Sunday, March 31, 2019

पैंजण


झिपरीच्या माळावर एक दशक काढलेली कलावती इथं आली तेंव्हा तिनं वयाची पस्तीशी गाठलेली असली तरी तिच्या देहावर विशीतली गोलाई होती. केवड्यासारख्या कायेच्या कलावतीचं उफाडयाचं अंग आटीव दुधाच्या गोळ्यागत गाभूळलेलं होतं. तिच्या तटतटलेल्या घोटीव देहात रसरशीतपणा होता. चेहरयावरती विलक्षण आव्हान असायचं. अरुंद उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप तिला खूप शोभून दिसे. कपाळावरती गोंदलेलं तुळशीचं पान कुंकवाच्या आड दडून जायचं. पण जर एखाद्या चुकार दिवशी सकाळी नहायच्या आधी केस मोकळे सोडून दारापाशी रेंगाळत उभी असली की कपाळावरचं गोंदण पाहताच चित्त वेधून घेई. धनुष्याकृती कोरीव भुवयाखालचे मासुळी पाणीदार डोळे एकदा नजरेस भिडले की बघणारयाच्या काळजाचा ताबा घेत. मग त्या कैदेतून मुक्तता नसायची. अपऱ्या  नाकातली चकाकती मोरणी नकळत लक्ष वेधून घेई. तिच्या गोबऱ्या मुलायम गालावरची खळी जीवघेणी होती. लालचुटूक डाळींबी नाजूक जिवणीआडून मोत्यासारख्या शुभ्र चमकदार दंतपंक्ती डोकावून बघत तेंव्हा तिनं बोलतच राहावं असं वाटे. मखमली कंबरेला करकचून आवळून बांधलेल्या रुपेरी कंबरपट्ट्याने निराळीच शोभा येई. कंबरेची हालचाल होऊन पट्टा खालीवर सरकला की त्याआडचे रग लागून लालबुंद झालेले वळ ठसठशीत दिसत. मांसल दंडावरचे आवळून बांधलेले काळे कडदोरे लक्ष वेधून घेत. त्यात एखाद दुसरा ताविज लाल धाग्यात बांधलेला असे. मनगटाजवळ गोंदलेला नागिणीचा फणा हटकून डोळ्यासमोर तरळत राही. दांडरलेल्या लुसलुशीत पोटऱ्या उघड्या टाकून बसलेली असली की माणसं तिच्या भवताली गोंडा घोळत, तिचा पदर कधी ढळतो यावर बुभुक्षितागत लक्ष ठेवीत. मजबूत बांध्याच्या कलावतीनं काळ्याभोर केसांचा सैलसर अंबाडा बांधलेला असला की त्यावर अबोली मोगऱ्याचे अधाशी गजरे वेटोळे घालून बसलेले असत. जणूकाही तेच तिचा आस्वाद घेत ! खांद्यावरून घेतलेला पदर कंबरेला खोचून निवांत बसून असली की सैलसर रेशमी पोलक्यातून तिच्या छातीचा उभार स्पष्ट दिसे. त्यावर अल्वार रूळणारी सोनसळीची सर जादुई हालचाल करे. सोनसरीचे रेशमी लालबुंद गोंडे नागिणीगत तिच्या पाठीवर असा काही रुळत की तिला पाठमोरं पाहणारा देखील खुळ्यागत बघतच राही. हातातली बिल्वरे, अंगठ्या तिच्या समृद्धीच्या खुणा होत्या. माशाची नक्षी असलेली जाडजुड जोडवी बोटात इतकी घट्ट रुतलेली असायची की निघणं अशक्य वाटावं. विशिष्ट लयीत छुमछुमणारी पैंजणं म्हणजे तिच्या चाहुलीची सुरेल खुण होती.


Saturday, March 30, 2019

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव..

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव पूर्वप्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी दि.३०/०३/१९  
२१ मार्च रोजी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया' (आयसीस) या जहाल अतिरेकी संघटनेचा नायनाट झाल्याची बातमी जगभरात झळकली आणि उजव्या विचारसरणीच्या अनेक पाठीराख्यांनी सर्वत्र आनंद व्यक्त केला आणि इस्लामी मुलतत्ववादावर विजय मिळवल्याची भावना जाणीवपूर्वक दृढ केली गेली. अनेकांना 'आयसीस'च्या कथित पराभवापेक्षा इस्लामी कट्टरतावादयांना परास्त केल्याचं समाधान अधिक सुखावून गेली. आता इस्लामी मुलतत्ववाद आटोक्यात आणण्यास वेग येईल अशी भावना पसरवली जाऊ लागली, भाबड्या समर्थकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तशा कंड्या पिकण्यास सुरुवात केली. याला जगभरातल्या माध्यमांनी खतपाणी घातले. या सर्व आनंदावर विरजण घालणारे वृत्त 'द ऍटलांटिक' या नियतकालिकाने दिले आहे.


Monday, March 25, 2019

'विथड्रॉइंग अंडर फायर' - धर्मवादी फुटीरतावाद्यांसोबतच्या लढ्याचे मर्म


'विथड्रॉइंग अंडर फायर : लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज' हे जोशुआ ग्लेस यांचे पुस्तक आहे. डिसेंबर २०११ मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. सप्टेंबर २०११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील इस्लामिक मुलतत्ववाद्यांचा सिनेरिओ कसा बदलला आणि इस्लामिक विद्रोही फुटीरतावादी यांचा आकृतीबंध कसा बदलत गेला याविषयीचं भाष्य यात आहे. शस्त्रसज्ज इस्लामी विद्रोही (इन्सर्जन्ट) संघटनांशी लढताना जगभरात विविध ठिकाणी कशी आणि का माघार घ्यावी लागली या अनुषंगाने हे भाष्य येते. या संदर्भातल्या जगातील मुख्य सहा मुख्य घटनांचा आढावा त्यांनी पुस्तकात घेतला आहे. १९२० मधली ब्रिटीशांची इराकमधली माघार, १९६२ मधील फ्रेंचांची अल्जेरियातील माघार, १९८९ अफगाणीस्तानातून रशियाची माघार, १९९४ मधली अमेरिकन सैन्याची सोमालियातून माघार, २००० साली इस्राईलची लेबॅनॉनमधून माघार आणि २००५ सालची इस्त्राईलची गाझा पट्टीतली माघार यावर सटीक विवेचन आहे.Sunday, March 24, 2019

झिपरीचा माळ


गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबिंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. दहा बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येणार नाही. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुतवून ताठ उभी होती. आमराईपासून नजर टाकली की एक हे जंगलच वाटे. भरीस रात्रंदिवस कानावर पडणाऱ्या पक्षांच्या हर तऱ्हेच्या आवाजाच्या जोडीला मोकाट कुत्र्यांची येजा असल्यानं आवाजात काहीबाही भर पडे. झुडपांच्या बेचक्यातून अलगद बाहेर येणाऱ्या सापमुंगसांचं, विंचू काट्याचं भयही मोठंच होतं. गावाबाहेरील पीरसाहेबाच्या दर्ग्याकडून येणारा नागमोडी ओढा येथून पुढे उताराला लागत असल्याने उतरणीची अंगचण असलेल्या माळाच्या कडंनं बारमाही ओल असायचीओढ्यात असलेल्या दगडधोंड्यांवर चढलेलं शेवाळ क्वचितच सुकलेलं दिसे. या माळाच्या चौदिशेने दगडी चळत रचलेले भराव वजा बांध होते. ओढ्यातून येणारी ओल या गोलाकार बांधात पाझरलेली असल्यानं इथल्या दगडांच्या कपारीत उगवलेली केकताडं बाळसं धरलेल्या गुटगुटीत पैलवानागत बारमाही जोमात पसरलेली दिसत. आमराईच्या बाजूने येणाऱ्या वाटेनं मधे येणारा आडवा बांध टोकरून त्यात पाऊलवाट बनवलेली. माणसांनी येजा करून ही नागमोडी वाट एकदम पक्की केलेली. आषाढात सगळ्या माळावर चिखल असला तरी या वाटेवरनं सहज येजा व्हायची इतकी या वाटेवरची माती टणक झालेली. गावात दिवेलागण झाली की या पायवाटेवरची येजा वाढलेली राही. उदबत्तीचा धूर हवेत विरावा तसा उजेडात अंधार मिसळत गेला की झिपरीच्या माळाबाहेर दोनचार निलट माणसं रेंगाळताना दिसत. गावातल्या कुण्या माणसानं त्यांना हटकलं की ती खोटी खोटी हसतउसनं अवसान आणून रामराम ठोकीत आणि पुढं निघून गेल्यासारखं करीत. मात्र विचारपूस करणाऱ्याची पाठ वळली की हे पुन्हा माघारी फिरत. डोळ्यात बोट घातल्यावर समोरचं दिसेनासं होई असा घनगर्द अंधार पडला की मग मात्र तिथल्या वर्दळीची भीड चेपलेली राही. सपासप ढांगा टाकत केकताडं ओलांडून झिपरीच्या माळातल्या झाडाझुडपांत ही माणसं दिसेनाशी होत.


Sunday, March 17, 2019

पिंपळाची पालवी..

पिंपळाची पालवी उत्तरार्ध

काळाच्या भट्टीत आयुष्याचं पोलाद जोरदारपणे शेकून घेतलेल्या दादूचा चेहरा एकसारखं विस्तवापुढं बसून रापून गेला होता. विस्तवातून उडणारया धुरांतल्या कणांमुळे त्याच्या अंगांगावर राखाडी काळसर लेप चढला होता. जणू काही ग्रीस लावलंय असा त्याचा अवतार दिसत होता. एका हाताने भाता हलवत मध्येच एका हाताने भट्टीतल्या विस्तवातले लोखंडाचे जुने तुकडे सांडशीने वरखाली करताना त्याची नजर ठिणग्यांकडं होती आणि चित्त मात्र जालिंदरकडं होतं. पोटात आकडी यावी तसं तोंड करून हातवारे करत जालिंदर त्याला तावातावाने बोलत होता. भात्याला लागून मागं बसलेली गोदाकाकू भांबावलेल्या मुद्रेनं दोघांकडे बघत होती. एकीकडं नवरा आणि एकीकडं पोरगा यांच्या कात्रीत ती सापडली होती. जालूचं कर्कश्य बोलणं वाढत चाललं तसं दादूकडून भात्याची गती आपसुक वाढत होती. भट्टीतल्या विस्तवात लालनिळ्या आगीच्या हलक्या ज्वाळा उठू लागल्या
, त्याची धग सगळीकडं जाणवू लागली. 


Sunday, March 10, 2019

तुमचं आमचं (!) 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' आणि फेसबुक ....


विख्यात अमेरिकन चित्रकार अँड्रयू वाईथ याने काढलेल्या 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' या पेंटींगसारखी फेसबुकची अवस्था झालीय. या पेंटींगला एक अर्थ आहे, याच्यामागे एक ट्रॅजेडी आहे. एक करुण कथा आहे. एक सत्यघटना आहे. लेखाच्या अखेरीस ती नमूद केलीय. पण त्याआधी खालील परिच्छेद वाचले तर या ब्लॉगपोस्टचा अर्थ कळेल.


Sunday, March 3, 2019

अखेरचा चुडामालनबाईचा हात मखमलीसारखा होता. गावात एकही बाई अशी नव्हती की जिला मालनबाईचा हात लागला नव्हता. लहानग्या पोरीपासून ते कंबरेत वाकलेल्या अन लटालटा मान कापणाऱ्या आज्जीबाईलाही ती परिचयाची होती. मालनचं काम कासारणीचं. पिढीजात चालत आलेलं. मालनच्या माहेरी देखील हाच व्यवसाय होता. ती नगर जिल्ह्यातल्या पारनेरची. तिच्या घरी असलेल्या बांगडयाच्या व्यवसायाची तिला पहिल्यापासूनच स्त्रीसुलभ ओढ होती. बालवयातलं आकर्षण हळूहळू संपुष्टात आलं ते कळत्या वयात. घरात अठरा विश्वे असणारं दारिद्र्य आणि गावगाड्याच्या जीवावर चालणारी गुजराण तिच्या कुटुंबाची पुरती फरफट करणारी होती. खाणारी तोंडं भरमसाठ आणि तुटपुंजं उत्पन्न यामुळं तिच्या वडीलांनी एकेक करून मुली लवकर 'कटवल्या'. तो काळ 'केले असेल पाप तर मुली होतील आपोआप' या पंक्तीवर दृढ श्रद्धा असणारा होता. खायला जड झालेल्या मुलींच्या अंगाला हळद लागताना मालनच्या वडीलांनी फारशी चौकशी न करता येतील त्या स्थळांना होकार भरला आणि जबाबदारीतून ते मोकळे झाले. मालन लग्न होऊन आल्यापासून घाण्याच्या बैलासारखी कामाला जुंपलेली. त्याशिवाय हाता तोंडाची गाठही पडत नव्हती. लहानपणी सदोदित किनकिनणाऱ्या फिरोजाबादी बांगडयाच्या सहवासात राहणाऱ्या मालनला रानात रोजंदारीवर काम करावं लागत होतं. सासरचा बांगडयांचा व्यवसाय होता पण त्यात किती लोकांचे हात लागत होते हे तिला ठाऊक होतं. नवरा वासुदेव नाकापुढं बघून चालणारा साधासुधा माणूस. त्याला दोन भावंडं. सगळ्यांची लग्ने झालेली. वासुदेवाची आई पारूबाई जुनाट वळणाची बाई. सगळं घर तिनं आपल्या धाकात ठेवलेलं. त्याला आणखी एक कारण होतं, थोरल्या पोराच्या लग्नानंतर दोन पोरं आणि दोन पोरी पाठीमागं ठेवून तिचा भ्रतार आजारपणात गेलेला. तेंव्हा एकाच वेळी शेतशिवाराचं काम सांभाळत तिनं पिढीजात कासाराचा धंदाही जिवंत ठेवला होता. गावात तिच्या भावकीतलं एक घर होतं. पारूबाईचा नवरा निवर्तल्यावर त्यांनी बांगडयांच्या व्यवसायास हात घालण्याचा प्रयत्न केलेला पण तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असणाऱ्या मेहनती पारूबाईपुढं त्यांची डाळ शिजली नाही. गावाने देखील रंडक्या बाईच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. पण एक अट घातली. अट म्हणजे काय तो जुलूमच होता. पारूबाईनेच कासारणीचा धंदा करावा पण बांगडया भरायला तिनं येऊ नये, तिच्या ऐवजी ज्येष्ठतेनुसार थोरल्या सुनेनं यावं ही ती अट. ती ऐकून पारूबाईच्या पोटात गोळा आलेला, पायाखालची माती सरकलेली. मेल्याहून मेल्यासारखं झालं तिला. पण तिनं होकार दिला. भावकीच्या नाकावर टिच्चून तिनं सुनेच्या हाती व्यवसाय सोपवला. पोरींची लग्ने केली. उरलेल्या पोरांना सुना आणल्या. त्यात सगळ्यात धाकटी मालन होती.


Saturday, March 2, 2019

माध्यमांतला युद्धज्वर - सारेच दीप मंदावले नाहीत !पुलवामा हत्याकांडाच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. जवानांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून देश शोकाकुल झाला. सर्व पक्ष, संघटना सरकारच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सामान्य नागरिक आपला क्रोध, शोक मिळेल त्या स्पेसमध्ये व्यक्त करू लागला. अशा नाजूक, गंभीर आपत्तीकाळात नागरिकांच्या आणि व्यवस्थेच्या संतापाचे, शोकाचे, प्रतिशोधाच्या भावनेचे नेटके, संयत प्रकटन माध्यमातून होणं नितांत गरजेचे असते पण दुर्दैवाने आपल्या माध्यमांच्या अकलेचे दिवाळे निघालेलं असल्यानं याही वेळेस त्यांनी माती खाल्ली. यात वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियाच्या खांद्यास खांदा भिडवून आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवताना लाजिरवाणा पोरखेळ केला.