अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.
वडील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग निर्मूलन पथकात अवैद्यकीय पर्यवेक्षक म्हणून कामास होते. त्यांचा स्वभाव अतिशय सेवाभावी आणि परोपकारी होता. जमेल तितक्या लोकांना मदत करावी, कुणाविषयी वाईट बोलू नये आणि आपल्याला कुणी वाईट म्हटले तरी ते मनावर न घेता, ज्याचे त्याचे कर्म त्याच्यावर सोडून आपण पुढे जात राहिले पाहिजे असं ते नेहमी म्हणत. वडिलांपेक्षा आई जास्त कणवाळू आणि हळव्या स्वभावाची होती, गोरगरिबांना मदत केली पाहिजे, दुःखी गरजू माणसांचे जीव जाणले पाहिजेत असं ती नेहमी सांगे. माणसातला देव पाहिला तर मंदिरातला देव आपोआप भेटतो, हे तिचे विचार होते!
शंभरएक माणसांचे एकत्र कुटुंबाचे खटलं गावाकडे होतं! परिणामी एकत्र कुटुंबाचे गावकडचे संस्कार वडिलांच्या अंगी अफाट मुरले होते. ते खऱ्या अर्थाने कुटुंबाचे बॅकबोन होते. त्यांच्या अन्य भावंडांपेक्षा ते काहीसे वेगळे होते. एकत्रात असताना काही कमीअधिक होत असते, काही बेरीज वजाबाक्या होत असतात, त्यावरून विचलित न होता आपण आपल्या नेकीच्या नि एकीच्या मार्गावर चालत राहिले पाहिजे ही त्यांची कुटुंबनिष्ठा होती. आजही त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतात.
आईवडिलांनी चांगली शिकवण देऊनही बऱ्याचदा आपण कमी पडतो, कुठे तरी आपलं पाऊल बहकतं, त्यांच्या अपेक्षेनुरूप आपण वागत नाही, आईवडील म्हणून त्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा हजारपटीने योगदान दिलेले असते आणि आपण मात्र शंभरीही गाठू शकत नाही, असं काहींच्या बाबतीत होतं; माझ्या बाबतीत असं झालंय. त्यांच्याइतकी ऊंची गाठणे सोडा, मात्र त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर नेटकी वाटचालही करू शकलो नाही, उलट काही कलंक माथी लावून घेतले. काही चुका अशा झाल्या की ज्यांची भरपाई कधीही शक्य झाली नाही. हे प्रकटन मी खुलूसच्या प्रस्तावनेतही लिहिले आहे, कबुलीजबाब मनावरचं ओझं हलकं करतात!
आता आईवडील दोघेही हयात नाहीत, ते देहरूपाने नसले तरी माझ्या अंतःकरणात मात्र रहिवास करून आहेत! त्यांच्या बोटाला धरून अजूनही नीट वाटचाल करायचा माझा प्रयत्न जारी आहे. ते आज लौकिकार्थाने असले असते तर, माझ्याविषयीची त्यांची खंत कणभर तरी कमी झाली असती असं मनापासून वाटतं. माझ्यातील जास्तीचे कारुण्य आणि संवेदनशीलता, कणव हे सारे आईकडून आलेय आणि सेवाभाव वडिलांकडून! लिहिण्याची उर्मी आईने दिलीय. त्यांना जसे अपेक्षित होते तसा त्यांच्या हयातीत वागू शकलो नाही मात्र त्यांच्या अपरोक्ष काही चांगल्या गोष्टी हातून घडताहेत, हे पाहायला ते हवे होते असे राहून राहून वाटते.
माझे आईवडील, शिक्षक, वाचक, संपादक आणि आप्तमित्र यांच्यामुळे मी घडत गेलो नि चार बरे शब्द लिहू शकलो. आयुष्य आणि अक्षर, दोन्हीस वळण लाभले!
चाहूरच्या अर्पणपत्रिकेत चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले तुलसी वृंदावनाचे चित्र आहे, आई वडिलांचेच प्रतीक जणू! घरादारासाठी आई आयुष्यभर तेवत राहिली आणि तिच्यासोबत वडीलही स्वतःला प्रदीप्त करत राहिले. संसाराच्या अंधारल्या वाटांवर त्यांनी काळजाचे दिवे लावले, त्या प्रकाशाची तिरिप अजूनही दिशा दाखवतेय! आईवडिलांचे ऋण कधीच फिटत नसतात, निदान त्यांच्या ऋणाप्रती व्यक्त तरी झाले पाहिजे, नाहीतर आपल्यासारखे कृतघ्न कुणीच नसते!
‘चाहूर’ हा ग्राम्यबोलीतला शब्द. याची नाळ मातीशी नि गावगाड्याच्या संस्कृतीशी जुळलीय. चाहूर हा शब्द मुक्या जीवाच्या भावनेशी तसेच निसर्गाप्रती कृतज्ञेशीही संबंधित आहे.
गावाकडच्या लोकांना हा शब्द ठाऊक आहे, तो बैलपोळ्यामुळे! बैलपोळ्याच्या दिवशी अंधारून येण्याआधी, शेतातून घरी नेण्यासाठी एका विशेष उतळी(दुरडी) बांधली जाते. जुंधळ्याची चाडं नव्याकोऱ्या उतळीला बांधून, त्यात नैवेद्य आणि दोन पणत्या ठेवून ती उतळी डोक्यावर चुंबळ न घेता तशीच ठेवली जाते. आत ठेवलेली पणती विझू नये म्हणून चाडांच्या तिन्ही बाजूंनी वाकळ (घोंगडी) बांधली जाते. ज्याच्या शेतशिवारात ही लगबग सुरू असते, त्या धन्याचा जोडीदार ही उतळी डोक्यावर ठेवून, स्वतःला घोंगडीखाली घेतो नि शेतकऱ्याच्या मागोमाग गावातल्या घराकडं निघतो. वाटेने दोघेही ‘चाहूर चाहूर चांगभलं’चा गजर करत असतात.
यातील ‘चाहूर’ ही संज्ञा बैलांसाठी वापरली जायची. पूर्वीच्या काळी गावोगावच्या वस्त्यातून विहिरीवर मोट असे. मोट हाकण्यासाठी कुठे चार तर कुठे सहा, आठ बैल जुंपले जात. यातल्या पुढच्या बैलजोडीला 'चाहूर' म्हटलं जाई.
जी बैलजोडी धन्याला पाणी उपसून देते, शेतशिवारात हिरवाई आणते, घराला बरकत देते ती चाहूर. या चाहूराचं चांगभलं झालं म्हणजे आपोआपच धन्याचं बळीराजाचं ही भलं होणार हे या घोषामागचं गणित. यात मुक्या जिवाप्रतीची कृतज्ञताही झळकते.
ज्या घटनांमुळे, लोकांमुळे, गावगल्ल्यांमुळे, ज्या गावगाड्यामुळे माझी जडणघडण झाली त्यांच्याप्रतीची कृतज्ञता म्हणजे हे पुस्तक, माझ्यासाठी हेच चाहूर! ‘चाहूर’चा एक अर्थ जमिनीच्या मोजमापाशी निगडीत आहे. चाहूर म्हणजे एकशेवीस बिघे जमीन. एक बिघा म्हणजे अदमासे वीस गुंठे जमीन. चाळीस गुंठे म्हणजे एक एकर. त्या हिशोबाने साठ एकराचे शिवार म्हणजे चाहूर!
एके काळी जेव्हा लोकसंख्या कमी होती, कसणारे हात कमी होते तेव्हा अनेकांपाशी मोठ्या जमिनी असत. त्या कसण्यासाठी बैल, शेतमजूर नि सालगडी असत. या सालगड्यांचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे चाहूर! आपलं चाहूर असावं असं कुणालाही वाटे. तद्वत आपल्या ललित लेखनाचा एक पट असावा असं वाटणं साहजिक आहे. याही अर्थानेही हे ‘चाहूर’ आहे!
‘चाहूर’चा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे लाकडी चार-पायी चौकट. धान्य काढून झाल्यावर त्याची उफणणी करण्यासाठी म्हणजेच त्यातील फोलपट, कचरा काढण्यासाठी या चौकटीचा वापर होतो. मनातल्या गाळाचा निचरा करण्यासाठीची ही शब्दरुपी चाहूर कामी येईल.
‘चाहूर’चे वाचन एक शांत शीतल अनुभव देईल अशी यामागची धारणा. हे ‘चाहूर’ कधी हुरहूर लावेल तर कधी मनात अफाट काहूर माजवेल. हे केवळ मानवी जीवनाविषयीचे नसून, यात विविध भावनांचा शब्दालेख आहे.
हे प्रकटन नितळ सच्चेपणाने आपल्यासमोर मांडताना अत्यंत निखळ आनंद होतोय. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर आणि संपादक विलास पाटील तसेच टीम मनोविकास यांच्यामुळे हा अनोखा विषय आणि आगळे वेगळे लेखन पुस्तक स्वरूपात येऊ शकले! या सर्वांविषयी कृतज्ञता!
- समीर गायकवाड
'चाहूर' वाचून तुमचा प्रामाणिक अभिप्राय लिहिल्यास त्यात मला आणि मनोविकास प्रकाशनाला टॅग केल्यास आनंद वाटेल...
#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #chahur #चाहूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा