गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !


रुजा इग्नाटोवा ही मूळची बल्गेरियाची असून ती व्यवसायाने डॉक्टर होती. रुजा दहा वर्षांची असताना तिचे कुटुंब जर्मनीला गेले. त्यानंतर 2005 मध्ये रुजाने कोन्स्टान्झ विद्यापीठातून कायद्यात पीएचडी केली. यानंतर रुजा मॅकेन्झी अँड कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून रुजू झाली. रुजाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. बिटकॉईनचे यश मस्तकात ठेवून तिने स्वत:चे वर्णन क्रिप्टो क्वीन असे केलेलं. त्यानंतर तिने 'वनकॉइन' नावाचे क्रिप्टो चलन तयार केल्याचा दावा केला. तिने या चलनाला बिटकॉइन किलर असे नाव दिले. रुजाने दावा केला होता की, एक वेळ अशी येईल की वनकॉईन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनेल आणि लोक त्यातून अनेक पटींनी नफा कमावतील. हा दावा फोल ठरलाय आणि आता स्थिती अशी आहे की फरार रुजावर आपल्या गुंतवणूकदारांची ४ अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये ग्रीसमधून गायब झालेल्या रुझावर एफबीआयने एक लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवून तिचे नाव टॉपटेन मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केलेय. एफबीआयच्या मते वनकॉईन कंपनीने जगभरात सुमारे 30,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भातील काही प्रकरणांची सुनावणी अजूनही सुरू आहे. यात शेकडो प्रकरणे आहेत पैकीच एकाचा नुकताच निकाल लागलाय. या प्रकरणात फ्लोरिडाच्या डेव्हिड पाईकने आपला गुन्हा मान्य केला आहे. एकसष्ट वर्षीय डेव्हिड पाईकला मॅनहॅटन फेडरल कोर्टाच्या सुनावणीत बँक फसवणूक करण्याच्या कटाच्या आरोपासाठी दोषी ठरवले आहे. सुनावणी समयी गुप्तचर यंत्रणांच्या वकिलांनी सांगितले की पाईकने माजी लॉक लॉर्ड एलएलपी अटर्नी मार्क स्कॉट यांची $400 दशलक्षची फसवणूक केली. जानेवारीमध्ये शिक्षा सुनावल्यावर पाईकला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. रुजा इग्नाटोवाच्या अनेक भानगडींच्या हिमनगाचे हे एक टोक आहे यावरून तिच्या घोटाळ्यांचा अंदाज यावा. 2016 मध्ये रुजा इग्नाटोवाने वनकॉईन संदर्भात लंडन ते दुबई पर्यंत अनेक देशांमध्ये सेमिनार आयोजित केले होते. प्रत्येक सेमिनारमध्ये ती म्हणायची की एक दिवस वनकॉइन बिटकॉइनला मागे टाकेल. बीबीसीच्या एका अहवालानुसार ऑगस्ट 2014 ते मार्च 2017 दरम्यान जगभरातील अनेक देशांमधून सुमारे चारअब्ज युरो वनकॉईनमध्ये गुंतवले गेले.

रुजा नियमितपणे सेमिनार करत होती आणि गुंतवणुकीचा वेग झपाट्याने वाढत होता. विशेष गोष्ट अशी होती की लोकांनी फक्त रुजाच्या शब्दांना भुलून गुंतवणूक केली. वनकॉईनकडे क्रिप्टोचलन ज्या तंत्रज्ञानावर काम करते देखील नव्हते हे इथे ध्यानात घेण्याजोगे आहे ! परिस्थिती आवाक्याबाहेर जातेय हे लक्षात येताच रुजाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी लिंक करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला ते जमले नाही. वनकॉईनचे सर्वात लहान पॅकेज 140 युरोचे होते आणि सर्वात मोठे एक लाख 18 हजार युरो होते. तिने गुंतवणूकदारांसाठी एक फॉरेन एक्सचेंज उघडण्याचे वचन दिले होते जे त्यांना भविष्यात त्यांच्याजवळील वनकॉईनच्या चलनाचे रूपांतर डॉलर्स किंवा युरोमध्ये रूपांतरित करण्यास अनुमती देणार होते. अनेक गुंतवणूकदार याची चातकासारखी वाट पाहत होते, कारण वनकॉईनच्या वेबपोर्टलवर त्यांचे क्रिप्टोचलन वेगाने अनेक पटींनी वाढताना दिसत होते. आपल्या नावावर असणाऱ्या  कोट्यावधीच्या क्रिप्टो चलनाचे डॉलर होताना पाहण्याचे अनेकांचे स्वप्न होते ! एका अंदाजानुसार वनकॉईनमध्ये 15 अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली असावी. दरम्यान बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचे समर्थक वनकॉइनच्या गुंतवणूकदारांशी संपर्क साधू लागले. ब्लॉकचेन अनुपलब्धीच्या वास्तवापासून ते वनकॉईनच्या खोट्या चलनवृद्धीविषयीचे कटुसत्य ते त्यांना सांगू लागले. तोवर वनकॉईनचे अनेक गुंतवणूकदार सत्य जाणून घेऊ शकले नव्हते. 

दरम्यानच्या काळात रुजा आपली हराम कमाई नवनव्या मालमत्ता खरेदीत गुंतवत होती. वनकॉईनने खाजगी ब्लॉकचेनचा वापर सुरु केल्याची कंडी पिकवून तिने बल्गेरियाची राजधानी सोफिया आणि काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील शहर सोझोपोलमध्ये लाखो डॉलर्सची मालमत्ता खरेदी केली. संशयाचे जाळे तयार होऊ लागताच तिने भव्य जाहिराती आणि प्रभावकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले. गुंतवणुकदारांना आणखी लोकांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या क्रिप्टो खात्यांमध्ये कमिशनचे पैसे वेगाने जमा होत असल्याची बतावणी केली गेली.  तिच्या शेवटच्या नोंदीनुसार ती ऑक्टोबर 2017 मध्ये लिस्बनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार होती मात्र आजतागायत लिस्बनला पोहोचली नाही. म्हणजेच लाखो गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवणारी क्रिप्टो क्वीन बेपत्ता झालीय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्यापपर्यंत रुजाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही हे वास्तव आहे. काहींच्या मते तिने प्लॅस्टिक सर्जरी केली असावी वा तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यापासून स्वतःला वाचवताना तिचा मृत्यू झाला असावा अशीही शक्यता वर्तवली जातेय मात्र त्यात तथ्य किती हे कुणीच सांगू शकत नाही. भारतासारख्या देशात आपण अनेकदा पाहिलेय की कमी अर्थसाक्षरतेचा फायदा घेऊन अनेक भामटे पॉन्झी स्कीम्स राबवतात आणि झटपट घबाड मिळवण्याच्या लोभापायी अनेकजण त्याला बळी पडतात.  इथे अनेक तज्ज्ञ उच्च शिक्षित व कथित रित्या शहाणे समजले जाणारे विदेशी गुंतवणूकदार देखील शिकार झाले आहेत. नेटकी माहिती न घेता भूलथापांना बळी पडून चकचकाटास वश होणारी अर्थकारणाची माहिती नसणारे लोक म्हणजे रुजासारख्यांचे भांडवलच होय ! क्रिप्टोक्वीन सापडेल की नाही हे सांगता येत नाही मात्र यावरून अनेकांना धडा मिळाला असेल असे नक्की म्हणता येईल मात्र त्यासाठीची किंमत आयुष्यभराच्या पूंजीचे असू नये. 

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा