बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..


मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!
की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?
त्याच्या जमातीमधला तो शेवटचा माणूस होता.
त्याच्यासारखा तो एकटाच होता अख्ख्या पृथ्वीवर! त्याच्या जाण्यानं त्यांची भाषा, त्यांचं ज्ञान, त्यांच्या आदिम संवेदना, त्यांच्या भावना, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांचं कल्पनाविश्व नि त्यांचं आकलन हे सारं संपुष्टात आलंय.
त्याच्या अनेक पिढ्यांचे अनुवांशिक गुणलक्षणयुक्त सत्व लयास गेलं.

गेली सहवीस वर्षे तो अन्य मानवांशी बोलल्याची नोंद नाही.
आधीही त्याच्याशी जे संभाषण झालेलं ते एकाच बाजूने होतं. त्यानं नुसताच सहभाग नोंदवलेला.
आठवड्यापूर्वी तो हे विश्व सोडून गेला, त्याच्या शारीरिक अवस्थेवरून तसा निष्कर्ष काढला गेलाय.

23 ऑगस्टला ब्राझीलमधील रोंडोनियाच्या जंगलात झुल्यामध्ये त्याचा लटकता मृतदेह आढळला.
झावळ्यांनी शाकारलेली त्याची एक झोपडी होती, त्यात आत काही विशेष नव्हतं! निव्वळ कामठयांचा सांगाडा होता.
मातीपासून बनवलेली भांडी होती, त्याच्या कंबरेला धाग्यांची गुंडाळी वा जाडाभरडा कपडा असायची.
त्याच्या गळ्यात इतर आदिम ऍमेझोनवासीयांसारखी नैसर्गिक आभूषणे होती. कंदमुळे खाऊन त्याने गुजराण केलेली.
एका ठराविक टापूतच तो दिसून यायचा, तो जिथे असेल तिथल्या भवतालच्या जागेत तब्बल दहा दहा फुटांचे खड्डे तो खंदून ठेवायचा.
अगदी ताशीव कोरीव आयताकृती खड्डे असत.
तो कशाने टोकरायचा तिथली चिवट ओली माती?
का करायचा तो खड्डे? खड्डे एकाच लांबी रुंदींचेच का बनवायचा?
याची उत्तरे त्याच्यासोबतच गेली..

तो जिथे राहायचा तिथे शिकारीसाठी खड्ड्यांच्या अलीकडे पलीकडे बाण रोवायचा. त्याने खोदलेले खड्डे हीच त्याची ओळख होती.
जग त्याला ‘मॅन ऑफ द होल’ म्हणूनच ओळखायचं.
शरीरशास्त्राच्या अभ्यासकांनुसार तो मरण पावला तेंव्हा त्याचं वय साठ वर्षांचं होतं.
मनुष्य समुहप्रिय जीव आहे असं मानलं जातं, मग आपल्या समुहातील लोकांविषयी त्याला काय वाटत असावं?
त्याने प्रेमाची अनुभूती घेतली होती का?
स्त्रीचा सहवास त्याला लाभला होता का?
ऍमेझोनमधल्या अन्य मानवी समुदायांपासून त्यानं स्वतःला विलग का केलं होतं?
आपल्यानंतर आपलं असं कुणी मागे उरणार नाही याविषयी त्याला काही संवेदना होत्या का?
मरताना जवळ पंख बाळगणारा हा निसर्गपुत्र नक्कीच भावनाशील असणार, मग त्याच्या भावविश्वात काय चाललं असावं?

2018 साली ब्राझीलच्या शासकीय वृत्तसंस्थेने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केलं होतं, तोच त्याच्या सजीव अस्तित्वाचा शेवटचा पुरावा.
70 च्या दशकात ब्राझीलमध्ये अवैधपणे जंगल तोडून शेती तयार केली गेली तेंव्हा अनेकांना ठार करण्यात आले. हा नरसंहार अत्यंत क्रूर असा होता.
मात्र शेती करणारे स्थानिक आणि मूळचे आदिवासी जे खऱ्या अर्थाने त्या जंगलाचे मालक होते त्यांच्यात एक छुपा संघर्ष जारी राहिला.
90 च्या दशकात हा संघर्ष पुन्हा उफाळून आला.
अनेक आदिवासींना विष पाजून मारण्याच्या घटना घडल्या.
1995 मध्ये याच मानवी जमातीमधील सहा जणांची गोळ्या घालून हत्या केली गेली आणि 'मॅन ऑफ द होल' हा एकटा उरला!

शतकापूर्वी ऍमेझॉनमध्ये 114 मानव जमाती होत्या, त्या आता वीसच्या घरात राहिल्यात. याच्या जाण्याने एक अध्याय संपलाय.
ब्राझिलियन मानववंशास्त्रज्ञ मार्सेलो डयोस सँटोस यांनी 1996 साली त्याच्याशी अखेरचा संपर्क साधला होता.
ते त्याच्याशी बोलण्यास उत्सुक असले तरी त्याची इच्छा नव्हती.
त्यांनी त्याला मक्याचे दाणे आणि काही बाण देऊन बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो आक्रमक झाला होता.
'त्यांच्या'तला 'तो' एकटाच उरला आहे हे उमगताच ब्राझील सरकारला उपरती झाली आणि तो राहत असलेला अख्खा टापू संरक्षित घोषित केला गेला.
बाहेरील व्यक्तींना तिथे जाण्यास मज्जाव होता.


शेती, शेतीतून पैसा, पैशातून संसार, संसारातून विकार आणि विकारातून वासना याचे चक्र 'मॅन ऑफ द होल'ला ठाऊक नव्हतं.
जंगलच त्याचे आईबाप असावेत.
त्यानं आपल्यासारखं निसर्गाला मातीला आईबापाला भोसकून आपलं विश्व उभं केलं नव्हतं.
त्याच्याकडे भौतिक साधने नव्हती म्हणजे तो विकसित नसावा असे आपण खुशाल म्हणू शकतो,
तो माणसात नव्हता म्हणजे त्याला आताच्या जात धर्म द्वेषमत्सराने ग्रासलेलं नसावं मग तर नक्कीच असंस्कृत होता असं आपण ठासून म्हणू शकतो.
त्याला जंगल सोडायचं नव्हतं म्हणजे तो स्वार्थी अज्ञानी होता असंही आपण म्हणू शकतो.
जंगल तोडून शेती करण्यास त्याच्यासह त्याच्या जमातीमधील लोकांनी विरोध केला होता म्हणजे त्याला काडीचेही व्यवहारज्ञान नव्हते असं तर आपण नक्कीच म्हणू शकतो.

आपण त्याला कितीही नावे ठेवली तरी त्याला त्याची खंत नसावी.
कारण स्वतःचं निर्वाण त्याला ठाऊक असावं तो झाडे पशू पक्षी यांच्या सान्निध्यात मरण पावला, तो मेला तेंव्हा तो एकटा नव्हता.
तो मेला तेंव्हा भवताली काँक्रीटच्या भिंती नव्हत्या आणि खरी खोटी माणसंही नव्हती.
तो मेला तेंव्हा वाराही थबकला असावा आणि पानेही दुःखाने शहारली असावीत,
पक्षी थिजून घरट्यात बसले असावेत,
प्राणीही उदास झाले असतील,
शोकमग्न झाडे माना तुकवून निश्चल उभी असावीत,
तो मेला तेंव्हा त्याच्या सताड उघड्या डोळ्यात अवघं आकाश उतरलं असावं,
रात्रीस एकट्याने लटकणाऱ्या त्याच्या अचेतन देहावर चांदणं उतरत असावं त्याची साथसोबत करायला!

एका अनोळखी नि विलक्षण भिन्न प्रकृतीच्या निसर्गपुत्राच्या जाण्याने अस्वस्थ होण्याइतकी संवेदना अंगी आहे हे कचकड्यांचे समाधान मानून माझी तुमची रोजमर्राची जिंदगी जारी राहील पण तिकडे त्याच्या विश्वात काय होईल?

तो जेंव्हा जिवंत होता तेंव्हा ऍमेझॉनमध्ये स्वतःला विलीन करणाऱ्या ग्वापोर नदीच्या काठापाशी नक्कीच जात असणार.
कित्येकदा नदीने त्याला कवेत घेतलं असणार.
रिओ ग्रँडे डे सोलच्या पात्राशी त्याचं नातं असावं.
आता कधी ग्वापोर नदीस अफाट पूर आला तर कोणत्याही विकसित सुसंस्कृत सभ्य सुजाण मानवाने अश्रू ढाळू नयेत...

- समीर गायकवाड.

छायाचित्र सौजन्य - द न्यूयॉर्क टाईम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा