मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

दिवाळीतले 'अर्धे आकाश' ....



दिवाळीच्या रात्री साखरझोपेत आपण जेंव्हा मऊ दुलईत झोपलेलो असतो तेंव्हा रानोमाळ कष्ट करत फिरणारया ऊसतोड कामगारांचे जत्थे थंडीत कुडकुडत असतात. अंगावर शहारे आणणारया अशा लोकांच्या दुर्दैवी अपूर्वाईची ही गाथा.. जिथे या बायकांपैकी दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले असते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय काढले जातात. कशासाठी, तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! ऊसतोड कामगारांच्या टोकदार दुःखांच्या जाणिवांची अनुभूती देणारा हा लेख अवश्य वाचा.......
मुकादम बिरजू पवार मला बजावून सांगत होता, 'यांना पैसे देऊ नका, फटाके देऊ नका ! इपरीत करतील अन आक्रीत होईल !' तरी देखील माझे मन राहवले नाही अन परवा दिवशी संध्याकाळी या लोकांना मी पैसे दिले अन निम्मे लोक काल पहाटे पसार झाले, मुकादमाशी ही 'पसारगोष्ट' केल्याबरोबर त्याने रात्री उशीरपर्यंत सगळयांनाच धरून आणले अन शेतावर आणून आदळलेच ! त्यातले चौघे अगदी 'टाकी फुल्ल' झाले होते. पोरासोरांना खायला दिलेल्या चीजवस्तू सोडल्या तर बाकी सगळ्याचा त्यांनी इस्कोट केला होता. तो कशात केला होता हे वेगळे लिहायचे गरज नाही. मुकादमाने भावड्याला तर सोलून काढला होता ; कारण हे डोकं त्याचंच असणार हे त्याने ओळखले होते. 'माझ्या मागे या बेण्याचे, एकट्याचेच लचांड आहे का' असं पुटपुटत बिरजू निघून गेला. कामाचं खाडं झालं म्हणून त्यानं सगळ्यांना रात्रभर तोड करायचे फर्मान जाताना सोडले. मला फार वाईट वाटलं पण आता माझाच नाईलाज झाला होता. त्यामुळे मूकदर्शक होऊन पाहण्यापलीकडे काहीच करू शकलो नाही. रात्री दहापासुन चालू झालेले त्यांचे कोयते पहाटे चारेक वाजेपर्यंत चालू होते. आपण सगळे साखरझोपेत मऊ दुलई पांघरून झोपलो होतो तेंव्हा उघड्या शिवारात, बोचरया थंडीत घोंघावणारया वारयात ते काटकुळे देह रात्रभर हात चालवत होते. काहींच्या अंगावर जीर्ण झालेले कपडे तर काहींचे तर ते देखील फाटलेलेच ! बायकासुद्धा दंड घातलेल्या लुगड्यात अन शहरातल्या बायका घालतात तसा सनकोटसारखा सदरा त्यांनी स्वेटरम्हणून घातला होता. ते सदरे देखील असेच कोणी तरी त्यांना उन्हाळ्यात दिलेले असावेत कारण ते देखील अगदी विरळ होऊन विटून गेलेले होते. शेताच्या कडेला बांधावरच त्यांनी बोरीबाभळीच्या जवळच पालं टाकली होती. त्यात त्यांची तान्हुली तशा गारव्यात झोळीत देवाच्या ओटीत सुखैनैव पडून रहावी तशी पडून होती. त्यांचे ओठ मात्र कोरडे होऊन गेलेले होते अन मुठी चांगल्याच आवळलेल्या होत्या. अधूनमधून दूध पित असल्यागत ओठ चोखणारी ती देवाघरची शापित फुले पाहून काळीज गलबलून जावं ! कोण कुठल्या मुलखातली ही माणसे लोकाच्या शिवारात आपल्या आयुष्याचे चिपाड करत फिरत राहतात ना दिवाळी ना दसरा ...बस्स बारमाही आकाशाच्या छपराखाली ते मांडतात पोटासाठीच्या संसाराचा फाटका-तुटका पसारा !.......

आदल्या साली घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दर वर्षी सलग पाच-सात महिने ऊसतोड करीत राबायचे, त्यातून जुने कर्ज फिटल्यावर पुन्हा नवे कर्ज अंगावर घेऊन गावाकडे जायचे... त्यावर गुजराण करीत पुढच्या वर्षी पुन्हा ऊसतोडीसाठी हजर व्हायचे... हेच दुष्टचक्र या सारया लोकांच्या आयुष्यात अव्याहत सुरू राहते... कर्ज फेडता-फेडता आणि ऊसतोड करता-करता त्यांच्या शरीराचेच पार ‘चिपाड’ होऊन जाते... मग अशात सण साजरा करण्याचे भान राहत नाही आणि परिस्थिती हाताबाहेर जात राहते अन ते मात्र चाकोरीत जगत राहतात. उसतोड कामगार मला तर त्या उसा सारखेच वाटतात, ज्यांना साखर कारखान्यांच्या महाकाय अजस्त्र चरकात पिळून काढले जाते अन त्याच्या लेखी चिपाड होणे हेच लिहिलेले असते. एखादाच ऊस तुलसीविवाहासाठी पुजला जातो नाही तर बाकीचे असेच वेगवेगळ्या चरकात पिळले जातात. किंबहुना ऊस तोड कामगार मात्र ऊस तोडण्याच्या नादात स्वतःच्या जिंदगीचे अक्षरशः चिपाड करून टाकतात. त्यांच्या आयुष्यातला रस नेमका कोणकोण पितो हे सांगणं मुश्कील आहे. पण डोळे झाकून बसलेला बधीर झालेला अख्खा समाज अन बोथट आयुष्य जगणारी ही माणसे देखील स्वतःसाठी रक्तपिपासू ठरतात ...

खरे तर दसरा म्हणजे यांच्या आयुष्याचे दरवर्षीचे दुर्दैवाचे सीमोल्लंघन असते. दसरा संपला की लगेच बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद. लातूर, अहमदनगर या जिल्ह्यातील ग्रामीण भाग चाळणी लावावे तसे अचूक खंगाळले जातात. गावोगावचे सावकार हे दलालासारखे काम करतात. नवी माणसे हुडकायची असली तर फक्त सावकाराकडे मुकादम जातात, गावोगावचे उंबरठे ते झिजवत नाहीत. सावकाराकडे त्याच्याकडून पैसे उचल नेलेल्या, कर्ज घेतलेल्या लोकांची यादी आ वासून वाट बघत असते. कर्जाच्या सावकारी पाशात अडकलेले जीव मुकाटपणे या तमाशातल्या कठपुतळ्या बनून राहतात.

मुकादम म्हणजे टोळीचा म्होरक्या ! टोळी म्हणजे ऊसतोड करणारया एका गटाला तोड टोळी म्हटले जाते. अशी एक टोळी एका वेळेला एकच मुकदमाच्या हाताखाली काम करते. साधारणपणे दहा ते वीस माणसे या एका टोळीत असतात. मुकादमाला साखर कारखाने उचल पैसे देतात. मुकादम ते पैसे या लोकांच्या हातात देण्याआधी सावकाराच्या बोकांडी घालतो ! सावकार कर्जाची रक्कम व्याजासकट काढून घेतो अन उरलेली रक्कम त्याच्या ऋणकोच्या हाती ठेवली जाते. त्या पसाभर पैशात त्या माणसाला वर्ष काढायचे असते, तेव्हढ्यात पोटाची खळगी भरत नाहीत मग पुन्हा कर्ज काढले जाते. मग पुन्हा मुकादम सांगेल तिथे जावं लागतं पोटावर बिरहाड घेऊन विंचवासारखं फिरावं लागतं. एका कोयत्याला साधारणपणे चाळीस ते सत्तर हजार रुपये मुकादम देतो. एक कोयता म्हणजे नवरा बायकोची एक जोडी ! एकटा सडाफटिंग जीव असल तर त्याला वीस ते पंचतीस हजार मिळतात. पण एकटा असला की पळून जाती म्हणून मुकादम शक्यतो जोडीच हुंगत फिरतो. घरात पैका अडका मायंदळ यावा म्हणून पोरासोरांची लग्ने लवकर उरकली जातात अन त्यांचा देखील कारखान्याच्या चरकासाठी बाजार मांडला जातो.

घराला कुलूप लावून, फाटका संसार ट्रकमध्ये घालून आणणारी ही माणसे ऊसतोडीच्या भागातल्या मोकळ्या जागेत झोपड्या उभारून राहतात. पहाटे चारला उठून स्वयंपाक केला जातो. भल्या सकाळीच भाजी-भाकरी खाऊन सात वाजता ते कामावर हजर होतात. साधारणत: तिघा जणांची एक स्वतंत्र ‘तोडटोळी’ असते. त्यात नवरा-बायको आणि एखाद्या मुलाचा समावेश असतो. दोघांनी कोयत्याने ऊस तोडायचा आणि बाईमाणसाने त्याची मोळी बांधायची. बैलगाडीभर ऊस तोडून झाला की, दोघा माणसांनी गाडी भरायला सुरुवात करायची आणि त्या वेळेत बाईने ऊस तोडायचा. अशी एक टोळी दिवसभरात साधारणत: तीन बैलगाड्या (तीन टन) ऊस तोडते. एक टन ऊस तोडल्यास २६० रुपये मिळतात. असा इतर टोळ्यांनी तोडलेला ऊस मिळून रोज सतरा-अठरा टनांचा ट्रक भरतो. सायंकाळी पाच वाजता काम थांबल्यावर पुरुषांनी जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येणारी ‘बांडी’ जवळच्या गावात नेऊन विकायची. त्या पैशांतून मीठ-मिरची आणायची आणि महिलांनी संध्याकाळचा स्वयंपाक शिजवायचा. पुढचे पाच-सात महिने अगदी आखिती पर्यंत हे चक्र चालू राहते.

या सर्व धबडग्यात सावकाराची चांदी होते. त्याचे पैसे घर बसले फिटतात, फक्त त्याला मुकादमाकडे अचूक खबर द्यावी लागते. चुकून कधी एखादी जोडी वा एखादा एकटा जीव पळून आला तर मात्र त्याची सगळी जोखीम सावकाराकडे असते. त्यामुळे सावकार या लोकांना पैसे देताना त्यांची अख्खी कुळं खणून काढतो, कुणाची ओळख ठेवून घेतो अन मग हातावर पैसे ठेवतो. गहाणवट म्हणून ठेवलेले किडूक मिडूक देखील हडप करावं अशा बेतानेच त्याचं व्याज अन कर्जवाटप चाललेलं असतं. मुकादमाला मिळणारया पैशात देखील काही सावकार कमिशन मागतात. त्याशिवाय नावे देत नाहीत !! आश्विन महिन्यातच मुकादम गावोगावी फिरतो, सावकाराकडे जाऊन पैसे देतो, मुदत देतो बांधी करून घेतो. टोळीची निघायची तारीख मुक्रर होते आणि ही ऊसतोडीची जगावेगळी काटेरी सफर सुरु होते..

गरजा, पैसे आणि कर्ज असे हे चक्र अव्याहत सुरु राहते. या सर्वातून जन्माला येते ती व्यसनाधीनता. दारू, जुगार, पत्ते यांचेच जास्त प्राबल्य राहते आणि उरलेसुरले किडूक मिडूक यात नष्ट होते. सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे यांच्याकडे नसतात अन त्याबातीत ही माणसे उदासीन देखील असतात. हेलपाटे कोणी किती आणि कुठे मारावे याचे गणित यांना जमत नाही. बँक असो वा पतपेढी तिथे कर्जदाराची पत महत्वाची असते, जी यांच्याकडे औषधाला देखली नसते. त्यातही अलीकडच्या काळात काही घटनांमध्ये पूर्ण उचल घेऊन अख्खी टोळीच परागंदा झाल्याचे देखील ऐकावयास मिळते तर काही ठिकाणी मुकादम लोक या मजुरांचे पैसे हडप करतात तर कधी कारखान्यालाच गंडा घालतात. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात असणारया विश्वासार्हतेवर नव्याने प्रश्नचिन्ह लागले आहे. काही ऊसतोडीचे प्रौढवयातले कामगार ज्याच्या घरी एकदोन ‘कोयते' असतात ते देखील वाढीव काम करतात. कशासाठी तर वर्षभराच्या दारुच्या नियोजनासाठी ! शारीरिक दुर्बलता, कामाचा ताण आणि कौटुंबिक ओढाताण यात या सर्वांची कुतरओढ होते अन व्यसनाधीनता ही यांना वरदान वाटू लागते.

मुकादम येऊन मुदतीची 'बांधी' करून गेला की मुक्रर झालेल्या तारखेला हे सगळे आपापल्या वस्तीतून निघतात, निघताना आपापले सामानसुमान घेऊनच बाहेर पडतात ! काहींच्या घरी तर ते देखील नसते, मग आदल्या हप्त्याच्या बाजारात जाऊन एखादी ट्रंक, ताडपत्री याची ऐनवक्ताची खरेदी होते. प्रत्येक कोयत्याची एखादी ट्रंक, ताडपत्री, ४-५ बांबु, दोनचार जर्मनची भांडीकुंडी असं सामान तयार होतं. ह्या सगळ्या धकाधकीत अश्विन सरतो आणि दिवाळीच्या आधी एकदोन हप्ते ठीकठिकाणचे बॉयलर धडाडून उठतात. कारखाने सुरु होतात अन टोळी मार्गस्थ होते. कारखान्याच्या गाड्या ट्रक, ट्रॅकटर क्वचित बैलगाड्यादेखील या वाड्यावस्त्यांवर येतात. गाड्या आल्याबरोबर त्यावर आधी जळण चढवले जाते ! शेतशिवारात कामाला जावे लागत असूनही त्यांना जळण सोबत न्यावे लागते कारण रानामाळातले लाकूड ओल्लेसुके निघू शकते अन देवाच्या दयेने पावसाची कृपा झाली तर एखाद्या जनावरांपेक्षाही वाईट हाल यांचे होतात. रक्त गोठवणारी थंडी, तंबूची फाटकी पाले अन अवतीभवती चिखल अशा अवस्थेत शरीराला ऊब देणारी शेकोटी अन पोटाला खाऊ घालणारी चूल पेटवण्यासाठी जर जळाऊ लाकडे नसतील तर होणारा त्रास हा नरकयातना नव्हे तर काय असतो ? त्यामुळे आधी जळण गाड्यांवर चढवले जाते. पाचसहा कोयत्यात अर्धे पोते ज्वारी अन तिखटमिठाच्या पुरचुंड्या एखाद्या गाठोड्यात बांधून तयार असतात ती गाठोडी वर ठेवली जातात. त्यावर मग एका ट्रंकेत घातलेला गरीबाचा संसार अन बायाबापड्यांच्या कंबरेला गोचिड गोमाशा चिटकाव्या तशी बिलगून बसलेली लेकरे अन त्यांच्या आयाबाया बसतात. मग वाढल्या वयाचे कामगार अन शेवटी तरणी पोरे बसतात. हा फाटका संसार अंगावर घेऊन अंधार कापत कारखान्याची गाडी बागायतदारांच्या शेतशिवारांचे बांध तुडवायला निघते..

वाड्या वस्त्या मागे पडताना कोण काहूर या लोकांच्या मनात माजत असेल याची कल्पना करवत नाही. आपल्या घरादाराला कुलूप लावून लोकाचे रान तुडवायला निघालेली माणसे दरसालचे अस्थायी निवासित तर नव्हेत ना, जे आपल्या व्यवस्थेने आपल्या गरजेसाठी बंदिस्त व्यवस्थेत जतन करून ठेवले आहेत. आधी कुणाचा ऊस न्यायचा आणि नंतर कुणाचा ऊस न्यायचा हे देखील मुकादमाने ठरवलेले असते, कधीकधी मागचा पुढचा क्रम बदलण्यासाठी मुकादम शेत मालकांकडून देखील पैसे उकळतात....

ज्या शेतात ऊस तोडी करायची असते तिथे टोळीची सवारी जर रात्री पोहोचली तर हाल अजून वाढतात. आधी पाल ठोकावे लागते, मग तीनदगडांची चूल मग पोटापाण्याला काही तरी करून खाऊ घालायचे अन दिवस उगवला की हातात कोयते घेऊन सपासपा हात चालवावा लागतो. भाकरी अन मिरचीचा ठेचा यावर गुजराण दिवसभर करावी लागते. दिस मावळल्यावर पुन्हा चूल पेटून उठते अन शेत शिवारातून तोडून आणलेली एखादी भाजी पातेल्यात उतरते ! आईच्या हाताने बनवलेल्या चवदार स्वयंपाकाइतकाच चवदार हा स्वयंपाक लागतो. कुठले मसाले नाहीत की पाककलेची कुठली व्यंजने नाहीत ! दिसभर राबराबून थकल्या हातांनी अन्नपूर्णेला घातलेली ती साद असते, ज्याची चव जिभेवर रेंगाळत राहते अन जठराग्नी तृप्त होतो. हळूंच पाठी टेकतात, बाया बापड्या तान्हुल्यांना झोळीतून काढून पदराआड प्यायला घेतात. जगातील कुठल्याही कृत्रिम भावनेचा लवलेश देखील नसणारे ते तान्हुले जीव आईच्या कुशीत बिलगून जातात.

रात्र अशीच निघून जाते, मध्यान रात्रीचा गारवा शरीरे जवळ करतो, दारू प्यायलेले-थकले भागले आपले दादले त्यांना त्यावेळी अगदी कापरासारखे वाटतात. एकेका पालात एकेक जोडपं असं निवून जातं अन भल्या पहाते रानात भुंकणारी कुत्री अन आपल्याच तोरयात आरवाणारे कोंबडे यांची साखरझोप मोडतात. अन दिस पुन्हा सुरु होतो अलगदच हाती कोयता येतो. उसाची लागवड जर नेटकी न होता जवळजवळ दाटीने केली असेल अन तो ऊस काटेरी असेल तर मात्र बोटे छिलून निघतात, दसकटासारखे काटे रुतून बसतात, दिसतही नाहीत अन लवकर निघत नाहीत असले हे काटे हाताचे पंजे जखडून टाकतात. पण हात थांबवून चालत नाही. मुकादम उरावर बसून काम करून घेतो. त्याच्या लेखी फक्त पैसा अन त्या पैशाची पुरेपूर वसुली या दोनच दिशा असतात. पण ही माणसे देखील गुरापेक्षा जास्त कष्ट करतात, रात्र म्हणत नाहीत की दिवस म्हणत नाहीत. एखादा नवशिक्या पोर वा त्याची बाईल लवकर थकत असेल तर त्यांना दारूचे टेकण लावणारे त्यांच्या जवळचेच असतात....

ऊसतोडीच्या टोळीवर जाणारया बायकांचे मागे एक सर्वेक्षण करण्यात आले होते जेंव्हा स्त्रीभ्रूण हत्येचा मुद्द्दा अगदी नेटाने ऐरणीवर आला होता बहुधा तेंव्हाचे हे सर्वेक्षण असावे, या नुसार यातील स्त्रियांचे गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण शहरी बायकांच्या साठपट अधिक आणि इतर ग्रामीण स्त्रियांच्या तुलनेत तीस ते चाळीस पट अधिक होते. दर दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले होते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय मोठ्या प्रमाणात आजदेखील काढले जातात. कशासाठी तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! इतक्यावरच हे थांबत नाही अनेक ठिकाणी या स्त्रिया उघड्यावर सर्व दैनंदिन क्रिया करताना कुणाच्या तरी नजरेत भरतात अन शेतशिवाराच्या बांधावर यांच्या पदराला बिनदिक्कतपणे हात घातला जातो. मग कधी चिरीमिरी देऊन तोंड बंद केले जाते तर कधी जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात तर कधी कपाळाचे कुंकू जायबंदी केले जाते ! काही अभागी स्त्रियांचे तर अशा या झोपड्यात – पालात बाळंतपणे होतात ! जिथे साधा आडोसा नसतो तिथे सुईण देखील देवता वाटू लागते तीदेखील यांच्या नशिबी नसते...

टोळ्या जिथे उतरतात तिथे अपघात होऊन मुले मरण्याचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे. कधी गाडीखाली तर रस्त्यावर या मजुरांची मुले आपला जीव सोडतात तेंव्हा यांच्या काळजाचे तुकडेतुकडे होतात, त्यासाठी कोयते चालवावे लगत नाहीत. आपल्याकडे नव्या जोडप्याची अनेक थेरं आजकाल पाहायला मिळतात त्यांनी किमान एकदा तरी ऊसतोडीची टोळी नजरेखालून घातली तरी मला खात्री आहे की आयुष्यातील अनेक भौतिक गोष्टींचा त्याग ते निश्चित करतील. मुलांना खाण्यासाठी फ्रीज भरून अन्न एकीकडे पडलेले आहे अन एकीकडे स्तनातून येणारे दुध काही दिवसातच आटून चालल्यामुळे डोळ्याचा पारा ओला होऊन वाहतो आहे असा हा दोन टोकाचा विरोधाभास आहे. कधी कधी यातील गर्भार स्त्रियाना जळणाचे काम दिले जाते, श्रम वाढतात, अकाली बाळंतपण होते. उसतोड कामावरील स्त्रियांचे मुल दगावण्याचे प्रमाण देखील इतरांच्या मानाने अगदी व्यस्त आहे. यांची मुले चालतीबोलती होईपर्यंत दगावत राहतात. पाटी पुस्तके आणि शाळा याची काय अवस्था असेल याविषयी न बोललेलं बरे. तरीही आजकाल काही कारखाना स्थळावर साखर शाळांचे उप्रकम राबवले जाताहेत. पण कारखाना स्थलाव्यतिरिक्त इतरत्र आढळणारया मुलांचे एक मोठे प्रश्नचिन्ह बधीर समाजव्यवस्थेपुढे उभे आहे पण ज्याकडे वेळ द्यायला उसंत कुणाकडेच नाही.

काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी यावर काम सुरु केले आहे. पण त्यांचा आवाका कमी पडतो अन प्रयत्न अगदी तोकडे पडतात. ही मुले केवळ नाव लिहिण्यावाचण्या इतके शिकतात. पुढे आईबाप ज्या चक्रात गुंतून पडले त्यात गुंतून जातात, त्यातून त्यांच्याच आयुष्याचा कोयता कधी होतो अन त्यांच्याच उमेदीवर तुटून पडतो हे त्यांनाच कळत नाही. वर्षातले अर्धे ते पाउण वर्ष बाहेर राहून ते गावाकडे परत जातात. इकडे गावाकडे तर सगळे तीन तेरा नऊ अठरा झालेले असतात. कारण गावातले बहुतांश लोक कर्जफेडीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अन मोठ्या पैशाच्या आमिषाने गाव सोडून टोळीबरोबर जातात. गावातील कामांना माणसे मिळणे दुरापस्त होते अन गाव मागे मागे जात राहते. कर्जाचा विळखा अधिक बळकट होतो. उचल हिशोब आणि व्याज याची आकडेमोड यांना येत नाही अन तीच जीवघेणी ठरते. त्यांनी उचललेल्या कर्जावर व्याज लावले जाते. एवढेच नव्हे, त्यांना उसाच्या वाहतुकीसाठी पुरवल्या जाणाऱ्या बैलगाड्यांचे भाडेही (मोसमाला सात हजार) त्यांच्याकडूनच वसूल केले जाते. मूळ कर्ज, त्यात नवी भर, बैलगाडीचे भाडे आणि या सगळ्यांवरचे व्याज अशी रक्कम फुगतच जाते आणि यांचे कर्ज कधीच फिटत नाही.

आयुष्य असे कर्जातच अखंड बुडून राहत असताना, दिवाळी कसली साजरी करणार? या मजुरांना ऐन दिवाळीतही सुटी नसते. रोजच्या खाण्याचेच वांधे असल्याने फटाके, नव्या कपड्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. गोडधोड करण्याची ऐपत नसते. दिवाळीसाठी मुकादम त्यांना खर्चासाठी म्हणून दोनशे रुपये देतो खरे; पण तेही पुन्हा हिशेबातून कापून घेतले जातात. सतत कंबरेत वाकून ऊसतोड केल्याने या कामगारांना पाठीचे, कंबरेचे आजार जडतात. मोसमाच्या सुरुवातीला शरीराला सवय नसल्याने ही माणसे आजारी पडतात. अशा वेळी त्यांना दवाखान्यात नेले जाते; पण त्याचा खर्चही हिशेबातून वजा केला जात असल्याने आजारी पडणेही त्यांना परवडणारे नसते. गेल्या सालचे कर्ज फेडले या खोट्या समाधानाने नवे कर्ज घेताना यांचे कोयते वापरून चिरा पडलेले तळवे नंतर नंतर थरथरू लागतात. तेंव्हा देहाचा पिंजरा झालेला असतो अन आयुष्याचे चिपाड ! आपण सगळे जण किती संवेदनशील आहोत आणि आपल्या सुखात मश्गुल आहोत ते कोणी सांगण्याची गरज नाही. भौतिक सुखाच्या दोन टोकांना असणारे हे उभे फाटलेले विषमतेचे आकाश कधी नी कसे सांधले जाणार हा प्रश्न नावापुरत्या हाडामासाच्या असणारया ऊसतोडीच्या माणसांनी डोक्यात घण हाणावा तसा ऐन दिवाळीत माझ्या मेंदूत ठोकल्यामुळे दिवाळीतले माझे अर्धे आकाश या जाणीवांनी पुरते विस्कटले गेले. माझ्यातला सामाजिक समरसतेचा लाव्हा पुरता उफाळला गेला.......

- समीर गायकवाड.

(टीप - लेखातील माहिती जालावरून साभार) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा