सोमवार, २५ मार्च, २०१९

'विथड्रॉइंग अंडर फायर' - धर्मवादी फुटीरतावाद्यांसोबतच्या लढ्याचे मर्म



'विथड्रॉइंग अंडर फायर : लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज' हे जोशुआ ग्लेस यांचे पुस्तक आहे. डिसेंबर २०११ मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. सप्टेंबर २०११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील इस्लामिक मुलतत्ववाद्यांचा सिनेरिओ कसा बदलला आणि इस्लामिक विद्रोही फुटीरतावादी यांचा आकृतीबंध कसा बदलत गेला याविषयीचं भाष्य यात आहे. शस्त्रसज्ज इस्लामी विद्रोही (इन्सर्जन्ट) संघटनांशी लढताना जगभरात विविध ठिकाणी कशी आणि का माघार घ्यावी लागली या अनुषंगाने हे भाष्य येते. या संदर्भातल्या जगातील मुख्य सहा मुख्य घटनांचा आढावा त्यांनी पुस्तकात घेतला आहे. १९२० मधली ब्रिटीशांची इराकमधली माघार, १९६२ मधील फ्रेंचांची अल्जेरियातील माघार, १९८९ अफगाणीस्तानातून रशियाची माघार, १९९४ मधली अमेरिकन सैन्याची सोमालियातून माघार, २००० साली इस्राईलची लेबॅनॉनमधून माघार आणि २००५ सालची इस्त्राईलची गाझा पट्टीतली माघार यावर सटीक विवेचन आहे.

२०११ मध्ये अमेरिकन सैन्य इराकमधून माघारी बोलवण्याची नामुष्की बुश यांच्यावर का आली याची चिकित्सा करताना व्हिएतनाममध्ये मिळालेल्या शिकस्तीचा नेमका संदर्भ पुस्तकात आला आहे. हे सर्व आता लिहिण्याचे कारण म्हणजे सणकी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी सिरीयातून अमेरिकन सैन्य माघारी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. खरं तर त्यांनी अफगाण, इराक आणि सिरीया या तिन्ही 
देशातील सैन्य माघारी बोलवलं आहे. त्याहून पुढे जात त्यांनी आता तालिबानशी बोलणी करण्याचा घाटही घातला आहे. 'जगासाठी अमेरिका आता झिजणार नाही त्याबदल्यात इस्लामी विद्रोहवाद्यांनी आमच्या भूमीवर दहशतवादी कारवाया करू नयेत' असा ट्रम्प यांचा पवित्रा आहे. जगभरातून त्यांची नालस्ती होत असली तरी ते त्याला भीक घालत नाहीत कारण त्यांच्या देशात त्यांना या साठीचं समर्थन काँग्रेससह रस्त्यावरही मिळतं आहे. या निर्णयाचा अंमलबजावणीनंतर इस्लामी विद्रोहवादी मोकाट होतील आणि त्यांना आवरणं कठीण होणार आहे.

अशा वेळेस काय करायला हवं याचा विचार विनिमर्श थंड डोक्याने केला पाहिजे. हा गुंता कसा सोडवता येईल यावर अत्यंत मार्मिक विश्लेषण या पुस्तकात आहे. इस्लामी

मुलतत्ववादयांसोबत लढताना अमेरिकेस नकळत माघार का घ्यावी लागली हे स्पष्ट करताना लेखक  म्हणतात की ज्या अट्टाहासापायी आपल्या मुख्य भूमीला धोका होऊ लागतो, आपली एकता आणि सार्वभौम रचना धोक्यात येऊ लागते, लोकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ लागतो व धर्म- पंथ यावर आधारित दरार पडू लागते तेंव्हा शासकांनी प्रथम प्राधान्य आपल्या मुख्य भूमीच्या संवर्धनास दिलं पाहिजे त्यासाठी विद्रोहयांच्या समोर बोलणी करताना प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही. पण त्यापायी अशा गोष्टी पणाला लावणं योग्य नाही ज्यांच्या जडणघडणीस शतकांचा काळ लागलेला असतो.

आपल्याकडील उजव्या विचाराच्या लोकांना इस्त्राईलच्या कडवट राष्ट्रवादाचे आणि त्याआडून सुरु असलेल्या इस्लामविरोधाचे खूप आकर्षण असते. सर्वाधिक मारक क्षमता आणि खुन्नस असलेल्या इस्त्राईलने देखील लेबॅनॉन आणि गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेऊन तिथला ताबा सोडून दिला. इस्त्राईलला असं का करावं लागलं याचं विश्लेषण करताना 

लेखक जगभरातील ज्यूंच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरील इस्त्राईलच्या दृष्टिकोनाचं आणि इस्त्राईलच्या आयसोलेशनच्या भीतीचं लॉजिक मांडतात. या पुस्तकातील सहाव्या प्रकरणाच्या प्रारंभी इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसच्या (IDF) वतीने लेबॅनॉनमधील सैन्यमाघारीचं कारण देताना एक महत्वाचं वक्तव्य केलं गेलं त्याचा दाखला देण्यात आलाय. त्यात म्हटलंय की, "अतिरेकी वा कर्मठ इस्लामी मुलतत्ववादयांच्या कडून होणाऱ्या हल्ल्यांना दहशतवादी म्हणून ट्रीट करण्याऐवजी परंपरागत सैन्यदले म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. कारण आपली ताकद ही आपल्या पोलीस दलात नसून सैन्यदलात असते, तिथे तोफखाना असतो, हवाई दल असतं, हेलिकॉप्टर्स असतात. त्यांचाच वापर केला पाहिजे. मग पोलीस दले त्यांना असलेलं समाज रक्षणाचं काम करतील." या म्हणण्याचा अर्थ असा होता की लेबॅनॉनवर ताबा ठेवण्यासाठी आपण आपली यंत्रणा तिथं राबवत आहोत आणि हे हल्लेखोर काही केल्या सरळ होत नाहीत. त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी स्थायी स्वरुपात सैन्य तैनात न करता घटनेनुसार सैन्यदलाची आयुधे वापरली पाहिजेत आणि पोलिसांना गृहरक्षणाचंच काम दिलं पाहिजे. हेजबोल्लाह या अतिरेकी संघटनेने आखलेली नागरीवस्त्यातून आक्रमण करण्याची नीती मोडून काढण्यासाठी इस्त्राईलला आधी लेबॅनॉनमधून माघार घ्यावी लागली याकडे लेखक लक्ष वेधतात.

दीर्घ काळ चालणाऱ्या या लढ्यात इस्लामी मुलतत्ववादीच जिंकतात असं नसून ते हरतात पण समोरच्यास नमवतात. जोडीने त्या भागाचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नुकसान ते करतात त्याची मोजदाद कशात करणार हा लेखकाचा प्रश्न आहे. या अनुषंगाने कश्मीरमधील 

इस्लामी विद्रोहवाद्यांचे विश्लेषण करायचं झालं तर पुलवामा हल्ल्यानंतर कामरान या जैशच्या अतिरेक्याच्या चकमकीच्या घटनेचा उल्लेख करता येईल. हा अतिरेकी त्याच्या सहकाऱ्यासह जिथं लपला होता त्याच्याशी आपल्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून चकमकी केल्या. त्यात दोन्ही बाजूनी जीवितहानी झाली. या पुस्तकात ज्या सहा मुख्य सैन्य माघारीच्या घटनांचा इतिहास मांडलाय तिथे आपल्या सुरक्षाकर्मींची, जवानांची प्राणहानी होऊ न देणे यावर खूप ध्यान देण्यात आलंय. विद्रोही मारण्याच्या नादात आपली माणसं मारली जावीत हे त्या देशांना मान्य नव्हते. आपल्याकडील चित्र तसं नाहीये. बऱ्याचवेळा समान जीवित हानी असते तर कधी कधी ती क्षतीग्रस्त विद्रोहयांच्या संख्येहुन अधिक असते. आपण याला गांभीर्याने घेत नाही हा आपला जुना प्रॉब्लेम आहे. आपल्या प्रत्येक जवानाची जीवित हानी झाल्यानंतर आपल्या मुठी वळल्या जात नाहीत हा आपला दोष आहे. सैन्याची आयुधे न वापरता कश्मीरमध्ये सैन्य तैनात केलेलं आहे आणि दहशतवादयांशी लढताना 
पोलीसदलाकडे जी हत्यारे असतात तशा हत्यारांनी आपलं सैन्यदल अतिरेक्यांशी दोन हात करतं. म्हणजे दोन्ही बाजूनी आपली पंचाईत आपण करून ठेवलेली आहे. कश्मीरी जनतेस आणि जगास वाटते की भारतीय सैन्यदले कश्मीरमध्ये डेरा टाकून बसली आहेत आणि सामान्य कश्मीरींच्या नागरी हक्कांचे तिथे दमण होते. प्रत्यक्षात तिथं तैनात असलेली सेनादले युद्धजन्य सामग्री न वापरता पोलिसी हत्यारानिशी लढतात ! नेमकी हीच चूक आक्रमणकर्त्या देशांच्या ध्यानी आल्यावर त्यांनी आपलं सैन्य त्या त्या प्रांतातून मागे घेतलं असं यात म्हटलंय. जिथं जिथं मुलतत्ववादी आहेत त्यांच्याशी लढताना एका सशस्त्र सेनेशी आपण लढत असल्याचा अविर्भाव असायला हवा आणि महत्वाचे म्हणजे त्यावेळी तिथल्या जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्वास असायला हवा हे सोल्युशन यातून मिळते.कश्मीरी जनतेच्या मनात जोवर सरकारबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण होत नाही तोवर आपण उचललेली सर्व पावले दिशाहीन ठरतील. एका प्रतिहल्ल्याने काहीच साध्य होणार नाही. यासाठी अतिरेक्यांचे दमण आणि सामान्य काश्मिरींच्या मनात विश्वासदर्शकता दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी प्रयत्न व्हायला हवेत. काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याच्या गोष्टी करत असताना देश हिंदुत्ववादी होऊ शकत नाही ही खरी मेख आहे.

याच विषयावरचं आणखी एक पुस्तक प्रसिद्ध आहे, 'वेजिंग इनसर्जंट वॉरफेअर' हे त्याचं नाव. सीथ जोन्स हे त्याचे लेखक. वॉशिंग्टन डीसी, अमेरिका येथील विख्यात जॉन हॉफकिन्स 

युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ऍडव्हान्सड् इंटरनॅशनल स्टडीज मध्ये ते सहाध्यायी प्राध्यापक आहेत. ते स्वतः या पुस्तकाची व्याख्या एका ओळीत अशी करतात - 'हे केवळ वास्तववादी हॅन्डबुक आहे जे विद्रोहातून उद्भवणारी युद्धजन्य स्थितीसमजून घ्यायला मदत करते.' या पुस्तकात अमेरिकेने इराक आणि अफगाणीस्तानातून केलेल्या सैन्यपरतीच्या कालक्रमावर प्रकाश टाकलाय. इस्लामी विद्रोहावर नियोजनबद्ध व्यूहरचना करण्यात अमेरिका कमी पडली असं त्यांचं मत.

इस्लामी मुलतत्ववादयांच्या विद्रोहास लोकांची साथ का मिळते यावर ते लिहितात, 'आधीच कमी असलेलं उत्पन्न घटत जाणं, धार्मिक धृवीकरण आणि पंथीय भेदातून उद्भवलेलं आक्रमक नैराश्य ही कारणे जिथे जिथे जनतेत वाढीस लागतात तिथे इस्लामी 

मुलतत्ववादयांचे फावते. याच्या जोडीला मग विद्रोही अशी व्यवस्था तयार करतात की तिथं अस्तित्वात येणारं प्रत्येक सरकार तकलादू आणि कुचकामी वाटू लागतं. भरीस भर म्हणजे अशा भागातील उत्पन्नाच्या साधनांवर ते आपलं नियंत्रण ठेवतात. अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या भागातले बेरोजगार, भुकेले, अल्पशिक्षित, नडलेले, गरजू, धर्मवादी, अंधानुयायी, मानसिक खच्चीकरण झालेले तरुण खूप सहजतेने विद्रोही इस्लामी मुलतत्ववादयांकडे सहज वळू लागतात. जोन्स लिहितात की हा फ्लो जे सरकार वा जी यंत्रणा थांबवू शकते त्यांनाच त्या भागात या समस्येवर यश मिळू शकतं. पण ते स्थायी नसून कालबद्ध असतं कारण एकदा धार्मिक कट्टरतावादाची पाळेमुळे रुजली की ती काही पिढ्या तरी जारी राहू शकतात. अशा वेळी मुलतत्ववाद्यांचे बंड मोडून काढण्यासाठी केवळ लष्करी कारवाई हे उत्तर कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याने फार तर काही काळ मानसिक समाधान मिळते पण मूळ समस्या आहे अशी राहते. असं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय.

बगदादच्या उत्तरेस असलेल्या अल ताजी या साल्दिन परगण्यातील शहरात आघाडी राष्ट्रांच्या फौजांचा बेसकॅम्प होता. तिथं अमेरिकन सैन्यास इस्लामी विद्रोहयांवर प्रतिहल्ले करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. एकाच प्रकारच्या हल्ल्यासाठी रस्ते, 
टेकड्या, वस्त्या आणि जंगले अशा विषम भौगोलिक ठिकाणी आक्रमणाच्या पद्धतीत बदल करताना नागरी कौल आपल्या बाजूला कसे वळवायचे, सैनिकांचे मनोबल कसे वाढवायचे, त्यांच्याकडे कोणती हत्यारे असली पाहिजेत या सर्व मुद्द्यांवर खल केला आहे. प्रतिहल्ल्याचा सेटअप लावताना तिथलं नागरी जीवन सरकारच्या बाजूने नसेल तर त्या हल्ल्यातून मिळणाऱ्या यशाची किंमत कवडीमोल ठरते असं त्यांनी येथे सुनावलं होतं. अमेरिकन सैन्य तब्बल दीड दशक अफगाणीस्तान, इराक भागात राहिलं आणि अखेर ठोस काही हाती न लागता परत चाललंय हे इथं ध्यानात घेण्याजोगं आहे. ज्या देशात इस्लामी मुलतत्ववाद्यांचा विद्रोह वाढत चालला आहे त्या प्रत्येक देशाच्या यंत्रणेने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे असं निकोलाय केरी हे ख्यातनाम समीक्षक सांगतात.

इराक आणि सिरीयातून अमेरिकन सैन्यदले माघारी फिरल्यानंतर इस्लामी बंडखोरांना अफाट बळ मिळणार आहे. पुलवामा ही त्याची झलक आहे. सरकारने आपल्या नीतीत बदल केला 

नाही तर मोठी जीवित वित्त हानी येत्या काळात झाल्यास नवल वाटणार नाही. जोशुआ ग्लेस यांनी पुस्तकाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे इस्लामिक विद्रोहातून काही धडे मिळाले आहेत आणि ते उमजले नाहीत तर कठीण आहे. त्यांनी कदाचित यामुळेच 'विस्तवातून माघार : इस्लामिक विद्रोहातून शिकलेले धडे' ( विथड्रॉइंग अंडर फायर - लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज) असं शीर्षक पुस्तकाला दिलंय. कश्मीरचा वणवा आपण विझवतो की त्यात आपले हात पोळून घेतो हे येणारा काळच सांगेल पण तोवर ही पुस्तके तिथली परिस्थिती कशी हाताळायची यावर मार्ग दाखवत राहतील..

- समीर गायकवाड.

इस्लामिक खलिफतचा दावा करून विद्रोह पुकारल्या गेलेल्या भागाचा नकाशा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा