शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

जेंव्हा मृत्यू हवा असतो..

एक असतो मृत्यूदूत. त्याचं काम असतं जीवांना मृत्यू बहाल करण्याचं.


तो फिरतो जंगलांतून, माळांमधून. असो ससा की असो गरुड, कोल्हा वा कुणी वन्य जीव.
हरेकास त्याच्या नुसत्या स्पर्शाने यायचा मृत्यू.
एकदा त्याच्या मोहिमेवर असताना दिसतं त्याला एक कोवळं देखणं तरतरीत हरीण. तो जातॊ हरिणापाशी त्याला स्पर्श करण्यास.
कसा कुणास ठाऊक पण हरणास लागतो सुगावा मृत्यूदूताच्या हेतूचा, तो जवळ येण्याआधीच सावध होतं हरीण.
त्याच्याकडे नजर देत पाहतं, क्षणेक थबकून उभं राहतं नि धूम ठोकून पळून जातं.

त्याच्या डोळ्यातली जगण्याची आशा नि मृत्यूची भीती पाहून मृत्यूदूतास येते निराशा. तो पाहू लागतो स्वतःच्याच हातांकडे.
आपण इतके कसे वाईट आहोत मनी येतो विचार त्याच्या.
न राहवून तो हरणाच्या दिशेने उडत जातो माग काढत. हरीण गेलेलं असतं त्याच्या कळपात हुंदडायला.
दुरून त्याला पाहताना मृत्यूदूताचा हात लागतो झाडांच्या पानांना, पाने जातात करपून सुकून!
वाईट वाटते मृत्यूदूताला.
तो तिथेच राहतो रेंगाळून.


मग रात्र होते अन् चन्द्र येतो अंधाराला सोबत घेऊन!
दिवसभर भटकून थकलेलं हरीण झोपी जातं मऊ लुसलुशीत गवताच्या कुरणात, तो ही जातो त्याच्यापाशी झोपतो त्याच्यासारखाच मान वेळावून!
कोवळ्या देखण्या फुलांच्या साक्षीने सकाळ होते, अंगात वारं भरलेलं हरीण पुन्हा मुक्त स्वच्छंद फिरू लागते, जगण्याचा कैफ हृदयात घेऊन!
मृत्यूदूतही त्याच्या पाठोपाठ जाऊ लागतो.

हरीण जिथे असेल तिथे धावू लागतो, नकळत त्याची काळजी घेऊ लागतो.
ऊन वारा पाऊस दिवस अंधार कशाचीही तमा न बाळगता फिरू लागतो त्याच्या बरोबर.
पिवळ्या तांबूस काजव्यांच्या शेतांत चंद्र पाहताना थक्क होऊन जातो, जगण्याचा अर्थ शोधू लागतो.
दरम्यान कळप ही धावत फिरत असतो वनांमधून चराचराचा आनंद घेत!

ऋतू आपली कूस बदलत राहतात.
निसर्ग आपलं काम चोख बजावत राहतो. कायाचक्र सुरु राहते.

बऱ्याच काळानंतर एका पानझडीच्या मौसमात हरणाला जाणवतं, आपली गात्रं शिथिल झालीत.
आपले सवंगडी आपल्यापेक्षा पुढे निघून गेलेत, आपण एकटेच मागे राहिलो आहोत.
आपले पायही आता लवकर उचलत नाहीत. हरिण काहीसे उदास होते.
मग त्याला हवाहवासा वाटतो आपल्या मृत्यूदूत मित्राचा स्पर्श.

तो जाऊ लागतो त्याच्या जवळ, मात्र दूत त्याला दुरूनच खुणावू लागतो, परिणाम काय होतील याची प्रचिती देऊ लागतो.
मात्र हरीण आता थकलेलं असतं, त्याला व्हायचं असतं मुक्त!

ते जातंच त्याच्याजवळ नि त्याच्या हातांना मायेने चाटू लागतं.
राहवत नाही मग मृत्यूदूताला, तो त्याला बिलगतो.
प्रेमाने कुरवाळतो. गच्च छातीशी धरतो.
क्षणात निष्प्राण होतो हरणाचा देह.
म्लान मलूल हरीण हलकेच धराशायी होतं.

जिवलग मित्राच्या कलेवरास पाहून मृत्यूदूतासही येतं गहिवरून.
त्याच्या अचेतन देहावरून मायेने हात फिरवून तो रवाना होतो नव्या मुक्तीच्या दिशेने...

ही या क्लिपमधली कथा.

********

एक वेळ येते जेंव्हा सगळ्यांनाच मृत्यूचे सत्य स्वीकारायचे असते.
मात्र ती वेळ आयुष्याने छळण्याची असू नये. शांतपणे एक्झिट घेता यायला हवी.

इथला आपला कार्यभाग संपला आता आपण कुणासही भार होऊ नये याची जाणीव त्या त्या वेळी व्हायला हवी.

श्वास सुरु आहेत म्हणजे जगणं नव्हे, जीवनाचा आनंद विविध अंगांनी जोवर घेता येतो तोवर जगण्याचा आस्वाद घेता येतो.
मात्र त्याहीवेळी पैलतीरावर नजर असायला हवी म्हणजे मृत्यूच्या दारावर कधी तोरण बांधायचं याचा अंदाज येतो.

खरंतर एखाद्याचे निधन झाल्यावर लोक म्हणतात 'त्यांचं आयुष्यच तेव्हढं होतं..', वास्तवात ते त्यांचं आयुष्यच नसतं, ते त्यांच्या मृत्यूचं आयुष्य असतं. life is a life of death!
मरण कधी तरी येणारच आहे म्हणून केंव्हाही मरता येत नाही हे ही खरे आहे मात्र आपला इथला वावर कधी आटोपता घ्यायचा हे ही कळायला हवे.

जगण्याची आसक्ती संपली की उर्वरित आयुष्य हे ही एक प्रकारचं मरणच असतं इतकं कळलं तरी पुरेसं आहे.

- समीर गायकवाड.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा