सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

ब्रिजित बार्डो - विचारांची दोन टोके गाठणारी सेक्स सिंबॉल!


एके काळची सेक्स सिंबॉल असणारी आणि मॉडेलिंग तसेच अभिनयाच्या क्षेत्रात आपला वादग्रस्त ठसा उमटवणारी फ्रेंच वोक लेडी, ब्रिजित बार्डो हिचे आज निधन झाले. एखाद्या व्यक्तीची मते, विचारधारा या टोकाकडून त्या टोकाकडे कशी जातात याचे ती उत्तम उदाहरण ठरावी.

मृत्यू समयी ती 91 वर्षांची होती, तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याविषयीची चर्चा तिच्या सेक्सी असण्याबद्दल आणि हॉट दिसण्याबद्दलची असायची. ती जगभरात चर्चेत होती ते दशक साठ आणि सत्तरचे होते, माझ्यासह अनेकांचा जन्मही झालेला नव्हता अशा काळातील ही बिनधास्त बाई, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या तीन दशकात एकशे ऐंशी अंशातून बदलली!

खरे तर ती कधीही फक्त एक लैंगिक प्रतीक नव्हती, लोकांच्या मते मात्र ती सदैव टूपीस बिकिनी घातलेली मोलोटॉव कॉकटेल होती! ती ओरिजिनल "इट गर्ल" होती जिने, महायुद्धोत्तर युरोपातील लैंगिक नीतीमत्तेच्या विचारधारांचा  अक्षरश: पालापाचोळा केला होता! आणि त्या बदल्यात तिला वैयक्तिक जीवनात त्याची क्रूर किंमत मोजावी लागलेली.

1934 मध्ये पॅरिसमध्ये परंपरावादी उच्चमध्यमवर्गीय पालकांच्या पोटी जन्मलेल्या छोट्या ब्रिजित बालेटची आधीची ओळख कुशल नर्तकी अशीच होती, परंतु वयाच्या पंधराव्या वर्षी ती एल Elle मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली, आणि अख्ख्या युरोपात तिच्या नावाची चर्चा सुरू झाली! 

सिनेमामधल्या तिच्या दिलखेचक अदा आणि मुलायम सोनेरी केसांच्या मोहक हेअरस्टाइल्समुळे तत्कालीन समाजात नव्या प्रकारच्या स्त्रीत्वाच्या प्रतिमा रुजवल्या गेल्या. या प्रतिमा बिनधास्तपणाच्या, अधीरतेच्या आणि केवळ वर्तमानात जगणाऱ्या उच्छृंखलतेच्या होत्या!

1956 साली आलेल्या 'अँड गॉड क्रिएटेड वुमन' या तिच्या यशस्वी चित्रपटामुळे, तिचा वर्ल्डफेमस "बार्डो लुक" लोकांमध्ये इतका पॉप्युलर झाला की आपल्याकडील 'साधना कट'च्या गॉसिपची आठवण यावी! बेडहेड हेअर स्टाइल, लोभस चेहरा, मदनिकेसाखा देह आणि अनवाणी पायांनी चालण्याची आगळी वेगळी ढब यामुळे तिची प्रत्येक अदा मोहून टाकायची! 

दिग्दर्शक रॉजर वादिम हे तिचे पहिले पती. रिव्हिएरावर नग्न सूर्यस्नान करताना रॉजरनी तिला टिपलं आणि संपूर्ण फॅशन जगाला फ्रेंच लिबर्टीचा खरा अर्थ नव्याने समजला. त्या सुखवादी प्रतिमेमागे होती एक अशी स्त्री जी स्वतःच्याच कर्माने त्यात कैद झाली होती.

दरम्यानच्या काळात पडद्यावर अगदी बिनधास्त धाडसी व्यक्तिरेखा ती साकारत होती आणि तिच्या खऱ्या आयुष्यातही नानाविध मानसिक, शारीरिक यातनांशी अगदी हिंसकपणे भिडत होती. वयाची तीस वर्षे होण्यापूर्वी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला, यंत्रवत प्रसिद्धीच्या हव्यासाने तिला ग्रासले होते. 

तिचे खाजगी आयुष्य आणि प्रेमप्रकरणे लोकांच्या सार्वजनिक गॉसिपिंगचे लिंचिंग ठरले. तिची चार लग्ने झाली. सहकलाकार जां-लुई ट्रिंटिग्नंटबरोबरचा घोटाळ्याच्या संबंधाने तिला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेले, आणि संगीतकार सर्ज गेंसबर्गबरोबरच्या उत्कट आणि तितक्या आत्मघातकी बॉंडिंगमुळे ती मनोमन विद्ध झाली. 

त्या काळात या दोघांचे एक रेकॉर्डिंग युरोपभर इतके व्हायरल झाले होते की शेवटी त्यावर बंदी घातली गेली, त्यातील ऑर्गझमच्या कामुक श्वासांसाठीची ही बंदी होती. लोक आजही या गोष्टी चवीने चघळतात. 1973 साली आलेल्या 'डॉन जुआन'नंतर वयाच्या 39व्या वर्षी अचानक अभिनय सोडला तेव्हा कथित सभ्यता आणि संस्कार यासाठी आग्रही जगाने सुस्कारा सोडला! पण ही गोष्टही तितकी खरी नव्हती कारण ब्रिजितने लाईमलाइटमध्ये राहण्याचा एक स्पॉटलाइट बदलून दुसरा सुरू केला होता!

तिने पहिल्या पतीला सोडचिठ्ठी देताना त्याच्यापासून जन्मलेल्या मुलाला त्याच्या स्वाधीन केलं होते आणि तेदेखील अतिशय बालवयात असताना! तिच्या मुलावर तिचे कधीही प्रेम नव्हते. आपल्याला एखादं कुत्रं जरी जन्माला आलं असतं तर अधिक बरं झालं असतं अशा आशयाची विधाने तिने केली होती. स्वतःच्या मुलाविषयी तिने विलक्षण बीभत्स आणि तिरस्काराची विधाने केली, त्यामुळे मुलाने तिच्याविरोधात खटला दाखल केला होता. तब्बल पाच दशकानंतर मायलेकांमधली दूरी कमी झाली! तिचे हे वर्तन आत्मसंतुष्टीकडे इतके झुकलेले होते की पुढे जाऊन तिच्या मनात त्याचे क्लेश झाले!      

बार्डोचा दुसरा काळ अॅनिमल राईट्स अॅक्टिविस्ट म्हणून तिच्या पहिल्या कालखंडा इतकाच वादग्रस्त राहिला. 1986 मध्ये ब्रिजित बार्डो फाउंडेशनची स्थापना केल्यापासून तिने हजारो प्राणी वाचवले, पण तिच्या टोकाच्या अतिस्पष्ट आणि उथळ समाजिक राजकीय विधानांनी वादंग माजवले. स्थलांतरितांचे प्रश्न, इस्लाममधला कट्टरतावाद यावर व्यक्त होतानाच आणि समलिंगी विवाहाला विरोध, वर्णद्वेषाला पूरक विचार अशी विचित्र टोके तिने गाठली. त्या अनुषंगाने भावना भडकावल्याबद्दल तिला दंड देखील झाले. 

जी स्त्री एके काळी लैंगिक मुक्तीचे प्रतीक होती, जिला स्वतःला लेस्बियन लाईफमेट्स आवडत होत्या, जी पुरुषांना लाथाडण्याचे स्वागत करत असे तिच स्त्री नंतरच्या काळात आधुनिक फेमिनिझमवर अतिशय खरमरीत टीका करू लागली होती. 'आजच्या स्त्रिया पुरुषांची बरोबरी करू इच्छितात. मी नेहमीच त्यांची शत्रू होऊ इच्छिते', अशी टोकाची भूमिका तिने मांडली! 1996 मध्ये तिच्या Initiales B.B. या गाण्यामधून हे विरोधाभास उघड होतात. 

एकेकाळी आजन्म बंडखोर वाटणारी ब्रिजितमधली स्त्री समकालीन प्रगतिवादाचा तिरस्कार करू लागली! एक अशी शाकाहारी स्त्री जी जागतिकवादाच्या विरोधात आक्रोश करू लागली. एके काळची मूळ मुक्त प्रेमाचे प्रतीक असणारी बोल्ड स्त्री, आताच्या काळातील स्त्री शोषणाविरोधाचा आवाज झालेल्या 'मी टू' या सर्वाधिक चर्चित अभियानास थेट ढोंगी संबोधत होती! 

आयुष्याच्या शेवटच्या दशकात सेंट-ट्रोपेमध्ये एकांतवासी जीवन जगणारी बार्डो फ्रान्सची सर्वाधिक अशक्य कोटीतला विरोधाभास असणारी व्यक्ती बनून राहिली! लोक तिला हसतही होते आणि तिचा आदरही करत होते! तिच्यावर एकाच वेळी खटलेही भरले जायचे आणि मोठमोठ्या मंचांवर तिच्यासाठी रेड कारपेटही अंथरले जायचे! दोन टोकांच्या लोकांची ती एकाच वेळेस हेट अँड प्राइड एलिमेंट ठरली होती. 

तिच्या तारुण्यसुलभ वयात तिने स्त्रियांना शिकवले की त्या स्वतःच्या लैंगिकतेच्या मालक होऊ शकतात, आणि नंतरच्या दशकांत त्याच स्त्रीमुक्तीने समाजाला कुठे नेले याविरोधात तिने विलक्षण संताप करत आयुष्य घालवले. 'व्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ शोधण्यापूर्वीच माझ्या आयुष्यात मी मुक्त जगत होते, आणि मी कधीही आदर्श व्यक्ती बनू इच्छित नव्हते', असं सांगणाऱ्या बार्डोची शोकांतिका ही आहे की, ज्या स्त्रीने सर्व प्रकारच्या चौकटी उध्वस्त केल्या तिला स्वतःला ब्रिजित बार्डो होण्यापासून कधीच सुटका मिळाली नाही!

लोक तिला विविध प्रतिमात शोधतात असं तिला वाटायचं मात्र लोकांच्या डोक्यातली 'ती सेक्स सिंबॉल' ब्रिजित बार्डो कधीच लुप्त होऊ शकली नाही ही तिच्या अंतर्मनाची खंत होती आणि त्या वैफल्याने ग्रासलेल्या ब्रिजितने विचारांचे दुसरे टोक गाठत स्वतःच्या भूतकाळावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला. 

आपल्या परिघात, भवतालात अशी अनेक माणसं आढळतात जी पूर्वी एका टोकाला असतात आणि वयाच्या दुसऱ्या टप्प्यात अगदी विरोधी टोकाला गेलेले असतात, माणसं अशी का वागतात किंवा त्यांच्या मनात असं काय घडतं की ते थेट विरोधी टोकाची भूमिका घेतात याचे उत्तर ब्रिजित बार्डो देते! विचाराचे दुसरे टोक गाठून लोक आपल्या भूतकाळाला शह देऊ इच्छितात त्यांच्या दृष्टीने घडलेल्या चुकांचे ते परिमार्जन असते! 

तिचे सिनेमे जेव्हा प्रदर्शित झालेले असत तेव्हा अतिशय ठळक अक्षरात तिचे नाव आणि त्यापुढे तिच्या हॉटनेसची, सेक्सी असण्याबद्दलची विशेषणे असत! ब्रिजितच्या आयुष्यात या गोष्टी आल्या तेव्हा ती पंधरा वर्षांची होती आणि जगाच्या थपडा खाऊन तिचे विचार बदलले तेव्हा तिला स्वतःच्याच भूतकाळाची शिसारी येत असेल! त्यातून तिने स्वतःला कोसण्याऐवजी ती ज्या विचारधारेचे, मुक्ततेचे, बंडखोरीचे प्रतीक झाली होती त्याच विचारधारांना तिने आरोपीच्या पिंजऱ्या उभं केलेलं!

काल तिचे देहावसान झाले तेव्हा साहजिकच युरोपियन देशांत पुन्हा एकदा दोन टोकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. दोन विरुद्ध टोकाचे लोक तिचे गुणगान करताहेत आणि तिची कुचेष्टाही करत आहेत! माझ्या पौगंडावस्थेत तिचा सिनेमा मी लपून छपून पाहिला होता. आमच्या सोलापूरमध्ये फक्त कल्पना टॉकीजला इंग्रजी सिनेमे लागत, ब्रिजितला तिथे पाहिले तेव्हा तिचे सौंदर्य हा सिनेमाचे उद्दिष्ट नसून तिचे बॉडी अपील हा मुख्य फोकस होता. 

आता मी जेव्हा मागे वळून या गोष्टीकडे पाहतो तेव्हा त्याचे जस्टीफिकेशन करण्याच्या भानगडीत पडत नाही; वयानुसारच्या भावना म्हणून त्याकडे पाहत असलो तरी आताच्या पिढीला या गोष्टींचे शून्य अप्रूप उरल्याचे जाणवते तेव्हा त्यांच्या हातून काही गोष्टी निसटल्याच्या नि काही सुखे गवसल्याच्या नोंदी देखील ठळक होतात! 

ब्रिजित बार्डो ही काही कॉम्प्लेक्स नेचरची स्त्री नव्हती अथवा तिने खूप मोठी क्रांतीही केली नव्हती मात्र तिने हे दाखवून दिले होते की, लोकांनी तुम्हाला काय म्हणावे हे तुम्ही ठरवू शकता त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नसून लोकांच्या भूमिकेत स्वतःला मांडले पाहिजे! 

वरवर ही बाब मानसशास्त्रीय गुंतागुंतीची वाटत असली तरी ती एक वैचारिक प्रक्रिया आहे ज्यासाठी निर्धार आणि संयम हवा, तसेच स्वतःच्या भूतकाळातील भूमिका जस्टीफाय न करता नवी भूमिका तितक्याच तीव्रतेने मांडण्याचे धाडस हवे. हे अशक्य नाही, प्रयत्न केले की जमते! 

उर्सुला आंड्रेस, बो डेरेक आणि ब्रिजित बार्डो या तिघी बरम्युडा ट्रँगलसारख्या होत्या! पामेला अँडरसनने त्या तिघींची जागा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नव्या मिलेनियममध्ये या गोष्टींचे आकर्षण गळून पडले आणि सेक्सबॉम्ब अथवा सेक्स सिम्बॉल या गोष्टी मागे पडल्या. याच्या समांतर काळात आपल्याकडेही सिल्क स्मिता आणि शकीला यांच्यानंतर या गोष्टी लोप पावल्या, याचे श्रेय पॉर्नच्या सुलभीकरणाला आणि त्याविषयीच्या घटत्या आकर्षणाला दिले पाहिजे, अशा गोष्टींची सहज आणि मुबलक उपलब्धी हे देखील यास कारणीभूत ठरले!       

अलविदा प्रिय ब्रिजित, तुझ्यामुळे मागे वळून या दृष्टीने धांडोळा घेता आला! you remain in memories of many!  

- समीर गायकवाड 



                                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा