Saturday, November 28, 2015

विंदानुभूती - आनंददायी जीवनाची समृद्ध अनुभूती !


आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. मग जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा दैनंदिन जीवनशैलीतली व्यावहारिक रुक्षता मनात खोल रुजते. परिणामी माणूसपणच हरवून जाते. अशा स्थितीत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले विविधार्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे 'घेता'. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही...

Friday, November 20, 2015

गदिमा पर्व...काही शाळांमध्ये मराठी हा विषय 'ऑप्शनल सब्जेक्ट' झाला आहे. त्यामुळे तिथली मुले मराठी वाचन लेखनाच्या मुलभूत मराठी शालेय संस्काराला मुकतात हे कटूसत्य आहे. इतर शाळातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे 'वैकल्पिक' म्हणून बघण्याचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. त्यात भरीस भर म्हणून मराठी हा ‘स्कोअरिंग’चा विषय नसल्याची गुणात्मक आवई ‘पैकीच्या पैकी' छाप शिक्षण पद्धतीत उठवली गेल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी विषयाच्या नुकसानाचे खरे मूल्यमापन काही वर्षांनी अचूक होईल. बालभारतीच्या प्राथमिक व माध्यमिक इयत्तामधील क्रमिक पुस्तकातून मराठी साहित्याचे वाचन-लेखनाचे जे संस्कार मुलांच्या मनावर होत होते त्याला आता तडा जाऊ लागला आहे. ज्या प्रमाणे भक्तीसाहित्य म्हटले की ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग आपसूक डोळ्यापुढे उभे राहतात तद्वत कविता म्हटले की केशवसुत, गदिमा, मर्ढेकर, बालकवी डोळ्यापुढे येतात. नुसते हे कवी चक्षुसापेक्ष येतात असं नव्हे तर त्यांच्या कविता वयाच्या सत्तरीत देखील तोंडपाठ असणारी माणसं आजही भवताली सापडतात. या कवितांचं बालमनावर इतकं गारुड आहे. 'आनंदी आनंद गडे' पासून ते 'पिपात पडले मेल्या उंदीर..' पर्यंत ही काव्यमाला विविध विषयात आणि आशयात बहरत जाते, इथूनच कवितेचं वेड डोक्यात शिरते. या काव्य संस्कारातून पुढे गेलेली मुले कोणत्याही शाखेतून पदवीधर होऊन कोणत्याही प्रांतात कोणत्याही क्षेत्रात चरितार्थासाठी रुजू झाली तरी डोक्यात ठाण मांडून बसलेल्या या कविता काही केल्या हटत नाहीत. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठीचे तास आणि चाल लावून म्हटलेल्या कविता मनाच्या एका कप्प्यात प्रत्येक विद्यार्थी खास आठवणी म्हणून जतन करतो कारण या कविता त्याला आपल्याशा वाटतात. या कवितांमध्ये प्रत्येकजण आपले बालपण कायम धुंडाळत असतो. इतकी परिणामकारकता या कवितांमध्ये आहे.


Saturday, November 14, 2015

आधुनिक कवी – बा. सी. मर्ढेकरआजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे आणि उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले, पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे...'
ही कविता जरी वाचली तरी मनःचक्षुपुढे बा.सी.मर्ढेकरांचे नाव येतेच ! या कवितेच्या योगाने मर्ढेकरांविषयी रसिक वाचकांच्या मनात एका विशिष्ट प्रतिमेचे घट्ट नाते तयार झाले आहे.


Tuesday, November 10, 2015

दिवाळीतले 'अर्धे आकाश' ....दिवाळीच्या रात्री साखरझोपेत आपण जेंव्हा मऊ दुलईत झोपलेलो असतो तेंव्हा रानोमाळ कष्ट करत फिरणारया ऊसतोड कामगारांचे जत्थे थंडीत कुडकुडत असतात. अंगावर शहारे आणणारया अशा लोकांच्या दुर्दैवी अपूर्वाईची ही गाथा.. जिथे या बायकांपैकी दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले असते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय काढले जातात. कशासाठी, तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! ऊसतोड कामगारांच्या टोकदार दुःखांच्या जाणिवांची अनुभूती देणारा हा लेख अवश्य वाचा.......