बुधवार, ९ जानेवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - करुणा


तुमच्या दुःखांची मी भग्न आरास मांडतो
लोक त्याचीही वाहवा करतात,
कुणीएक सुस्कारेही सोडतात
पण जिवंत तुम्ही जळताना राजरोस चितेवर
लोक ढुंकूनही बघत नाहीत,
'रंडी तो थी कुत्ते की मौत मर गयी' म्हणतात
तरीही मी जिवंत कलेवरांच्या राशी उलथत राहतो,
तुम्ही नित्य नवे पत्ते पुरवत राहता.
गावगल्ल्या, वस्त्या, मेट्रोपॉलिटन शहरे,
पाण्याच्या पाईपलाईनपासून ते
फ्लायओव्हरच्या पुलाखाली गलितगात्र होऊन
ओघळलेल्या स्तनांना फाटक्या वस्त्रांनी झाकत
काळवंडलेल्या चेहऱ्याने तुम्ही पडून असता.

कुत्र्यांचे संभोग फक्त भादव्यात असतात पण तुमची सुटका नसते ,
न्हाण आलेलं असो, नसो
वा न्हाण जाऊन डोक्याची चांदी झालेली असो
फाटक्या पथारीवर वासनेच्या गर्दुल्ल्याशी
इच्छा असो नसो बारमाही शय्यासोबत करावीच लागते.
दात पडलेल्या, केस विस्कटलेल्या अन
अख्खा देह बेडसोअर्स झालेल्या
छिन्न विच्छिन्न अवस्थेत पोहोचल्यावर यमदुतांचा पुरुषार्थ जागा होतो.

तुम्ही अखेरची रात्र त्यांच्याशी शेअर करता
आणि हातपाय घासून जबडा वेडावाकडा करून मरून जाता.
तुमची डेडबॉडी कोणी क्लेम करत नाही,
काही दिवस शवागरातल्या पेट्यात तुम्ही पडून राहता.
जितेपणी न मिळता, मेल्यावर मिळालेला हा एकमेव एअरकंडीशन्ड रहिवास.
मग काही दिवसात तुमचं क्रियाकर्म होतं.
तुम्ही मेलेल्या जागेवर आता कुणी तरी दुसरीच पण
तुमच्यासारखीच जख्ख म्हातारी वेश्या येऊन पडलेली असते....
ईश्वर, अल्लाह, ईसामसी सर्वांना प्रार्थना करत असते,
लवकर मरण यावे म्हणून अहोरात्र काहीतरी पुटपुटत असते....

अलीकडच्या काळात मी सुद्धा निर्मिकाची करुणा भाकतो,
खरंच वेश्यांना तरुणपणीच मरण द्यावे,
जमल्यास जन्मल्याबरोबर मारावे
न जमल्यास शक्य तेव्हढ्या लवकर मारून बरणीबंद अवस्थेत जतन करावे.
तेही त्या विश्वनिहंत्यास जमत नसेल तर त्याला कचकून शिवी देतो
त्यांच्या जागी तुझ्या आया बहिणी तिथं बसवून बघ म्हणतो !
जरठवृद्ध झाल्यावर त्या कशा मरतात हे थिजलेल्या डोळ्याने बघ अन
गोठलेल्या संवेदनांनी काळजाच्या ठिकऱ्या उडवणारा अनुभव घे
मग तुला काय वाटते ते बघ नंतरच तुझ्या सदसदविवेकबुद्धीने काय तो निर्णय घे.....
तो हतबल होऊन ऐकत असतो.
त्याचा तरी काय दोष हे गरळ त्यानेच तर ओकलेलं आहे,
इथे करुणेला थारा नाही !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा