शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...

सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल. 

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

वेश्यांच्या जागांवर कुणाचा डोळा ?..

हजारो किमी अंतरावरील अफगाणी महिलांचा आपल्या लोकांना कळवळा आलाय यात वाईट नाहीये मात्र आपल्या बुडाखाली काय होतेय याचीही जरा माहिती ठेवायला हवी. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरातील 'गंगा जमुना' या रेड लाईट एरियात कर्फ्यू लावलेल्या घटनेस आता आठवडा होईल.
इथल्या बायकांचा आक्रोश कुणाच्या कानी पडत नाहीये कारण हा मुद्दा चलनात आल्याने कुणाचीच पोळी भाजली जाणार नाहीये.
उलटपक्षी या बायका देशोधडीला लागल्या तर लाखो कोटीहून अधिक किंमतीच्या जागा हडपण्याचे पुण्यकाम आपसात वाटून घेऊन करता येतं हे आपल्या लोकांना पक्कं ठाऊक आहे .

पोलिसांचे म्हणणे आहे की या भागात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातंय. गुन्हेगारांचा वावरही आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहेत. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्रीही होत आहे, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. परिसरातील नगरसेवक आणि संबंधितांनी गंगाजमनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गत बुधवारी रात्री गंगा-जमुना सील केली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली असं पोलीस सांगतात.

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

मैत्रीची अनोखी दास्तान : मार्टिना - ख्रिस



आपल्यापैकी किती जण टेनिसचे चाहते आहेत ठाऊक नाही आणि कितीजण या दोघींना ओळखतात याची कल्पना नाही. मात्र जे ह्या दोघींबद्दल जाणतात त्यांच्या लेखी या दोघीजणी म्हणजे टेनिसकोर्टवरच्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी होत. या दोघींनी तब्बल सोळा वर्षे नेटच्या दोन्ही बाजूंनी लढत टेनिसचं युद्ध खेळलं. त्या इतक्या त्वेषाने लढायच्या की प्रेक्षकांना स्फुरण यायचं. विशेषतः अंतिम सामन्यात या आमने सामने आल्या की क्रिडारसिकांना मेजवानी लाभे. त्या अक्षरशः तुटून पडत. दोघींना अफाट पाठीराखे लाभले होते. दोघींनाही मोठ्या संख्येत प्रेक्षक चिअरअप करायचे.
महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.