मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

प्रिय जॉर्ज फर्नांडीस ..तर जॉर्ज अखेर तुम्ही गेलातच.
आता सगळीकडे तुम्हाला घाऊक श्रद्धांजल्या वाहिल्या जातील.
त्यात ते सुद्धा सामील असतील ज्यांनी तुम्हाला शहिदांचा लुटारू म्हटलं होतं !
जॉर्ज तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असं त्यांना का वाटलं असावं ?
सैनिकांच्या शवपेट्यांत तुम्ही पैसा खाल्ला असा बेफाम आरोप तुमच्यावर झाला होता.
मरतानाही तुम्हाला त्याच्या वेदना जाणवल्या का हो जॉर्ज ?
तुम्ही तर तेंव्हाच मरण पावला होतात जेंव्हा तुमची तत्वे मरून गेली होती, किंबहुना समाजवादयांचे वारसदार म्हणवल्या गेल्या बाजारू नवसमाजवादयांनीच त्याची हत्या केली होती.
जॉर्ज तुम्ही त्यांना आवरलं का नाही कधी ?

शनिवार, २६ जानेवारी, २०१९

मोदी, रॅमाफोसा आणि प्रजासत्ताक दिन.


आपला देश आज ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्रपती मॅटामेला सिरील रॅमाफोसा हे प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य दिव्य सोहळयाचे यंदाचे मुख्य अतिथी आहेत. परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०१८ रोजी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये आयोजित केलेल्या १३ व्या जी २० देशांच्या बैठकीत रॅमाफोसांना प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख अतिथीपदाचे निमंत्रण दिले. भारत सरकार यंदाचं वर्ष महात्मा गांधीजींची १५० वी जयंतीवर्ष म्हणून साजरं करणार असल्याने रॅमाफोसा यांना निमंत्रित केलं गेल्याची पार्श्वभूमी विशद केली गेलीय. गांधीजींचे आफ्रिकेशी असणारे गहिरे नाते आणि तिथला प्रेरणादायी सहवास इतिहास सर्वश्रुत आहे, त्यास उजाळा देण्यासाठी सरकारने रॅमाफोसांना बोलवल्याचं म्हटलं जातंय. मोदीजींनी यावर वक्तव्य केलं होतं की रॅमाफोसांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक दृढ होतील. या सर्व बाबी पाहू जाता कुणासही असं वाटेल की गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून सध्याचे सरकार मार्गक्रमण करतेय आणि त्याच भावनेने सर्व धोरणे राबवतेय. पण वास्तव वेगळंच आहे.

रविवार, २० जानेवारी, २०१९

'अक्षर' कहाणी...


‘वपुर्झा’मध्ये व. पु, काळे लिहितात की, “एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमीनीवरच आहोत.“

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

हॅलो..


आपण एखाद्याचं हृदय घायाळ करायचं, त्याच्या काळजाला जखमा द्यायच्या, नंतर त्याच्यासाठी एकाकीपणे झुरत राहायचं, त्याची क्षमा मागण्यासाठी जगत रहायचं, त्याच्या आवाजासाठी तडफडत राहायचं, एका क्षमायाचनेसाठी हजारो फोन कॉल्स करायचे पण पलीकडून कुणीच आपला आवाज ऐकण्यासाठी नसणं या सारखा दैवदुर्विलास कोणताच नाही.
याच थीमवर एक प्रसिद्ध काव्य रचले गेले आणि त्याचं रुपांतर गीतात झाल्यावर त्याला २०१७ मध्ये 'सॉन्ग ऑफ द इअर'चे ग्रामी ऍवार्ड मिळाले !
जिने काव्य रचले तिनेच ते गायले. ऍडेल तिचे नाव.
माझी आवडती गायिका आणि आवडते गाणे.
ऍडेलच्या 'हॅलो' या कवितेचा मराठीतील स्वैर अनुवाद खाली दिलाय.

बुधवार, ९ जानेवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - करुणा


तुमच्या दुःखांची मी भग्न आरास मांडतो
लोक त्याचीही वाहवा करतात,
कुणीएक सुस्कारेही सोडतात
पण जिवंत तुम्ही जळताना राजरोस चितेवर
लोक ढुंकूनही बघत नाहीत,
'रंडी तो थी कुत्ते की मौत मर गयी' म्हणतात
तरीही मी जिवंत कलेवरांच्या राशी उलथत राहतो,
तुम्ही नित्य नवे पत्ते पुरवत राहता.
गावगल्ल्या, वस्त्या, मेट्रोपॉलिटन शहरे,
पाण्याच्या पाईपलाईनपासून ते
फ्लायओव्हरच्या पुलाखाली गलितगात्र होऊन
ओघळलेल्या स्तनांना फाटक्या वस्त्रांनी झाकत
काळवंडलेल्या चेहऱ्याने तुम्ही पडून असता.

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

नयनतारा सहगल यांच्या निमित्ताने....

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 
मन उचंबळून यावं वा अंतःकरण भरून यावं असं काही साहित्य संमेलनांतून घडत नसतं. तिथं जे होतं तो एक 'इव्हेंट' असतो, ज्यात असते कमालीची कृत्रिमता, अनावश्यक औपचारिकता आणि आढ्यताखोर ज्ञानप्रदर्शनाची अहमहमिका ! यातूनही अध्यक्षीय भाषण, स्वागत भाषण, समारोपाचे भाषण अशी तीनचार मनोगते कधी कधी वेगळी वाटतात अन्यथा त्यांचीही एक ठाशीव छापील चौकटबंद आवृत्ती दरसाली पुनरुद्धृत होत असते. ही भाषणे देखील बहुत करून रटाळ असतात हे मान्य करायला हवे. साहित्य संमेलनात नावीन्याचा पुरता अभाव आढळतो हे देखील खरे. लिखितमुद्रित माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमे आहेत हे या संस्थेने या डिजिटल काळात अजूनही पुरते स्वीकारलेलं नाही.