रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मेडीटेशन आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस!


माणूस इकडे तिकडे शांतता शोधत असतो मात्र खरी शांतता त्याच्या हृदयात असते. अर्थात या गोष्टीचा थांग तेव्हाच लागतो जेव्हा मन अशांत होते! शांततेचा शोध शांत भोवतालात अथवा सुख समृद्धीत आकंठ बुडालेल्या अवस्थेत असताना कुणीच घेत नाही! जगभरात बुद्धासारखे एखादे अपवाद असतील मात्र बाकी विश्व शांतता कधी शोधते याचे उत्तर एकसमान येते.

आज जगभरात मेडीटेशनचा बोलबाला आहे, आपल्याकडे तर मेडीटेशन्सवरच्या रिल्स, पोस्ट्स, पॉडकास्ट लाखोंच्या संख्येत रतीब घालताना दिसतात. आपल्यापैकी अनेक जण विविध प्रकारचे मेडिटेशन करताना दिसतात. मनःशांतीचा सोपा नी सहज सुलभ मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते! मात्र मेडिटेशन कुणी लिहिलं याचा शोध घेतला की विस्मयकारक नाव आणि माहिती समोर येते!

आपल्यापैकी अनेकांनी 'ग्लॅडिएटर' हा सिनेमा पाहिला असेल. अभिनेता रसेल क्रो याने साकारलेला मॅक्सिमस, कमांडर ऑफ द आर्मीज ऑफ नॉर्थ, विसरणे शक्य नाही. वास्तवात हे पात्र काल्पनिक होते तरीही जगभरातील सिनेरसिकांना याची भुरळ पडली कारण, मॅक्सिमसची पार्श्वभूमी! आपला वृद्ध राजा मार्कस ऑरेलियस याच्याशी एकनिष्ठ असणारा सेनापती असणारा मॅक्सिमस आपलं सर्वस्व गमावूनही राजावर झालेल्या अन्यायासाठी प्राणांची बाजी लावतो. मार्कसचा क्रूर मुलगा सम्राट कमोडस याची तो हत्या करतो अशा मांडणीची ती काल्पनिक कहाणी होती.
 
रोमन सम्राटांचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, एम्परर कमोडस हा अत्यंत क्रूर आणि अस्थिर शासक म्हणून अल्पावधीत कुख्यात झाला होता. त्याने स्वतःच्या प्रजेला सळो की पळो केलं होतं. रोमन सिनेटवर त्याने जरब निर्माण केली होती, त्याच्या विरोधातील प्रत्येक आवाज तो अत्यंत क्रूरपणे दाबून टाकत असे. त्याच्या समर्थकांना त्याने मोकाट सोडले होते. कॅलिगुला हा लैंगिक दृष्ट्या सर्वात विकृत सम्राट मानायचा झाला तर कमोडस हा राजकीय दृष्ट्या सर्वात विकृत मानला जाईल.
 
कमोडसचे वडील, मार्कस ऑरेलियस Marcus Aurelius हे महान रोमन सम्राट होते. रोमन इतिहासात त्यांची नोंद अतिशय गोरवशाली शब्दांत घेतली गेलीय. रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात अनेक सम्राट झाले, परंतु सत्ता हातात असूनही अंतर्मुख राहणारे, युद्धाच्या वादळातही अंतःकरणातली आत्मियतेची नि प्रेमाची ज्योत जपणारे त्यांच्यासारखे शिस्तप्रिय पराक्रमी राजे अत्यंत कमी! इ.स. १२१ मध्ये जन्मलेला हा सम्राट, त्यामुळेच इतिहासात "तत्त्वज्ञ-सम्राट" म्हणूनही अधोरेखित केला गेलाय!

मार्कस ऑरेलियसचे आयुष्य प्रचंड विरोधाभासाने भरलेलं होतं. एका बाजूला युद्धांचा अखंड ताण, तर दुसरीकडे स्वतःला स्वसंवादातून नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न. त्याच्याकडे अनिर्बंध सत्ता होती, शक्ती होती, वैभव होते पण अंतर्मनात तो सामान्य मनुष्याप्रमाणेच भीती, अपराधगंड आणि जबाबदारीच्या ओझ्याने ग्रस्त होता.

मार्कसचे बालपण रोममधील अभिजन वर्गात गेले, पण त्यात कोणताही अहंगंड नव्हता आणि फुकाचा दिमाखही नव्हता. रोमन सिनेटर मार्कस ऍनिअस व्हेरस यांचा तो मुलगा होता. अत्यंत लहान वयात त्याच्या पित्याचे निधन झाले आणि त्याची जबाबदारी सम्राट अँटोनिनस पायस यांनी उचलली. त्यामुळे बालवयातच मार्कस ऑरेलियसच्या ठायी शिस्त, नैतिकतेची शिकवण, विवेक आणि सामाजिक राजकीय मूल्ये, किशोरवयातच उत्तरोत्तर खोलवर रुजत गेली.
 
तिथल्या शिस्तप्रिय जीवनात त्याने आपल्या कौटुंबिक जीवनाचा विसर पडू दिला नाही, किंबहुना त्याच्या अंतर्मनात सुखाने जगण्याविषयीची आणि सुखाच्या शोधाची एक कश्मकश सदैव जारी राहिली. परिणामी जगण्याबद्दल त्याने एक तत्त्व स्वीकारले - 'जे काही घडते, ते स्वीकारणे; जे शक्य आहे ते सुधारणे; आणि उरलेल्या गोष्टींबद्दल मनाला शांत ठेवणे.' त्याने मांडलेला हाच विचार पुढे जाऊन स्टॉइसिजम या तत्त्वज्ञानाचा पाया ठरला!
 
इ.स. 161 मध्ये त्याने रोमची सत्ता स्वीकारली. हा काळ रोमसाठी शांततेचा नव्हता. पूर्वेकडील इराणी वंशाच्या पार्थियन साम्राज्याशी युद्धाचे सावट घोंघावत होते, राज्यात विविध महामारीच्या आजारांनी थैमान घातले होते, आणि उत्तरेकडील जर्मनिक जमातींचा सततचा तणाव, हे सर्व त्याच्या सुरुवातीच्या काळातले वास्तव होते.

जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट आहेत की, ज्यांच्या सैन्याने युद्धे लढली, राज्ये काबिज केली, शत्रूच्या राजसत्ता ताब्यात घेतल्या आणि ते राजे, सम्राट स्वतः मात्र उंची महालातच सुरक्षित राहिले; परंतु मार्कस ऑरेलियस, हा स्वतः सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी सीमारेषांवर तंबू ठोकून राहत असे. तो रोमचा चक्रवर्ती सम्राट असला तरी युद्धाच्या मोर्चावर तो सामान्य रोमन सैनिकांप्रमाणेच अन्न, पाणी, थंडी, पाऊस आणि रोगराई आदींना सामोरा जायचा.

मार्कोमॅनिक युद्ध सुरू असताना त्याने त्याच्या शमियान्यात, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात स्वतःच्या विचारांची नोंद ठेवायला सुरुवात केली. या नोंदी कोणत्याही वाचकासाठी नव्हत्या, स्वतःच्या मनाशी त्याने केलेला, तो एक अलौकिक संवाद होता. त्याच्या मृत्यू पश्चात काही दशकानंतर हे लेखन 'मेडीटेशन्स' या नावाने प्रसिद्ध झाले. आजही जगभरातील लोक त्याच्या लेखनात स्वतःची शांती शोधतात. या ग्रंथात सत्ता, राग, वासना, नैतिकता, दुखः आणि मानवी आयुष्याच्या क्षणभंगुरतेबद्दल त्याने प्रामाणिकपणे लिहिलेय

रोमन साम्राज्याचे विशालकाय काटेरी जू त्याच्या खांद्यावर असताना, तो मात्र मन स्थिर ठेवण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आधार घेत होता, ही गोष्ट आजही त्याचे वेगळेपण अधोरेखित करते.

जागतिक इतिहास आजही अत्यंत आदराने त्याचे स्मरण करतो. असे असले तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निर्णय वादग्रस्त ठरले याची खुली चिकित्साही केली जाते, आणि या चिकित्सेला आजवर कुण्या रोमन व्यक्तीने, आमच्या सुवर्ण इतिहासाचा अवमान करू नका म्हणून आक्षेप घेतल्याचे घडले नाही, ही बाब विशेष मानावी लागेल!
 
त्याचा मुलगा कमोड्स याचा स्वभाव त्याला ओळखता आला नाही आणि त्याच्यावर भरवसा ठेवत त्याला साम्राज्याचा वारसदार करण्याचा निर्णय सर्वार्थाने घातक ठरला, इव्हन त्याच्याही जीवावर बेतला! अनेक इतिहासकारांच्या मते ही त्याची एकमेव चूक होती. सम्राट म्हणून तो प्रामाणिक आणि कार्यनिष्ठ असला तरी, कुटुंबाकडे पाहताना तो तर्कापेक्षा अंतःकारणाचा कौल ऐकत असे हा त्याचा मानवी दोषही इतिहास नोंदवतो.
 
मार्कस ऑरेलियसच्या आयुष्याचा अंत:काल दुःखद होता. त्याच्या शेवटच्या काळात अँटनाइन प्लेगने संपूर्ण रोमन साम्राज्याला ग्रासले होते. हा प्लेग खुद्द ऑरेलियसलाही दीर्घकाळ त्रस्त करत राहिला. तशा अवस्थेतही त्याने युद्धाची मोहीम जारी ठेवली होती. खरे तर उदासीनता, अशक्तपणा आणि तापाच्या झटक्यांचा त्याच्यावर परिणाम झाला होता, मात्र त्याने तसे दाखवले नाही कारण सैन्याचे आत्मबल त्याला खच्ची करायचे नव्हते. एक स्टॉइक तत्त्वज्ञ म्हणून त्याचे आरोग्य ढासळत असतानाही कर्तव्याची, त्यागाची ज्योत त्याने तेवती ठेवलेली.

शेवटच्या दिवसांत त्याचा मुलगा कमोडस याच्या स्वभावाची चुणूक लागली तेव्हा त्याला पश्चाताप झाला असेल का, याचे ठोस उत्तर रोमन इतिहास देत नाही. कमोडस जणू आपल्या वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत होता हे चित्र मात्र तेव्हाच स्पष्ट झाले होते. या सर्व अंतिम धकाधकीच्या काळात मार्कस ऑरेलियसला आधार लाभला असेल, तो त्यानेच लिहिलेल्या मेडीटेशन्सचाच!

आपल्या महान जन्मदात्या पित्याविषयीही अनुदार दृष्टिकोन बाळगणाऱ्या कमोडसचा अनाचार जेव्हा सर्व सीमा ओलांडून पाशवीपणाच्या टोकाला पोहोचला तेव्हा त्याचा कुस्ती प्रशिक्षक मित्र असणाऱ्या नार्सिसस याने त्याची हत्या केली. रोमने सुटकेचा निश्वास सोडला. सर्वांना वाटले जुने दिवस परत येतील, मात्र तसे कधीही झाले नाही! रोमन साम्राज्याचे ते विलक्षण गौरवशाली महान दिवस कधीही फिरून परत आले नाहीत!

एक बिनडोक, स्तुतिप्रिय, किमान बुद्धीमत्तेच्या लोकांचा अनुनय करणारा आणि बुद्धिमंत लोकांची अवहेलना करणारा मूर्ख अप्पलपोटा शासक सत्तेत आला तर ती राजसत्ता, ते राज्य कैक पटीने मागे जाते. कदाचित ते मूळ पदाला कधीही पोहोचत नाही, हे कमोडसच्या कार्यकाळाने सिद्ध केले. अमर्याद सत्ता भोगूनही तो अस्वस्थ असायचा! विशेष बाब म्हणजे त्याच कमोडसच्या वडिलांनी मनःशांतीवरचे जगातले सर्वात अलौकिक विचार मांडले होते!

मनःशांती आणि मोक्षमार्ग आपल्याच ठायी असतो, आपली नजर त्याकडे जात नाही! विषाक्त भवतालाकडे कसे पाहायचे याची दृष्टी अवगत असली तर कदाचित आपल्यालाही मनःशांती गवसेल आणि मनःशांतीचा हा मार्ग इतरांनाही दाखवू शकतो!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा