मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

रविवार, २६ जून, २०२२

खऱ्या समानतेच्या शोधात..


'जातीसाठी माती खावी' किंवा 'जात नाही ती जात' ह्या आपल्याकडच्या पॉप्युलर टॅगलाईन्स आहेत. एकीकडे सातत्याने जातीयवादाविरुद्ध कंठशोष करायचा आणि त्याचवेळी हस्ते परहस्ते आपल्या जातीच्या 'अहं'ला गोंजारत रहायचं ही भारतीय माणसाची खासियत बनून गेलीय. सद्यकाळात आपले विचार आपल्या व्यक्तीमत्वाइतके दुभंगत चाललेत हे कटूसत्य आहे, गतशतकातली जातीनिर्मूलनाची साधीसोपी चळवळ आपण पूर्णतः स्वीकारू शकलो नाही हे वास्तव आहे. मागील आठ शतकांत अगदी संतपरंपरेपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंत अनेकांनी यावर प्रबोधन केले आहे मात्र आपल्यावर त्याचा परिणाम शून्य झालाय. गत शतकात वा अगदी या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत लोकांच्या वागणुकीत जातीयता स्पष्ट दिसून यायची, त्यावर प्रहार करणं सोपं असायचं. लोक याची दखल घेत असत, अगदी राजसत्तेपासून ते मीडियापर्यंत याची नोंद घेतली जायची. परिणामी जे जातीभेद करत असत ते अगदी उघडे पडत असत, अशांची बाजू घ्यायला फार कुणी पुढे येत नसत. अर्थातच अशांना समर्थन देण्याची खुमखुमी काहींच्या ठायी असायची मात्र लोकलज्जेस्तव तसेच वाढत्या सामाजिक दबावापुढे असे लोक वचकून राहत आणि जातीभेद करणाऱ्याला खुले समर्थन मिळत नसे.

मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.