रविवार, २८ जून, २०२०

पोशिंद्याचा धनी...


घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नकोआत्महत्या करू नकोस !"
भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलंआमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्तानिशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवलीशंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलंजगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. 
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.

शनिवार, ६ जून, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज – जिंदगी का सफर...

लॉकडाऊनच्या काळातील काहींच्या वेदना इतक्या टोकदार आहेत की कुणाही सुहृदाच्या आतडयाला पीळ पडावा. अशीच एक कहाणी महंगी प्रसाद यांची आहे. आजही लॉकडाउनमुळे देशभरातील मजूर कामगार मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. अशाच अभागी लोकापैकी एक होते महंगी प्रसाद ज्यांनी तब्बल तीस वर्षांपूर्वी रागाच्या भरात आपलं घर सोडलं होतं. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील कैथवलिया हे त्यांचं गाव. खेड्यातलं सामान्य जीवन जे देशभरात अनुभवायला येतं तसंच शांत रम्य ग्रामजीवन त्यांच्या गावी देखील होतं. घरातल्या छोट्याशा कुरबुरीवरून नाराज होत त्यांनी गाव सोडलं होतं ते साल होतं 1990चं ! तेंव्हा ते संतापाच्या इतक्या आहारी गेले होते की आपल्या जबाबदार्‍यांचा विसर त्यांना पडला होता, आपण कोणता अनर्थ करत आहोत याचं त्यांना जरादेखील भान नव्हतं. वास्तवात हे भान हरपल्यामुळेच आणि जोडीला विवेक गमावल्यामुळेच त्यांनी आपल्या गावाची वाट कायमची सोडून दिली होती. घर सोडून परागंदा झाले तेंव्हा ते काही पोरजिन्नस होते वा अगदी पंचविशीतले तरुण होते अशातलीही बाब नव्हती. ते खरे तर परिपक्वतेच्या उंबरठ्यावर होते, कारण तेंव्हा त्यांचं वय तब्बल चाळीस वर्षांचं होतं.