रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

शिवाजीराजांचे नव्या दमाचे 'नवे किल्लेदार'.....दिवाळीची आम्ही वाट बघतो आपल्या शिवाजी राजांसाठी ! दिवाळीतल्या फराळ फटाक्यापेक्षा राजांचे आगमन जास्त दणक्यात अन अगदी उत्कंठेने साजरे होते ! सिंहासनाधीश राजे दिवाळीच्या आधी किल्ल्यात स्थानापन्न होतात तोच दिवस खरा दिवाळीचा दिवस !! प्रत्येक अंगणात उभे राहतात गडकोट ! छातीचा कोट फुलून यावेत असे देखणे गडकोट !! काळ्या - करड्या मातीतून बनलेले हे किल्ले कधीच भग्नावस्थेतल्या खंडहरासारखे नसतात , ना यांना खिंडारे असतात, ना चिरे ढासळलेले राजवाडे ना पडलेले महाल !! या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या राजाचे धगधगते चैतन्य ओसंडून वाहत असते. नवीन आस मनी घेऊन चिमुकल्या हातांनी नव्या उमेदीने जीव लावून बांधलेले ते काळजाचे बुरुजच असतात, त्याला शोभिवंत करण्यासाठी रोशनदाने, मशाली, टेंभे, चिरागदाने, शामदाने ना उंची झुंबरे यापैकी काही लागत नाही ! या किल्ल्यांना प्रकाशमान करण्यासाठी पुरेशा असतात काळजाच्या पणत्या, ज्यात घामाचे तेल असते अन डोळ्याच्या फुलवाती !

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - पोलीस, प्रशासन आणि कुंटणखाने - उत्तरार्ध.


कुंटणखान्याच्या टिप्स मिळाल्यावर धाडी टाकल्या जातात. पोलीसांची ही 'रेड' कधी कधी आपले नाव ठराविक कालावधीनंतर रेकॉर्डवर यावे म्हणून 'पाडून' घेतल्या जातात. या पूर्वनियोजित धाडींची कुंटणखान्याच्या मालकिणीला वा चालकाला पूर्वकल्पना असते, त्यांनी याला व्यवस्थित मॅनेज केलेलं असते. या धाडीत रेकॉर्डवर काय आणायचे हे आधीच निश्चित केलेलं असतं. वर्षदोन वर्षाला एखादी धाड पाडून घेऊन त्यात केवळ मुद्देमाल हाती लागू द्यायचा, बायका पोरींना अन्यत्र हलवायचे अशी सोय करून ठेवली की त्या लॉजेसची, रिसॉर्टची, ठिकाणांची नावे ब्लॅकलिस्टमध्ये येत नाहीत. धाड पडून गेल्यानंतर दोनेक वर्षे जोमात धंदा करायचा असे गणित असते. सर्वच धाडी अशा बनावट नसतात. बऱ्याचदा सेक्सवर्कर्ससाठी काम करणाऱ्या एनजीओज, समाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासहित तक्रारी दिल्यावरही धाडी टाकल्या जातात. यात मात्र फारशी बनवाबनवी करता येत नाही. अनेकदा अशा धाडींचीही माहिती पोलीस खात्या कडून लीक करण्याचा प्रयत्न केला जातो. माहिती लीक झाली तर अड्डेवाले सावध होतात आणि मुली दडवल्या जातात. छापा टाकायला गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागते. बऱ्याचदा छापे टाकताना सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काही सामाजिक सुरक्षा शाखेचे विशेष पोलीस, महिला पोलीस, तक्रारदार एनजीओचे प्रतिनिधी, महिला पुनर्वसनच्या कर्मचारी यांनाही पथकात सामील करून घेतले जाते.

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - पोलीस, प्रशासन आणि कुंटणखाने....


देशाची राजधानी दिल्ली असो वा मुख्य आर्थिक नाडी असणारं महानगर मुंबई वा सिटी ऑफ जॉय म्हणून लौकिक असणारं महानगर कोलकता असो तिथे ज्या गोष्टी सामाईक आहेत त्यातली एक बाब म्हणजे कुंटणखाने. भिंतींची चळत एकावर एक चढलेली, वेडेवाकडे अस्वच्छ जिने, लोखंडी ग्रील्सनी बंदिस्त केलेले अरुंद सज्जे, काचेची तावदाने फुटलेल्या जाळ्या ठोकलेल्या खिडक्या, कळकटून गेलेले दरवाजे आणि या सर्वाआडून डोकावणारे चेहरे. भडक लिपस्टिक लावून ओठांची मादक हालचाल करत येणाऱ्या जाणाऱ्यास नेत्रपल्लवी करणाऱ्या, हातवारे करून नजर वेधून घेणाऱ्या चौदा ते चाळीस वयोगटाचे हे चेहरे बाकी कोणतीच भाषा बोलत नाहीत. हे इथला कॉमन नजारा.

कट्टरवादयांच्या अराजकाची नांदी ...


बंगालच्या माल्डाहून आलेल्या ४७ वर्षीय मुहम्मद अफराजुल या ठेकेदारास राजस्थानातील राजसमंद येथे आयसीसच्या हत्याऱ्याप्रमाणे आधी गळा चिरून, नंतर मारहाण करून जिवंत जाळून मारले गेले. शंभूलाल रेगर या नराधमाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हे निर्घृण कृत्य केले. इतके करून त्याचे समाधान झाले नाही, आपली दहशत बसावी, या घटनेमुळे मुसलमानांनी भ्यावं यासाठी त्याने या कृत्यादरम्यान याचा व्हिडीओ एका अल्पवयीन नातेवाईकास काढायला लावून तो व्हॉट्सअपवर पोस्ट केला. काही क्षणांमध्येच संपूर्ण देशभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्या व्हॉटस्अप ग्रुपवर तो पोस्ट करण्यात आला, तो भाजपाच्या नेत्याने तयार केलेला होता. त्यामुळे याचे तार भाजपाशी जोडले गेले. या घटनेनंतर भाजपच्या त्या नेत्याने 'शंभूलालशी आपला कसलाही संबंध नाही' अशी भूमिका घेतली.

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - चॉकलेट...दोन दशकापूर्वी अंडरएज म्हणजे सज्ञान नसलेल्या मुलींना लपवून ठेवण्याच्या विविध क्लृप्त्या देशभरातल्या कुंटणखाण्यात अवलंबल्या जायच्या. आता त्यात नवनवी भर पडतीय. पण तरीही 'लाईन'मध्ये असलेल्या टीन एज मुलीच राजरोस बाजारात उभ्या दिसतात.
मुद्दा आहे चाईल्ड सेक्स वर्कर्सचा. २००१ सालानंतर आपल्या देशातल्या मेट्रो सिटीजमधून हे फॅड आले आणि बघता बघता सर्व उपनगरीय आणि मध्यम - मोठ्या शहरात चाईल्ड सेक्स वर्कर्सचा छुपा उपभोग सुरु झाला.
पोलिसांच्या रेडमध्ये या मुली आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ते अत्यल्प का आहे याचे कारण अर्थातच 'अर्थ'पूर्ण आहे.
या मुली लपवून ठेवणं किती सोपं आहे आणि यांना कसं आणलं जातं. कसं, कधी व कुठं लपवलं जातं यावरती मागे स्वतंत्र ब्लॉगमधून प्रकाश टाकला असल्याने इथे पुनरुक्ती टाळतोय.

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी 'आपण अध्यक्ष झालो तर इस्त्राईलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू' असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांना तेंव्हा ट्रम्प निवडून येतीलच याची हमी नव्हती त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासनांकडे कानाडोळा केला गेला. निवडून येताच इस्लामी राष्ट्रातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादले होते. मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे  खरे तर केवळ उजव्या विचारसरणीचेच नसून पक्के मुस्लीमद्वेष्टेही आहेत हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर 'अमेरिका फर्स्ट' अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझीझमच नव्या रुपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटीश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममधे दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा.

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...


मागच्या आठवड्यात आपल्या देशात तीन घटना घडल्या ज्यांचे परिघ भिन्न होते पण त्यांची त्रिज्या स्त्रियांशी संबंधित होती. स्त्री विषयक तीन भिन्न जाणिवांची प्रचीती या घटनांनी दिली. आपल्या देशातील जनतेचा आणि राजकारण्यांचा स्त्रीविषयक संकुचित दृष्टीकोन यातून उघडा पडला. आपल्या इतिहासात डोकावून पाहताना एकेकाळच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे दाखले नेहमी दिले जातात. मातृसत्ताक कुटुंब पद्धती प्राचीन काळी भारतात सर्वत्रच अस्तित्वात होती का यावर देखील मतभेद आहेत. पण सिंधू संस्कृती आणि द्रविड संस्कृतीत देखील याच्या पाऊलखुणा आढळतात. आजघडीला ही पद्धत जवळपास नामशेष झालीय अन कधी काळी कुटुंबप्रमुख असणारी स्त्री आता भोगदासी अन वस्तूविशेष होऊन राहिली आहे. नाही म्हणायला ईशान्येकडील राज्यांपैकी मेघालयातील गारो या मुळच्या इंडोतिबेट आणि खासी या माओ- ख्येर लोकांच्या वंशज असलेल्या आदिवासी जातीतच ही मातृसत्ताक पद्धती अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे जे आदिम काळापासून निसर्गाचा पोत जपत आलेत, ज्यांनी अजूनही माणुसकी निभावताना डिजिटल युगाला आपलेसे केले नाही त्यांनी मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची कास सोडलेली नाही अन जे महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतात, टेक्नोसेव्ही जगाचे जे पाईक होऊ इच्छितात त्यांनी मात्र स्त्रीला मातृसत्ताक पद्धतीतील शीर्ष स्थानावरून खाली खेचून थेट पायाखाली रगडायचेच बाकी ठेवले आहे. असो.