गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

'बाप'कवी - इंद्रजित भालेरावइंद्रजित भालेराव हे अस्सल काळ्या मातीचे कवी महाराष्ट्राला कसे गवसले त्याची कथा मोठी सुरस आहे. १९८५ च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं एक नवलेखक शिबीर कोल्हापूरच्या पन्हाळगडावर सुरू होतं. त्यात भालेराव शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते. कवितांचं सादरीकरण सुरू होतं. भालेरावांची पाळी आली. त्यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेत नवशिक्षित शेतकरी दाम्पत्याचं वर्णन होतं. नवविवाहित कुळंबीण आपल्या काबाडाच्या धन्याला सांजच्या पहारी लवकर घरी येण्याचं निमंत्रण कसं देते, हा प्रसंग भालेराव कवितेतून मांडत होते. नवविवाहिता.. ती पण खेडय़ातली.. भरलेलं घर.. घरी वडीलधाऱ्या माणसांसमोर नवऱ्याशी बोलायची सोय नाही. आणि शेतशिवारात आपला शेतकरी कायम गावगडय़ांच्या गराडय़ात.. तिथंही संवादाची सुतराम शक्यता नाही.. तेव्हा तू आज लवकर घरी ये, असा निरोप आपल्या नवऱ्याला भाकरी वाढताना ती अबोलपणे देते.. इतरांच्या भाकऱ्या आणि नवऱ्याची भाकरी यात छोटासा फरक असतो.. नवऱ्याच्या भाकरीला कुंकवाचा इवलासा टिळा लावलेला असतो.. हा सूचक सांगावा नवऱ्याला न सांगता कळतो नि तो सूर्य बुडायच्या आधीच औत सोडतो.. हे निवेदन श्रोत्यांमध्ये बसलेले एक प्रकाशक ऐकत होते. त्यांना या कवीमध्ये 'स्पार्क' दिसला. त्यांनी भालेरावांना गाठलं. त्यांच्या प्रकाशित-अप्रकाशित कविता जमवायला सांगितलं. आणि १९८९ ला त्यांचा 'पीकपाणी' हा पहिला कवितासंग्रह काढला. त्यांची 'बाप' ही कविता खूप प्रसिद्ध आहे...
बाप -
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप?
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्याहाती
दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !

शेतातल्या मातीत आजन्म राबणाऱ्या शेतकरी बापाची भळभळणारी खरीखुरी व्यथा या कवितेत कवी इंद्रजित भालेराव यांनी मांडली आहे. साऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरयामधला कष्टकरी बाप इथे त्यांनी पोटतिडीकेने मांडला आहे. बोराटीच्या काटेरी झाप असणाऱ्या खोपट्यात राहणारा, अंगावर चिंध्या लेवून पोटात फक्त मिरची भाकर घालू शकणारा, ज्याच्या भाग्यरेखेत रांत्रादिन कष्टच लिहिले आहेत असा कष्टलेला बाप या कवितेतून आपल्याला भेटतो. जगाचे तोंड गोड करणाऱ्या शेतकरयाच्या पायी मात्र काटेकुटेच असतात, त्याला गोडधोड मिळत नाही, चांगले कपडे मिळत नाहीत, चांगले घर मिळत नाही. त्याने असं काय पाप केलंय असा सवाल भालेराव तळतळून विचारतात. त्याने किती कष्ट केले याचे साधी मोजमापदेखील केले जात नाही कारण ते देखील त्याच्या हाती नाही. आपला हा अहोरात्र काबाड कष्ट करणारा बाप चुलीसाठीसुद्धा लाकडे फोडतो अन मग चूल पेटते. बापाने फोडलेल्या लाकडांवर चूल धडाडून पेटते, अन त्या कष्टाच्या पेटत्या चुलीवर घामगाळल्या पिठाच्या भाकऱ्या आई करते असं काळीज पिळवटून टाकणारे वर्णन करून कवी शेवटी म्हणतात की, या घामाच्या भाकरीची, कष्टाच्या कालवणाची अमृताहून गोड अशी जी चव आहे त्याचे वर्णन करता येत नाही इतकी ती श्रेष्ठ आहे ! या उलट अधाशी जग अतृप्तासारखं हापाहाप करून खात राहतं अन आम्ही कष्टाचं खाऊन सुखी समाधानी राहतो !! आपल्या वेदनांचा वापर त्यांनी शब्दास्त्रात करून समाजाला इथे जे सुनावले आहे त्याला खरेच तोड नाही.

येणाऱ्या काळात अशी काबाडकष्टाची कामे करून चालणार नाही तर शिक्षित व्हावे लागणार आहे अन शिक्षणातून नवं जगणं शिकायचे आहे असा क्रांतीकारक संदेश देणारी कविता तर बहुजनांच्या गळ्यातला ताईत बनली आहे -

शिक बाबा शिक लढायला शिक -
शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक
लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ईक
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख
मागं मागं नको पुढं सरायला शिक
आत्महत्या नको करू लढायला शिक
कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं
बुडिविती त्याचा कधी करिती ना घोरं
तुला टाळून जाणार्‍याला आडवायला शिक
घेतलेली कर्जं सारी बुडवायला शिक
उंटावून शेळ्या हाकी सरकारं शहाणं
त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण
तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शिक
तूच दिली सत्ता त्याला पाडायला शिक
जातील हे दिस आणि होईलही ठीक
उद्या तुझा शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टीक
हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक...

गावाकडचे दिवस अन तिथले साधेसुधे जीवन,तिथला साधेपणा, नात्यातला ओलावा व सहजता या सर्व भावना त्यांनी अगदी सहजसुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत -
'माझ्या आजीच्या मळ्यात
डबडबली विहीर
पाणी पिण्याला थांबती
साधू गोसावी फकीर.
माझ्या आजीच्या मळ्यात
डेराभरला ताकाचा
गुऱ्हाळाच्या दिवसात
पिपा भरला पाकाचा.
आजी सा-याला द्यायची
ताकापाकाचा गोडवा
तिच्यामुळे शिकलो मी
कसा माणूस जोडावा..'

रानावनातून फिरताना केलेल्या उनाड खोड्या, तिथे लुटलेला अमर्याद आनंद अन त्यातला मातीचा गोडवा याचा सार्थ अभिमान खट्याळ शैलीत या कवितेत आढळतो -
'आम्ही रानामधली पोरं
आम्ही वळतो गाई गुरं
खाली धरणी वर आभाळ
मधी उभे आम्ही गोपाळ
आम्ही चपळ, आम्ही चातुरं....'

ग्रामीण भागातील जीवन शब्दांकित करताना कवी तिथला निसर्ग, प्राणी-पक्षी यांचं मानवाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं किती एकजीव आहे हे देखील त्यांच्या कवितेतून जाणवते -
'माझी एक गाय होती तिला होते वासरू
तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू,
मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ
दोघासाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ....'

गायीचे असे वर्णन एक मातीतला माणूसच करू शकतो, कारण या गोष्टी अनुभवल्याशिवाय शाईत उतरत नाहीत -
'शिंग जणू शिवाजीच्या दोन उभ्या तलवारी
डोळे जणू मोरपीस पापण्यात अलवारी
वासरासाठी जमे डोळाभर पाणी पाणी..."

गावाकडच्या समाधानी कुटुंबात असणारं भावा बहिणीचे मायेचे नाते यावर त्यांनी हळवे भाष्य केले आहे -
दादा गेला शाळेसाठी दूरदूर गावा
रानातला रानमेवा त्याला कुणी द्यावा
शाळेची खडतर वाट चालतानाही शाळेविषयी मनात असलेली ओढ, रविवारच्या सुट्टीच्या दिवसातील गमती, दिवाळीच्या सणाची गंमत, गायरान, पाऊस असा गावाकडील जीवनपट उलगडणाऱ्या या कविता शहरीमनालाही स्पर्शून जातात.


वेळी अवेळी येणारा पाऊस अवकाळी रूपाचा अन विध्वंसाचा असला की तो नकोसा असतो पण अटळ असतो. पण तो गरजेचाही असतो, त्याच्या येण्याच्या खाणाखुणा ठरलेल्या असतात, त्याची प्रतीक्षाही ठरलेली असते. पण जर तो आलाच नाही तर मात्र काळीज फाकून जाते अन दुःखासमोर किती - कसे वाकायचे याचे भान उरत नाही....
असह्य उकाडा हिदेखील
तुझ्या येण्याचीच खूण
असं कळल्यापासून
त्याचीही प्रतीक्षाच आहे
तू आलास की धुडगुस
विस्कटणं ठरलेलं
तरी प्रतिक्षा संपत नाही
काळीज फाकून फाकून जाते
झाकून दु:ख ठेवू किती
नाती किती तोडून टाकू
दु:खासमोर वाकू किती

शहरात राहणाऱ्या व्यक्तींना खेड्यातील लोकांच्या
कष्टाची फारशी माहिती नसते अन कधीकधी फिकीरही नसते. तसेच त्याला जे आयते अन्न मिळते त्याची निर्मितीमूल्येही माहिती नसतात, त्याची खरी किंमत त्याला माहिती नसते. शहरी व ग्रामीण माणसाच्या एकंदर जीवनमानाचे सुंदर तुलनात्मक वर्णन त्यांच्या माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या कवितेत आहे.
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता !
कशी ऊन्हात,ऊन्हात तळतात माणसं
कशी खातात जिवाला स्वस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता !
काळ्या बापाच,बापाच हिरव रानं
काळ्या माईन ,माईन पिकवल सोन
पण त्याचा घामाचा भाव लय सस्ता
माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता !
ईथ डब्यात तुला साखर लागलीया गोड
तिथ शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड
पण भाव ठरतो त्याला न पुसता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता !
जवा दुष्काळ ,दुष्काळ घिरप्या घाली
तवा गावाला ,गावाला कुणी न वाली
…..कस सुगीत घालतात गस्ता…..
माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता !
या भुमीचा मुळाधिकारी
बाप झालाय ,झालाय आज भिकारी
गाव असुन झालाय फिरस्ता
माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता !
काट्याकुट्याचा तुडवीस रस्ता….
माझ्या गावाकड चल माझा दोस्ता…

'आम्ही काबाडचे धनी’ ह्या कथात्मक दीर्घ कवितेतून दारिद्र्याने गांजलेल्या काबाडाचे मनोगत आई आणि ‘काळी आई’ विषयी वाटणारा कृतज्ञ भाव स्पष्ट होती. ही कविता आत्मवृत्तत्मक असून त्यातून कवीने मागसलेल्या आणि पिचलेल्या काबाडयाची करूण कहाणी निवेदन केली आहे. ग्रामीण समाज कृषीनिष्ठा असतो आणि शेती-माय ही या समाजाची आधारभूमी असते. अशी तिची धारणा आहे.

'इंद्रजित भालेराव यांची कविता - आकलन आस्वाद आणि आक्षेप' या ग्रंथाच्या संपादकियात भगवान काळे यांनी भालेरावांच्या समग्र कवितांचे समीक्षण अत्यंत नेमक्या शब्दात मार्मिक पद्धतीने केले आहे. इंद्रजित भालेराव हे १९८९ साली प्रकाशित झालेल्या पहिल्याच ‘पीकपाणी’ या कवितासंग्रहाने काव्यरसिक-समीक्षकांना परिचित झाले. ‘पीकपाणी’ या कवितासंग्रहापासून सुरू झालेला त्यांचा काव्यप्रवास ‘भूमीचे मार्दव’ या कवितासंग्रहापर्यंत आजतागायत सुरू आहे.मराठी साहित्यात स्वतःचा ठसा उमटविण्यात त्यांची कविता यशस्वी ठरली आहे. काव्य लेखनासोबत काव्यवाचनाच्या आगळ्या वेगळ्या शैलीतून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय झाले. इतक्या मोठ्या विसंवादी भेदात्मक व्यक्तीसमुहांमध्ये अफाट रसिकमान्यता खूप कमी कवींच्या वाट्याला आली आहे.

‘आम्ही काबाडाचे धनी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर भालेराव यांना व्यंकटेश माडगूळकर यांनी एक पत्र पाठवले होते. त्यात माडगूळकर म्हणतात, सूर्यनारायण येण्याआधी आलेल्या उषेला नमस्कार ! या पत्राचा संदर्भ देऊन भालेरावांच्या कवितेवरील समग्र समीक्षेच्या ग्रंथांचे प्रकाशन करताना प्रसिद्ध साहित्यिक सदानंद मोरे म्हणाले होते, ‘‘जर आज तात्या (व्यंकटेश माडगूळकर) असते तर ते नक्की म्हणाले असते की, सूर्य उगवलेला आहे ! आज भालेराव यांच्या कवितेचा सूर्य उगवलेला असून त्याचा पुरावा म्हणजे त्यांच्या कवितेवरील ७६० पृष्ठांचा हा समीक्षाग्रंथ आहे ! इंद्रजित भालेराव यांच्या कवितेने महाराष्ट्राला लळा लावलेला आहे. त्या अर्थाने हा ग्रंथ म्हणजे त्यांचे लळाचरित्रच आहे !’’ इंद्रजित भालेरावांच्या कवितेचे हे यथार्थ मुल्यांकन आहे..

अगम्य, शब्दबंबाळ प्रतिमांचा वापर त्यांच्या कवितेत आढळत नाही. साध्या, सरळ बोलीभाषेत त्यांची कविता थेटपणे वाचक-श्रोत्यांपर्यंत पोहोचते आणि आपला परिणाम साधते. आपल्या कवितेतून काय संदेश दयायचा आहे याचा निश्चय त्यांच्या काव्यात आढळतो, ज्या परिसर आणि समाजाशी त्यांचे घट्ट नाते आहे, ज्या परिसर आणि समाजाने त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत त्याबद्दलच ही कविता बोलते. शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांबरोबर त्यांचे गुणदोष, त्यांच्या धारणा, रूढी-परंपरा, समज-अपसमज, लोकसंकेत यांच्यासह संपूर्ण कृषिजीवन त्यांची कविता विविध बारकाव्यांसह आपल्या आवाक्यात घेताना दिसते. म्हणूनच संपूर्ण कृषिसंस्कृतीचे दर्शन त्यांच्या कवितेतून होताना दिसते.

शब्दांना शेणामातीचा दरवळ अपेक्षिणारी त्यांची कविता केवळ अभावाचे चित्रण न करता कृषिसंस्कृतीतील सौदर्यस्थळांचाही वेध घेते. अशा विविधांगी आशयामुळे त्यांची कविता एकसुरी होत नाही. कृषिसंस्कृतीशी संबंधित असणारे सर्व घटक, पशुपक्षी, झाडेझुडपे, गवत, विविध हंगाम, पाऊस, शेतीची अवजारे अशा सर्व गोष्टी कवितेचा विषय होताना दिसतात. या सर्व बाबी कवितेचा विषय होतात, यातही एक सहजता आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील अपार कष्ट, त्याचे अभावग्रस्त जगणे याचे चित्रण करताना त्यांची कविता अधिक टोकदार होते. म्हणून गव्हासारख्या पिकावरील कवितेतही शेतकऱ्याचे अभावग्रस्त जगणे ते अधोरेखित करतात.

इंद्रजित भालेराव यांना गावगाडय़ाची पक्की समज आहे. शेतकरी आलुतेदार-बलुतेदार यांच्या परस्पर संबंधांतील बारकावे त्यांना माहीत आहेत. गावगाडय़ात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय, जातीजातींमधील परपस्परसंबंध त्यातील तणावांसह ते व्यक्त करतात. कुटुंब, नातेसंबंध, भावभावकी, गावातील राजकारण असा गावगाडय़ाचा मोठा पट त्यांच्या कवितेतून साक्षात होतो. मानवी नाते संबंधांबरोबरच ग्रामसंस्कृतीचे निसर्गाशी असलेले महत्त्व, पेरणी, सुगी या हंगामांना असलेले महत्त्व त्यांच्या कवितेत उत्कटपणे येते. त्यांच्या कवितेतून येणारा निसर्ग रस-रूप-गंध आणि चव घेऊन अवतरतो. निसर्गाचे इतके सहृदय चित्रण आणि सर्जनाच्या पातळीवर त्याचा केलेला आविष्कार यापूर्वी व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनातच प्रामुख्याने दिसतो. वेगवेगळी पिके आणि गवतावरील त्यांच्या कविता केवळ माहितीच्या पातळीवर राहत नाहीत तर त्यामागे असलेल्या लोकधारणा, लोकजीवनात प्रचलित असलेले त्यांच्याबद्दलचे बरे-वाईट संदर्भ कवितांना वेगळे संदर्भमूल्य प्राप्त करून देतात.

इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ठळकपणे लक्षात येणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील स्त्री-चित्रण. मुळातच पारंपरिक लोकगीते, जात्यावरच्या ओव्या यांचे संस्कार पचवलेली त्यांची कविता आहे. आई आणि बहिणीच्या तोंडून ऐकलेल्या ओव्यांनी त्यांच्या कवितेला बळ दिल्याचे ते मान्य करतात. ग्रामीण स्त्रियांच्या सुख-दु:खाची वेगवेगळी रूपे त्यांनी जवळून अनुभवली आहेत. आई, सासू, सून, बहीण, आजी अशा विविध नात्यांबरोबरच दाईच्या रूपातील दलित स्त्रीही या कवितेत भेटते. शेतीव्यवस्थेत स्त्रियांच्या वाटय़ाला येणारे कष्ट आणि रांगडय़ा किंवा रानटीपणाकडे झुकलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांचा होणारा कोंडमारा भालेराव यांनी अत्यंत समर्थपणे टिपला आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा स्त्रीची परिस्थिती तर आणखीच वाईट. घरदार आणि समाज सांभाळताना तिची होणारी घालमेल याचे चित्रण ते अत्यंत सूचकतेने करतात. शेतकरी कुटुंबातील स्त्री हाच शेतीव्यवस्थेचा खरा आधार आहे. उपजत असलेली सोशिकता दुर्गुण ठरावा एवढय़ा पातळीवर आहे; परंतु दुसरा पर्यायही तिच्यासमोर उपलब्ध नाही. अशा या स्त्रीच्या विविध भावना प्रेम, शृंगार, विरह, भावनिक घुसमट यांच्या विविध तऱ्हा त्यांनी चित्रित केल्या आहेत. ‘कुळंबिणीची कहाणी’ या दीर्घ कवितेतून आलेले स्वत:चे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या स्त्रीरूपाचे आणखी वेगळे दर्शन घडते. कृषिसंस्कृतीशी अतूट नाते ठेवून ‘मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं’ असा संस्कार येणाऱ्या पिढय़ांवर करणारी, स्वत:च्या सुखाचा विचार न करता नातेसंबंधांना महत्त्व देणारी स्त्री त्यांच्या कवितेत भेटते.

त्यांच्या कवितेवर लोकगीते, लोकलय, ओवी आणि अभंग यांचा फार मोठा प्रभाव आहे. संस्कारक्षम वयात कानावर पडलेल्या जात्यावरच्या ओव्या, भजने, आरत्या, अभंग यांनी आपल्या कवितेत समृद्ध केल्याचे ते मान्य करतात. म्हणूनच संत तुकाराम, संत जनाबाई चौधरी, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ आदींच्या रचना त्यांच्या पूर्वसुरी ठरतात. त्यांच्या कवितेची भाषा वाडय़ातल्या ग्रामीण माणसाची भाषा आहे.

पीकपाणी नंतर 'बाप', 'गावाकडे चल माझ्या दोस्ता', 'दो जीवाची माय मही गेली' प्रसिद्ध कविता, 'आम्ही काबाडाचे धनी' (दीर्घ कविता), 'दूर राहिला गाव', 'कुळंबिणीची कहाणी', 'रानमळ्याची वाट' (बालकविता), 'उगवले नारायण' (लोककाव्य), 'गावाकडं चल माझ्या दोस्ता' (कुमार कविता), 'गाई आल्या घरा' (ललित लेख), 'लळा', 'घरीदारी' (ललित लेख), 'भिंगुळवाणा' (कादंबरी), 'पेरा', 'टाहो', भूमीचे मार्दव (कविता) अशी त्यांची एकामागून एक पुस्तकं येत राहिली. पुढे त्यांनी संत जनाबाई, ताराबाई शिंदे, जिजाऊ यांच्यावर चरित्रात्मक लेखन केलं. बी. रघुनाथांच्या समग्र लेखनाचं श्रीकांत उमरीकर यांच्या सहकार्याने संपादन केलं. त्यांच्या काव्यावर त्यांनी समीक्षात्मक लेखनही केलं आहे.

प्रसिद्ध लेखक सुनीलकुमार लवटे यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी अत्यंत हृद्य शब्दात व्यक्त केल्या आहेत ; एका खानदेशच्या शेतकरी मेळाव्यात तिथे जमलेले शेतकरी कापसाचे चुकारे (देणं) एकरकमेनं, भावहमीनं मिळावेत म्हणून कापूस एकाधिकार खरेदी योजनेसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते. गावागावाहून हजारो शेतकरी बैलगाडय़ांनी आलेले. ते गावजत्रेसारखे इकडेतिकडे ऐसपैस पसरलेले. तेवढय़ात भालेराव माइक हातात घेऊन गाऊ लागले.. त्याबरोबर टाळ्यांचा नाद ठेक्यावर येऊ लागला. जमलेले हजारो शेतकरी एका तालात त्यांच्यामागोमाग गाऊ लागले-
काटय़ाकुटय़ाचा तुडवीत रस्ता
गावाकडं चल माझ्या दोस्ता..
शेतकऱ्यांना वाटलं, अरे, हे आपलंच पोर आपलं गाणं गातंय, तर आपण पण गाऊ या. आणि मग ठरूनच गेलं की, भालेरावांच्या कवितेनं शेतकरी मेळावा सुरू व्हायचा आणि शरद जोशींच्या भाषणानं संपायचा.

भालेरावांची कविता म्हणजे कृषीसंस्कृतीचं आख्यान, भारूड, बखर !. त्यात शेत, गवत, जनावरं, वासरं, साप, गाव, पेरा, टाहो, खळं, मळा, माळ, शिव, शीळ, रान, घोंगडं, पाऊससरी, खुरपं, दोर, कासरा, बिंडा असं सारं येणारच. त्यांची कविता छोटय़ा प्रसंगातून मोठं काव्य, जीवन चित्रित करते. डाळ वाळत घातलेली असताना गाईचं खांड त्यात तोंड घालतं नि राखण करणारं पोरगं कसं भांबावून जातं, परीक्षेच्या धांदलीत गरम पाण्यात पेन धुताना त्याचं वितळणं, १५ ऑगस्ट- २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी गडबडीत धुतलेले ओले कपडे इस्त्री केले की त्यांना आंबट वास कसा येतो, हे भालेरावांच्या कविताच सांगू शकते. एकाच वेळी जीवनाची त्रेधा नि परिस्थितीची तिरपीट वर्णनं तेच करू जाणोत. हास्य तर उभारायचं, पण त्यातला दु:खाचा तळ मात्र सोडायचा नाही, ही या कवीच्या कवितेची पूर्वअट असते.

या कवीला मांजराचं पिल्लू साद घालतं तसंच राघूचंही. 'इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो' म्हणत रानोमाळ भटकणारा अनवाणी शेतकरी त्यांच्या कवितेत ज्या तन्मयतेनं चित्रित झालाय तसा तो दुसरीकडे सापडणं केवळ अशक्य. त्यांच्या कवितेचं बेणं म्हणजे अस्सल देशी वाण. खुरप्याच्या अणीवर शिवार पिकवणारा शेतकरी त्या कवितेत भेटतो. 'मोट झाली जुनी, इंजिनही जुने झाले, माणसांच्या भल्यासाठीच सगळ्यांचे येणे-जाणे' म्हणत भालेराव शेतीच्या बदलाचा इतिहास नोंदवतात. त्यांच्या कवितेत कृषीसंस्कृतीचा मांडव, उत्सव, जत्रा आहे नि दुष्काळ, रोगराईचं तांडवही आहे. उभ्या झाडाला वाळवी लागल्याचं पाहून धसका घेतलेली कुळंबीणसुद्धा आहे.

एकवीस पोरांचा शंकऱ्या महार रक्त ओकत राबत मरतो ते फक्त या कवीच्याच डोळ्यांना दिसतं. पुजाऱ्याची पोर दिव्यातलं उरलेलं तेल घेऊन गुजराण करते तेही देवाशी प्रतारणा न करता नि गुराख्याचं पोर उपाशी न ठेवता. रानभर भेदणारी ल्हावरं पाहावीत ती भालेरावांच्याच कवितेत. ही कविता रानफुलांच्या रंगांचं इंद्रधनुष्य रेखाटते नि चिवळ चिमणीची चिवचिवही टिपते. मोहळाच्या मधाच्या मधाळ वासानं ती गंधलेली आहे. या कवितेत पंढरीचा पांडुरंग आहे आणि महात्मा फुल्यांचा निर्मिकही. 'शेतकऱ्याचा आसूड' महात्मा फुल्यांनी वर्णिल्यानंतर जन्माला आलेला हे कवी. त्यांनी साऱ्या कवितेत शेतकऱ्यांचे अश्रू पेरलेत.. उद्या सोन्याचं पीक यावं म्हणून !

गोव्यातल्या विचारवेध या व्याख्यानमालेत बोलताना भालेरावांनी त्यांच्या कवितांची वाटचाल मनमोकळ्या शैलीत मांडली होती. ती त्यांच्याच शब्दात - "मी चौथी फुकट पास, सातवी ढकल पास आणि मेट्रिक नापास झालेलो आहे. १९७३ साली महाराष्ट्रात महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे त्यावेळच्या मंत्र्यांनी चौथीच्या मुलांना दुसऱया गावात जाऊन परीक्षा देण्यास मनाई केली होती. लोंखडे गुरुजींमुळे त्याकाळी चौथीच्या मुलांना परीक्षा न देताच पास करण्यात आले. याचाच अर्थ मी फुकट पास झालो. सातवीच्या परीक्षेसाठी पूर्णा जक्शन येथे जाऊन परीक्षा दिली होती. खर म्हणजे नापास झाला होतो, परंतु त्यावेळी कावळे गुरुजी यांनी ढकलपास केले. मेट्रिक परीक्षेत मात्र मी नापास झालो, असे ते म्हणाले. नापास झाल्यानंतर त्यावेळच्या प्रथेनुसार वडिलांनी गुरे राखायची जबाबदारी माथी मारली. एरव्ही सुट्टीमध्ये गुरे राखायचो आता वर्षभर राखावी लागणार हे मी जाणले. मी आनंदाने हे काम केले. मी माझ्या गुरांना कधीच मारले नाही. मी पुढे चालायचो गुरे मागे यायची. कधी शेतात गेली तर गळय़ात हात घालून ओढून आणायचो, पण कधी काटीचा वापर केला नाही. गुरे जर शेतातून आली नाहीत तर बांधावर उभा राहून रहायचो. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून गुरे बाहेर यायची. आईने जेवणाचा दिलेला डबा मी वासरांना चारायचो आणि स्वतः कोवळे गवत खायचो.

गुरे राखण्याच्या बदल्यात वडिलांनी कधी पैसे दिले नाहीत तरीही पुस्तकाच्या रुपाने मी ते वसूल करायचो. यातूनच बोध घेत गुरे राखण्यावर एक पुस्तक लिहिले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा १९९५ साली १५००० रुपयांचा पुरस्कार मिळाला. कोणवर कोणता प्रसंग कसा येईल हे सांगता येत नाही. गुरे राखण्याच्या अनुभवावरून लिहिलेले हे पुस्तक ललीत विज्ञान म्हणून जळगाव विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी वापरले. याच पुस्तकातील हिरा नावाच्या मुलीचे चरित्र कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमात आहे. माझ्यावर धार्मिकतेचे संस्कार होते. महानुभाव सांप्रदायचे संस्कार होते. मला संपूर्ण भगवतगीता तोंडपाठ होती. चक्राधर स्वामींचे ‘एक हजार दहा पाठ’ तोंडपाठ होते. नववीत असताना बहिणाबाईंच्या पुटकविता तोंडपाठ होत्या. दहावीत असताना जात्यावरील ओव्या, अभंग, आरत्या सगळ काही तोंडपाठ होते. मला लोकसाहित्य शिकविण्यासाठी मांडे सर लाभले. त्यांच्या सांगण्यावरून मी जात्यावरील २०० ओव्या लिहून काढल्या. पुढे कॉलेजमध्ये केवळ ४५ टक्के गुण मिळाले तरीही संपूर्ण कॉलेजमध्ये आपण प्रथम आलो होतो, असेही भालेराव म्हणाले. त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही. एमएच्या परीक्षेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविण्याचा मान मिळविला. त्यांची बाप नावाची कविता २० वर्षे महाराष्ट्रात अभ्यासक्रमात होती. तीन वेळा अभ्यासक्रम बदलला, मात्र त्यांची बाप ही कविता मात्र अभ्यासक्रमातून वगळली गेली नव्हती. प्रा. राम शेवाळकर यांच्या सांगण्यावरून आपण बालकविता लिहिली. पाचवीच्या मुलांच्या आकलन कक्षेत बसेल असा छंद वापरला. पाचवीच्या बालभारतीमध्ये बाप कविता घेण्यात आली. ही कविता सुमारे ७ कोटी विद्यार्थ्यांनी अभ्यासली. ही कविता महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ‘२८ वर्षापूर्वी प्रकाशित झालेला पिकपानी हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात सामाविष्ट झाला, महात्मा फुलेंनंतर इश्वरासाठी निर्मिक हा शब्द केवळ आपण कवितेसाठी वापरला. आपली ‘शिक बाबा शिक’ ही कविता अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. ही कविता वाचून, ऐकून अनेक शेतकऱयांनी आत्महत्या करण्याचा विचार बदलला, हीच खरी आपल्या कवितेची कमाई आहे…"

अस्सल काळ्या मातीच्या कुशीतले, आशयघन काव्याचे कसदारसमृद्ध पीक पेरणारे इंद्रजित भालेराव खऱ्या अर्थाने भूमीपुत्रातले सिद्धहस्त 'बाप'कवी आहेत. येणाऱ्या काळातही त्यांच्याकडून मातीच्या गायनाचे हे लेणे अजून उंचावत जावे ह्या अपेक्षांना ते निश्चित खरे करून दाखवतील..

***** ******* ************** ******* 
'भूमीनिष्ठांची मांदियाळी' हा कवी इंद्रजित भालेराव यांचा काव्यसंग्रह. भालेराव रसिक वाचकांना ठाऊक आहेतच त्याशिवाय शेतात राबत्या हातांनाही ज्ञात आहेत.

गावगाड्यातल्या लेकीबाळी त्यांच्या कविता वाचून आपल्या बापाचं पिढ्यानपिढ्याचं दुखणं सहजी ओळखी लागल्यात आणि नव्या पिढीतल्या कोवळ्या मातीलाही आकार लाभतोय.

शेतीमातीच्या कविता त्यांनी आजवर विविध मंचांवरून मांडल्या आहेत.
वाचकांनीही त्यांना भरभरून दाद दिलीय नि सुजाण समीक्षकांनीही त्यांना गौरवलंय.


त्यांच्या अन्य काव्यसंग्रहापेक्षा हा काव्यसंग्रह वेगळा आहे कारण याची माती काळीभोर कसदार नि चेतनादायी आहे, यातल्या शब्दपेरणीतून आलेलं पीक पिंडऱ्यापर्यंत कधी आलं आणि छातीशी स्पर्धा करून मस्तकाच्या उंचीहून वर कसं गेलं हे उमगत नाही.

या कविता केवळ मातीत राबत्या हातांच्या नसून समाजाचं देणं फेडणाऱ्या 'दात्या' हातांच्याही आहेत.
द्रष्टे समाजसुधारक, शेतकरी नेते, वाङ्मयाशी नातं असणारे रसिक राजकारणी, संत महात्मे आणि कवितेचे भूषण मानले गेलेले कवी यांच्या अनुषंगाने व्यक्त होणाऱ्या कविता यात आहेत.

चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम, रवींद्रनाथ टागोर, कवी पाश, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, भाई उद्धवराव पाटील, शरद जोशी, बराक ओबामा, विलासराव साळुंखे, पोपटराव पवार, साधनाताई आमटे आणि संत गाडगेबाबा अशी सोळा खणांची वर्गवारी यात आहे.

(रविंद्रनाथ टागोर)
आपण आगाऊपणा केला, नीट नाही वागलो
की मोठी माणसं आपलं घर उन्हात बांधतात
________________________________

(तुकाराम)
तुका नव्हे टाळ I तुका ना चिपळी
निर्वाणीची टाळी I तुकाराम
____________________________

(पाश)
उद्याच्या हिरव्या स्वप्नासाठी
सगळ्या शिवाराला
आग लावणारी होती तुझी कविता
सरकारी पुरस्कारांच्या तुकड्यांची
तिला मातब्बरी नव्हती
_______________________

(कबीर)
अरे कबिरा
परवा तुला नेटवर पाहिलं
लबाड लुच्च्या भामट्यांनी घेरलेलं तुला
ज्यांना लाथाडून काशीहून
तू मगहरला आलास
तेच हे
त्यांना जेंव्हा समजलं
तुझ्या नावाचा पंथ सुरु होतोय
तेंव्हा ते गालातल्या गालात हसले
______________________

(ज्ञानेश्वर)
ही अनवट वाट तुम्ही चाललात
कबूल की तुम्हाला गुढी पंढरपूरला न्यायची होती
पण तुम्ही ती रानातल्या वाटांनी नेली
विश्वाचे आर्त तुमच्या मनात प्रकाशले
तुम्ही शकून सांगणारा पैलतीराचा कावू झालात
म्हणून ही दहीभाताची उंडी मी तुमच्या तोंडी घालतोय
________________________

(चक्रधरस्वामी)
विटाळामुळं
ज्यांच्या वाट्याला कायम
टाळाटाळ आली होती
त्या स्त्रीत्वाला आणि शूद्रत्वाला
पावित्र्याची पदवी दिलीस
पोथीत नसलेल्या गोष्टींनाही
पोथीत सन्मानाने जागा दिलीस
__________________________________________

(गांधीजी)
कुणी निर्माण केले हे विकासाचे मृगजळ
आणि का धावला माझा बाप
मृग होऊन या नकली जळाच्या मागे?
त्यांचा निसर्ग विरोध
आणि माझ्या बापाचा निसर्ग
यांच्या अवमेळात
निर्माण झाले गळफास
तुमचा संदेश धुडकावून केलेल्या पेरणीला
गळफासांचे पीक आले..
_______________________________

(वल्लभभाई पटेल)
जोडा कुठं चावतो ते
नेमकं घालणाराला कळावं
तसं शेतकऱ्याचं दुखणं
नेमकं तुला कळायचं
__________________________________

(पोपटराव पवार)
झाडं म्हणजे पृथ्वीचे हात
झाडाच्या हातांनी आभाळाला बोलावलं
तरच ते स्त्रवतं - द्रवतं
पण आम्ही करंटे, पृथ्वीचे हातच तोडले
आणि पावसाची वाट पाहू लागलो
___________________________________

(यशवंतराव चव्हाण)
तुला रांगांया भेटल्या
सह्य पर्वताच्या रांगा
आल्या संगम घेऊन
कृष्णा - कोयनेच्या गंगा
________________________________

(भाई उद्धवराव पाटील)
सुरु केलंय उत्खनन
तुझ्या घरांचं घुशींनी
काटेरी झुडपांनी धरलीय मेघडंबरी
जिथं तुझा पाळणा हलला..
_____________________________

(शरद जोशी)
मेंढरं देखील एक होतात
पण यांना एकी माहीत नव्हती
याआधी अनेक आले त्यांना हाकारणारे
पाहिजे त्यानं यावं, हाकारावं
काम झालं की
पांगलेल्या माळावर सोडून द्यावं..
__________________________________

(बराक ओबामा)
रात्री झोपलेल्या मुलींच्या अंगावर
पांघरून घालताना त्याला होणारं सर्वोच्च सुख
त्याच्यातल्या आईच्या अस्तित्वाची खूण आहे
परमेश्वर पाठीमागे उभा असल्याशिवाय
अशी आई लाभत नाही असं माझी माय म्हणते
_____________________________________

(गाडगे बाबा)
बाबांचा खराटा। बाबांची लेखणी
अक्षरे देखणी। भुईवर

खराटयामधून। बाबांची कविता
चालता बोलता । जन्म घेई
_____________________________

(साधनाताई आमटे)
तुझा पदर केवढा
झाला आभाळा एवढा
त्याच्या खाली सामावला
अनाथांचा पोरवडा
____________________________

सामाजिकतेइतकीच वैयक्तिकता आणि खाजगी जीवन तितकेच महत्वाचे आहे हे सूचित करणाऱ्या इतक्या व्यक्तिरेखा कवितेच्या माध्यमातून चितारणे ही जोखीमच होय, ती भालेरावांनी सहजी पत्करलीय आणि एका वेगळ्या काव्यसंग्रहाची नीव रचलीय।

- समीर गायकवाड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा