शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुल्क राज आनंद - भूमिका घेऊन जगलेला लेखक!


ज्या व्यक्ती स्वतःमध्ये आणि समाजामध्ये सच्चेपणाने नितळतेने डोकावू शकतात त्यांचं साहित्य अधिक कसदार असतं..
"आजही लिखाण माझ्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. दररोज लिहिल्याशिवाय मला राहवत नाही. खरं तर 1927 मध्ये मला पहिल्यांदा मानसिक ताणामुळे खचायला झालं तेव्हा व्हिएन्नामध्ये सिग्मंड फ्रॉइड यांची भेट घेतली. भेटींचा सिलसिला जारी राहिला.

त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीने मला मोठा दिलासा मिळाला. पण नंतरच्या काळात आलेल्या मानसिक ताणांच्या दोन झटक्यांवर मात करण्याची ताकद मात्र फक्त लिखाणातूनच मिळाली. प्रत्येक आघात समयी मी एक कादंबरी लिहिली आणि त्यामुळे माझी कमकुवत झालेली मज्जासंस्था पुन्हा सावरली.

माझी मैत्रीण आणि कार्यकर्त्या गेरट्रूड मिट्शेल यांना 1936 मध्ये ना*झींनी ठार मारले तेव्हा मी 'एक्रॉस द ब्लॅक वॉटर्स' ही कादंबरी लिहिली. माझ्या वैयक्तिक आयुष्यात, काही स्त्रियांवर मी मनापासून प्रेम केले आहे आणि त्या मरण पावल्या तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेलो. खरं तर प्रत्येक मानसिक ताणाचा धक्का त्यांच्या गमावण्यानेच सुरू झाला.

पहिला झटका तेव्हा आला जेव्हा मला समजले की माझं पहिलं प्रेम आयरीन, जी आयरिश होती आणि आयरिश राष्ट्रीय चळवळीत काम करत होती; ती 1927 मध्ये मारली गेली. उरलेले दोन धक्केही अशाच दु:खांच्या पाठोपाठ आले.

मी फक्त प्रेमसंबंधातच नाही, तर लग्नाच्या बाबतीतही खूप त्रास सहन केला आहे. माझं पहिलं लग्न केथलीन व्हॅन गेल्डरसोबत टिकू शकलं नाही. दुसरं लग्न अॅनेल डी’सिल्वासोबत होणार होतं, पण तिने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आणि तेही मोडलं. नंतर मी नर्तकी शिरीन वजीफदारसोबत लग्न केलं.

आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, यूकेमध्ये आलेल्या पहिल्या मानसिक ताणाच्या धक्क्यातून मी नुकताच सावरला होतो. भारतात परतलो आणि साबरमती आश्रमात गांधीजींना भेटायला गेलो, तिथे राहण्याची परवानगी मिळेल का अशी त्यांना विनंती केली. बराच विचार केल्यानंतर त्यांनी मला तिथे राहण्याची परवानगी दिली, पण तीन अटींची शपथ घेण्याच्या बदल्यात. खरं तर मी तीन व्रतं घेतली - शौचालय साफ करण्याचं, कधीही मद्यपान न करण्याचं आणि स्त्रियांकडे वासनेने कधीही न पाहण्याचं.

सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण नंतर कुणीतरी गांधीजींना सांगितलं की, आश्रमात राहणाऱ्या टायपिस्टशी मी फ्लर्ट करतोय; ती एक अमेरिकन स्त्री होती, घटस्फोटित, आणि आपल्या लहान मुलासह तिथे राहत होती. त्या आरोपात काहीही तथ्य नव्हतं, तरीही मला आश्रम सोडावा लागला. कारण स्त्रियांच्या बदनामीस तिथे शून्य थारा होता.

तरीही, त्या आश्रमातला तो अल्पकालीन सहवास आणि महात्मा गांधींसोबत झालेला संवाद यांनी माझ्या जीवनशैलीवर, माझ्या विचारसरणीवर आणि लोकांशी असलेल्या माझ्या नात्यावर मोठा परिणाम केला. त्यांनी मला देशभर फिरायला, गावकऱ्यांशी संवाद साधायला आणि स्वतः प्रत्यक्ष वास्तव पाहायला सांगितलं होतं. पुढे जाऊन माझ्या लेखनात याचं प्रतिबिंब उमटत गेलं!"

विख्यात लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, मुल्क राज आनंद यांचे हे मनोगत अतिशय बोलके आणि पारदर्शी आहे. स्वतःकडे कसे पाहिले पाहिजे याचा एक चांगला वास्तूपाठ यात दिसतो.

मुल्क राज आनंद हे भारतातील त्या थोर व्यक्तींपैकी एक होते ज्यांनी विदेशी जगताला दाखवून दिलं की, एक भारतीयही त्यांच्या (इंग्रजी) भाषेत त्यांच्याइतकंच उत्तम लेखन करू शकतो.

इंग्रजी भाषा त्यांच्यासाठी कधीही टॅबू अथवा न्यूनगंडही नव्हती. बीबीसीने आपल्या एका डॉक्युमेंटरीत भारताचे चार्ल्स डिकन्स असा त्यांचा गौरव केलाय. भारतातल्या इंग्रजी लेखनाचे जनक म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

आपल्या 99 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 100 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. जगातील 22 भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालं आणि सर्वत्र त्यांची प्रशंसा झाली. लिहायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ प्रत्येक वर्षी त्यांची एखादी तरी पुस्तकं छापली गेली.

आर.के. नारायण, सज्जाद जहीर, अहमद अली, राजा राव, ई.एम. फॉर्स्टर, हेन्री मिलर, जॉर्ज ऑरवेल अशा जगप्रसिद्ध लेखकांशी त्यांची मैत्री होती. ते प्रगतिशील लेखक संघाचे संस्थापक सदस्य होते. 1935 मध्ये लंडनमध्ये भारतीय प्रगतिशील लेखकांचा पहिला ग्रुप तयार झाला तेव्हा त्यांची फार मोठी भूमिका होती.

लंडनमधल्या त्यांच्या एका खोलीत या लेखकांच्या नियमित बैठका होत्या. तिथे ते ठरवत की आपल्या लेखनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कशी मदत करता येईल. प्रगतिशील लेखक संघाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा तयार करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

12 डिसेंबर 1905 रोजी अविभाजित भारतातल्या पेशावरमध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीचं शिक्षण खालसा कॉलेज (अमृतसर) आणि पंजाब विद्यापीठात झालं. नंतर लंडनला केंब्रिज विद्यापीठातून 1929 मध्ये तत्त्वज्ञानात पीएच.डी. मिळवली. पीएच.डी. नंतर जिनिव्हामध्ये ‘लीग ऑफ नेशन्स’च्या बौद्धिक सहकार्य शाळेत त्यांनी अध्यापन केलं.

दुसऱ्या महायुद्धात, लंडनमध्ये बीबीसीसाठी पटकथा लेखक आणि प्रसारक म्हणून काम केलं (त्याच वेळी जॉर्ज ऑरवेलही तिथे होते). भारताचा स्वातंत्र्यलढा जोरात होता तेव्हा 1946 मध्ये नव्या कल्पना घेऊन ते भारतात परतले.

1948 ते 1966 पर्यंत भारतातल्या अनेक विद्यापीठांत त्यांनी अध्यापन केलं, जोडीने इंग्रजी पत्रकारिताही केली. लंडनमध्ये अभ्यास करत असतानाच त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबऱ्या असलेल्या दोन छापल्या गेल्या – 1935 मध्ये प्रकाशित झालेली ‘अनटचेबल’ (अछूत) आणि त्याच्या पुढच्या वर्षी प्रकाशित झालेली ‘कुली’.

या दोन्ही कादंबऱ्यांत ते थेट भारतातल्या जाती-व्यवस्था आणि वर्ग-व्यवस्थेशी भिडले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या इतर महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये ‘टू लीव्स अँड अ बड’, ‘द व्हिलेज’, ‘अक्रॉस द ब्लॅक वॉटर्स’, ‘द स्वॉर्ड अँड द सिकल’, ‘द प्रायव्हेट लाइफ ऑफ अन इंडियन प्रिन्स’ यांचा समावेश आहे.

त्यांनी ‘सेव्हन एजेस ऑफ मॅन’ (मानवाच्या सात वय) या नावाने सात खंडांत आत्मचरित्रही लिहिलं. सेव्हन समर्स (बालपण), मॉर्निंग फेस (किशोरवय), कन्फेशन ऑफ अ लवर (तरुणपण), द बबल (प्रौढावस्था) हे त्यातले काही खंड होत.

1946 मध्ये आलेलं ‘एपॉलॉजी फॉर हिरोइझम’ हे आत्मचरित्र त्यांनी पंडित नेहरूंना समर्पित केलं होतं. ‘अनटचेबल’ ही कादंबरी छापणे त्यांच्यासाठी खूप कठीण गेलं. जातीचा विषय असल्यामुळे अनेक प्रकाशकांनी नकार दिला. शेवटी ई.एम. फॉर्स्टर यांच्या मदतीने ती छापली गेली आणि छापताक्षणी जगभर गाजली. 22 भाषांत भाषांतर झालं. खुद्द महात्मा गांधींनीही तिची प्रशंसा केली.

