बुधवार, २७ एप्रिल, २०१६

क्रूरकर्मा नादिरशहा ...



पुर्वीच्या उत्तरपुर्व पर्शियामधील आणि आत्ताच्या इराणमधील खोरासनमध्ये १६८७ सालीं एका धनगरी मेंढपाळाच्या अफ्शराच्या घरी जगात इतिहास घडवणारा एक मुलगा जन्माला आला. किझीबाश आणि अफ्शर या दोन्हीही भटक्या पण पराक्रमी पर्शियन प्रजाती होत्या. त्याच्या जन्मानंतर काही वर्षातच त्याच्या आईला उझबेकी गनिमांनी पळवून नेले. त्याचे वडिल मेंढपाळ असल्याने ते मेंढ्यांच्या चामड्यांचे कोट, टोप्या वगैरे करून विकीत असत. १३व्या वर्षी त्याचे वडिल मृत्युमुखी पडले. आजूबाजूची युद्धग्रस्तता आणि वडिलांचे निधन या अस्थिरतेमुळे लहानपणापासून त्या मुलाचे आयुष्य अनेक प्रकारच्या साहसांत गेले. सतरा वर्षांचा असतांना तो उझ्बेकांच्या कैदेत सांपडला, याचवेळेस त्याच्या आईला बंदी बनवण्यात आले आणि कालांतराने तिचेही निधन कैदेत असताना झाले.१७०८ मध्ये तो उझ्बेकांच्या तावडीतून निसटला आणि खोरासनला परतला. या सर्व घटनांचा त्याच्या युवा मनावर विपरीत परिणाम झाला आणि त्याचा स्वभाव क्रूर, विध्वंसक, परहिताविषयी निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा बनला.



उझ्बेकांच्या कैदेतून सुटल्यावर बापाच्या मेंढ्या विकून तो लुटालूट करूं लागला. आसपासच्या परिसराची त्याने लुट चालवली.याच दरम्यान अफगाणांनीं इराणचा काही प्रदेश काबीज केला त्या धामधुमींत ६ हजार टुकार पण चिवट पराक्रमी लोक जवळ बाळगून त्याने आत्ताच्या इराणमधला हेरातचा प्रसिद्ध किल्ला हस्तगत केला हे करताना त्याने त्याचा तिथला अंमलदार असलेला चुलता हाल हाल करून ठार मारला. त्यामुळे तो अख्ख्या पर्शियामध्ये प्रसिद्ध झाला, तो तरुण म्हणजे नादिरशाह...क्रूरतेचे विकृत प्रतिक बनलेला विश्वयोद्धा ! चेंगीझ खान आणि तैमुरलंग हे ज्याचे आदर्श होते तो नादिर !

सुरुवातीच्या काळात तो मारहाणीच्या बेफिकिरी आयुष्याला काही काळ वैतागला देखील होता अन त्यामुळे एका शांतताप्रिय सुभेदाराच्या हाताखाली तो सामान्य आयुष्य जगण्यासाठी तो रुजू झाला. इथे त्याचे काम होते राजधानी इस्फाहन येथे सुलतान हुसेनच्या दरबारात खलिते पोहोच करण्याचे. हे काम करताना त्याने त्याच्या सहकारयांना यमसदनी धाडले. साथीदारांना मारल्यामुळे संतप्त झालेल्या सुलतानाला त्याने अशी काही पट्टी पाडली की सुलतानाने त्याला खुश होऊन भेटवस्तू दिल्या. पण त्याच्या या विश्वासघातकी कृत्यामुळे त्याचा मालक त्याच्यावर नाराज झाला तेंव्हा आपला खेळ इथे खल्लास होऊ शकतो हे ध्यानात आलेल्या नादिरने त्याचीच हत्त्या केली व तिच्या सुंदर तरुण मुलीला घेऊन पोबारा केला. या तरुणीपासून त्याचा थोरला मुलगा रझा कुली मिर्झा हा जन्मास आला.

या काळात १५०२ पासून सत्तेत असलेल्या सफ्वैद घराण्याचे राज्य होते. पण ते कमकुवत झाले होते. याचा फायदा अफगाण आक्रमकांनी घेतला. १७२२ मध्ये मुहम्मद होटकीच्या नेतृत्वाखाली अफगाणी लुटारूंनी आधी कंदहारमधील गुर्गेनखान या सुलतानाच्या सुभेदाराचा काटा काढला आणि ते थेट गुल्नाबादपर्यंत धडकले, राजधानी इस्फाहनवर ताबा मिळवला. दुबळ्या सुलतान हुसैनने शरणागती पत्करली पण राज्य हवाली करण्याच्या आधीच तिथे बंडाळी झाली. सुलतानाच्या मुलाने तह्मस्प दुसरा स्वतःला शहा घोषित केले. या सर्व अस्थिरतेचा फायदा उठवत पर्शियाचे परंपरागत शत्रू ओट्टोमन आणि रशियन टोळ्यांनी सीमावर्ती पर्शियाचे लचके तोडले, मोठा भूभाग वेगेवगळ्या टोळ्यांच्या ताब्यात गेला.या भूभागावरून अनेक वर्षे हा सर्व परिसर अस्थिर राहिला. शेवटी रशियन - ओट्टोमन आक्रमकांनी आपसात तह करून भूभागांची वाटणी केली.१७२४ चा ट्रिटी ऑफ कोंस्टेटीनोपाल या नावाने हा करार मदार ओळखला जातो. या दरम्यान नादिरने स्वतःचे छोटेखानी सैन्य स्थापन केले होते.

पर्शियाचा स्वयंघोषित शहा तहमस्प दुसरा याचे राज्य या गील्झाई अफगाण टोळ्यांनी अशा पद्धतीने हिसकावून घेतल्यानें शहाने थेट नादीरची मदत मागितली व नादिरनें अफगाणी टोळ्यांचा पराभव केला १७३० मध्ये शहाला समारंभपूर्वक गादीवर बसविलें. शाहला पुन्हा गादीवर बसवताना त्याने त्याचा असा काही विश्वास संपादन केला की सर्व सैनिकी सूत्रे त्याच्या ताब्यात आली. त्याला तहमस्प कुली ( तहम्स्पचा सेवक ) ही पदवी मिळाली. याचा फायदा उचलत त्याने १७२९ मध्ये आधी अफगाणचा बिमोड करायचे ठरवले. सर्वप्रथम त्याने हेरातचा किल्ला व प्रांत ताब्यात घेऊन अब्दालीच्या अफगाणी टोळ्या नेस्तनाबूत केल्या. अफगाणचा शहा अश्रफ याला त्याच्याच सहकारयांच्या हस्ते यमसदनी धाडले. अफगाणची राजधानी कंदहारचे महत्व संपुष्टात आणत त्याने तिथे लगतच नवे शहर उभे केले ते म्हणजे नादिराबाद !!

१७३० ते १७३५ सातत्याने युद्ध करत त्याने ओट्टोमन आणि रशियन आक्रमकांचा पाडाव केला. कोकेशस व उत्तर इराणचा सर्व गेलेला भूभाग परत मिळवला.१७३३ मध्ये तो बगदादच्या हद्दीशी येऊन थडकला अन त्याला ओट्टोमन तोपाल उस्मान पाशाचा कडवा प्रतिकार अनपेक्षित रीत्या समोर आला. याच दरम्यान पर्शियामध्ये बंडाळी होण्याच्या वार्ता त्याच्या कानी येत होत्या. पण कालांतराने नादिरने पुन्हा विशाल सैन्य घेऊन बगदादवर स्वारी केली अन उस्मान पाशाचा प्रतिकार मोडून काढला.१७३५ मध्ये त्याने रष्तचा तह केला अन रशियनांच्या ताब्यातला पर्शियन भूभाग पुन्हा कब्जात केला. नादिरने अनेक युद्धें करून पांच वर्षांच्या आंत पर्शियन साम्राज्याची हद्द प्राचीन काळीं होती तितकी विस्तृत केली. याचवेळेस त्याचा डोळा थेट इराणच्या शाहच्या गादीवर होता, त्यासाठी तो योग्य संधीची वाट बघत होता अन एके दिवशी त्याने ही किमयादेखील केली. इसवीसन १७३२मध्ये तहमस्पनें तुर्कांशी अपमानकारक वर्तन केले आणि आपल्या गैरहजेरींत गैरवर्तन केले अति मद्यप्राशन केले असे आरोप त्याने थेट सुलतान तह्मस्पवर ठेवले. बहुतांश दरबारी लोकाना आपल्या बाजूला वळवून त्याने सुल्तानास पदच्युत केलें व त्याच्या अब्बास (तिसरा) नांवाच्या लहान मुलास गादीवर बसवून आपण सर्वाधिकारी झाला. छोटा अब्बास नावालाच शहा होता खरा कारभार नादिरच करत होता, सगळी सत्ता त्याने निरंकुशपणे स्वतःच्या हातात ठेवली होती.त्याचे मन मानेल तसा कारभार त्याने या काळात केला.

यानंतर नादिरने आधी तुर्कांपासून जिंकलेले प्रांत परत घेतले. या लढायांच्या काळात १७३६ मध्ये अब्बास मृत्यूमुखी पडला, त्याचा मृत्यू संशयास्पद स्थितीतच झाला, त्यामुळे बरयाच जणांचा नादिरचा संशय आला पण त्याचे नाव घेण्याची कोणाची हिंमत झाली नाही. ही कुजबुज आणि प्रजेमधली अस्वस्थता याचा अचूक अंदाज घेऊन नादिरने अब्बासच्या मृत्यूपश्चात आपल्या सर्वाधिकारी असणारया पदाचा राजीनामा दिला. त्याच्या या खेळीमुळे त्याच्याकडे उठणारी बोटे आपोआपच गप्प झाली,अस्वस्थ लोकांची आणि त्याच्यावर खार खाऊन असणाऱ्यांची तोंडे बंद झाली. याचा दुसरा फायदा असा झाला की त्याच्या या नाट्यमय कुरघोडीने राज्यांतील सरदारांनीं त्याला गादीवर बसण्यास सांगितलें.याच वेळेची वाट बघणारया नादिरने १७३६ मध्ये इराणच्या तक्तावर आपले नाव कोरले आणि तो तक्तपोशी करून घेऊन गादीवर बसला. त्याने स्वतःच्या पाशवी पराक्रमाच्या अन कपटी राजनीतीच्या आधारे आत्ताच्या आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, उत्तर कोकेशस ,इराक, तुर्की, तुर्कमेनिस्तान, अफगाणीस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, उत्तर भारतीय पर्वत प्रदेश, ओमान, आणि पर्शियन आखात इतका मोठा भूभाग काबीज केला.

तो इराणचा शहा झाला पण खरा इथे खरे तर फार मोठी मेख होती. पण ही मेखदेखील कपटी, धुर्त नादिरशाहने सोडवली. पर्शियन राजघराणे सफ्वैद हे शिया पंथीय होते तर नादिरने जिंकलेल्या ओट्टोमन साम्राज्यातील बहुतांश भाग सुन्नी पंथीय होता. त्याचबरोबर त्याच्या सैन्यात देखील शिया आणि सुन्नी दोन्ही पंथाचे लोक होते. खरे तर नादिर हा जन्मतः शिया होता पण विवाहपश्चात तो सुन्नी झाला होता. बहुतांशी एखादा तरुण जेंव्हा आंतरधर्मीय विवाह करतो तेंव्हा शक्यतो तो वधुला तिचा धर्म बदलून स्वतःचा धर्म स्वीकारायला भाग पाडतो,पण इथे तर एक सर्वेसर्वा जो योगायोगाने त्या पदावर आला होता त्याचा पंथ हा देशाच्या मुख्य पंथाच्या विरुद्ध होता. मग त्याने ती सर्व परिस्थिती कशी हाताळली असेल याचा अंदाजही करणे अवघड वाटते. त्याने एक शक्कल लढवली, सुन्नी लोकांना स्वीकारायला सोपा जाईल असा शिया मधला नवा पंथ 'जाफरी' त्याने सर्वांच्या माथी मारला. शिया इमाम (सहावे )जाफर अल सादिक यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्याने हा मधला मार्ग हुडकून काढला. हे करताना ओट्टोमन इमामांनी जाफरी या पंथाला मजहब म्हणून मान्यता दिली नाही पण नादिरने मोठ्या चलाखीने या जाफरीयन लोकांसाठी मक्का - हजला जाण्याची मान्यता ओट्टोमनांकडून पदरात पाडून घेतली.हा उद्योग करताना त्याने सफ्वैद घराणे मुळातल्या शियांच्या वरचष्म्यासह पूर्णतः मोडीत काढले.कलेह -इ- नादेरी नावाने त्याने नव्या इस्लामी धर्म सुधारणा लागू करून या सर्व घडामोडीवर कडी केली. पर्शियन लोकांना जाफरी पंथ स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी त्याने सर्व हतकंडे अवलंबले. देशांतर्गत हा उद्योग चालू ठेवत दुसरीकडे साम्राज्यविस्ताराची भूक देखील जागृत ठेवली होती. त्यानें १७३७ सालीं विशालकाय अफगाणिस्तान जिंकून तो इराणास जोडला, तो नुसता यावर समाधानी राहिला नाही तर त्याने अफगाणी लोकांनी १७३० पासून सीमावर्ती इराण्यांचा जो अनन्वित छळवाद मांडला होता, जे अनर्थ केले होते त्याचा पुरेपूर सूड उगविला.याची अनेक रक्तरंजित वर्णने इतिहासात नोंद आहेत.

आपल्या सततच्या क्रूर हिंस्त्र कारवायांनी जनता आपल्या राजवटीला कंटाळेल आणि त्याचबरोबर सरदार आपल्याविरोधात जातील अन त्यामुळे आपल्याविरुद्ध बंडाळी होऊ शकते याचा मागमूस लागल्याबरोबर काही कालावधीसाठी त्याने पुढें सौम्यवृत्ति धारण करून त्या लोकांचा विश्वास जिंकला अन लोककल्याणाची काही कामेही केली. एकीकडे लोकविश्वास त्याने तसूभरही ढळू दिला नाही अन दुसरीकडे देशाची भौगीलिक सत्तासीमा तो राक्षसी हाव असल्यागत वाढवत गेला. त्याने देशाची सीमा इतकी रुंदावली की त्याच्या राज्याची हद्द तत्कालीन भारताच्या मुघल साम्राज्यास भिडली.

मुघलांपर्यंत सीमा भिडल्यावर त्याची हाव आणखी वाढली, समृद्ध हिंदुस्थानची भूमी त्याला खुणावू लागली. या देशावरही आपला कब्जा असावा असे त्याला वाटू लागले, यासाठी तो मुघलांशी कुरापात कशी काढता येईल यावर विचार करू लागला. त्याच्या डोक्यात चोवीसतास हिंदुस्थानवरची स्वारी घोंघावू लागली. लुट आणि पैसा अडका त्याच्यापुढे नाचू लागली. याच दरम्यान त्याने कब्जा केलेल्या अफगाणीस्तानातील त्याच्या ताब्यांतील कित्येक अफगाण लोक गझनवी नजीकच्या मुघल राज्यांत जाऊन राहिले. हा मुद्दा नादिरशाहच्या ध्यानात आल्याबरोबर त्याचे डोळे आनंदाने लकाकले. त्याने या लोकाना आपल्या राज्यात परत पाठविण्याविषयीं दिल्लीच्या बादशहास संदेश पाठवला. मुघलांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही, परिणामी दिल्लीहून नादिरशाहच्या खलित्यास कांहींच जबाब गेला नाहीं. नादिरशाहला याचा अंदाज असावाच तो पूर्ण तयारीनिशी याचीच वाट बघत होता. कंदहार जिंकून तो तिथेच डेरा टाकून होता.

फेब्रुवारी १७३९ मध्ये नादिरशहा मुघलांच्या मुलुखावर चालून आला, त्याची चाल इतकी अभेद्य आणि अचूक होती की त्याने खैबरखिंडीद्वारे कूच करून गझनी, काबूल, पेशावर,सिंध लाहोर आपल्या ताब्यात घेतले. त्याने मुघलांना चारीमुंड्या चीत केले. १३ फेब्रुवारी १७३९ मध्ये त्याने कर्णाल इथे मुघल सैन्यास समोरासमोर माती चारली. पुढे जाऊन वेगाने सिंधूचे खोरे पार केले तेंव्हा पाचावर धारण बसलेल्या मुघल बादशहा मुहंमदशाहने आधी निजामास नादिरशहाकडे तहाची बोलणी करण्यास पाठवले, नादिरने त्याला भिक घातली नाही तेंव्हा मागाहून महंमदशहा स्वत: त्याच्या छावणींत जाऊन त्यास भेटला. एकीकडे भेटीचे, तहाचे देखावे तसेच चालू ठेवत नादिरशाह थेट दिल्लीपर्यंत आला. दिल्लीत दाखल होताना आपल्याला मुघलांकडून दगाफटका होऊ नये म्हणून त्याने मुहंमदशहाला स्वतःसोबत ठेवले. काही काळातच ते दोघे दिल्लीस डेरेदाखल झाले.

या दरम्यान वैफल्यग्रस्त मुघल सैनिकांनी नादिरशाह जखमी होऊन मरण पावल्याची अफवा पसरवली.या अफवेमुळे चेव आलेल्या सैनिकांनी अन सामान्य रयतेने नादिरशाहच्या सैन्यावरच हल्ले चढवले. अचानक सुरु झालेल्या या हल्ल्यांनी संतप्त झालेल्या नादीरशहाने दिल्लीचे शिरकाण करण्याचा हुकुम त्याच्या सैन्याला दिला तो दिवस होता २२ मार्च १७३९. नादिरशहाचा हुकुम येताच त्याच्या क्रुर सैन्याने काही तासात २००००० लोक मारले. दिल्ली रक्तांच्या नदीत वाहून निघाली, सर्वत्र मृत्यूने थैमान घातले. आपल्या रयतेचे असे निशस्त्र शिरकाण बघून मुघल बादशहा नादिरच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडला आणि त्याने आपली हार सर्वतोपरी स्वीकारली. नादिरशहाला इथल्या संपत्तीत रस जास्त होता, त्याने मुघलांशी तह केला. दिल्लीकरांच्या जीवाच्या मोबदल्यात त्याने मुघलांच्या शाही खजिन्याची चावीच घेतली. मुघल सत्तेचे साम्राज्याचे महान प्रतिक बनून राहिलेल्या मयुर सिंहासनावर त्याने हात मारला. कोहिनूर आणि दर्या - ए - नूर हे हिरे देखील त्याने मिळवले, जाताना तत्कालीन सातशे दशलक्ष रुपये, हिरे, माणिक,मोती ,जडजवाहिरे, दागदागिने आणि हजोरांच्या संख्येने हत्ती,उंट,घोडे सोबत नेले. १७३९ च्या मे महिन्याच्या सुरुवातीस नादिरशहा दिल्लीची कत्तल करून आणि देशाची सर्वात मोठी लुट करून मग्रूरपणे परत निघाला. नादिरशाहने केलेली ही लुट इतकी अफाट होती की त्या खुशीत त्याने त्याच्या संपूर्ण साम्राज्यात सलग तीन वर्षे एका दमडीचा देखील कर वसूल केला नाही. त्याने सगळा कर माफ केला. सततच्या युद्धांमुळे जर्जर झालेल्या त्याच्या देशास अन रित्या झालेल्या अर्थव्यवस्थेस दिल्लीची लुट एक संजीवनी ठरली. दिल्लीहून परत जातांना त्यानें महंमदास बादशाही पदावर बसविलें आणि त्यास अनेक प्रकारचा उपदेश केला. `बादशहाविरुद्ध बंड कराल, तर मी पुनरपि येऊन तुमचा संहार करीन’ अशी सर्व लोकांस जाहीर दहशत घालून आणि दिल्लीच्या एका राजकन्येशीं आपल्या मुलाचें लग्न लावूनच नादिरशहा इराणांत परत गेला.



नादिर जेव्हा मुघलांशी लढत होता तेंव्हा त्याने पर्शियात त्याच्या मुलाला रझाला मागे लक्ष्य ठेवण्यासाठी ठेवले होते. या रझाने तर नादिरपेक्षाही जास्त जुलूम प्रजेवर केले. आपला बाप नादिर मेल्याचे समजून त्याने स्वतःची तख्तपोशी करण्याची तयारी सुरु केली होती. त्यासाठी त्याने तहमस्पचे अख्खे खानदान नष्ट केले. परतलेल्या नादिरला याने वाईट वाटले, पण राज्य शाबूत ठेवल्याने नादिरने त्याच्या या कुरघोडीकडे कानाडोळा केला. परतल्यानंतर त्याने त्याचा भाऊ इब्राहीम याच्या वधाचा बदला घेण्यासाठी दागीस्तानची लढाई केली.१७४१ मध्ये माझ्देरानच्या जंगलातून जाताना त्याच्यावर छुपा हल्ला झाला. त्यात तो किरकोळ जखमी झाला पण या नंतरच त्याची प्रकृती त्याला साथ देईनाशी झाली. आपला मुलगा रझानेच हा हल्ला केला असावा या संशयाने पछाडलेल्या नादिरने आपल्या मुलाचे डोळे काढले, त्याला अंध केले. पुढे त्याला याचे वाईट वाटले आणि मुलाचे डोळे काढताना हजर असणारया सर्व प्रजाजनांचे त्याने हत्त्याकांड केले. आयुष्यभर केलेल्या लढाया आणि वध यामुळे नादिर वरचेवर विकृत होत गेला. तरीदेखील त्याची साम्राज्याची भूक कमी झाली नाही, त्याने बहारीन, मस्कत, नजफपर्यंत सीमा वाढवल्या. यावरून त्याने केव्हढे विशाल साम्राज्य वाढवले याचा पुसटसा अंदाज येतो.त्याने इराणी चलनदेखील बदलले, नादेरी नावाचे चांदीचे चलन त्याने मुघल रुपयाच्या धर्तीवर वापरात आणले.

जसजसे वय वाढले तसतसे त्याची तब्येत ढासळत गेली. तब्येत जशी ढासळत गेली तसा तो अधिक क्रुर अन अधिक विकृत होत गेला. त्याने प्रजेवर अनन्वित जुलूम सुरु केले,कट्टर शिया लोकांचे तर त्याने जीवन नरकापेक्षाही वाईट केले. त्याने जनतेवर प्रचंड कर लादले, आलेले सर्व पैसे तो सैन्यावर खर्च करू लागला. त्याच्याविरुद्ध जाणारया सर्व व्यक्तीना तो निर्दयीपणे ठार करू लागला.लोकांना मारून त्यांच्या कवट्याचे त्याने अनेक मनोरे उभे केले ! त्याच्या या जुलमी विकृत राजवटीला कंटाळलेल्या काही उमरावांनी त्याचा सफाया करण्यासाठी एक योजना आखली. त्यानुसार १७४७ मध्ये आजच्या दिवशी २० जून रोजी झोपेत असताना त्याची हत्त्या करण्यात आली. खुद्द त्याचा पुतण्या अलीकुलीखान याच्या हातून त्याचा खून झाला. त्याची कबर मशाद येथें आहे, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या घराण्यात अनेक बंडाळ्या झाल्या, त्याच्यानंतर अलीकुली इराणचा शहा झाला. त्यानें नादिरचे पुत्र व नातू मिळून १३ जण ठार केले. फक्त एक शाहरूख नांवाचा नातू जिवंत सुटला; तो पळून आस्ट्रियाच्या राज्यांत गेला. तेथें त्यानें आस्ट्रियन सरकारची नौकरी पत्करली. तिकडे त्याला बॅरन व्हॉन सेमेलिन म्हणत; तो व्हिएन्ना येथेंच मरण पावला. इकडे मात्र सर्वत्र अनागोंदी झाली, साम्राज्याचे अनेक तुकडे पडले. यातूनच अहमद शहा दुराणीने आत्ताच्या अफगाणीस्तानचे स्वतंत्र अस्तित्व घोषित केले. इराण, अझरबैजान, आर्मेनिया यांनीही हाच कित्ता गिरवला. नादिरशहाने जेव्हढे काही मिळवले होते त्याच्या अनेकपटीने त्याच्या मृत्यूपश्चात गमावले. नादिरशहाचा जन्म हलक्या कुळांत होऊन देखील त्याने जगातील सर्वोच्च साम्राज्याचे तख्त काबीज केले, त्याचे शिक्षण देखील अगदी अत्यल्प होते त्याला कोणत्याही विशेष विद्या अस काही विशेष कसबदेखील त्याच्या अंगी नव्हते परंतु पाशवी पराक्रमाच्या ताकदीवर अन नशिबाच्या व अकलेच्या जोरावर अनेक राज्यांची उलथापालथ करण्याचें त्यास सामर्थ्य आलें. जगाचा इतिहास नादिरशहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही इतकी त्याची विकृत, क्रुर राजवट आणि विशाल साम्राज्य होते.



मुघलांच्या नाकावर टिच्चून त्याने लुटून नेलेला अपरिमित खजिना म्हणजे देशाचे आजवरचे सर्वात मोठे आर्थिक नुकसान होय....

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा