ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.
2019 साली सत्तेत आलेल्या बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बत्तीस नंतरचा सर्वात मोठा विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. ते शब्दशः नायक होते! विराट विजयासह त्यांनी सत्ता काबीज केली. ब्रिटनला नवा हिरो गवसला अशा अर्थाच्या हेडलाईन्स अनेक टॅब्लॉईड दैनिकांसह मुख्य प्रवाहातील मीडियाने प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र अवघ्या तीन वर्षांत हे चित्र इतके उलटे झालेय की जॉन्सननी स्वत:च्याच खासदारांचं समर्थन गमावलंय! एव्हढेच नव्हे तर त्यांना पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दयावा लागलाय. बोरिस जॉन्सन यांनी थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर पदभार सांभाळला होता. ते बहुमतानं पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांचे बहुमत विराट असले तरी विरोधकांचा दावा असायचा की त्यांच्याकडे नाविन्यांची व लक्ष केंद्रित करण्याची उणीव आहे. त्यांच्या सल्लागारपदी काम करणाऱ्या व्यक्तीनेदेखील त्यांच्यावर अनियंत्रित असल्याचा आरोप केला होता.
बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पहिल्यांदा अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला तेव्हा हे विश्वासमत त्यांनी थोडक्यात जिंकलेलं. ते जिंकून देताना जॉन्सन यांच्या बाजूने खासदारांची मतं वळवण्याचं महत्त्वाचं काम ख्रिस पिंचर या त्यांच्या खूप जवळच्या सहकाऱ्याने आणि तेव्हाच्या डेप्युटी चिफ व्हिपने केलं होतं. पिंचर यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बोरिस यांनी जे पाऊल उचललं तेच त्यांना गर्तेत घेऊन गेलं. ख्रिस पिंचर हे इंग्लंडमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी अनेकदा उलटसुलट बातम्या छापून आल्या आहेत. 29 जूनला पिंचर लंडनमधील एका खासगी क्लबमध्ये गेले. तिथे त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक मद्यसेवन केलं. तिथल्या दोन पुरुषांना त्यांनी आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. पिंचर स्वत: समलैंगिक विवाहाचे पुरस्कर्ते आहेत आणि 2017च्या नोव्हेंबरमध्ये ग्रेट ब्रिटनचे आघाडीचे रोईंग खेळाडू ऍलेक्स स्टोरी यांनी त्यांच्याविरोधात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप केला होता. स्टोरी हे पिंचर यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. सतत नकार देऊनही दारूच्या नशेत असलेल्या पिंचर यांनी आपलं ऐकलं नाही, असं स्टोरी म्हणाले होते. त्यानंतर डिसेंबर 2017मध्ये आणखी एक खासदार टॉम बेनक्लिनसॉप यांनीही असाच आरोप केला. हे सर्व आरोप एका रात्रीत झालेले नव्हते हे विशेष!
ब्रिटिश संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरच असे आरोप होणं ही गंभीर गोष्ट होती. हे प्रकरण 'वेस्टमिन्स्टर सेक्श्युअल ऍलिगेशन्स' या नावाने खूप गाजलं. यापायी त्यांनी व्हिप पदाचा राजीनामाही दिला. तरीही बोरिस यांनी त्यांच्याविषयी चकार शब्द उच्चारला नव्हता. चौफेर टीका होऊ लागल्यावर मात्र त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली. तत्पूर्वी मखलाशी करत ब्रिटन सरकारनं खुलासा केला की बोरिस जॉन्सन यांनी पिंचर यांची नेमणूक करण्याआधी त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. काही मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. वास्तवात हे निखालस असत्य होते कारण बीबीसीने एका बातमीत जॉन्सन यांना पिंचर यांच्याबाबतच्या तक्रारीची औपचारिक माहिती असल्याच्या माहितीचा भंडाफोड केला होता. बीबीसीने बारकावे दिल्यानंतर बोरिस यांनी मान्य केलं की 2019 मध्येच त्यांना याविषयीची माहिती होती. या घटनेपासून पंतप्रधान खोटारडे आहेत अशी जी प्रतिमा निर्माण झाली ती अधिकाधिक बुलंद होत गेली. ते ज्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत त्या पक्षानेच त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला, 59% मतं मिळवून जॉन्सन यांनी एकदा आपली गादी वाचवली. कॉन्झर्व्हेटिव्जच्या घटनेप्रमाणे एकदा अविश्वास प्रस्ताव जिंकल्यानंतर पुढचं एक वर्ष अशा नेत्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव आणता येत नसल्याने बोरिस विरोधकांनी थेट पक्षाच्या घटनादुरुस्तीचाच घाट घातला. यावरून जॉन्सन यांच्याविरोधात किती तीव्र नाराजी होती याचा अंदाज यावा. लेबर आणि लिबरल या दोन्ही पक्षांत त्यांच्या विरोधातला आवाज चढतच राहीला.
याशिवायही आणखी काही गोष्टींमुळे जॉन्सन यांच्याविषयी जनक्षोभ निर्माण झाला. सामान्य ब्रिटिश नागरिकांना जेंव्हा कोविडविषयक कठोर नियम लागू केले होते तेंव्हा बोरिस यांनी स्वतः मात्र मोठी घोडचूक केली. जून 2020 मध्ये डाऊनिंग स्ट्रीट गार्डनमध्ये वाढदिवशी बोरिस जॉन्सन लॉकडाऊनचे नियम तोडून पार्टीत सहभागी झाले. याबद्दल सुनावणी होऊन त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. पोलिसांनी डाऊनिंग स्ट्रीट आणि व्हाईटहॉलमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचा उल्लंघन केल्याबद्दल 83 लोकांवर एकूण 126 दंड ठोठावले. यात जॉन्सन यांची पुरती नाचक्की झाली. त्यातच महागाईची भर पडली. 2022 मधला महागाईचा दर 9.1 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. युक्रेन रशिया युद्धाने त्यात तेल ओतले. तेलाच्या किंमती आणि खाद्यपदार्थांचा तुटवडा यात वाढ झाली तेंव्हा जॉन्सन सरकारने इंधनावर ड्युटी चार्ज 5 पेंस प्रति लीटर घटवला आणि एप्रिलमध्ये टॅक्समध्ये पुन्हा वाढ केली गेली. नॅशनल इंश्युरन्समधील योगदानही 1.25 पेंसने वाढवण्यात आलं. आरोग्य आणि सामाजिक देखभालीसाठी करवाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे सरकारकडून सांगितले गेले. परिणामी 34 हजार पौंडहून अधिक वार्षिक मिळकत असणाऱ्या लोकांनाही करदाता होणं भाग पडलं. याखेरीज एक मुद्दा होता चुकीच्या लोकांना पाठीशी घालण्याचा. 2021 च्या ऑक्टोबरमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स कमिटीने तत्कालीन कॉन्झर्व्हेटिव्ह खासदार ओवेन पॅटर्सन यांना 30 दिवसांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली होती. ओवेन यांनी लॉबिंगच्या नियमांना तोडून त्या कंपन्यांना लाभ मिळवून दिला ज्यांनी त्यांना पैसे दिले होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानं त्यांचं निलंबन रोखलं. गदारोळानंतर पॅटर्सन यांनी राजीनामा दिला. नोकरदार वर्गावर करवाढ करणारे बोरिस यांचे शासन भ्रष्टांच्या पाठीशी उभं असल्याची लोकभावना त्यांना बुडवून गेली.
2019 सालच्या ख्रिसमसच्या वेळेसही अशीच स्थिती होती, सरकार कोसळेल की काय असे वाटत होते मात्र बोरिस यांचा राजनीतिक मुत्सद्दी कामी आला होता. या खेपेस तसे काही घडले नाही. मंत्रीमंडळामधून दबाव वाढू लागल्यावर बोरिस यांनी एकहाती चुका केल्या. गृहनिर्माण मंत्री मायकेल गोव्ह यांना मंत्रिमंडळातून काढलं गेलं. वेल्सचे परराष्ट्र मंत्री सिमन हार्ट यांच्या संगतीने गृहसचिव प्रीती पटेल यांनी भेट घेत जॉन्सनना राजीनामा देण्याची विनंती केली. ऍटर्नी जनरल सुएला ब्रेवरमन आणि माजी मंत्री मॅट हॅनॉक यांनीही पटेल यांचाच कित्ता गिरवला. या दरम्यान साजिद जावेद आणि ऋषी सुनक यांच्यासह मंत्री आणि इतर अधिकारी अशा एकूण 44 जणांनी राजीनामा दिल्याने जॉन्सन यांचे आसन पुरते डळमळीत झाले होते. अखेरीस स्वतःचा पक्षच पूर्णतः विरोधात गेल्यानंतर बोरिस जॉन्सन हे अत्यंत अपमानजनक पद्धतीने खुर्चीवरून बाजूला झाले. ते आता काळजीवाहू पंतप्रधान असतील आणि येत्या काही दिवसांतच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला नवीन नेत्याची निवड करावी लागेल जे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. बोरिस जॉन्सन यांना न्यूटनचे पहिले दोन्ही नियम अत्यंत प्रत्ययकारक पद्धतीने लागू पडले आहेत आता तिसरा नियम ते स्वतःहुन वेगाने अंमलात आणतात की कसे हे पाहणे विलक्षण रंजक असेल.

- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा