नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरकार योजना आणते. लोक पापनाशनासाठी नदीच्या पाण्यात डुबक्या मारतात, कुणी परिक्रमा करतात तर कुणी अर्घ्य देतात तर कुठे जलपूजा होते, काही ठिकाणी नदीकाठी दशक्रिया विधी होतात तर नदीपात्रात अस्थीविसर्जनही होते! अशा सर्व गोष्टीपुरताच आपला नदीशी संबंध येतो, त्या गोष्टी उरकून आपण आपल्या वाटेने घराकडे रवाना झालो की, नदी जाणे नि नदीचे प्रदूषण जाणे अशी आपली भूमिका असते. सरकार व्यतिरिक्त नद्यांचे अभ्यासक काही डेटा मांडत असतात. नद्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि काही व्यक्ती मनापासून नदीच्या स्वरुपासाठी तळमळत राहतात. हे सर्व आपण केवळ पाहत असतो, त्याचे आपल्याला काहीही सोयरसुतक नसते. धार्मिक, पौराणिक ग्रंथाखेरीज नद्यांचे उल्लेख कविता, कथा, कादंबऱ्यात येतात. कुणी आत्मीयतेने लिहितो, काही ललित लेखनही केले जाते. काहीजण माहितीपर मांडणी करतात. तर काहींना अजूनही नद्यांविषयी धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक अंगाने लिहावे वाटते हेही अनाकलनीय आहे! नदीच्या अस्वच्छतेविषयी अतिशय प्रामाणिकपणे परखडपणे दस्तऐवज स्वरूपात खूप कमी लिहिले जाते. एखाद्या नदीच्या उगमापासून ते नदीच्या अंतापर्यंतच्या जलप्रवासावर प्रदूषणाच्या दृष्टिकोनातुन सविस्तर मुद्देसूद परखड लेखन केल्याची उदाहरणे कमीच आहेत. विशेष वानवा आहे ती नदीच्या जलप्रवाहासॊबत साकारत असलेल्या सामाजिक परिस्थितीच्या आकलनाची! नदीच्या उगमापासून ते नदी समुद्रास जिथे मिळते तिथेपर्यंतच्या संपूर्ण जलप्रवासात, नदीच्या काठावर असणाऱ्या शेकडो गावांत, शहरांत आणि बदलत्या राज्यांत नदीकिनाऱ्यावर सामाजिक स्थिती कशी आहे आणि ती कशी बदलत गेली आहे याचा आढावा घेणारे मराठी पुस्तक माझ्या वाचनात तरी नाही.
असे पुस्तक आपल्याकडे लिहिले जाण्याची शक्यता कमीच आहे, कारण अशी मांडणी कुणी केली तर आधी त्या विषयी धार्मिक वाद निर्माण केले जातील, कदाचित पुस्तक प्रकाशनच रोखले जाईल. आणि जरी समजा पुस्तक प्रकाशित जरी झाले तरी किती लोक ते वाचतील आणि वाचन केलेल्या किती लोकांना त्यातले सत्य पचनी पडेल असे प्रश्न आपल्याकडे लेखनाआधीच लेखकाच्या तोंडावर फेकले जातात. मग कुणाच्या डोक्यात या विषयाचा पुस्तकी किडा वळवळला तरी त्याला ठेचण्याचे काम इथला साहित्यव्यवहार पार पाडतो. तशी खबरदारी इथल्या अभिजन वर्गाकडून नक्कीच घेतली जाते. असो. माझ्या वाचनात असे एक इंग्रजी पुस्तक आलेलं. त्याच्याविषयी चार गोष्टी आवर्जून सांगण्याजोग्या वाटल्या.
'ब्लड रिव्हर: अ जर्नी टू आफ्रिकाज ब्रोकन हार्ट' हे नॉन फिक्शन पुस्तक टिम बुचर यांनी लिहिलंय. 2007 मध्ये ते प्रकाशित झालेय. जगातील सर्वात धोकादायक देशातला भयावह प्रवास, अशीही या पुस्तकातील जलप्रवासाची ओळख आहे. ही केवळ ललितकथा वा रोमांचक गोष्ट नसून, एक खरा प्रवासवृत्तांत आहे, जो ब्रिटिश पत्रकार टिम बुचर यांच्या धाडसी आणि धोकादायक प्रवासावर आधारित आहे. डेली टेलिग्राफच्या आफ्रिका आवृत्तीचे मुख्य वार्ताहर म्हणून 2000 साली ते आफ्रिकेत पोहोचले होते. बुचरला काँगो नदी आणि त्याच्या इतिहासाने इतके आकर्षित केले की, त्यांनी 1874 साली नेचर एक्सप्लोरर हेन्री मॉर्टन स्टॅनलीने केलेल्या ऐतिहासिक नदी मोहिमेची पुनर्रचना करण्याचे ठरवले. 3000 मैल लांबीची काँगो नदी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठ्या जलस्त्रोताची नदी आहे. ती डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) या देशाच्या हृदयातून वाहते असे म्हटले तर वावगे ठरू नये. टिम बुचर मात्र काँगो नदीला, आफ्रिकेचे भंगलेले हृदय म्हणतात.
हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीची साहस कथा नसून काँगोच्या खोऱ्यातले वसाहतवादी शोषण, स्वातंत्र्यानंतरची अराजकता आणि आजच्या युद्धग्रस्त अवस्थेचे गहिरे चित्रण आहे. पुस्तकाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातील हेन्री मॉर्टन स्टॅनलीच्या वारशाने होते. एक ब्रिटिश-अमेरिकन एक्सप्लोरर, डेली टेलिग्राफचा पत्रकार एकत्र येऊन पहिल्यांदाच काँगो नदीचे नकाशे काढतात. 1874 ते 1877 साला दरम्यानच्या त्या मोहिमेत स्टॅनलीने, पश्चिम आफ्रिकेतील तेव्हा झैरे नावाने ओळखल्या जात असलेल्या किनशासापासून सुरुवात करून पूर्वेकडे तांझानियाच्या तंगान्यिका तलावापर्यंत, आजच्या कॅलेमीपर्यंत प्रवास केला, ज्यात त्यांनी नदीच्या मूळ स्रोतांचा शोध घेतला आणि मध्य आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय भागाची भौगोलिक माहिती गोळा केली. या मोहिमेने बेल्जियन राजा लिओपोल्ड द्वितीयला काँगोला वसाहत बनवण्यास प्रेरित केले, ज्याने लाखो काँगोवासीयांच्या शोषणाने रबर उद्योग उभारला आणि काँगो नदीचे, हार्ट ऑफ आफ्रिका हे नाव कायमचे रक्तरंजित केले. त्या मोहिमेनंतर दीडशे वर्षांनी टिम बुचर, 2004 साली त्याच मार्गाने ही जलमोहिम पार पाडण्याचे ठरवतात. मधल्या दीडशे वर्षांत काँगो नदी जगातील सर्वात धोकादायक देशातून वाहत असल्याने बदनाम झाली. गृहयुद्ध, भ्रष्टाचार, रोगराई आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ती पुरती बेजार झाली. या सफरीवर बुचर एकटे निघतात, फक्त एका बॅकपॅक, शूजमध्ये लपवलेले काही हजार डॉलर्स आणि एक नोटबुक ते सोबत घेतात. काँगो नदीच्या पात्रातून ४९०० किलोमीटर लांबीचा प्रवास पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय, जे आजवर कुणालाच पूर्ण करता आलेले नाही. i am going to touch Africa's heart! असं ते प्रस्तावनेत लिहितात.
रवांडा या भीषण युद्धग्रस्त देशाच्या सीमेवरील क्वांडा या छोट्याशा गावापासून बुचरच्या मोहिमेस सुरुवात होते. काँगो देशाच्या सीमेवरची अस्थिरता, दंगे, व्याकुळ झालेले शरणार्थी आणि अवैध खाणकाम हळूहळू समोर येऊ लागते. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात ते कोबाल्ट टाउन (कातांगा प्रांतातले खाणीनी समृद्ध असलेले एक शहर) गाठतात; मोबाईल फोन्स आणि बॅटरीसाठी लागणारे जगातला ३०% कोबाल्टचा साठा या परिसरात आहे. या खाणी बाल कामगारांनी ठासून भरल्यात, हिंसाचाराचे भडके इथे रोज उडतात. या भागात बुचरला, बेनॉईट सारखे स्थानिक मार्गदर्शक मिळतात. बेनॉईट हा एक काँगोवियन मोटरसायकल चालक आहे, जो त्यांना शंभर सीसी मोटरसायकलवरून नदीकाठच्या प्रवासाला घेऊन जातो. वास्तवात या भागात डांबरी रस्तेच राहिलेले नसतात. जिकडे पाहावे तिकडे दलदल, जंगल आणि नदीचे पात्र दिसते! दुसऱ्या टप्प्यात ते 'कॅलेमी'' या आताच्या भग्न अवस्थेतील शहरात पोहोचतात. तिथल्या जुन्या बेल्जियन रेस्त्रोमध्ये पोहोचल्यावर बुचरला खायला प्यायला काही खास मिळत नाही. येथे ते काँगोच्या वसाहतवादी वैभवाची आठवण करून देतात. 1950 च्या दशकात येथे विमानसेवा, क्रूझ शिप्स आणि क्रीडा क्लब्स होते, पण सेकोच्या शासनाने आणि 1990 च्या दशकातील युद्धाने सर्व काही उद्ध्वस्त केले. दरम्यानच्या चिवट प्रवासात बुचर आजार पडतात. त्यांना मलेरिया नि डायरिया, एकत्रच होतो. पुढचा काही प्रवास त्यांना हेलिकॉप्टरने करावा लागतो, या दरम्यानचे एकाकीपण हा त्यांच्या नियोजनाचा हिस्सा नसूनही वाट्याला येते.
पुस्तकाचा मध्यवर्ती भाग ताण निर्माण करतो. खास करुन नदीकाठच्या जंगलातील प्रवास जीवघेणा वाटू लागतो. 'कॅलेमी''पासून ते कासोंगोपर्यंत, बुचर कधी मोटरसायकलवर तर पायी चालतात. वॉक टू डेथ, हा टप्पा स्टॅनलीच्या मोहिमेतील एका घातक भागाची आठवण करवतो, जिथे कधीकाळी त्यांचे साथीदार भूक आणि रोगराईने टाचा घासून मारले गेलेत. इथे टिम बुचरला स्थानिक पिग्मी जमातीचे लोक भेटतात, ज्यांचे हक्क लुटले गेलेत आणि जे घरदार सोडून, गावे मागे टाकून, जंगलातील घनदाट वनराईत हरवून गेलेत. टिम, नंतर उबुंडू पर्यंत पोहोचतात, जेथे काँगो नदीवर प्रथमच एकल होडक्यात बसून प्रवास करतात. पुढे जाऊन एका मोटरबोटमध्ये बसतात, इथे ऐन नदीच्या मध्यभागी त्यांच्या बोटीचे इंजिन खराब होते. काळजात धडकी भरवणारा पाऊस सुरु होतो आणि नदीला जिवघेणा पूर येतो. जिथे, नदीपात्र पाण्याने फुगते तिथल्या किनाऱ्यावर चोरांचा वाढता धोका समोर येतो. या भागात त्यांना साईदी नावाचा बोटचालक भेटतो, जो त्यांना किसांगानीपर्यंत घेऊन जातो. या प्रवासादरम्यान बुचर काँगोच्या इतिहासाची एक दुःखद आठवण शेयर करतात - लिओपोल्डच्या क्रूर शासनात लाखो लोकांचे हात तोडले गेले, पॅट्रिस लुमुंबाच्या हत्येनंतर, मोबुटूचे बत्तीस वर्षांचे तानाशाही शासन नष्ट होते. नव्वदच्या दशकातील आफ्रिकेच्या पहिल्या जागतिक युद्धात तब्बल पन्नास लाख लोक मरण पावलेत. हा भूभाग केवळ भौगोलिक विषमतेचा नसून, इथे शोषणाचे भयावह प्रकार समोर येतात. जबरदस्तीने बालकांना सैनिकी पेशात भरती केले जाते, मुलींवर बलात्कार केले जातात आणि अंगावर काटे आणणारे कामगारांच्या शोषणाचे चित्रण हादरवून सोडते!
पुस्तकाच्या अंतिम भागात टिम बुचर, किसांगानी'जवळ (पूर्वीचे स्टॅनलीव्हिल) भूमध्यरेषेला ओलांडतात मात्र द इक्वेटर एक्सप्रेस'मध्ये ते नदीच्या वेगवान प्रवाहात अडकतात. पुन्हा एकल होडीमधून प्रवास करतात. प्राण्यांच्या वाढत्या धोक्यात नि जंगली धुक्यात ते गुंतून पडतात. येथे ते युएनच्या सहाय्यक कार्यकर्त्यांना तसेच आणि पिग्मी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटतात; शेवटी, ते मंबासा आणि बूजा गाठतात, जेथे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते. कधी मोटरसायकल तर कधी ट्रकने आणि शेवटी विमानाने प्रवास करत ते नदीच्या अंतिम पडावापाशी पोहोचतात. टिम बुचर काँगोच्या भविष्याविषयीही प्रकाश टाकतात: ही नदी आफ्रिकेची सर्वात मोठी संपत्ती असू शकते, पण युद्ध आणि भ्रष्टाचाराने ती जागीच स्तब्ध झालीय! त्यांच्या मते काँगो हा देखील एक खंडच आहे जिथे मानवी प्रगतीचे सामान्य नियम लागू झाले नाहीत! तब्बल 44 दिवसांच्या या प्रवासानंतर बुचर किनशासातून परत येतात खरे. परंतु, 'काँगोचा प्रदेश इतका का मागे पडला?'हा प्रश्न त्यांचा पिच्छा पुरवतो. पुस्तकाचा शेवट निराशावादी आहे. ते काँगोच्या भविष्याबद्दल शोक व्यक्त करतात आणि वाचकांना विनंती करतात की जमेल त्याने इथे गेलेच पाहिजेत! वसाहतवादापासून ते आधुनिक युद्धांपर्यंतच्या सर्व गोष्टीवर साधक बाधक मत मांडतात.
नदीकाठच्या ज्या शहरात, गावांत गुन्हेगारीचे भयंकर पेव फुटले आहे तिथे नदीच नसती तर ते चित्र बदलले असते का याचे शानदार विश्लेषण ते करतात, हे वाचताना आपल्याकडचे वाळूमाफिया आणि त्यातून निर्माण होणारा अनेक टेबलांवर फिरणारा पैसा आठवतो. नदीपात्र ज्या भागात खोल होते तिथे खून हाणामाऱ्या अधिक आहेत असे निरीक्षणही ते नोंदवतात. नदीपात्रापासून दूर असणारी गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसली तरी ती गावे आंनदी आहेत असाही निष्कर्ष मांडतात. नदीकाठच्या काही गावात आपल्या पूर्वजांसाठी विशेष पूजा केली जाते याचा उल्लेख करतात. ज्या भागात पाऊस कमी पडतो पण नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागते तिथे पिण्याचे पाणी मिळत नाही मात्र रक्ताचे पाट सहज वाहू शकतात हे सत्यही मांडतात. खाणींचे आणि उद्योगांचे पाणी जिथे नदीत सोडले जाते तिथे अनारोग्य, गरिबी, गुन्हेगारी आणि भणंगतेचे प्रमाण जास्ती असल्याची नोंद करतात. गरीब आणि श्रीमंत यांच्या मनात नदीविषयी असणाऱ्या भिन्न भावना आणि त्या मागची भूमिका स्पष्ट करतात. नदी जिथे समुद्राला मिळते तिथे मोठे अवजड उद्योग आहेत, बंदर आहे मात्र तिथे नदीचे रूप एखाद्या कॉर्पोरेट ऑफिससारखे होऊन जाते ही फॅक्टदेखील मांडतात. नदीत होणारे प्रदूषण आणि नदीतले जलजीवन यांचा संबंध स्पष्ट करताना त्याचा सामाजिक जीवनाशी असणारा थेट संबंध समोर आणतात, ही तथ्ये मन विषण्ण करतात. काँगो काठच्या श्रीमंत शहरातले पैशांचे सूत्र नदीशी कसे जुळले आहे याचे हुशारीने गणित मांडतात. काँगो नदीचा प्रवास वाचून आपण उद्विग्न होऊन जातो.
हे पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यासमोर आपल्या अनेक नद्या आल्या. खास करून गंगा आणि यमुना! गंगेच्या उगमापासून ते हिंद महासागरात विलय होईपर्यंत तिच्या काठावर किती नि काय काय होते, याचा एक अल्पसा आराखडा मांडला तरी शरमेने मान खाली जाते! आपल्या नद्यांची अवस्था आपण काय करुन ठेवलीय! खऱ्या अर्थाने आपण नद्यांचे गुन्हेगार आहोत, नदीचे पाणी वापरण्याचा वा नदीपात्रात उतरण्याचा आपल्याला कोणताही नैतिक अधिकार नाही हे कधीतरी निसर्गच आपल्याला ठणकावून सांगेल तेव्हा सारं काही संपलेलं असू नये!
खरे तर आपल्या नद्यात पाणी वाहत नसून, टिम बुचर म्हणतात तसं आपण नद्यांना विद्ध केलंय, नद्यांच्या प्रवाहात त्यांचं रक्त वाहतंय आणि आपल्याला त्याचे जराही सोयरसूतक नाही, ही खंत पोखरून टाकणारी आहे!
- समीर गायकवाड
#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #novel

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा