मोहमद ममदानी यांनी युगांडाचा जुलुमी शासक इदी अमीन यांच्या राजवटीवर एक पुस्तक लिहिलेय, त्यात त्यांनी स्वतःविषयी फारसं लिहिलेलं नाही. इदी अमीन हा युगांडाचा सर्वेसर्वा कसा झाला इथेपासून ते त्याची राजवट कशी कोसळली याचा आढावा त्यात आहे. अमीनने स्वप्नाळू राष्ट्रवादाची स्वप्ने युगांडन जनतेला दाखवली आणि तिथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या, अगदी नागरिकत्व असणाऱ्या नॉन युगांडन लोकांनाही देशाबाहेर हाकलून लावले. त्याचे टार्गेट खास करुन भारतीय वंशाचे लोक होते ज्यांनी युगांडाचा व्यापार उदीम वाढवला होता, अर्थव्यवस्थेला आकार देण्यात त्यांचा मोठे योगदान होते. अनेक उद्योगधंदे, सेवा क्षेत्रे जसे की रस्ते निर्माण, सार्वजनिक मालमत्तांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधा यांत ही कथित 'बाहेरची' माणसं कार्यरत होती. देशात या लोकांविरोधात आंदोलन उभं केलं गेलं तेही एका रात्रीत! त्यामुळे ही माणसं सैरभैर झाली, त्यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली, अनेकांना जीवे मारण्यात आले, जितके म्हणून अत्याचार करणे शक्य होते ते केले गेले.
स्थलांतरित लोकांना युगांडा सोडण्यासाठी अमीनने फक्त तीस दिवस दिले होते. या काळात अनेक लोक आपलं घरदार, जमीन जुमला तिथेच सोडून विस्थापित झाले. हे लोक गेले आणि देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, आर्थिक संतुलन बिघडले, देशांतर्गत सावर्जनिक व्यवस्थेवर ताण पडू लागला, तेव्हा अमीन अजूनच पिसाळला. त्याने आपण जगातले महत्वाचे शासक असल्याचा आव आणायला सुरुवात केली, आपल्याशिवाय युरोपियन अमेरिकन देश आफ्रिकेबद्दलचे धोरण ठरवू शकत नाहीत अशी फुशारकी तो मारू लागला. आपण जगातले तंटे सोडवू शकतो अशा बातम्या जनमानसात बिंबवू लागला. हे करत असताना तो नियमित काळाच्या अंतराने रेडिओद्वारे जनतेला संबोधित करायचा, मध्ययुगीन विचार मांडायचा, स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, कसे वागावे कसे बोलावे याचे धडे देऊ लागला. त्याने जी स्वप्ने दाखवली ती काही केल्या खरी झाली नाहीत आणि त्याच्या दोन दशकांच्या राजवटीच्या अखेरीस त्याने इतकी दडपशाही केली की त्याचे समर्थक देखील वैतागले, अखेर त्याच्या विरोधात बंड झाले. त्याला देश सोडून पळून जावे लागले.
अमीन जोपर्यंत सत्तेत होता तोपर्यंत त्याने आणखी एक नीच कृत्य केले ते म्हणजे लोकांच्या मनातल्या वंशवादाच्या वृथा अभिमानास त्याने भयंकर खतपाणी घातले. परिणामी युगांडन लोकांच्या मनात इतका द्वेष, तिरस्कार निर्माण झाला की शेजारी देश रवांडा, काँगो यांच्यासोबतचे संबंध खराब झाले. अमीन 1971 ते 1979 पर्यंत सत्तेत होता मात्र त्याच्या राजवटीने देश देश काही दशके मागे गेला. 1972 ला मोहमद ममदानी देश सोडून गेले आणि अमीनच्या पलायनानंतर 1979 मध्ये ते परतले.
अमीन नंतर सत्तेत आलेल्या मिल्टन ओबोटे सरकारच्या त्रुटी आणि धोरणात्मक विसंगती यावर त्यांनी कडवट टीका केली. नाराज झालेल्या ओबोटे यांनी त्यांचे नागरिकत्व स्थगित केले. 1984 मध्ये ममदानी यांनी पुन्हा एकदा युगांडा सोडला, ते दक्षिण आफ्रिकेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1985 मध्ये मिल्टन ओबोटे यांची राजवट संपुष्टात आली.
योवेरी मुसेवेनीने ओबोटे यांच्याविरोधात बंड केले आणि त्यांना सत्तेतून पदच्युत केले. मुसेवेनी हे ख्रिश्चन धार्जिणे असले तरी त्यांनी स्थानिकांशी मिळते जुळते धोरण ठेवले. परिणामी 1986 ते 2025 अशी चाळीस वर्षे ते आजतागायत ते सत्तेत आहेत. त्यांच्या बाजूने आपला कल नोंदनवणाऱ्या अनेक बुद्धिजीवी लोकांना त्यांनी युगांडात परत बोलावले. त्यातलेच एक होते मोहमद ममदानी!
1986 मध्ये ते तिसऱ्यांदा युगांडात परतले आणि त्यांनी मकेरेरे युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन विभाग सुरू केला, तिथे जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. या दरम्यान 1991 मध्ये जोहरान यांचा जन्म युगांडाची राजधानी कंपाला इथे झाला. 1986 ते 1998 ते ममदानी कुटुंब युगांडात राहिले. 1998 मध्ये मोहमद ममदानी कोलंबिया विद्यापिठात प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी अमेरिकेत आले आणि तिथेच स्थायिक झाले. 2017 मध्ये जोहरान यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
'सलाम बॉम्बे'सारख्या संवेदनशील सिनेमाच्या निर्मात्या दिग्दर्शिका असलेल्या मीरा नायर त्यांच्या मिसिसिपी मसाला या पुढच्या सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी युगांडाला गेल्या होत्या, तिथे त्यांची भेट मोहमद ममदानी यांच्याशी झाली. एकमेकांचे विचार पटल्यावर भेटीनंतर दोन वर्षांनी त्यांनी साध्या पद्धतीने विवाह केला.
मीरा नायर यांचे सिनेमे पाहिले तर लक्षात येईल की त्या कमालीच्या संवेदनशील आणि टोकदार विद्रोही विचारांच्या आहेत. मोहमद ममदानी यांचे विचार पाहिले तर लक्षात येईल की ते अगदी खमके लढवय्ये आहेत, आपल्या विचारांवर ठाम राहणारे आहेत, त्यांच्या हुशार अभ्यासू व्यक्तिमत्वाला अफाट विद्वत्तेची जोड आहे.
आई वडिलांचे हे सर्व गुण जोहरान ममदानी यांच्यात दिसून येतात. त्यांच्या वडिलांनी स्थलांतरितांना हक्क मिळावेत यासाठी निरंतर संघर्ष केला, त्यांनी स्वतःला कधीही विकले नाही आणि आईने कधीही तडजोड केली नाही, दोघेही ताठ मानेने आणि ताठ कण्याने लढत राहिले!
जोहरान ममदानी यांची जडण घडण अशी विद्रोही आणि लढाऊ भवतालात झालेली असल्याने ते अधिक प्रमाणात खंबीर आणि धाडसी वाटतात, याचे काही क्रेडिट त्यांच्या आईवडिलांना दिले पाहिजे! जोहरान, अमेरिकेच्या बदलत्या अर्थराजकारणात नव्या आशेने उगवलेला पहिला तारा ठरू शकतात! आपल्या मातापित्याने दिलेले नाव सार्थ करू शकतात. त्यांना शुभेच्छा!
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा