मुंबईत तुला भेटायला आलेलो तर
तू निघून गेलेली.
मध्ये एकदा तू भलतीकडेच भेटलीस
विलक्षण म्लान थकलेली,
तू नाव बदलले होतेस.
खरे सांगायचे म्हटलं तर
तू पुरती संपत आलेली..
माझा पडेल चेहरा पाहून
डोळ्यातलं पाणी लपवत म्हणालीस
इट्स ओके,
आणखी काही दिवस तरी असेन ना..
खूप दिवस झाले या भेटीला
पुन्हा तुझी चौकशी नाही केली मी
निदान माझ्या स्मृतीत तरी तू कायम जिवंत असशील!
- समीर गायकवाड.
कवितेच्या नोंदी -
काही शोध न संपलेलेच बरे असतात. शोध पुरे होतात आणि शोकाच्या डागण्या कायमस्वरूपी राहतात.
आपलं जीवश्च कंठश्च माणूस मरणपंथाला लागलेलं असतं. आपण असहाय असतो, त्याच्यासाठी काही करावं असं वाटत असतं मात्र तो जीव दुनियेच्या गर्दीत नाहीसा होतो. मग कुठे जरी चौकशी केली तरी ती वाईट बातमीच कळणार असते, अशा वेळी विचारपूस न केलेली बरी, निदान ते जीवाचं माणूस आपल्या विश्वात तरी सचेत असतं. सगळ्याच जिवाची किंमत सर्वांनाच नसते!
खऱ्या घटनेत न राहवून तिची चौकशी केली तर सारं संपलेलं होतं. हैदराबादला तिचा ठावठिकाणा असल्याचं कळलेलं. तिथेही तिने नाव बदललं होतं, त्याच्यासाठी! तिचा मृत्यू होऊन दीडेक वर्ष झालेलं. हा तिथे गेला, तिची कबर तरी पाहता येईल म्हणून कबरस्तानमध्येही गेला. मात्र तिथे नुकतीच माती खालीवर केलेली. आपल्याला दहन केलं तर आपल्या अस्थीदेखील कुठे तरी विसर्जित केल्या जातील म्हणून तिने नाव बदललेलं. शेवटी तिच्या अस्थीदेखील मिळाल्या नाहीत. असहाय अवस्थेत आलेलं बेवारसासारखं मरण कवटाळून ती गेली. मृत्यूआधी तीन आठवडे निपचित पडून होती मात्र अखेरच्या क्षणी पूर्ण ताकद एकवटून तिने याचंच नाव घेतलेलं. मग दोन आचके नि खेळ खल्लास. आता त्याला वाटतं की तिची विचारपूस केली नसती तर बरे झाले असते. काही दुःखे काळजात खोल खोल रुततात!
आपल्या सर्वांना निदान रक्ताची माणसं, मित्र, नातलग तरी असतात मात्र ज्यांचं कुणीच नसतं त्यांच्यातलं कुणी असं मरणपंथाला लागल्यावर त्या व्यक्तीच्या मनात गतकाळात आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांच्या भेटीची अनिवार इच्छा असते, किमान एक क्षणतरी हव्याशा व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःला पाहावं आणि मग श्वास सोडावेत असं वाटत असतं. ही तगमग मी पाहिलीय. खोटं बोलून आपणच तिच्या हातात हात द्यायचा, ग्लानीत असणाऱ्या जीवाला वाटतं 'तो'च आलाय! मग त्या जिवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागतात आणि काही क्षणातच तो जीव हे जग सोडून गेलेला असतो, मरतुकड्या अशक्त हातात आपला हात घट्ट धरून! अशांचे मरणसोहळे होत नाहीत नि त्यांच्यासाठी कुणी रडत नाही. मग घट्ट धरलेल्या हाताचे ठसे अनेक वर्ष आपल्याला एकट्यालाच दिसत असतात! हे फार भीषण दुःखद असतं!
आजाराने ग्रासलेल्या एखाद्या अश्राप जीवाच्या अकाली जाण्याची बातमी आपल्या कानी येऊ नये अशीच बहुतेकांची इच्छा असते. तिकडून एखादा फोन आला तरी तो घ्यावा वाटत नाही. मेसेज आला तर वाचला जात नाही. एखाद्याचं असणं आधारदायी असतं, आजारी असलं म्हणून काय झालं आपलं माणूस हयात आहे याचंही एक सुख असतं. त्यातलीच ही एक चटका लावून गेलेली एक्झिट, जिचा मी कधीच सामना करु शकलो नाही...