इंदुरीकर फेमस झाले ते त्यांच्या कीर्तनाच्या शैलीने!
त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांनी त्यांच्यासारख्या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे रूढ झाला. त्यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन मानसिकतेच्याच होत्या. व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या तरुणांना ते झोडपून काढत हे योग्यच होते, वरवर त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट जाणवत असे. असो. पोस्टचा मुद्दा तो नाहीये.
नुकताच त्यांनी त्रागा करत आपण इथून पुढे कीर्तन करणार नसल्याचे, जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याविषयी हक्काने सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती अयोग्य आहे! ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत! (किती ओजस्वी भाषा आहे ही!)
पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली खाचात रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी ते खिदळत, उड्या हाणत सांगत असत! लोकही बारुळ्यागत टाळ्या वाजवत!
लग्नं साधीच केली पाहिजेत, त्यात उधळपट्टी करू नये! कमी माणसं बोलवावीत, लग्नाचा फालतूचा खर्च कमी करून तो पैसा सामाजिक कार्याला दिला पाहिजे, लग्नात बडेजाव करू नये, गाड्या अन् घोड्यांचे प्रदर्शन करू नये, ही सगळी त्यांची मते! ही मते चांगलीच आहेत यात दुमत नाही.
नुकताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा दिमाखात आणि थाटामाटात साजरा झाला. त्यांच्या मुलीला सर्व सुखे लाभोत असाच आशीर्वाद साऱ्यांनी दिलाय, मात्र त्याच वेळेस त्यांच्या विसंगतीवर बोट ठेवण्यात समाज मागे राहिला नाही हे आता लपून राहिले नाही!
त्यांनी ज्या ज्या गोष्टींवर टीका केली होती त्या सर्व गोष्टी त्यांच्या या सोहळ्यात साजऱ्या झाल्यात. त्यांची मुलगी गॉगल घालून कारच्या सनरूफमध्ये उभी राहून नाचलीय (या नाचण्याला माझा तरी आक्षेप नाहीये, त्यांचा मात्र नक्कीच होता!), तिने मेकअप केलाय, त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर तिने नको ती सर्व थेरं केली आहेत, (मुलींनी काय करावे काय नाही हे सांगण्याचा त्यांचा अधिकार नसूनही त्यांनी हिरेमाणकं उधळावीत तशी ही मुक्ताफळे उधळली होती जी सर्वस्वी अश्लाघ्य आणि अस्थानी होती) आता ते कचाट्यात सापडलेत!
इंदुरीकरांनी लग्न, साखरपुड्याविषयी जे सांगितलं होतं त्याच्या नेमकं उलटं त्यांच्या कार्यात घडलेलं दिसतं! नवरदेव डुलत आला आणि त्याच्या वरातीत नागीण डॅन्स, मुंगळा डॅन्स (हे त्यांचेच शब्द आहेत) झाला नाही, लोक झिंगले नाहीत या गोष्टी वगळता बाकी सर्व तसेच झाले! आता यासाठी ते कुणाला बोलणार आहेत?
ते म्हणतात की वऱ्हाडी मंडळी भारतीय बैठकीत होती, जेवण वाढणारे वाढपी वारकरी वेषभुषेत होते, लग्नाला आलेल्या महिला मराठी साज नेसून होत्या, इत्यादी!
मात्र ते हे सांगत नाहीत की, त्यांनी ज्या भपकेबाजीवर टीका केली होती ती त्यांना टाळता आली नाही! नाचणाऱ्या स्त्रियांवर टीका केली होती ते टाळता आले नाही!
तुम्ही खुर्चीवर बसला की जमिनीवर बसला याला महत्व नाही, तुम्ही जे सांगत आला होतात त्याचे तुम्हीच पालन केले की नाही हे महत्वाचे आहे!
वाढपी वारकरी वेषात होते की नव्हते, याला तितके महत्व नाही जितके महत्व जेवणाचा मेनू कमी खाद्यपदार्थांचा होता की नव्हता याला आहे!
कारण हा मुद्दा देखील ते कीर्तनात सांगत असत! एकच लापशी करत जावा, आमटी चपाती आन् भात पुरेसा आहे!
'घे रे बुंदी!" हे त्यांचंच कीर्तन आहे! आता ही सर्व त्यांचीच मते होती आता त्यांच्याच अंगलट आली आहेत!
या विषयावर अतिशय प्रतिकूल मत मांडत सामान्य लोकांवर त्यांनी नेहमीच तोंडसुख घेतलेय, सबब जे स्वतःला कीर्तनकार प्रबोधनकार म्हणवून घेतात त्यांनी दशकांपासून ज्या गोष्टीवर कडाडून टीका केलीय, तिच गोष्ट त्यांनी केली असेल तर ती नैतिक दृष्ट्या चूकच होय.
समजा त्यांनी अशा प्रकारची टीका त्यांच्या कीर्तनाद्वारे केली नसती, तर त्यांनी हा कार्यक्रम कसाही केला असता, तर त्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार केवळ त्या लोकांना उरला असता, जे अशा प्रकारच्या सोहळ्यांना फाटा देऊन आदर्श पद्धतीने लग्न साखरपुडा आदी कार्यक्रम करतात.
इथे इंदुरीकर नैतिकदृष्ट्या चुकलेलेच आहेत, आता लोकांनी त्यांना आरसा दाखवल्यावर त्यांनी इतका त्रागा करून स्वतःचे हसे करून घेतले तर त्यांच्या प्रगल्भतेवरचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक होईल.
आपण चुकलो हे प्रांजळपणे मान्य करण्याची उदारता त्यांच्या ठायी नसेल आणि त्यांना बोल लावणाऱ्यांवरच ते नाराज असतील तर त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले पाहिजे.
‘आधी केले मग सांगितले‘ हीच संतसंस्कृती आहे, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले‘ - असं उगीच म्हटलेलं नाही.
लोकांना उपदेश करणं सोपं आहे पण आपल्याकडूनही त्यांचं पालन व्हावे हे उपदेशकर्त्यास उमजत नसेल तर तो उपदेश तोंडाची वाफ ठरतो! इंदुरीकर चुकलेतच!
शेवटचे - जे उपदेश करतात मात्र स्वतःच्या आचरणात त्याच गोष्टी पाळत नाहीत अशांसाठी तुकोबांनी काय लिहिलंय हे वाचण्याजोगे, विचार करण्याजोगे आहे -
मुखी सांगे ब्रह्मज्ञान। जन लोकांची कापितो मान ।।
कथा सांगतो देवाचि । अंतरी आशा बहु लोभाची ।।
तुका म्हणे तोचि वेडा । त्याचे हानोनि थोबाड फोडा ।।
'घोडे लावलेत' ही भाषा कीर्तनकारांच्या मुखी शोभत नाही! कारण संत परंपरेतील अनेक ज्ञानी, व्यासंगी, संयमी, वैराग्यशील आणि अध्यात्मिक उंची गाठलेल्या अनेक विख्यात मंडळींची नावे कीर्तनकार या शब्दाशी जोडली गेलीत.
इंदुरीकरांनी जो त्रागा चालवला आहे, जी आदळआपट केलीय आणि जी भाषा वापरली आहे त्यासाठी तुकोबांचा एक अभंग उद्धृत करावासा वाटतो -
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला l
आपली संत परंपरा काय सांगते हे त्यांना ठाऊक असेलच, त्यांना आपण काय सांगायचे, कारण तो आपला प्रांत नाही! त्यांनी समाजाला काही उपदेशाचे डोस पाजले असल्याने हा त्यांना दाखवलेला आरसा आहे!
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।
शब्द नेहमी जपून वापरले पाहिजेत याचे भान अशा कीर्तनकारांना नसावे अशी शंका वाटण्याजोगी परिस्थिती आहे. लोकांना विनोदी वाटावे, त्यांनी खिदळावे, टाळ्या पिटाव्यात म्हणून कसलेही शब्दप्रयोग करणे याला काय म्हणावे!
उठता बसता माऊलीचा घोष करण्यापेक्षा त्यांची तत्वे आणि त्यांचे अन्वय लोकांपर्यंत न्यायला हवीत, हे या मंडळींना आपण कसे सांगायचे?
अशाने 'वरुन कीर्तन आतून तमाशा' ही म्हण लोकांच्या मनात रूढ होण्यास मदत होते. भागवत संप्रदायाचे पाईक असणाऱ्य अन्य वारकरी टाळकरी आणि अध्यात्मिक मंडळींनी अशा प्रवृत्तींना पूर्वीच पायबंद घातला असता तर कीर्तनाच्या नावाखाली उगवलेले भरमसाठ तण माजलेच नसते!
तुकोबा म्हणतात -
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥
आताचे कीर्तनकार ही गोष्ट मानतात का, हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे!
सारेच कीर्तनकार असे आहेत असे म्हणण्यातही काहीच अर्थ नाही, कारण संत परंपरेला साजेसे वर्तन असणारे आणि उत्तम पद्धतीचे कीर्तन प्रबोधन करणारे अनेक ज्ञानी व्यासंगी अध्यात्मिक बैठक असलेले कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत हे कुणी नाकारू शकत नाही. आपण कुणाला डोक्यावर घ्यायचे हे लोकांनी ठरवायचे आहे हा या बाबतीतला कळीचा मुद्दा आहे!
एखादी प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा लोकांना चार गोष्टी सुनावते आणि त्याच्या हातून त्याच गोष्टी घडतात, तेव्हा लोक त्यावर तोंडसुख घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत, मग तो कुणी का असेना, त्याची गय केली जात नाही हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले!
- समीर गायकवाड
#इंदुरीकर #कीर्तन #समीरबापू #blogger
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा