शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू!

MANOHAR JOSHI मनोहर जोशी


मनोहर जोशींच्या आयुष्यात डोकावताना त्यांच्या राजकीय भूमिकांचा खल अनेकजण पाडतील; मात्र त्यात सर्वांना स्वारस्य असेल असे नाही.चाळीसच्या दशकात जन्मलेल्या जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत भिक्षुकी करत असत.त्यांच्या बालपणीचा एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता जिथे अनेक तऱ्हेच्या जीवनदायी साधनांची कमतरता होती. अशी प्रतिकूल स्थिती असूनही त्यांच्या अंगी शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळेच विपरीत काळावरही त्यांना मात करता आली.

रायगड जिल्ह्यातील नांदवी हे त्यांचे गाव. त्या काळात कोकण किनारपट्टी पूर्णतः सर्वंकष साधनांच्या अभावाने ग्रासलेली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती.
दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. बहीण खूप सधन अवस्थेत होती अशातली गोष्ट नव्हती. तिच्यापाशी आल्याने त्यांना शिक्षणाचे सक्षम पर्याय गवसले जे त्यांच्या गावात त्यांना कधीच मिळाले नसते.
मोठ्या शहरांचा हा फायदा असतो, जो तरुण मनोहर जोशींनी अचूक घेतला.
मात्र हे शिक्षण त्यांना सहजी घेता आले नाही.
त्यासाठीचा आर्थिक स्रोत त्यांच्यापाशी नव्हता. त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्या आधारे शिक्षण घेतलं.
किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झालं.

स्वतंत्र भारतातले ते पहिले दशक होते. उच्चशिक्षण घेणाऱ्या हातांना तेव्हा नोकरी बऱ्यापैकी सत्वर मिळत असे. जोशींना फारशी खटपट न करता मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरीही मिळाली. मात्र या दरम्यानही त्यांचे शिक्षण सुरु होते ही एक महत्वाची गोष्ट होय.
मात्र एमएचे शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर १९६१ मध्ये त्यांनी पालिकेची नोकरी सोडली होती.

शक्यतो नोकरी पेशात रमणारा वर्ग म्हणून ज्या जातवर्गाची गणना होते त्या वर्गवारीतुन येणारा एक तरुण चक्क सरकारी नोकरी सोडतो हे जरा वेगळेच चित्र होते. कारण अत्यंत विषम परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन, शहरातही स्वकमाईने उच्च शिक्षण पूर्ण करून कुणाला जर सरकारी नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी जणू स्वर्गप्राप्ती असते! मात्र जोशींनी तो मोह तिथेच दूर लोटला आणि एक भव्योदात्त स्वप्न पाहिले, जे पुढे जाऊन पुरेही केले!

पालिकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आवडीचा शिक्षकी पेशा स्वीकारला होता. शिवाय त्यांना एलएलबीचे पूर्णवेळ शिक्षण घ्यायचे होते. १९६४ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशींचे एमए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
इथे त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला तो म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरु करण्याचा!
आता ते केवळ मनोहर जोशी उरले नव्हते तर प्रिन्सिपॉल मनोहर जोशी झाले होते. त्यांच्या नावाचे साइनबोर्ड असणारे कोहिनूर क्लासेस आधी मुंबईत सुरु झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

सुरुवातीला चौकटबंद साच्यात असणारे हे क्लासेस त्याच दशकात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या रूपात पुढे आले. 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टीट्यूट'चे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले.
जवळपास महत्वाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरात एसटी स्टॅन्ड अथवा स्टेशन परिसरात जोशी सरांचे कोहिनूर क्लासेस दिसू लागले.
ज्यांना आयटीआयला प्रवेश मिळत नव्हता ते सर्रास कोहिनूरमध्ये प्रवेश घेत असत. फिटरपासून इलेक्ट्रिशियनपर्यंत आणि मेकॅनिकपासून ते एसी रिपेअरिंगपर्यंत अनेक कोर्सेस तिथे उपलब्ध झाले.

दरम्यान सरांची राजकीय पत वाढल्याचा नेमका फायदा त्यांनी या संस्थेला करून दिला. नोकरीची हमी देणारी शिक्षणसंस्था म्हणून ही संस्था नावरूपाला आली. राज्याच्या ग्रामीण भागातून मुले मोठ्या संख्येने प्रवेश घेऊ लागली, त्यांना त्या अनुषंगाने रोजगारही मिळत गेला हे वास्तव होते.
मात्र सर राजकारणातून फेकले जाण्याचा कालखंड आणि कोहिनूरचे साचेबद्ध झालेले शिक्षण एकाच काळात झाल्याने कोहिनूरचे नाव मागे पडत गेले. वेळेवर अपडेट न केले गेल्याने ही संस्था मागे पडली ती कायमचीच!

इतकी चांगली शैक्षणिक सूत्रे जुळवून आणूनही गणपती दूध पितो याचे ऑनलाईन रेकॉर्डिंग करून तशी अफवा पसरवण्याचा बाष्कळ मूर्खपणा त्यांनी केला होता हेही नमूद केले पाहिजे!

मनोहर जोशी शिवसेनेला काही अंशी ओझे वाटू लागले आणि त्यांचे रूपांतर अडगळीत झाले हे वास्तव होते मात्र याची कारणे शोधली तर या कृतीचे उत्तरही सापडते. असो.
मनोहर जोशींचे जाणे राजकीय दृष्ट्या विविध संदर्भाचे असेल मात्र त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक संदर्भही आहेत हे महत्वाचे आहे.
कारण खूप कमी राजकारण्यांच्या वाट्याला हे संदर्भ येतात.
मरण पावलेल्या व्यक्तीला चांगलेच म्हटले पाहिजे याचे बंधन नाही मात्र त्याची चिकित्सा अगदी तटस्थपणे निर्विकारपणे करायची झाल्यास त्याच्या अन्य बिंदुंचा आढावाही घेतला जाणे अनिवार्य आहे.

आरंभीच्या काळातील शिवसेनेतील कोणत्याही नेत्याकडे सहकार वा शैक्षणिक चळवळींचा वारसा नव्हता कारण या संघटनेची / पक्षाची स्थापनाच मुळी भावनेच्या आधारावरील मुद्द्यांना धरून होती.
यामुळेच मनोहर जोशींचे वेगळेपण लक्षात येते.
त्यांचा वैयक्तिक इतिहास पाहिला की मग भिन्नतेचा हा परीघ आणखी थोडा मोठा वाटू लागतो.
मात्र त्यांच्या या बिंदुची चर्चा फारशी झाली नाही याची कारणे राज्याच्या जातीय, सामाजिक आणि राजकीय समीकरणात दडून होती.

मनोहर जोशींच्या जाण्याने ऐंशी नव्वदच्या दशकातील ग्रामीण व निमशहरी तरुणांना नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता पोटापाण्याचे शिक्षण सहज उपलब्ध करून देणारा एक वेगळा संदर्भ लयास गेला आहे.

- समीर गायकवाड

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

आयुष्याची लढाई!

जगण्याची लढाई आयुष्य कामगार श्रमिक


संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात.
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.

कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामासाठी जी माणसं राबत असतात त्यातील तळाच्या माणसाचे हात रितेच असतात आणि त्याचं घरही उतरतीला लागलेलं असतं. 
श्रमणाऱ्या हातांचे बक्कळ कमावते असण्याचे एखाद दुसरे अपवाद असू शकतील मात्र अपवाद म्हणजेच सकल सत्य नसतं.

सद्यकाळात कष्टकऱ्यांना, 
अंगमेहनत करणाऱ्याना समाजात कसलेही मानाचे स्थान नाही आणि दिवसेंदिवस श्रमाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित होत असतानाही जे लोक नाईलाजाने स्वतःला जुंपून घेतात त्यांच्या श्रमास मूल्य नाही!
किती क्लेशदायी विरोधाभास आहे हा!

या माणसांचीही काही स्वप्ने असतील का आणि त्या स्वप्नांचे पुढे जाऊन काय होत असेल?

वास्तवात ही माणसं आपली रोजमर्राची जंग दिवसाढवळ्या हरत असतात तरीही आयुष्याच्या लढाईला ते रोज उठून कशाच्या आधारे सामोरे जात असतील हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करत आलाय आणि प्रेरणाही देत आलाय!

आयुष्याच्या लढाईच्या न सुटणाऱ्या गुंत्यातल्या नोंदी..

- समीर गायकवाड

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

कलात्मक अभिव्यक्तीवर धर्मवादाचे दडपण!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कला धार्मिक कट्टरतावाद सनातन


२०१७ साली मुंबईमधील बरेलवी रझा अकादमीने इराणी चित्रपट निर्माते दिग्दर्शक माजिद माजिदी आणि विख्यात भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या विरोधात बहिष्काराचा फतवा काढला होता. निमित्त होते एका सिनेमाचे, 'मोहम्मद - मेसेंजर ऑफ गॉड' या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर बनवलेल्या सिनेमामुळे देशातले कर्मठ मुस्लिम संतापले होते. सिनेमा तयार झाला नि रिलीजही झाला. २१ जुलै २०२० साली तो डॉन वाहिनीवरून ऑनलाइन स्ट्रीम होणार होता. रझावाले न्यायालयात गेले नाहीत त्यांनी सत्तेत असणाऱ्या महाआघाडी सरकारकडे याचिका दाखल केली की, या चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रक्षेपण होऊ देऊ नये. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यास मान्यता देत सिनेमा प्रदर्शित होऊ दिला नाही. उलट त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली की देश पातळीवरही बंदी लादली जावी. सर्व सोशल मीडिया साधनांवरून हा सिनेमा हटवण्याची त्यांनी मागणी केली होती. 'द वायर'मध्ये शुद्धव्रत सेनगुप्ता यांनी त्यावर कडक निर्भत्सना करणारा लेख लिहिला होता आणि राज्य सरकारच्या या निर्णयास आव्हान देणे गरजेचे आहे असे म्हटले होते. मात्र तसे काही झाले नाही.

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का?

पूनम पांडे नैतिकता


अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे की मरण पावली आहे हे अजून नेमके कळलेले नाही. परंतु लोकांनी सवयीप्रमाणे तिची ‘अब्रू’ चव्हाट्यावर आणलीय! आता तिची अब्रू म्हणजे काय? तिचं शरीर, तिचे लैंगिक अवयव की तिच्या सेक्स विषयक भावना? तसं तर तिने तिचे सारं शरीर पूर्वीच दाखवलेलं आहे. देहावरचे सर्व कपडे पूर्वीच काढलेत! मागून पुढून, वरून खालून लोकांनी तिला पाहिलंय! कुणी एकांतात बंद खोलीत वा लपून छपून पाहिले असेल, कुणी मित्रांबरोबर मिटक्या मारत पाहिले असेल तर कोणी थेट ग्रुप करून एन्जॉय करत पाहिले असेल पण तिला पाहिलेलं आहे हे नक्की! ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी नसेल पाहिले. पण त्यांची संख्या किती हे सांगता येणार नाही. आता हेच पहा की, ती मरण पावलीय असं नुसतं सुतोवाच केलं गेलंय तरी तिच्या पोस्टवरती लोक तुटून पडलेत! जणू तिच्या देहावर पडण्याचे सुख त्यात अनुभवता आलेय. कदाचित ती जिवंतपणी यांच्यासमोर एकांतात अशीच विवस्त्र येती तर यांच्या सुखभावना प्रत्यक्षात अंमलात आणल्या असत्या! तिचा दोष काय होता? काय अपराध होता? तर ती एक पॉर्नस्टार होती. सेक्सविषयी तिच्या भावना आणि तिचं राहणं, जगण्या विषयीचे तिचे दृष्टिकोन कथित सभ्य लोकांच्या पांढरपेशी परिघाबाहेरचे होते! सर्वांनी तसेच असले पाहिजे असेही काही नाही मात्र जो परिघाबाहेर राहून बंधने तोडतो त्याला त्याची किंमत मोजावी लागते हा आपला 'न्याय' आहे!

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!



दोनेक वर्षांपूर्वीच्या कडक उन्हाळ्यातली गोष्ट. बरड रानातल्या बांधालगत असणाऱ्या भल्याथोरल्या उंच पिंपळावर वरच्या बाजूला धनेश (हॉर्नबिल) पक्षाने घरटे केले होते. जाडजूड फांदीच्या ढोलीत खचका पाहून घरटं बांधलेलं. एरव्ही भयंकर एकजीव असणारी नर मादीची जोडी घरटं बांधताना नर खाली साठलेले चिखल मातीचे गोळे वर घेऊन जायचा. झाडाच्या बुंध्यापाशी जुनी डोबी होती, त्यातलं पाणी झिरपून तिथं ओल तयार झाली होती. त्याच चिखलाचे गोळे नराने वर नेलेले. मादीने बहुतके तीन अंडी घातली होती, ती आतच बसून होती. अंडी उबवून पिले जन्माला यायच्या काळात घरट्याचे तोंड जवळपास पूर्णतः बंद झालेलं. फक्त मादीची चोच बाहेर राहील इतकीच सांद त्याने ठेवली होती. पिले जन्मली. मादी पिलांसोबत आत घरट्यात आणि नर सकाळ संध्याकाळ घरट्यापाशी! दिवसातून दोनतीन वेळा तरी तो त्यांचं खाद्य घेऊन तिथं यायचा. मादीच्या तोंडात घास घालायचा, ती आपल्या चोचीतून पिलांच्या चोचीत घालायची. पिले दोन तीन आठवड्याची झाली असतील. एव्हाना मे महिन्याचे कडक उन्हाचे तडाखे बसू लागले होते. एके दिवशी हवेतला उष्मा अतिशय टोकाला पोहोचला. वाऱ्याचे नामोनिशाण नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. रणरणत्या उन्हात सारं चराचर म्लान होऊन निपचित पडलं होतं. त्या जीवघेण्या उन्हातही नर बाहेर पडला होता. मात्र त्यादिवशी अघटित घडलं. अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह नि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दोन तीनदा तरी वीज कोसळल्याचा आवाज आला. काळजात धस्स झालं. संध्याकाळ सरून गेली. गडद रात्र आली. नर परतला नव्हता. पिले व्याकुळ होऊन गेली होती. त्यांचा आवाज कुंठला होता, दोनच दिवसांनी मादीने जीव सोडला. धनेश पक्षाच्या जोडीतला नर मरण पावला तर मादी पिलांसकट जीव सोडते! किती हे प्रेम, किती उत्कट या संवेदना! कुठले विधी न करता नि कुठले प्रस्थ न माजवता हे पक्षी मुक्याने आपली प्रेमकथा निसर्गाच्या पटावर लिहून जातात. ही संवेदनशीलता अफाट आहे.

आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे!



आमच्या इथल्या एका कुख्यात तसेच विख्यात(!) कनवाळू महान राजकीय नेता कम कार्यकर्त्याचा मध्यंतरी अकाली (कारण तेच ते प्रसिद्ध लिव्हर / किडनी फेल्युअरचे!) मृत्यू झाला.
त्याची मयत वगैरे जाम थाटात काढली होती. तुफान पब्लिक मयतीला आलं होतं (तसेही आमच्या इथे रिकामटेकडी माणसे खूप असतात). पुढारी तर हरामी सगळे झाडून आले होते, त्या समाजातील पुढच्या मतांवर त्यांचा डोळा जो असतो! असो.
मयत झाली. त्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी अकाली विधवा झाली.
काही नालायकांनी तिच्या कानात राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न केला पण ती बधली नाही.
त्याच्या कोवळ्या पोरांना काही हराम्यांनी मधाचे बोट लावले.
पोरं बिथरली. बापाचे कटआऊट लावून बापाच्या राजकीय दुष्मनांना चॅलेंज देऊ लागली. परिसरात असणाऱ्या दोन नंबर धंद्यावरून भांडणे होऊ लागली.