त्या घटनेनंतर तिच्या मनावर खोल आघात झाला. सरकारने तिला नवे घर दिले, भांडीकुंडी घेण्यासाठी मदतही केली. अनेक विणवण्या केल्यानंतर तिने स्थलांतर केले. लोक तिला विसरून गेले. मात्र चार वर्षांनी फार मोठा पूर आला तेव्हा ती पुन्हा तिथे परतली. पूरग्रस्तांसोबत राहू लागली. सरकारी अधिकारी पुराची पाहणी करण्यास आले की ती हमखास समोर असे.
जेव्हा जेव्हा पूर येई तेव्हा ती येऊ लागली. तिच्या घराचा काही शोध लागला का याची भोळी जिज्ञासा तिच्या नजरेत असे. क्वचितच ती सरकारी अधिकाऱ्यांना त्याविषयी विचारत असे. हळूहळू तिचं येणं वाढत गेलं. बऱ्याचदा पाऊस ओसरला की नदीकिनारी चक्कर टाकून जाऊ लागली. तिचे घर जिथे होते तिथे तासंतास बसून राहू लागली. 2021 च्या पुरात नदीचे पात्र विस्तारले, कूस बदलली! तिचे घर असणारा भूभाग कायमचा पाण्याखाली गेला. त्यावर्षी ती बरेच दिवस नदीकडे पाहत राहिली. त्या काळातली ती क्लिप होती.
मधल्या चार वर्षांत ती तिथे आली असेल की नाही असा प्रश्न सहज मनात चमकून गेला. ती या जगात असेल नसेल याचा कुणी शोध घेतला असेल का? की तिची मुले तिला घेऊन गेली असतील, तसेच घडलेले असावे असं मी स्वतःचं समाधान करून घेतलं.
या घटनेशी वेगळ्या अर्थाने साम्य असणारी एक वृद्धा आमच्या पंचक्रोशीतल्या गावात होती. ती दर महिन्याला एकादशी झाल्यावर पंढरपुरला जाऊन यायची. लोक एकादशीला जातात, ही त्रयोदशीला जायची. दीड दशकापूर्वी पंढरीच्या चंद्रभागेस पूर आला होता तेव्हा तिचा तरुण मुलगा पुरात वाहून गेला होता असं तिचं म्हणणं. त्याच्या भेटीच्या आशेने ही माऊली दर महिन्याला जाऊन यायची.
शिंदे सरकार वाड्याच्या बाजूने घाट उतरून खाली जायची, बराच वेळ नदीकाठच्या पात्रात बसून राहायची, नदीच्या वाळवंटात भटक्या कुत्र्यांना गायींना खाऊ घालायची. संध्याकाळ होण्याच्या सुमारास गावात परत यायची. वास्तवात तिचा मरण पावलाच नव्हता. कारण त्या दिवशी त्यांची चुकामुक झाली होती. तो गावी आला आणि जवळचे नातलग वारल्यामुळे तिथेच थांबला. त्याला वाटलं की बाकीच्या बायकांसोबत आई असेल आणि आईला वाटलं की आपला मुलगा नावेत बसून गोपाळपुरला गेलाय! वास्तवात दुसरेच कुणी तरी नदीत वाहून गेले आणि तिचा समज झाला की आपलाच मुलगा वाहून गेला.
दिवसभर ती तिथेच रडत राहिली. संध्याकाळी पोलिसांनी चौकशी करून तिला गावी पोहोचवले, तोवर तिच्या मुलाचा प्राण कंठाशी आला होता. तिच्या मुलाला भेटून पोलीस निर्धास्त होऊन माघारी गेले. दरम्यान घरी परतल्यानंतर तिने मुलाला ओळखले नाही, जणू तिची स्मृतीच नष्ट झाली होती. तिला जबर धक्का बसला होता. तिच्यावर बरेच उपचार करून झाले मात्र काही केल्या तिला हे उमजलेच नाही की आपला मुलगा हयात आहे आणि जो वाहून गेला तो दुसराच कुणी तरी होता.
तसा तिचा कुणालाच काहीच त्रास नव्हता, ती मुलासोबत घरात राहायची मात्र त्यात मायलेकाचे नाते नव्हते! नंतर नंतर तोच तिला पंढरपुरला घेऊन जाऊ लागला. साधारण चार वर्षे हा सिलसिला चालला. त्यानंतर मात्र पोराचा धोसरा काढून तिची तब्येत बिघडत गेली आणि त्यातच तिचे निधन झाले. हे सर्व विलक्षण विदारक होते. या घटनेला आता दशक उलटून गेलेय.
एक आई म्हणून तिने जे काही सोसले वा यातना सहन केल्या त्याला तोड नव्हती आणि आपल्या आईची सेवा करणाऱ्या तिच्या मुलासाठीही शब्द नाहीत. ज्यांचं सर्वस्व हिरावलं जातं वा ज्यांना आपण संपले आहोत असं वाटू लागतं, ते कुठे ना कुठे, कशात ना कशात आपला आधार शोधत असतात, आपला भूतकाळ हाती लागतो याची चाचपणी करत असतात. अशांना समजून घेतले तर कदाचित त्यांचा सुखांत होऊ शकतो.
माणूस मोठा संवेदनशील आणि मायाळू आहे, त्याचा ज्यावर जिव जडतो त्यासाठी तो स्वतःचे समर्पण करतो. आताच्या काळातला भवताल इतका विषाक्त होत असतानाही अशी माणसं चुकून जरी नजरेस पडली तरी ती जीवश्च दंतकथेसारखी वाटू लागतात! माणूस म्हणून आपण खूप दुर्मिळ झालो आहोत.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा