
आपल्याकडे काहींना वाटते की, या फाइल्सचे तपशील अमेरिकन संसदेत सार्वजनिक केल्यानंतर राजकीय घडामोडींना उत येईल.
असे काही होईल की नाही हे काही तासांनी कळेलच. तूर्त एपस्टीन फाइल्सची आणि या मागच्या विकृत वासना कांडांची माहिती.
एपस्टीन स्वतः सेक्स हाउंड होता, विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले अशातली बाब नव्हती त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा शोषण केले.
दोन दशकं तो हा उद्योग करत होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट होते. तिथे तो या ओंगळवाण्या श्रीमंतीच्या चिखलात बुडालेल्या गलिच्छ लोकांना बोलवायचा, त्यांच्या विकृत वासनांना तो आकार द्यायचा.
मात्र त्याचा नीचपणा अधमपणा इथवरच सीमित नव्हता, हे सर्व शोषण होत असताना त्याचे त्याने रेकॉर्डिंग केले आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्याने अनेक डील करवून घेतल्या, इतरांना करवून दिल्या.
अल्पवयीन मुलींचा पुरवठा करुन तो जगातला सर्वात मोठा सेटलर झाला होता! जगातल्या सर्वात पॉवरफुल देशाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याने आपल्या पॉकेटमध्ये ठेवले होते, बाकीच्यांची काय बिशाद!
सेक्स सिंबॉल असणारी घिस्लेन मॅक्सवेल ही त्याची स्टेपनी कम गर्लफ्रेंड होती. तिचे काम एकच होते, ते म्हणजे ज्या ज्या लोकांना ही घाणेरडी सर्विस पुरवायची असेल त्यांची लिस्ट बनवणे आणि त्यांना ईमेल पाठवून, फोन कॉल करुन बेटावर अय्याशीसाठी बोलवणे!
काही वेळा तिने एपस्टीनच्या फोनवरून टेक्स्ट मेसेज केले आहेत तर बऱ्याचदा तिच्या फोनवरून तिने संपर्क साधला. तिने ज्यांना बोलवले त्यातले किती लोक प्रत्यक्षात तिथे आले आणि त्यांनी या घाणीत स्वतःला डुबवले हे आज कळेल.
कारण यात ज्यांची नावे आली आहेत अशा अनेकांचे म्हणणे आहे की, आम्हाला केवळ कॉन्टॅक्ट केला होता आम्ही त्यात सामील झालो नाही! खरे खोटे आज कळू शकते, मात्र आज जे उघड होईल तेच अंतिम सत्य असेल काय, हे काळच ठरवेल!
एपस्टीनचे जाळे अत्यंत व्यवस्थित होते. अल्पवयीन मुलींना पाम बीच, न्यूयॉर्क आणि खासगी बेटावर बोलावले जाई. या मुलींची भरती कशी केली जाई याची माहिती मस्तक सुन्न करणारी आहे.
एका मुलीचे शोषण पूर्ण झाले की, तिच्या सेक्स टेप्स दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली जायची की तिने दुसरी मुलगी आणावी! ती मुलगी दुसऱ्या मुलीला आणायची – मॉडेलिंग किंवा मसाजच्या नोकरीचे आमिष दाखवले जायचे. नव्या मुलीला आणल्यास तिला बोनस दिला जायचा.
बऱ्याचदा या मुलींना खरोखरच मसाजचे काम दिले जायचे, त्या कुणाचा मसाज करत आहेत हे त्यांना कधीही कळू दिले जात नसे. याचेही शूटिंग होई. मसाजपासून सुरू झालेले किळसवाणे कृत्य प्रत्यक्षात लैंगिक शोषणापर्यंत जाई तेव्हा तया मुलीपाशी पर्याय उरलेले नसत.
या घाणीत एपस्टीन आणि त्याचे निवडक मित्र सहभागी होत. बऱ्याचदा एकत्रित शोषण केले जाई! हे सर्व रेकॉर्ड करण्यामागे त्याचे वासनेने, अधिक पैशाच्या हव्यासाचे माइंड होते.
जेफरी एपस्टीन हे नाव आज जगभरात उच्चभ्रू वर्गातील लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या प्रकरणाशी कायमचे जोडले गेलेय. अमेरिकन अब्जाधीश आणि फायनान्शिअल तज्ज्ञ असलेल्या एपस्टीनने अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी एक व्यापक जाळे विणले होते, ज्यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, वैज्ञानिक आणि सेलिब्रिटींचा समावेश होता.
हे प्रकरण २००० च्या दशकापासून उघडकीस येत गेले, आणि २०२४-२०२५ पर्यंतच्या कोर्टातील दस्तऐवज उघडकीस आल्याने त्याची व्याप्ती अधिक स्पष्ट झाली.
नोव्हेंबर 2025 मध्ये Epstein Files Transparency Act हा अमेरिकेच्या काँग्रेसने पास केला आणि त्यानंतर U.S. न्याय विभागाने 30 दिवसांत Epstein-संबंधित फाइल्स सार्वजनिक करण्याची अनिवार्यता जाहीर केली.
आज १९ डिसेंबर रोजी अमेरिकन न्याय विभागाला नव्या कायद्याअंतर्गत एपस्टीनशी संबंधित हजारो पानांच्या गोपनीय दस्तऐवजांचे उघड करणे बंधनकारक झाले आहे.
यातील अनेक तपशील जसेच्या तसे उघड झाल्यास अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा अधिक खुलासा होऊ शकतो. जेफरी एपस्टीनचा जन्म 1953 मध्ये झाला. तो वॉल स्ट्रीटवर यशस्वी ट्रेडर, डिलर झाला आणि अनेक श्रीमंतांसोबत मैत्री निर्माण केली.
2005 मध्ये फ्लॉरिडामधील पाम बीच पोलिसांना पहिल्यांदा तक्रारी मिळाल्या की एपस्टीन अल्पवयीन मुलींना पैशांसाठी मसाजच्या निमित्ताने बोलावतो आणि त्यांचे यौन शोषण करतो.
2008 मध्ये फ्लॉरिडा कोर्टात एपस्टीनने अल्पवयीन वेश्याव्यवसायाशी संबंधित आरोप मान्य केले आणि फक्त तेरा महिन्यांची शिक्षा झाली, त्यात वर्क रिलीजची सोयही होती. त्याला ठोठावलेली शिक्षा आणि त्यात काढलेली पळवाट आजही अत्यंत सौम्य मानली जाते.
2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तुरुंगात असताना त्याने आत्महत्या केली असे फेडरल एजन्सीच्या तपासात समोर आलेय.
मात्र हा मृत्यू आजही अनेकांना संशयास्पद वाटतो, ज्या तुरुंगात इंचभर लांबीचा दोरीचा तुकडा मिळणे पूर्णतः दुरापास्त होते तिथे त्याने चक्क आत्महत्या केली हे कुणाच्याही पचनी पडणार नाही. मात्र या विषयीचे अन्य कोणतेही पुरावे समोर आले नाहीत त्यामुळे ती आत्महत्याच मानली गेली.
2021 मध्ये एपस्टीनची मैत्रीण घिस्लेन मॅक्सवेलला हिला सेक्स ट्रॅफिकिंगसाठी वीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली. मात्र यावर अनेकांनी असामाधान व्यक्त केले. 2024 मध्ये व्हर्जिनिया गिफ्रे विरुद्ध मॅक्सवेल खटल्यातील शेकडो पाने सार्वजनिक करण्यात आली, त्यातून संवेदनशील माहिती समोर आली आणि अनेकांचे धाबे दणाणले.
यंदाच्या फेब्रुवारीमध्ये डिक्लासिफाइड फाइल्स समोर आल्या आणि आज 19 डिसेंबर रोजी ग्रँड ज्युरीसमोर सर्व ट्रान्स्क्रिप्ट्स उघड केल्या जाणार आहेत. या फाइल्समध्ये बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, अलन डर्शोविट्झ यांसारख्या शक्तिशाली नावांचा उल्लेख आहे, पण बहुतेकांवर थेट आरोप नाहीत.
आपल्या देशातीलही काहींची नावे यात आली आहेत. अनिल अंबानी यांचे एपस्टीन सोबतचे चॅट सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. मेसी, बेकहॅम, टायगर वुड्स या खेळाडूंसह सचिन तेंडुलकर याचाही एका ठिकाणी उल्लेख आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असलेले पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नावही त्यात आलेय. मोदी आणि ट्रम्प यांची मुलाखत घडवण्यासाठी आपण मोदी यांच्या संपर्कात आहोत असाही एक उल्लेख आहे ज्यात एपस्टीन याने ‘मोदी ऑन बोर्ड’ असे मेन्शन केले आहे! अमेरिकन वेलनेस गुरु दीपक चोप्रा याचे नाव तर अनेक वेळा आहे.
हे सेक्स स्कॅन्डल पिरॅमिड स्कीमसारखे होते – मुली स्वतः पीडित आणि रिक्रूटर दोन्ही बनत असे. अशीच मोडस ऑपरेंडी असणारी रॅकेट्स जगात वेळोवेळी उघडकीस आलीत. राजकीय नेते, प्रभावशाली उद्योगपती, उच्चभ्रू वर्गातले श्रीमंत आणि सेलिब्रिटी यांच्या विरोधातील सेक्स आणि शोषणाच्या आरोपांची अनेक प्रकरणे जगात गाजली आहेत.
प्लेबॉय या सेक्स मॅगेझिनचा संस्थापक ह्यू हेफनर यानेही असेच शेण खाल्ले होते. त्याच्या प्लेबॉय मॅन्शनमध्ये ड्रग्स, ऑर्गीज आणि जबरदस्तीचे आरोप झाले. अनेक प्लेमेट्सनी हेफनरवर बलात्कार आणि शोषणाचे आरोप केले.
विन्स्टन चर्चिल, जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निगडीत अनेक सेक्स स्कॅन्डल्स समोर आले आहेत. या विवादांचा समावेश मीडिया आणि ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये केला गेला आहे, काही ठिकाणी आरोप सिद्ध झाले तर काही ठिकाणी नाकारले गेले आहेत.
नेक्सीअम या पंथाचा संस्थापक कीथ रॅनियरेने महिलांना सेक्स स्लेव्ह बनवले होते. २०२० मध्ये त्याला १२० वर्षांची शिक्षा. त्याच्यासोबत एलिसन मॅक या अभिनेत्रीला महिलांच्या रॅकेटरिंगच्या आरोपात शिक्षा झाली.
इंग्लंड स्थित मँचेस्टर नजीकच्या रोचडेल उपनगरात पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांनी शेकडो अल्पवयीन मुलींचे शोषण केले. रॅकेटच्या प्रमुखास नुकतीच शिक्षा सुनावली गेलीय. बीबीसी स्टार जिमी सॅविल याने आयुष्यात शेकडो मुलांचे शोषण केल्याचे त्याच्या मृत्यूनंतर उघड झाले.
अमेरिकन रॅपर सीन उर्फ डिडी कॉम्ब्स याने तर वेश्यांनाच टार्गेट करुन त्यांचे रॅकेट चालवले. खेरीज त्याने मोठ्या प्रमाणात सेक्स ट्रॅफिकिंग केले. विकृतांच्या या मांदियाळीते हॉवर्ड ह्यूजेसचेही नाव घेतले जाते. तो अत्यंत एकाकी आणि विक्षिप्त सेक्स हाउंड म्हणून ओळखला जातो.
प्रिन्स अँड्र्यू यांनी एपस्टीनशी संबंध असल्याचे मान्य केले मात्र अल्पवयीन मुलीचे शोषण आरोप नाकारले. बिल क्लिंटन यांनी एपस्टीनच्या खाजगी विमानात अनेकदा प्रवास केल्याचे उल्लेख आढळले आहेत, पण सेक्स अॅक्टिविटीमध्ये सामील असल्याचे थेट पुरावे अद्याप तरी समोर आले नाहीत.
मॅट गेट्झ याच्यावरही एपस्टीन सोबत अल्पवयीन मुलीच्या ट्रॅफिकिंग केल्याचे आरोप आहेत. डेनिस हॅस्टर्ट या अमेरिकन स्पीकरवरही मुलांच्या शोषणाचे आरोप आहेत.
जगभरातील मानवी तस्करीची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे. ILO च्या अहवालानुसार, २०२२ मध्ये २७.६ दशलक्ष लोकांवर जबरदस्ती केली गेली. यात सेक्स ट्रॅफिकिंगचा मोठा वाटा आहे.
गत सालच्या UNODC च्या रिपोर्टनुसार २०२२ मध्ये ज्यांची ओळख निश्चित झाली अशा पीडितांमध्ये तब्बल २५% वाढ झाली, यात मुली आणि महिलांचा वाटा 61% इतका अफाट होता. एक कोटी वीस लाख मुले ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये फसली.
अल्पवयीन मुलींचे शोषण ही गुन्हेगारांची एक विकृत मानसिकता असते, जिला पेडोफिलिया असे म्हटले जाते. ही एक मानसिक विकृती आहे, ज्यात प्रीप्युबेसेंट मुलांप्रती आकर्षण निर्माण झालेले असते. मेंदूतील असामान्यता, बालपणीचे ट्रॉमा, पॉवर आणि कंट्रोलची इच्छा, शमन न झालेल्या इच्छांचे सुप्त प्रकटन यातून ही विकृती बळावते.
यातील अनेक गुन्हेगारांना स्वतःचे वर्तन विकृती वाटत नाही; ते त्याचे सामान्यीकरण करतात! अल्पवयीन मुले कमकुवत असल्याने सहज लक्ष्य होतात हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
एपस्टीन फाइल्स हे फक्त एका व्यक्तीचे प्रकरण नसून सत्तेच्या गैरफायदा घेण्याच्या अनैतिक अधाशी वृत्तीचे, मानवी हव्यासाचे, विकारग्रस्त वासनांचे आणि संस्थात्मक अपयशाचे प्रतीक आहे.
आज उघड होणाऱ्या फाइल्समुळे अधिक सत्य बाहेर येईल, पण खरा बदल तेव्हाच येईल जेव्हा पीडितांचे संरक्षण आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. मानवी तस्करी ही जागतिक समस्या आहे; तिच्या मुळाशी असलेली असमानता आणि लैंगिक विकृती दूर करण्याची गरज आहे.
एपस्टीन फाइल्सच्या खुलाशानंतर जगभरात यासंबंधी विस्तृत न्याय आणि सार्वजनिक चर्चा सुरु आहे. मानव तस्करी ही आधुनिक गुलामीच्या स्वरूपात आहे, ज्याला जागतिक स्तरावर सामोरे जाणे हे केवळ कायद्याचे काम नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे.
आज एपस्टीनचा जो डाटा रिलिज केला जाणार आहे त्याची साईज 300 गिगाबाईट्स आहे. त्यात व्हिडिओ क्लिप्स, फोटो, टेक्स्ट मेसेजेस, चॅट आणि ट्रान्सस्क्रिप्ट यांचा समावेश आहे.
आज सार्वजनिक केल्या जाणाऱ्या डाटामध्ये काही गोष्टी हाईड केल्या जाव्यात असे न्याय विभागाने पूर्वीच आदेश दिले आहेत. त्यानुसार मुलींचे चेहरे, त्यांची नावे, त्यांची ओळख पटवून देणाऱ्या खुणा यांचा समावेश आहे. खेरीज अशा गोष्टीही सामायिक केल्या जाणार नाहीत ज्यांचा तपास हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या ऍक्शननंतर एफबीआयच्या क्लोजरनंतर गवसल्या आहेत!
इतक्या सर्व अटी शर्ती असूनही, मागील आठ तासात डेमोक्रॅटिक सिनेटर्सनी फोटो आणि चॅट सार्वजनिक करण्याचा जो धडाका लावला आहे तो काही तरी वेगळे घडेल याची शक्यता वाढवणारा आहे. कारण आज समोर आलेले पुरावे या समितीने नाकारलेले नाहीत.
इकडे अमेरिकेत लोकांमध्ये उत्सुकता आहे पण इथल्या मीडियाला वाटते की, यात ट्रंम्प यांना अडचणीत आणणारे काही समोर येणार नाही. न्यूट्रल माध्यमे कमी उरलीत. काहींना वाटते की ज्यांच्यावर ट्रम्प यांचा राग आहे त्यांची मात्र कुंडली समोर येईल. आपल्याकडे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य याच अनुषंगाने आले आहे.
आता या घडीला जेव्हा भारतात सकाळचे दहा वाजले आहेत तेव्हा अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये 18 डिसेंबर, गुरुवार रोजीचे रात्रीचे साडेदहा वाजले आहेत. इथल्या 19 डिसेंबरला सकाळी नऊनंतर कधीही या फाइल्स रिलीज होऊ शकतात. युएस डिपार्टमेंट ऑफ जस्टीसच्या वेबसाइट्सवरती त्याचे तमाम अपडेट्स पाहता येतील
एपस्टीन किती अधम नीच होता याचे काही ताजे पुरावे काल लीक झाले आहेत, त्यात त्याने शाळकरी मुलींच्या अंगावर लोलिता या विख्यात कादंबरीमधील गाजलेली वाक्ये लिहिली आहेत. मुलींची छाती, पाठ, कंबर, पोट, पायाचा तळवा, कपाळ अशा ठिकाणी त्याने ही लिखावट केलीय.
1955 मध्ये अमेरिकन लेखक ब्लादिमीर नॅबोकोव यांनी ही कादंबरी लिहिलीय. फ्रेंच साहित्याचा विकृत प्राध्यापक बारा वर्षीय मुलीला बंधक बनवतो आणि तिचे शोषण करतो. शेवटी तो ह्रदयविकाराच्या धक्क्याने मरतो आणि १७ वर्षांची लोलिता प्रसूती दरम्यान अपत्याला जन्म देऊन मरण पावते अशी यातली कथा.
या कादंबरीतील वाक्ये एपस्टीनने या कोवळ्या मुलींच्या देहावर लिहिली होती यावरून तो काय लेव्हलचा विकृत होता याची कल्पना यावी. अशा नीच व्यक्तीशी जवळीक असणाऱ्या आणि त्याच्या मदतीने शोषण केल्याचे सिद्ध झालेल्या कोणत्याही व्यक्तीला जगाने माफ करू नये, कसलाही मुलाहिजा न बाळगता त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने न्यायप्रिय समाजात वावरत असल्याचा मेसेज जाईल!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा