नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!
एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.
त्या शुक्रवारी नगमाने दम दिल्यानंतर तो पुन्हा तिच्या गल्लीत आलाच नाही.
नगमाला वाटले आपली मात्रा लागू पडली,
फकीरबाबाचे बिंग फुटणार म्हटल्यावर तो पुन्हा या वाटेला गेलाच नाही असा तिचा समज होता.
या घटनेस बरीच वर्षे उलटून गेली.
नियतीने फसवलेल्या आणि लोकांनी ओरबाडून खाल्लेल्या नगमाने स्वतःमध्ये अशी काही सुधारणा केली की तिच्या नावाने अनेकांना कापरे भरत असे.
पोलीस दरबारीही तिचे वजन वाढले.
नागपाडा पोलीस स्टेशनपर्यंत तिची हद्द पसरली, कीर्ती वाढली.
दलालांचा कंपू तिला घाबरून असायचा.
मुंबईत आल्यानंतर तब्बल तीन दशकांनी तिच्या मनाने अकस्मात ओढ घेतल्यानंतर ती जालौनला तिच्या गावी गेली. गावातल्या नजरा तिचा पाठलाग करायच्या. तिला कसेसेच वाटायचे.
तिची बदनाम ख्याती तिला सुख मिळू देत नव्हती,
तिच्यापाशी ऐश्वर्य होतं पैसा अडका होता,दहशत होती, नाव होतं आणि जोडीला बदनामीही होती.
नगमाच्या पाठीमागे काही वर्षांनी तिची आई आफरीन मरण पावली, नगमाचे दोन भाऊ कायमचे घर सोडून गेले.
कालांतराने तिच्या बहीणींची लग्ने झाली.
ज्या मामाने तिला दलदलीत लोटलेले तोदेखील मरण पावला तेंव्हा गावाशी तिची नाळ पुन्हा जुळली.
मात्र तिचे मन मेले होते.
आता इतक्या वर्षांनी गावी परतल्यानंतर तिच्या मनातली गावाची जी छबी होती ती पुरती उद्ध्वस्त झाली,
कारण पूर्वीचं काहीच शिल्लक नव्हतं, सर्व खाणाखुणा पुसल्या गेल्या होत्या.
माणसंही बदलली होती.
आता आपण पुन्हा कधीही घरी परतायचे नाही हे मनाशी पक्के ठरवून तिने जालौन कायमचे सोडायचा निश्चय केला.
मात्र बहीणींचा खूप आग्रह झाल्याने आपली मामी शकीला हिच्या घरी जायला राजी झाली.
आईबापाच्या मागे तिच्या कुटुंबियांचे पालनपोषण मामीनेच केले होते.
आपला दादला सुलेमान याचा छळ सोसून तिने भाच्या मोठ्या केल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वीच टीबीच्या इन्फेक्शनने तिचा इंतकाल झाला होता.
नगमा घरी आल्यावर मामीच्या मुलांना, नातवंडांना कोण आनंद झाला.
सुखाची एक लहर त्या गरीबखान्यात दौडली.
नगमाचे सारे गिलेशिकवे कधीच दूर झाले होते, ती आता केवळ नियतीवर म्हणजेच पर्यायाने स्वतःवर नाराज होती.
मामीच्या घरातून निघताना तिची पावले जड झाली.
निघताना मामीच्या मोठ्या मुलाने लियाकतने तिच्या हातात एक लिफाफा अलगद सरकावला आणि सवडीने वाचायला सांगितलं.
नगमासाठीचे आफरीनचे आखरी अल्फाज त्यात मौजूद होते.
नगमाने घाईत तो लिफाफा पर्समध्ये तसाच ठेवला आणि त्याच रात्री ठरल्याप्रमाणे ती मुंबईला रवाना झाली.
अड्ड्यावर आल्यानंतर दोन दिवस प्रवासाच्या शीणवट्यात आणि मानसिक तगमगीत गेले.
तिसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठल्याबरोबर तिला लियाकतने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली.
तिने अत्यन्त आतुरतेने पर्स खोलून लिफाफा बाहेर काढला आणि अधाशासारखा उघडला.
एकेक अक्षर वाचताना तिच्या चेहऱ्याचा रंग उडत गेला. पार फिकट पडला.
नगमाचा जन्मदाता बाप इनायतअली याचं मन संसारात रमलं नाही,
ती चार वर्षाची असतानाच तो घर सोडून गेला.
नगमाच्या आईचं नाव आफरीन होतं मात्र नावाच्या अर्थातलं 'लक' तिच्या ठायी नव्हतं,
अत्यंत कमनशिबी बाई होती ती.
सुलेमान हा तिचा सावत्र भाऊ, त्याची वाईट नजर होती तिच्या संसारावर.
त्यानं आफरीनचं जगणं अक्षरशः हराम केलं.
तिला पुरतं बरबाद करून तो थांबला नाही तर तिच्या पोरीबाळींनाही हात लावायचा त्याने प्रयत्न केला.
अखेर त्यांच्यात सौदा झाला त्याने नगमाला विकून टाकले!
आपल्या उर्वरित अपत्यांना उराशी धरून नगमासाठी रक्ताचे अश्रू ढाळून त्या माऊलीने एकेक दिवस युगासारखा व्यतित केला.
नगमा जर कधी परतून आलीच तर तिला सारं सत्य सांगावं ही तिचीच इच्छा होती,
जमल्यास नगमाने आपल्याला माफ करावं ही तिची आखरी ख्वाहिश होती.
