रविवार, १० मार्च, २०१९

तुमचं आमचं (!) 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' आणि फेसबुक ....


विख्यात अमेरिकन चित्रकार अँड्रयू वाईथ याने काढलेल्या 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' या पेंटींगसारखी फेसबुकची अवस्था झालीय. या पेंटींगला एक अर्थ आहे, याच्यामागे एक ट्रॅजेडी आहे. एक करुण कथा आहे. एक सत्यघटना आहे. लेखाच्या अखेरीस ती नमूद केलीय. पण त्याआधी खालील परिच्छेद वाचले तर या ब्लॉगपोस्टचा अर्थ कळेल.

सुरुवातीला फेसबुक तरुण होतं, त्यात उमदेपण होतं, नावीन्य होतं. अगदी रसरशीत होतं. फेसबुक सुरु झाल्याबरोबर तरुणांच्या त्यावर उड्या पडल्या होत्या. आता हे चित्र बदललंय. फेसबुक वापरणाऱ्या लोकांचा वयोगट आणि त्यांची आवडनिवड यावर सोशल मीडियाचे अभ्यासक सतत मते घेत राहतात. त्यातून ते विविध निष्कर्ष नोंदवतात. फेसबुकच्या वापरकर्त्यांचा आणि फेसबुकच्या लोकप्रियतेचा एक परस्परावलंबी रेशो आहे. फेसबुकचे निम्म्याहून अधिक वापरकर्ते तरुण होते तेंव्हा फेसबुक सर्वात मोठी सोशल मीडिया नेटवर्किंग साईट होती. आता ते स्थान कधीच खाली घसरलेय. १४ ते २४ वयोगटातले फेसबुक युजर केंव्हाच सायोनारा करून निघून गेलेत. जे आहेत त्यांचे एकुणात प्रमाण नगण्य आहे. फेसबुक निघालं तेंव्हा डिजिटल साक्षरता नसल्याने पन्नाशीच्या पुढचे लोक क्वचित दिसायचे. त्यांचे कौतुक व्हायचे. आता पंचेचाळीशीच्या पुढचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २५ ते ४० वयोगटाचे वापरकर्ते अधिक आहेत, त्या खालोखाल ४० ते ५० या वयोगटाचे युजर्स आहेत. त्या नंतर ५० ते ६५ वयोगटातले वापरकर्ते आहेत. २५ ते ४० वयोगटातील लोक 'रम्य ते बालपण' आणि भूतकाळ यात अधिक रमतात. तर ४० ते ५० हे राजकारण आणि सामाजिक खाजखरुज यात जास्त रस घेतात. ५० ते ६० त्यांच्या तारुण्यातील आठवणींवर भर देणाऱ्या गोष्टींना उजाळा देतात. ६० ते ६५ हे निव्वळ प्रेक्षक असतात. या समग्र सूत्राला नक्कीच काही अपवाद असतील.

तर झालेय असे की हे तीनही गट रोमान्स, प्रेम, काल्पनिक विश्व, प्रतिभाधारित गोष्टी, चित्रकला, शिल्पकला, साहित्य यात जास्त रमत नाहीत. उखाळ्यापाखाळ्या काढणे यावर अधिक भर राहतो. राजकीय धार्मिक जातीय आक्रोशाने कटुतेच्या सर्व सीमा पार केल्यात. शिव्यागाळ, कुत्सित टोमणेबाजी, कंपूगिरी, भाटगिरी याला ऊत आलाय. एक्स्ट्राअफेअर्सवरही जोर असतो. क्रियाशीलता हा सळसळत्या तरुणाईचा गुण फेसबुकने कधीच गमावला आहे. या दोन वर्षात तर अनेक युजर्स सातत्याने आपलं खाते डीएक्टीव्हेट करून पुन्हा पुन्हा ये जा करताना दिसलेत. इंस्टाग्रामवरील फोटोचॅट, व्हिडीओचॅट, व्हिडीओ ऍप्सनी (टिकटॉक, म्युझिकली इ.) तरुणाईला भुरळ घातलीय. ते त्या विश्वात सुखी आहेत. इथे आहे तरी काय पराकोटीची द्वेषमूलकता, तिरस्कार, राजकीय हेत्वारोप, वाढते बाजारू विक्रीचे स्वरूप, तोच तोच नॉस्टॅल्जीकपणा आणि त्याच त्या शिळ्या कढीचा ऊत ! वेब सिरीजचे प्रेक्षक वाढले आणि टीव्हीवरील डेली सोप्स व चित्रपटगृहावर त्याचे जसे वेगाने परिणाम झाले तसं फेसबुकचं झालंय. खेरीज फेसबुकने डेटाच्या बारा भानगडी करून विश्वासार्हता गमावली आहे. व्हॉटसएपचे देखील उतरते दिवस सुरु झालेत. हे असं का घडलं याचं कारण वापरकर्त्यांचे हेतू वेस्टेड इंटरेस्टमध्ये अधिक गुंतत राहिले आणि करमणूक, टाईमपास, जवळीक या बाजूने ते आकुंचन पावत गेले.
येत्या काही वर्षात हे चित्र अधिक भीषण होईल. एखादे नवे चॅटऍप मोस्टली गुगलचेच नवे फिचर ज्याचे नाव अजून जाहीर झालेलं नाही, ते ही जागा भरून काढेल. तोवर जे युजर्स सक्रिय राहतील त्या युजर्सची आणि फेसबुकची अवस्था अँड्रयू वाईथ यांच्या 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' या पेंटीगसारखी होईल.

'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' हे एका खऱ्याखुऱ्या स्त्रीचे चित्र आहे. ऍना ख्रिस्टीना ओल्सन हे तिचे पूर्ण नाव. ती चार्को-मेरी-टूथ (CMT) डिसीजने ग्रस्त होती. या व्याधीत पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम बाधित होते. हळूहळू मांस झडून जाते, त्वचेची स्पर्श संवेदना नष्ट होत जाते. ताकद कमी होते, स्नायुंवरील ताबा ढासळत जातो. उभं राहणं अशक्य होत जातं. हा आजार बहुतांशी अनुवांशिक असतो. याच्यावर नेमके उपाय अजूनही ज्ञात नाहीत. एके दिवशी अँड्रयू वाईथने त्याच्या घराच्या खिडकीतून पाहिलं की ख्रिस्टीना खुरडत खुरडत तिच्या घराकडे अक्षरशः सरपटल्यागत जात होती. ते दृश्य पाहून त्याला गलबलून आलं. त्यानं ख्रिस्टीनाला अशा अवस्थेत क्वचित पाहिलं होतं. १९४० ते १९६८ च्या दरम्यान त्याच्या विविध कलाकृतीत ख्रिस्टीना आणि तिचा भाऊ सब्जेक्ट बनून येत राहिले. पण या कलाकृतीत ती दिसत नाही पण तिचं सगळं विश्व दिसतं.

या पेंटींगच्या वेळेस ती ५५ वर्षांची होती. एके काळी काहीशी धडधाकट असलेली ख्रिस्टीना वाढत्या वयानुसार अधिकाधिक विकारग्रस्त होत गेली. ख्रिस्टीनाच्या पायात ताकद उरलेली नव्हती. हातांच्या जोरावर ती खरडत खरडत घराकडे निघाली होती. चित्रात ख्रिस्टीना दिसते आणि तिच्या भोवताली सगळीकडे वाळून जायच्या बेतात आलेलं पिवळं पडलेलं निर्जीव असं गवताळ कुरण दिसतं. दुरून डौलदार वाटणारं पण डार्क ग्रे शेड असलेलं तिचं टुमदार घर दिसतं, बाजूची दोन तीन छोटी घरेही त्याच शेड मध्ये दिसतात. काही अंतरावर असलेलं दुसरं एक घर उगाचच उदास वाटतं. ख्रिस्टीनाच्या घराकडे जाणारा कोरीव रस्ता अजूनच बेचैन करून जातो. बहुधा त्यावरून वाहनांची येजा काहीच नसावी कारण त्या वाटेत देखील बरंचसं गवत दिसतं. क्षितीज दिसत नाही पण आभाळ उगाच मळभ दाटून आल्यासारखं दिसतं. हा परिसर कधीकाळी चैतन्याने प्रफुल्लित असेल का किंव होईल का असा प्रश्न नकळत मनात येऊन जातो.

या पेंटींगमध्ये जोश नाहीये, कमालीची स्थिरता आहे, अगम्य करुण झाक आहे. कधी काळी हा सगळा भाग हिरवागार असेल, त्या घरांत रौनक असेल, माणसांची वर्दळ असेल, घरांजवळ झाडं असतील, आसमंतात पक्षी असतील, एक चैतन्य भरभरून असेल. पण आता ते सगळं लोप पावलंय. आता एक आस उरलीये ती ख्रिस्टीनाची आहे. काहीही करून हाल अपेष्टा सोसून तिला आपलं ध्येय गाठायचे आहे. तिला घरात जायचेय. तोवर चित्रात दिसणारं दीर्घ अंतर तिला कुणाच्याही सोबतीविना कापायचे आहे. फेसबुक आणि फेसबुक युजर्सची अवस्था अनुक्रमे या चित्रातील ख्रिस्टीनाच्या विश्वासारखी आणि ख्रिस्टीनासारखी झालीय. या चित्राकडे पाहून प्रश्न पडतो की येथे पुन्हा हिरवाई येईल का, ख्रिस्टीना पूर्ववत बरी होईल का ? तसाच प्रश्न मला फेसबुकबद्दल पडलाय.

फेबु हे एक माध्यम आहे, याचा इतका काय विचार करायचा असं म्हणून मुद्दा टाळता येईल पण 'राईज आणि फॉल'ची गणिते समजली की आपल्याला त्या मुशीत एकजीव होणं सोपं जातं. अर्थात ही एक सामाजिक प्रकिया आहे. पण यातून देखील खूप काही शिकता येतं आणि आपल्यात सुधारणा करता येतात. असो. हे चित्र इतकं गाजलं की अमेरिकेतील नॉक्स काउंटीतील क्युशिंग या गावातलं ख्रिस्टीनाचं हे घर फर्न्सवर्थ आर्ट्स म्युझिअम या संस्थेने देखभासाठी स्वतःकडे घेतलं. अमेरिकेच्या नॅशनल हिस्टॉरिक लँडमार्कमध्ये याचा समावेश झाला आहे. काही काळानंतर अँड्रयू वाईथने त्याचे घर आणि चित्रकलेची जागा दोन्हीत बदल केला. पण हौशी रसिक लोक आजही ख्रिस्टीनाच्या घराला भेट देतात. ही कुरणे डौलदार हिरवी असतील, इथं रसरशीत माणसांचा राबता असेल, पक्षांची किलबिल असेल, झाडंझुडपं असतील तेंव्हा हा परिसर नक्कीच रम्य वाटत असेल.


आता काही दिवसांत देशभरात निवडणुकांचा ज्वर चढेल फेसबुकही त्याला अपवाद असणार नाही. तेंव्हा त्यात चिखलफेक होणं ठरलेलं असणार आहे. जातीधर्मद्वेष टोकाला जाईल, व्यक्तीगत पातळीवरची टीका कमालीच्या हीन स्तरावर जाऊन पोहोचेल. मत्सर आणि इर्षा यांचं गलिच्छ प्रदर्शन होत जाईल आणि सरते शेवटी सभ्यतेचं वस्त्रहरण ठरलेलं असेल. अशा वेळी काही रम्य आणि शांत स्पेस शोधणं हे आताच क्रमप्राप्त ठरेल अन्यथा कर्कश्श्य कोलाहलाच्या भोवऱ्यात आपण कधी आणि कसे अडकून पडू हे आपल्यालाही उमगणार नाही. इथं आपण काय शोधायचं हे आपल्या हाती आहे हे ही खरं आहे आणि इथं गुंतून राहिलो तरी बाह्य वास्तव जगात निर्णय घेताना, धोरण ठरवताना आपला विवेक जागा ठेवूनच आपण निर्णय घ्यायचा आहे हे खरं आहे..                 

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा