शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

गदिमा पर्व...



काही शाळांमध्ये मराठी हा विषय 'ऑप्शनल सब्जेक्ट' झाला आहे. त्यामुळे तिथली मुले मराठी वाचन लेखनाच्या मुलभूत मराठी शालेय संस्काराला मुकतात हे कटूसत्य आहे. इतर शाळातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे 'वैकल्पिक' म्हणून बघण्याचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. त्यात भरीस भर म्हणून मराठी हा ‘स्कोअरिंग’चा विषय नसल्याची गुणात्मक आवई ‘पैकीच्या पैकी' छाप शिक्षण पद्धतीत उठवली गेल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी विषयाच्या नुकसानाचे खरे मूल्यमापन काही वर्षांनी अचूक होईल. बालभारतीच्या प्राथमिक व माध्यमिक इयत्तामधील क्रमिक पुस्तकातून मराठी साहित्याचे वाचन-लेखनाचे जे संस्कार मुलांच्या मनावर होत होते त्याला आता तडा जाऊ लागला आहे. ज्या प्रमाणे भक्तीसाहित्य म्हटले की ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग आपसूक डोळ्यापुढे उभे राहतात तद्वत कविता म्हटले की केशवसुत, गदिमा, मर्ढेकर, बालकवी डोळ्यापुढे येतात. नुसते हे कवी चक्षुसापेक्ष येतात असं नव्हे तर त्यांच्या कविता वयाच्या सत्तरीत देखील तोंडपाठ असणारी माणसं आजही भवताली सापडतात. या कवितांचं बालमनावर इतकं गारुड आहे. 'आनंदी आनंद गडे' पासून ते 'पिपात पडले मेल्या उंदीर..' पर्यंत ही काव्यमाला विविध विषयात आणि आशयात बहरत जाते, इथूनच कवितेचं वेड डोक्यात शिरते. या काव्य संस्कारातून पुढे गेलेली मुले कोणत्याही शाखेतून पदवीधर होऊन कोणत्याही प्रांतात कोणत्याही क्षेत्रात चरितार्थासाठी रुजू झाली तरी डोक्यात ठाण मांडून बसलेल्या या कविता काही केल्या हटत नाहीत. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठीचे तास आणि चाल लावून म्हटलेल्या कविता मनाच्या एका कप्प्यात प्रत्येक विद्यार्थी खास आठवणी म्हणून जतन करतो कारण या कविता त्याला आपल्याशा वाटतात. या कवितांमध्ये प्रत्येकजण आपले बालपण कायम धुंडाळत असतो. इतकी परिणामकारकता या कवितांमध्ये आहे.

शालेय जीवनातील शिक्षणात कविता आणि कथा यांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. त्यातही प्रत्येक जण आयुष्याच्या कोणत्या तरी अनामिक वळणावर दोनेक ओळींची का होईना पण आपली स्वतःची एक कविता करतो, कुणी ती कविता आपल्या मनातच ठेवतो तर कुणी ती कविता कागदावर उतरवतो मात्र वैयक्तिक अस्तित्वापुरती ती सीमित ठेवतो. मित्र मंडळीत कविता वाचून दाखवणारे निर्मिकही असतात. क्वचित कुणी हौशी आपल्या कविता प्रकाशनासाठी पाठवतो. तर ज्याचा ध्यास – श्वासच कविता झालेला असतो तो कवितांवरच जगतो ! असं असतं कवितेचं वेड !! हे कवितेचं वेड डोक्यात खोलवर शिरण्यास कारणीभूत घटकापैकीच एक म्हणजे शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात भेटलेले कवी आणि त्यांच्या अजरामर कविता. काही कवींची एखादीच कविता आपल्याला माहिती असते. उदाहरण सांगायचे झाले तर कवी बी यांची 'गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या...' ही कविता होय. कवी बी यांची दुसरी कोणती कविता आहे हे पटकन सांगता येणार नाही पण ही कविता मात्र विसरायचे म्हटले तरी विसरता येणार नाही. कारण त्या कवितेशी असे काही भावनिक नाते जुळलेले असते की ते वयाच्या कोणत्याही टप्प्यात अगदी शाबूत असते. कवी आणि त्यांच्या अजरामर कविता यांचे बालवयात होणारे साहित्यसंस्कार सक्षमतेने झाल्याने पिढ्या घडत गेल्या आणि अजूनही काही प्रमाणात घडताहेत. अशा कवींमध्ये अग्रस्थान असलेले एक कवी गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा तथा अण्णा होत. त्यांनी लिहिलेली 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ...' ही कविता आजही कुठेही वाचली वा ऐकली वा पाहिली तरी मन हरखून जाते. हे एक भावगीत आहे. पण वयोमानानुसार त्याचे अर्थ वेगेवगळे लागत जातात. गदिमांचे आणि त्यांच्या कवितांचे मराठी साहित्यात अढळ स्थान आहे.


'ज्ञानियाचा वा तुक्यातचा, तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे !'
गदिमांचं भावार्थ प्रकटन इतकं ताकदीचं होतं. मुक्तहस्ते शब्दकुंचला फिरवून गीत चित्र ते सहज साकारत असत. मराठी मातीशी इमान राखून तिचे ऋण आपल्या भावभावनांतून व्यक्त करणारे गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर होत. त्यांनी लिहिलेल्या ‘गीत रामायणा’मुळे महाराष्ट्राचे वाल्मिकी अशीही त्यांची ओळख आहे. नभोवाणीमुळे गीत रामायणाची शहरातल्या उंची दिवाणखान्यापासून ते गावोगावच्या पारांपर्यंत अनेक वेळा पारायणे झाली आहेत हे वेगळे सांगायला नको. गदिमा ऐकले वा वाचले नाहीत असं सांगणारा मराठी रसिक विरळाच. गदिमांचे काव्य चित्रपटगीते, बालगीते, लावण्या, भक्तिगीते, देशभक्तिपर गीते, सवाल-जबाब आणि अन्य गीते अशा वेगवेगळ्या स्वरूपात ढोबळमानाने विभागता येते. २०१४-१५ हे गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणाचे हीरकमहोत्सवी वर्ष होते. संस्कृत गीतरामायण ध्वनिस्वरूपातही उपलब्ध आहे.

गदिमा बालवयापासून चांगलेच लक्षात आहेत ते बालभारतीच्या पुस्तकातील त्यांच्या "'एका तळ्यात होती बदके पिलें सुरेख ...." या प्रसिद्ध कवितेमुळे. अत्यंत करूण रसाने भरलेली ही सोपी आणि अर्थपूर्ण कविता बालवयात वेगळेच संस्कार करून जाते. या कवितेमुळे काव्यवाचनाचे वेड लागले. या कवितेच्या गोड चालीमुळे मराठी गाण्यांची आवड निर्माण झाली ती आजतागायत कायम आहे असं सांगणारे रसिक अजूनही भेटतात.

एका तळ्यांत होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यातसवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक

आशा भोसलेंच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात भावगीतांच्या कार्यक्रमात रेडीओवरती कित्येक वर्षे हे गाणं ऐकले आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत भीमपलास रागात संगीतबद्ध केले होते. ही एक अत्यंत सुंदर आशयाची कविता आहे आणि गोड आवाजात मधुर संगीतात सजलेले अवीट गाणेही आहे. मराठी सुगम संगीतातील हे एक कोरीव शब्दलेणे आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. या गीताच्या तीन आवृत्या झाल्या. गदिमांचे हे गीत वेगवेगळ्या प्रसिध्द संगीतकारांच्या चालींवर वेगवेगळ्या प्रसिध्द गायक–गायिकांनी गायलं आहे. हे एक बालगीत असल्याचा भासही यात दडला आहे. त्यामुळे बालगीताच्या चालीत असणारी बालीशता, हळुवारपणा आणि अल्लड निरागसपणा यात डोकवते. त्यास कसलीही बाधा पोहोचू न देता सुंदर हृद्य आशय अगदी नजाकतीने मांडला आहे. सुरुवातीला हे केवळ बदकाच्या पिलाचं गीत असावं असं यातल्या मुखड्यावरून वाटते. पण यात एक व्यथा आहे, एक भळभळणारे दुःख आहे जे अनेकांच्या मनात तसेच अव्यक्त स्वरुपात तसेच राहिलेले असते त्याला त्यांनी यात वाट करून दिलेली आहे.

आटपाट नगरामध्ये एक टुमदार स्वच्छ असे पाण्याचे तळे आहे. या तळ्यात बदक आणि त्याची सुरेख पिले विहार करत असतात. या सर्व पिलांमध्ये एक थोडेसे अजागळ वाटणारे किंचित कुरूप दिसणारे पिलू देखील आहे. या पिल्लाला दुसरी पिले त्यांच्या संगे खेळावयास घेत नाहीत. कवितेमध्ये ही ओळ अगदी सहजसुंदर शब्दांकित झालीय परिणामी कवितेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. हे पिलू कुरूप तर होतेच आणि त्याला बाकीची पिले त्यांच्यासवे घेत नसल्याने ते एकटेच वेगळे तरंगताना, विहरताना दिसत असे. त्याच्या वेगळेपणामुळे लोक देखील त्याच्या कडे अंगुलीनिर्देश करतात. त्याची टवाळी करतात. त्याला त्याच्या रूपावरून टोमणे मारले जातात. इतर पिलांमध्ये न राहता थोडेसे वेगळे पडलेल्या या पिलाला लोक 'कुरूप' असं संबोधून त्याची निर्भत्सना करतात.

आपल्या रूपावरून आपल्याला जग दुषणे देते, आपल्याला लोक हसतात इतेकेच नव्हे तर आपण ज्या तळ्यात राहतो तिथली आपली इतर भावंडे - पिले देखील आपल्याला जवळ करत नाहीत याचं त्या पिलाला भारी दुःख वाटते. ते गरीब भोळे पिलू दुःखी कष्टी होऊन रडू लागते. ते अगदी एकाकी पडते. त्याची दखल कोणीच घेत नाही याचे त्याला राहून राहून दुःख वाटू लागते. आपल्या भावना आपण सांगायच्या तरी कोणापाशी असा त्याला प्रश्न पडतो. आपण कोणाजवळ जरी मन मोकळे करायला गेलो तरी आपल्याला टोचूनच बोलले जाते, आपल्या वेदनेची कुणालाच का तमा नसावी या विचाराने ते अधिक दुःखी होई. आपल्यावर जो तो धाक दाखवतो आणि आपले म्हणणे ऐकून घेत नाही, या विचाराने ते अगदी हिरमुसून जाते.

आपल्या रुपामुळे आपल्याला सगळे जण हसतात या जाणीवेने व्याकुळ झालेले ते पिलू अश्रू ढाळत बसू लागते. ते या सर्वांपासून दूर जाते. ते अन्न पाणी वर्ज्य करून केवळ दुःखात जीवन घालवू लागते. एके दिवशी चोरून पाण्यात पाहताना त्याची नजर स्वतःच्या रूपाच्या प्रतिबिंबावर पडते. पाण्यातले आपले प्रतिबिंब पाहून त्याचे सगळे दुःख, त्याच्या सगळ्या वेदना कुठच्या कुठे पळून जातात. कारण त्याला त्या प्रतिबिंबावरून उमगते की ते काही इतर पिलांसारखे साधेसुधे बदक नसून तो एक राजहंस आहे ! तो लाखात एक असणारा राजहंस आहे याची जाणीव होता क्षणी त्याचे जीवन आत्मविश्वासाने भरून जाते. त्याच्या मनातील जगाचे भय निघून जाते आणि त्याच्या जीवनात समाधान, आनंद याची नांदी होते.

प्रत्येक व्यक्ती जो पर्यंत आपल्या अंतरंगात डोकावून स्वतःचा खरा शोध घेत नाही तोवर त्याला त्याची खरी ओळख होत नाही. आपण आपल्या बाह्य रूपावर जास्त भर देतो, जग आपल्याला काय म्हणते याचाच आपण विचार करत बसतो आणि स्वतःचे खरे अस्तित्व गमावून बसतो. आपल्यामध्ये अनेक खुबी असतात, अनेक सदगुण असतात, विविध कला असतात मात्र आपण त्याचा विकास होऊ देत नाही. मुळात आपण स्वतःशीच नीट सामोरे जात नाही, आपलीच आपल्याला खरी ओळख होत नाही. त्यामुळे आपल्याला जग जसे मुद्रांकीत करते, जसे जग वर्णिते तसेच आपण स्वतःला समजत जातो. यातून बाहेर पडून स्वतःची खरी ओळख निर्माण करायची असेल तर आपल्या अस्तित्वाचा आणि स्वत्वाच्या सत्वाचा शोध घेणे अनिवार्य आहे. इतका सुंदर संदेश गदिमांच्या या कवितेत आहे.

या अनुषंगाने पुलं गादिमांबद्दल म्हणतात की, "महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत. इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्यार माणसाचे उपकार फार मोठे असतात. 'Song has the longest life' अशी एक म्हण आहे. एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला? माणसाच्या मनाचे लहानमोठेपण, रागद्वेष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्याo कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते. हजारो लोक एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते. माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली, चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विद्वज्जन परिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ? मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली, त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो."

गदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'माडगुळे' या गावात गेले. गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते, वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरवातीला 'ब्रम्हचारी', 'ब्रँडीची बाटली'सारख्या काही चित्रपटात सहायक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या. 'भक्त दामाजी' (१९४२) व 'पहिला पाळणा' (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली, 'लोकशाहीर रामजोशी'(१९४७) या चित्रपटापासून खर्याप अर्थाने 'कथा, पटकथा, संवाद, गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले.मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता', 'निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.

मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी', 'वंदे मातरम, 'पुढचे पाऊल', 'गुळाचा गणपती', 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे', 'ऊनपाऊस', 'सुवासिनी', 'जगाच्या पाठीवर', 'प्रपंच', 'मुंबईचा जावई', 'देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे. त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. प्राचीन मराठी काव्याला अर्वाचीन काळात गदिमांनी अधिक समृद्ध केले. संतकाव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांचा स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील मनाला भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून गदिमांची गीते निर्माण झाली.

गदिमांच्या गीतांजलीत 'गोरी गोरी पान', 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख', 'मामाच्या गावाला जाऊ या' सारखी अगदी लहानांच्या तोंडी असणार्या गीतापासून ते अगदी गणपतीत हक्काचे स्थान मिळवून असलेल्या 'नाच रे मोरा' सारख्या बालगीतांचा समावेश होतो. त्यांची चित्रपट गीते म्हटली तर 'एक धागा सुखाचा', 'जग हे बंदीशाळा', 'या चिमण्यांनो परत फिरा रे', 'राजहंस सांगतो', 'घन घन माला नभी दाटल्या', 'बुगडी माझी सांडली ग', 'फड सांभाळ तुर्यारला आला', 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'विठ्ठला तू वेडा कुंभार' ही गाणी लागलीच नजरेत भरतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला. व्ही.शांताराम यांचा 'दो आंखे बारह हाथ', 'नवरंग','गूंज ऊठी शहनाई', 'तूफान और दिया' हे चित्रपट गदिमांचेच ! अगदी गुरुदत्तच्या 'प्यासा' ची मूळ कथा असो, राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चनचा 'ब्लॅक', मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून उतरलेली होती. हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे, सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमां बद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्या पेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडतं कारण गदिमा म्हटंल की ते मला "मॉं की गोदी मे" सारख वाटत!.

मराठी साहित्यात गदिमांनी कवी, कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला. आरंभी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम केले. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे जाऊन 'सुगंधी-वीणा', 'जोगिया', 'चार संगीतिका', 'गीतरामायण', 'काव्यकथा', 'चैत्रबन', 'गीतगोपाल', 'गीतसौभद्र' अशी काव्यनिर्मिती त्यांच्या हातून झाली. गदिमांच्या निधनानंतर अलिकडच्या काळात 'वैशाखी', 'पूरिया', 'अजून गदिमा', 'नाच रे मोरा' हे काव्य-चित्रपटगीत - बालगीत संग्रह संकलित करण्यात आले आहेत.

याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङमय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. 'लपलेले ओघ', 'बांधावरल्या बाभळी', 'कृष्णाची करंगळी', 'बोलका शंख', 'वेग आणि इतर कथा', 'थोरली पाती', 'तुपाचा नंदादीप', 'चंदनी उदबत्ती', 'भाताचे फूल', 'सोने आणि माती', 'तीन चित्रकथा', 'कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)', 'तीळ आणि तांदूळ' सारखे लघुकथा संग्रह, 'वाटेवरल्या सावल्या', 'मंतरलेले दिवस' हे आत्मचरित्रपर लिखाण, 'दे टाळी ग घे टाळी', 'मिनी', 'शशांक मंजिरी', 'नाच रे मोरा' सारखे बालवाङमय, 'तुलसी रामायण' (गद्य भाषांतर) व 'शब्दरंजन', 'अक्षर', 'धरती' सारख्या मासिकांचे संपादन, 'आकाशाची फळे', 'ऊभे धागे आडवे धागे' सारख्या कादंबर्यास, 'युध्दाच्या सावल्या', 'परचक्र' सारखी नाटके. अशी जवळजवळ ३७ पुस्तके गदिमांच्या नावावर आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ही कादंबरीच अशा १५७ पटकथा गदिमांनी लिहील्या त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर २०० पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील!.

गदिमांनी स्चातंत्रलढयातही भाग घेतला होता. खूप मोठया कुटुंबाची जवाबदारी, त्यात अठराविश्वे दारिद्र्य यामुळे गदिमांनी स्वातंत्र लढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने, पोवाडे लिहून जनजागृती केली. सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.

गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला. ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. विधान परिषदेत जेंव्हा त्यांचे असायचे तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार विधान परिषदेत आवर्जुन येत. गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती तरीही त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व पक्षीयांचा समावेश होता. अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत, शरदरावजी पवार असोत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे. स.गो.बर्वे, सुशीलकुमार शिंदे, राम नाईक, मनोहर जोशी सर्वच त्यांच्या परिवाराचेच सदस्य होते.

गदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मीकी' ही पदवी गीतरामायण या महाकाव्यामुळे मिळाली. 'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले. श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला. रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे. गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे. गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत,कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले 'गीतगोपालही' गीतरामयणाच्या तोडीस तोड आहे.

पुरस्काराच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची. गदिमांना भारत सरकारने 'पद्मश्री' (१९६९) हा किताब बहाल केला.ते 'संगीत नाटक अकादमी' व 'विष्णुदास भावे सुवर्णपदक' या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते.१९६९ ला ग्वाल्हेरला झालेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे' अध्यक्षपद,१९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे' ते अध्यक्ष होते.त्यांच्या अनेक चित्रपटांना कथा, पटकथा, संवाद,गीते लेखनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले,अनेक पुस्तकांना राज्य व क्रेंद्र शासनाचे पुरस्कार लाभले.

१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस. कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह ! इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. स्त्रीपुरुष, वृध्द, राजकारणी, कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते, अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत. म्हणूनच मराठी माणसाच्या ह्रदयात जिथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तिथे गदिमांचेही स्थान आहे.

साभार लेखन संदर्भ – पटकथा गदिमांच्या जन्माची : सुमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा