मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

मिहीर शर्मा यांनी लिहिलेला लेख ढाका एक्सप्रेसमध्ये प्रकाशित होण्याआधी ब्लूमबर्गमध्ये पब्लिश झाला होता. बांगला माध्यमांना त्याची भुरळ पडणे साहजिक होते त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यास ठळक प्रसिद्धी दिली आणि आपल्या देशाचा गौरव जगभरात कसा वाढतो आहे यावर भाष्य केले. बांगलादेशच्या आजवरचा प्रगतीचा मागोवा त्यात होता आणि आता नेमकी कोणती धोरणे फलदायी ठरत आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला. अर्ध्या शतकापूर्वी मार्च 1971 मध्ये, बांगलादेशच्या संस्थापकांनी त्याकाळी त्यांच्याहून श्रीमंत आणि अधिक शक्तिशाली असलेल्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले. दुष्काळ व युद्धजन्य कालखंडात या देशाचा जन्म झाला. दरम्यान लाखो बांगलादेशी नागरिक भारतात पळून गेले किंवा पाकिस्तानी सैनिकांनी मारले. पाकिस्तानी लष्कराच्या अमेरिकन पाठिराख्यांना, बांगलादेशची निर्मिती अयशस्वी होईल असे वाटत होते. एकीकडेअमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर हे उघडपणे याला 'बॉटमलेस बास्केट' म्हणून हिणवत तर दुसरीकडे जॉर्ज हॅरिसन आणि रविशंकर यांनी संघर्षग्रस्त देशांकडे युनिसेफच्या माध्यमातून मदत 
बांगलादेशचा वाढता जीडीपी   
कार्यासाठी पैसे उभारण्यासाठी प्रथमच सुपर बेनेफिट्सचे आयोजन केले होते. 1971 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सरासरीच्या एक सप्तमांश इतकी परकीय मदत मिळत असे. सध्या ते प्रमाण फक्‍त दोन टक्‍के आहे. म्हणजेच विदेशी मदतीच्या आधाराची बांगलादेशला गरज उरलेली नाही. वित्तीय तूट, रोजगार, खास करून महिला रोजगार, विदेश व्यापार संतुलन याबाबतीत बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा उजवी आहे.

भारतीय उपखंडातील बहुतांश राष्ट्रे बऱ्यापैकी भरकटलेल्या अवस्थेत दिसत असताना बांगलादेशने ही मजल मारली आहे हे विशेष आहे. महागाई, उपासमार, धर्मांधता आणि विषमतेने पाकिस्तानची अधोगती जारी आहे. श्रीलंकेची अवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे, जनता हवालदिल झाली असून अन्नाला महाग झाली आहे. त्यातून तिथे अराजक माजले आहे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करताहेत. श्रीलंकन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचेच घर नष्ट करण्यात आले आणि त्यांना पलायन करावे लागले. भूतान, मालदीव, नेपाळ यांचीही वाटचाल समाधानकारक नाही. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांची अवस्था थोडीफार अशीच आहे. 2022 मध्ये बांगलादेशचे दरडोई उत्पन्न पाकिस्तानपेक्षा 37 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. भारताची अर्थव्यवस्था 
गत दशकातील तुलनात्मक वाढ 
बांगलादेशच्या दहापट मोठी आणि आपली लोकसंख्या त्यांच्यापेक्षा सहापट जास्त आहे. 2007 साली बांगलादेशचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत 50 टक्‍के इतके होते. 2014 साली ते 70 टक्‍के झाले आणि 2020 मध्ये बांगलादेशने याबाबत भारतावर मात केली. त्यांचा दरडोई जीडीपी गेल्या वर्षभरात 9% ने वाढला आहे, वाढून $2,227 वर पोहोचला आहे. भारतातील दरडोई जीडीपी दर $1947 आहे तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न $१,५४३ आहे. 1971 मध्ये, पाकिस्तान बांगलादेशपेक्षा 70% श्रीमंत होता; आज बांगलादेश पाकिस्तानपेक्षा ४५ टक्के श्रीमंत आहे. एका पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञाने निदर्शनास आणून दिलेय की, कदाचित 2030 मध्ये त्यांना बांगलादेशकडून मदत मागावी लागेल अशी स्थिती तेंव्हा निर्माण झालेली असेल.

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण बांगलादेशपेक्षा मागे आहोत या वस्तुस्थितीचा सामना केला पाहिजे. 2020-21 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न फक्त $1,947 होते हे नाकारता येणार नाही. आजवरच्या भारतीय अर्थतज्ज्ञांच्या दाव्यानुसार आपण एकटेच दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थेतले वाघ होतो बाकीचे आपल्या आसपास देखील नव्हते. काही वर्षांपूर्वीपर्यंत यात तथ्य देखील होते मात्र आता चित्र बदलले आहे हे वास्तव आपल्या अर्थनीतीकारांनी स्वीकारले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही, आपल्या धुरिणांना आपण बांगलादेशपेक्षा पिछाडीवर आहोत हे मान्य करावेसे वाटत नाही. ब्लूमबर्गमधील लेखात या भारतीय वृत्तीविषयी तिरका कटाक्ष टाकण्यात आलाय, भारताने बांगलादेशचे यश मान्य करावे अशी अपेक्षा ठेवून आपला श्वास रोखू नका असा 
सेक्टर वाईज झालेली वाढ  
सल्ला त्यांनी बांगला माध्यमांना दिलाय. पुढे त्यात लिहिलंय की भारतातील उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींना खात्री आहे की बांगलादेश इतका असहाय्य आहे की तिथले लोक राजरोसपणे बेकायदेशीर स्थलांतर करत भारतीय सीमेत दाखल होताहेत. प्रत्यक्षात बांगलादेश हा आनंददायी राष्ट्रात देखील भारताच्या पुढे आहे, त्याउलट भारतीय माध्यमे आणि उजव्या विचारसरणीचे सरकार मात्र बांगलादेशास कस्पटासमान लेखून धर्मद्वेषाच्या आहारी गेलेला इस्लामी मूलतत्त्ववादाकडे कललेला देश अशीच प्रतिमा उभी करण्यात दंग आहेत. मिसिसिपीला जशी कॅनडातून बेकायदेशीर स्थलांतरितांविषयी भीती बाळगायची गरज नाही तद्वतच भारतीयांची मनोवस्था असावी अशी अत्यंत तिखट टिप्पणी या लेखात केलीय.

बांगलादेशची प्रगती निर्यात, सामाजिक प्रगती आणि वित्तीय विवेक या तीन स्तंभांवर अवलंबून आहे असा सूर या लेखात आहे. 2011 ते 2019 दरम्यान, बांगलादेशची निर्यात जागतिक सरासरी 0.4% च्या तुलनेत दरवर्षी 8.6% ने वाढली. हे यश मुख्यत्वे वस्त्रोद्योग उत्पादनांवर अथक लक्ष केंद्रित करण्यामुळे मिळाले आहे. तिथल्या श्रमशक्तीमध्ये बांगलादेशी महिलांचा वाटा सातत्याने वाढला आहे, भारत आणि पाकिस्तानात मात्र तुलनेत तो कमी झाला आहे. बांगलादेशने सार्वजनिक कर्ज-ते-जीडीपी प्रमाण 30% आणि 40% दरम्यान राखले आहे. वित्तीय संयमामुळे बांगलादेशच्या खाजगी क्षेत्राला कर्ज घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आहे. बांगलादेशच्या यशामुळे त्यांच्या काही समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेच्या सामान्यीकृत सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस सारख्या विकसित अर्थव्यवस्थांना टॅरिफ-मुक्त प्रवेशास अनुमती देणार्‍या विविध यंत्रणांमध्ये देशाच्या सहभागाचा फायदा तिच्या निर्यातीला होतो. हे गट केवळ जगातील सर्वात कमी विकसित देशांसाठी खुले आहेत. बांगलादेशला हे 
बांगलादेशची नवी ओळख पद्मा ब्रीज..     
विशेषाधिकार 2026 पर्यंत सोडून द्यावे लागतील. जसजशी त्यांची अर्थव्यवस्था परिपक्व होईल तसतसे त्याचे तुलनात्मक फायदे देखील बदलतील. व्हिएतनाम आणि इतरांप्रमाणे त्यांना नंतर वस्त्रोद्योगावर अवलंबून न राहता उच्च-मूल्याच्या निर्यातीकडे वळवावे लागेल. या टप्प्यावरचे आर्थिक संक्रमण बांगलादेशची खरी चाचणी घेईल कारण त्या शर्यतीत बरीच छोटीमोठी राष्ट्रे आहेत. यासाठीचे पुढील दशकाचे धोरण तिथे आखले जातेय, जागतिक एकात्मतेच्या नवीन स्वरूपांवर आणि अर्थव्यवस्थेच्या निरंतर परिवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जातोय. मुक्त-व्यापार करारांवर स्वाक्षरी करून विकसित जगातील बाजारपेठेतील प्रवेश टिकवून ठेवणे ही सर्वात हुशार गोष्ट साध्य करण्याची धडपड तिथे अखंड जारी आहे, त्यासाठी त्यांना अजून बरेच काही करायचे आहे. 360 अब्ज डॉलर्सचा सहा किलोमीटर लांबीचा आणि 42 खांब असलेला पद्मा प्रकल्प हा पूल चारपदरी महामार्ग असून, खालच्या बाजूला रेल्वेमार्गही आहे. शेख मूजीबूर रेहमान यांच्या आदर्श राष्ट्रउभारणीच्या दृष्टीने त्या देशाची वेगवान वाटचाल सुरू आहे तर आपण कुठे कमी पडत आहोत याविषयी भारताने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा