Saturday, August 29, 2015

रेड लाईट डायरीज - कोरं पत्र..तू कुठे आहेस मला नेमकं ठाऊक नाही,
तुझ्याकडे पोस्टमन येतो का याचीही माहिती नाही.
पत्र आलंच तुझ्या नावाचे तरी ते तुला पोहोच होते का तेही ज्ञात नाही.
मागच्या दोन दशकात खरंच तुला कुणाचं पत्र आलं का हे तरी कसं विचारू ?
तुझं नाव तेच आहे की, शहर बदलल्यावर नावही बदलते ?
तू आता कोणती भाषा बोलतेस, पैशाची तर नक्कीच नाही !
तुला पत्र पाठवलं तर ते तुझ्याच जीवावर तर बेतणार नाही ना ?
तसं मी तुला खूप खूप शोधलंय पण तू पुन्हा एकदाही दिसली नाहीस...Thursday, August 13, 2015

'भीमकवी' वामनदादा कर्डक ....


आंबेडकरी चळवळीतला माणूस असो वा सामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण म्हणजे वामनदादांनी लिहिलेली अर्थपूर्ण आणि अवीट गोडीची भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते ! वामनदादा कर्डर्कांची भीमगीते आता आंबेडकर जयंतीचा अविभाज्य घटक बनून गेली आहेत इतकी ही गीते सामान्य माणसाच्या मनाला भावली आहेत. नुकतेच मिसरूड फुटलेल्या मुलांपासून ते संघर्षमय जीवनाचा अखेरचा काळ व्यतित करणारे वृद्ध असोत,सर्वांना ही गाणी तोंडपाठ असतात. वामनदादांनी लिहिलेल्या गाण्यात असे कोणते रसायन आहे की ज्याने माणसाचे रुपांतर भीमसैनिकात होते हे पाहण्यासाठी त्यांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की ही लोकांची बोली आहे, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे, हा जल्लोषही आहे अन वेदनेचा हुंकारही आहे, हा मनामनात दफन केलेल्या उपेक्षेचा आक्रोश आहे, हा धगधगत्या अग्नीकुंडाचा निखारा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा बुलंद झालेला नारा आहे !


Friday, August 7, 2015

हिंदुस्थानच्या अखेरच्या बादशहाची दर्दभरी दास्तान .....बाबरच्या रूपाने मुघल ज्या क्षणी हिंदुस्थानात दाखल झाले त्या क्षणापासून त्यांनी ह्या भूमीकडे केवळ लुटमार, साम्राज्यविस्तार व अय्याशीच्या हेतूने पाहिले. त्यांच्यातल्या एकाही बादशहाने ह्या भूमीला आपले सरजमीन-ए-वतन मानले नाही की ह्या मातीचे त्यांना ऋण वाटले नाही. पण ह्या सर्व मुघल बादशहांना अपवाद राहिला तो हिंदुस्थानचा अखेरचा बादशहा, बहादूरशहा जफर. आधीच्या सम्राटांनी हिंदुस्थानची लयलूट केली तर याचे प्राणपाखरू ह्या भूमीसाठी रुंजी घालत निशब्दतेने भयाण अवस्थेत मरून पडले. ज्या मुघलांनी हिंदुस्थानला कधी आपला वतनमुलुख मानला नाही त्यांचा अखेरचा शिलेदार मात्र ह्या भूमीत दफन केले जावे म्हणून तडफडत राहिला ! किती हा दैवदुर्विलास !


Thursday, August 6, 2015

गणगोत ....सकाळी रानात आल्यापासून भैरूआबाचं कशातच मन लागत नव्हतं. त्याच्या जीवाची नुसती उलघाल होत होती. त्याच्या मुलाचं म्हणजे आनंदाचं ते वाक्य कानात उकळते शिसं ओतल्यागत कानठळ्या बसवत घुमत होतं,
“आबा, आजचा दिवस हा कामाचा शेवटचा दिवस. आता काम बास करायचं. उद्यापास्नं घरी थांबायचं. ऐकताय नव्हं ?”
त्याचं हे असलं टोकाचं बोलणं ऐकल्यापासून काय करावं काय नाही हे काही केल्या सुचत नव्हते. दुपारचं जेवण देखील त्यांनी घेतलं नव्हतं. आल्यापासून सगळं लक्ष गोठ्यात लागून राहिलेलं. भैरू आबा आता सत्तरीला आलेला माणूस पण गड्याची मान अजून ताठ होती. कपाळावर नुकताच सुरकुत्यांनी डाव मांडायला सुरुवात केलेली. गालफाडे आत गेलेली अन लांब निमुळती हनुवटी. ओठावरच्या भरदाट पांढुरक्या मिशा चहा पिताना बशीत बुडाव्या अशा. कानाच्या मोठ्यालठ जाडसर पाळ्यात सोन्याची भिकबाळी त्यांचा कान हलला की हळूच डुलायची. वयाच्या मानानं नजर अजूनही इतकी तीक्ष्ण होती की गायी म्हशींच्या आमुण्याच्या पाटीत पडलेलं गाजरगवत लांबून ओळखायचे अन बाजूला काढायचे.


Wednesday, August 5, 2015

शापित सौंदर्यसम्राज्ञीची दास्तान - मेरिलिन मनरो !


अख्खी दुनिया जिच्या सौंदर्याची दिवानी झाली होती, जिचे सौंदर्य मापदंड बनून गेले, जिला अप्सरेहून अधिक देखणं म्हटलं गेलं त्या मेरिलिन मनरोच्या जीवनाची अखेर काटेरी एकांतवासातली आणि काळीज विदीर्ण करणारी का ठरली ? ....हॉलीवूडच्या ऑल टाईम ग्रेट, बोल्ड अँड ब्युटीफुल गोर्जिअस ब्युटीक्वीन मेरिलिन मनरोच्या जीवनाचा छोटासा आलेख.....


Tuesday, August 4, 2015

छायाचित्रकाराची अनोखी दास्तान ....केविन कार्टर !


संवेदनशील व्यक्तीने काळजाला हात घालणारी एखादी कलाकृती बनवली आणि त्यातून त्याच्या मनात अपराधीत्व दाटून आले तर त्याच्या मनातील भावनांचा कडेलोट होतो. अशाच एका सहृदयी व्यक्तीबद्दल,  केविन कार्टरबद्दल जेंव्हा कधी विचार करतो तेंव्हा डोळ्यात नकळत पाणी येतेच.... 

छायाचित्रकाराच्या मनात भावनांचे कल्लोळ दाटतील अशा काही क्षणांचे त्याला साक्षीदार व्हावे लागते अन त्यातून जन्माला येते एक अप्रतिम छायाचित्र. त्यात कधी दुःख असते तर कधीवेदनारागआक्रोशशृंगारप्रेमआनंदद्वेषमोह अशा अगणित भावनांचे हुंकार त्यात व्यक्त होतात. छायाचित्रकारासाठी त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय पुलीत्झर पुरस्कार ठरावा. या पुरस्काराच्या वेडाने झपाटलेले छायाचित्रकार जगाच्या पाठीवर कुठेही अन कसल्याही परिस्थितीमध्ये जातात.ताजी उदाहरणे म्हणजे सिरीयाचे गृहयुद्ध असो वा इबोलाचा आउटब्रेक असो आपल्याला खरी आणि नेमकी परिस्थिती तंतोतंत माहिती छायाचित्रकारच पोहोचवतात.त्यासाठी प्रसंगी ते जीवसुद्धा धोक्यात घालतात.....


Monday, August 3, 2015

वेध 'शिशिरागमना'चा ......


जगाला भले बहारदार 'वसंत' अतिप्रिय वाटत असेल पण मला 'शिशिर' भावतो...
शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जातात, जणू सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी सगळी पाने गळून पडतात...
झाड निष्पर्ण होऊन जाते आणि उरते त्याचे अस्सल देहमूळ !
आपल्या विचारांच्या पुनर्विलोकनात दंग असणारे खोड राहते.
थंड वाऱ्यास आपला पूर्वेतिहास विचारणाऱ्या, टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या फांदया विचार करायला भाग पाडतात.
'वर्षा' झाडांच्या तृषार्तमुळांना तृप्त करून गेलेली असते,
पानझडीमुळे शिशिरात झाडांना पाणी कमी लागते त्यामुळे शिशिरात झाडे जणू उपवासाची तपश्चर्या करतात.
शिशिरातल्या झाडांना रंग, गंध, आकार आणि स्पर्श यातील कशाचेही अप्रूप नसते. जणू ध्यानस्थ ऋषी मुनीच !


Saturday, August 1, 2015

मीना कुमारी रिअल लाईफ ट्रॅजेडी क्वीन.....आपल्या मागे एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांचा गुलदस्ता ती रसिकांसाठी सोडून गेली. पण अखेरच्या क्षणी ती एकटी पडली होती, तिचा एकांत इतका दुखद ठरला की एका चाहत्याने तिच्या रुग्णालयाचे बिल अदा केले ! बॉलिवूडमध्ये दिलीप कुमारला ट्रॅजेडी किंग म्हणून तर मीना कुमारीला ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. मीना कुमारीच्या अभिनयाची एक वेगळीच छाप होती. तिचा अभिनय बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांत आपोआप अश्रू तरळायचे. गुरुदत्तच्या 'साहिब बीवी और गुलाम' या सिनेमातील 'छोटी बहू' जणू मीना यांच्या खासगी आयुष्यात सामील झाली होती. मीना कुमारी अशी पहिली अभिनेत्री होती की जी आपले दुःख, वेदना अन औदासिन्य मिटविण्यासाठी परपुरुषांबरोबर बसून दारु प्यायची .… धर्मेंद्रने प्रेमात दगा दिल्यानंतर ती दारुच्या आहारी गेली होती. १ ऑगस्ट १९३२ रोजी जन्मलेल्या मीनाने ३१ मार्च १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला.……