आफरीनच्या मृत्यूनंतर सुलेमानची बायको शकीला हिनेच त्यांचा सांभाळ केला.
दरम्यान सुलेमान एका अपघातात मरण पावला,
शकीलाची मुले मोठी झाली त्यांनी नगमाचा पत्ता मिळवला आणि तिला सगळी हकीकत कळवली.
तरीही घरी परतण्याचे नगमाचे मन होत नव्हते, मात्र आता अचानक उचल मनाने खाल्ल्याने ती गावी जाऊन आली होती.
आता तिच्या पुढयात असलेल्या चिठ्ठीने ती पुरती थिजून गेली होती.
त्यात एका फकिराचा उल्लेख होता.
पंचवीस वर्षांपूर्वी गावात एक फकीर आला होता तेंव्हा आफरीन हयात नव्हती.
त्यानं बरेच वर्ष तिथे वास्तव्य केलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
तो फकीर रोज न चुकता शकीलाच्या घरी यायचा, दुआ द्यायचा बदल्यात काहीच घ्यायचा नाही.
नुसता डोळ्यात पाणी आणून पाहत राहायचा.
त्याच्या काळजात होत असणारी विलक्षण घालमेल डोळ्यात स्पष्ट दिसायची.
बऱ्याचदा त्याने नकळत रोख रक्कम देखील त्या पोराबाळांच्या हातावर ठेवलेली.
त्याला मिळणारी बरीचशी रक्कम तो शकीलाच्या घरी आणून द्यायचा तेही कुणाच्याही नकळत.
शकीलाला अनेकदा वाटायचं की हाच इनायतअली असावा,
तिने त्याला कधी पाहिलेच नव्हते तरीही तिला तसे वाटायचे.
मात्र ती तिची वेडी आशा होती.
तो इनायत असता तर गावातल्या लोकांनी त्याला ओळखलं असतं, मात्र सारेच त्याला अंजानबाबा म्हणत.
हा अंजानबाबा शकीलासाठी मोठा आधार ठरला होता.
त्याच्या मृत्यूनंतरच शकीला निर्वतली होती.
इनायतअलीबद्दलचा हा कयास तिला नगमाला कळवायचा होता आणि आफरीनची मुराद देखील सांगायची होती, तेच तिने चिठ्ठीत लिहिलं होतं.
मजकूर वाचत असतानाच नगमाने उदार अंतःकरणाने आफरीनला माफ केलं, तसेही तिच्या मनात आईबद्दल अढी नव्हतीच.
मात्र आईची तेंव्हाची अवस्था काय झाली असेल या विचाराने तिचे काळीज विदीर्ण झाले.
चिठ्ठी वाचून पूर्ण होताच नगमाच्या काळजाचा ठोका चुकला.
मस्तकात वीज कोसळावी तसा तिला तो फकीर आठवला जो तिच्याकडे न चुकता हरेक शुक्रवारी यायचा, ती त्याला किती हिडीसफिडीस करायची हे आठवून तिला रडू आलं.
त्याच्याविषयी तिला एकाएकी अपार आस्था, माया वाटू लागली.
तिने त्याचा शोध घ्यायचा ठरवला.
काही वर्षांपूर्वी बेलॉसिस रोडवरील अलेक्झांड्रा थिएटरचे दीनियत मध्ये परिवर्तन झालं होतं, काहींनी सांगितलं की या इबादतखान्यापाशी तसा एक फकीर अनेकदा दिसायचा.
मात्र तो फकीर हा नव्हता ज्याला नगमा शोधत होती.
अनेक कबरस्स्ताने तिने पालथी घातली, कैक मस्जिदींत तिने त्याच्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
अखेर दलाल इस्टेटजवळील रहमत मस्जिदपाशी तो जुम्मा नमाजला बाहेर दिसायचा अशी माहिती तिला मिळाली.
दरम्यान तिने प्रोफेशनल आर्टिस्टला नेमकं वर्णन सांगून त्याचं स्केच बनवून घेतलं आणि तिथल्या अत्तरवाल्याला ते दाखवलं. त्यानं काही मिनिटातच ते ओळखलं.
आश्चर्यचकित होऊन तो उत्तरला, "हिदायतबाबा तो गुजर गया, उस हादसे को लगभग पच्चीस साल हुए हैं."
ते ऐकताच नगमाच्या पायाखालची जमीन सरकली.
आता एकच सवाल तिच्या काळजात घर करून होता तो म्हणजे त्या दोघांशी तिचे काही नाते होते का ?
मनाचे समाधान करण्यासाठी हिदायतबाबाचे स्केच तिने जालौनला सुलेमानच्या मुलांकडे पाठवले आणि गावातल्या म्हाताऱ्या माणसांना दाखवायला सांगितलं, अंजानबाबा असाच दिसत होता का हे विचारायला सांगितलं.
दोनच दिवसांनी नगमाला फोन आला,
"अंजानबाबा हुबेहूब असाच दिसायचा!"
आताशा थकलेल्या नगमाची नजर अजूनही त्याचा शोध घेतेय.
तिची ही आखरी ख्वाहिश आहे जी कधीच पुरी होणार नाही हे माहिती असूनही ती त्याचा शोध घेतेय कारण त्या निमित्ताने त्याच्या भेटीची आस टिकून राहील.
- समीर गायकवाड
खूप छान
उत्तर द्याहटवा