शुक्रवार, ३१ मे, २०१९

शुगर अँड ब्राऊनीज - दारिया कोमानेस्क्यू (रोमानिया)


जेंव्हा कधी 'टिकटॉक' ओपन केलेलं तेंव्हा तेंव्हा हे गाणं कानावर आलेलं. आपली जिज्ञासा मूलतःच चौकस असल्यानं सवयीनं या गाण्याचा पिच्छा पुरवला.
मग हाती लागली एक सुंदर प्रेम कविता आणि एक संवेदनशील प्रतिभाशाली तरुण गायिका, कवयित्री.
दारिया कोमानेस्क्यू तिचं नाव. धारिया हे तिचं निकनेम.

शनिवार, २५ मे, २०१९

हुस्न, इश्क और बदन : गुजरी हुई जन्नत...

नवाबाच्या दरबारातलं पण आम आदमीसाठी खुलं असलेलं गाणं बजावणं 
मागे काही दिवसापूर्वी मुजरेवाल्या तवायफांवर एक लेख लिहिला होता. त्यातला एक संदर्भ लागतच नव्हता. लखनौमधील एक मित्र योगेश प्रवीण यांनी तो संदर्भ मिळवून दिला. एका जमान्यात बनारस हे तवायफ स्त्रियांचं मुख्य शहर होतं. सुरुवातीच्या काळात लोक त्यांच्याकडे लपून छपून जायचे. बाकी अमीरजादे या गल्ल्यात पाय ठेवत नसत कारण कैकांनी आपल्या बगानवाडीत अशा खंडीभर बायका ठेवलेल्या असत. या बायकांकडे जायचं म्हणजे पुरुषांना खूप कमीपणा वाटायचा. शिवाय लोकलज्जेचा मुद्दाही होता. पण हे चित्र एका माणसामुळे बदलले. त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. आपल्याला सिराज उद्दौला म्हटलं की फक्त प्लासीची लढाई आठवते. मात्र या खेरीजही या माणसाचं एक सप्तरंगी चरित्र होतं.

शनिवार, ११ मे, २०१९

गुलकी बन्नो आणि जग्गी ...


विख्यात हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत. त्यांची 'गुलकी बन्नो' नावाची एक कथा आहे. गुलकी नामक एका कुबड्या मध्यमवयीन स्त्रीचं भावविश्व त्यात रेखाटलं आहे. घेघाबुवाच्या ओसरीवर बसून भाजीपाला विकून गुलकी आपला चरितार्थ चालवायची. आपल्या पित्याच्या मृत्यूच्या पश्चात ती पूर्णतः एकाकी झालेली. तिचा नवरा मनसेधू यानं दुसरं लग्न केलेलं. खरं तर गुलकीला कुबड येण्यास मनसेधूचं वागणंच अधिक कारणीभूत असतं. गुलकी अल्पवयीन असतानाच मनसेधूसोबत तिचा विवाह झालेला असतो. खुशालचेंडू मनसेधूच्या संसाराचं ओझं उचलताना गुलकी दबून जाते. अतिकष्ट आणि शरीराची झिज यामुळे तिच्या पाठीवर कुबड येतं. वयाच्या पंचविशीत तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळं पसरतं. ती कंबरेत वाकते. देहाने आणि मनाने खचून जाते. घेघाबुवाच्या कट्ट्यावरल्या तिच्या भाजीपाल्याच्या दुकानाभवती गल्लीतली सगळी पोरंठोरं दंगामस्ती करत असतात. त्यांच्या खेळण्याचा तो ठिय्या असतो. ही पोरं तिथं खेळतही असतात आणि जोडीनंच गुलकीची यथेच्छ टिंगलही करत असतात. त्यांच्या दृष्टीने ती टवाळीचा विषय असते. या मुलांत जानकी उस्तादाची मिरवा आणि मटकी ही बहिण भावंडं सामील असतात. जानकी उस्ताद अज्ञात रोगानं मरण पावल्यानंतर ही भावंडं रस्त्यावर आलेली, त्यांना कुणी वाली नव्हता पण त्यांचं अल्लड बालपण अजून पुरतं सरलेलं नसल्यानं परिस्थितीच्या झळा त्यांना बसल्या नव्हत्या. ही भावंडंही रोगग्रस्त आणि अपंग होती. गोड गळ्याच्या बोबड्या मिरवाला गायला खूप आवडायचं. गुलकीच्या दुकानाजवळ बसून तो गायचा. गल्लीतल्या पोरांना रागे न भरणाऱ्या गुलकीचा मिरवा आणि मटकीवर विशेष जीव होता. मिरवा गाऊ लागला की त्याच्यासाठी ती मटकीपाशी खाण्याची जिन्नस देई. मिरवा आणि मटकीच्या कंपूत झबरी नावाची कुत्रीही सामील होती.