प्रस्तावनेत फॉर्स्टर म्हणतात, “ही कादंबरी शब्दांचा दिखावा न करता थेट वाचकांच्या अंत:करणात शिरते आणि मानवी मनाचे नितळ शुद्धीकरण करते. ज्या भारतीयाने अस्पृश्यांचे जीवन जवळून पाहिलं आहे त्यालाच हे लेखन शक्य होईल.”

या कादंबरीनंतरच बीबीसीने त्यांना भारताचा चार्ल्स डिकन्स म्हटलेलं. त्यांच्या 'कुली’ या कादंबरीमध्ये मजुरांच्या दुःखाची कहाणी आहे. ‘टू लीव्स अँड अ बड’ (१९३७) ही चहाच्या मळ्यातल्या एका पंजाबी मजुराची आणि त्याच्या इंग्रज मालकाच्या शोषणाची कहाणी आहे. ही कादंबरी भारताबरोबर ब्रिटन-अमेरिकेतही एकाच वेळी छापली गेली आणि सगळीकडे कौतुक झालं. ख्वाजा अहमद अब्बासांना इतकी आवडली की त्यांनी 1956 मध्ये यावर ‘राही’ नावाची फिल्म बनवली (पण ती चालली नाही).

1940 ची ‘अक्रॉस द ब्लॅक वॉटर्स’ ही दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या भारतीय सैनिकांवरची कादंबरी आहे. त्यांनी नेहमी आव्हानात्मक विषय निवडले आणि त्यावर खोल संशोधन केलं. ते क्रांतिकारी आणि समाजवादी विचारांचे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतले पात्र अन्यायाविरुद्ध लढताना दिसतात. जॉर्ज ऑरवेल त्यांचे मोठे चाहते होते.

त्यांचे साहित्य इंग्रजीत लिहिलेलं असलं तरी त्यांचा पिंड नेहमी भारतीयच राहिला. इंग्रजी साहित्यात सगळ्यात आधी पंजाबी-हिंदी शब्द भरपूर वापरणारे ते पहिले लेखक होत. प्रगतिशील लेखक संघाशी त्यांचं आयुष्यभर घट्ट नातं होतं.

स्पेनच्या गृहयुद्धात त्यांनी पाहिलं की युरोपातले प्रगतिशील लेखक फॅसिझमविरुद्ध बंदुकीही घेऊन लढतायत. त्याच प्रेरणेने भारतातही असा संघर्ष उभा करायचा त्यांनी ठामपणे प्रयत्न केला.

त्यांचे जवळचे मित्र सज्जाद जहीर म्हणतात, “आनंद फार उत्साही आणि झपाटलेले होते. त्यांची लेखणी जितक्या वेगाने चालायची त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांची जीभ चालायची. एखादं काम ठरवलं की जमीन-आकाश एक करून ते पूर्ण करायचे. केवळ लिहिणंच नव्हे तर आपल्या पुस्तकांचं छपाई-प्रकाशन-प्रचार यातही त्यांची तितकीच मेहनत असायची.”

जातिव्यवस्था- अस्पृश्यतेने त्यांना खूप वेदना व्हायच्या. दलितांसाठी आरक्षणाचे ते ठाम समर्थक होते. शेवटपर्यंत प्रगतिशील-जनवादी विचारांवर ठाम राहिले. नव्या लेखकांना ते सांगायचे, “लेखनाने समाजाला पुढे न्या, त्याला नवं दिशा द्या.”

तत्त्वज्ञान, इतिहास, भारतीय कला-संस्कृती-पुरातत्त्वशास्त्राचे ते मोठे जाणकार होते. 1965 ते 1970 पर्यंत ललित कला अकादमीचे ते अध्यक्ष होते. ‘मार्ग’ नावाची कलापत्रिका त्यांनी काढली. मार्क्स-एंगेल्स, टागोर, नेहरू, कामसूत्र अशा विविध विषयांवरही त्यांनी विस्तृत लेखन केलंय.

1972 मध्ये त्यांच्या ‘मॉर्निंग फेस’ या आत्मचरित्रपर लेखनाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, 1967 मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण, आणि विश्व शांति परिषदेकडून आंतरराष्ट्रीय शांति पुरस्कार मिळाला. इतकी मोठी ख्याती कीर्ती असूनही ते ते साधं जीवन जगले. आयुष्यातील शेवटची वर्षे त्यांनी महाराष्ट्रातल्या खंडाळ्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात घालवली. 28 सप्टेंबर 2004 ला वयाच्या 99 व्या वर्षी या थोर भारतीय लेखकाने जगाचा निरोप घेतला.

मुल्क म्हणजे देश, वतन, इलाखा! मुल्क राज आनंद त्यांच्या नावाला जागले. त्यांचे साहित्य इंग्रजी भाषेत असले तरी त्यांची नाळ भारतीय भूमीसोबतच राहिली. इथली माणसं,इथल्या व्यथा आणि इथल्या सामाजिक जाणिवा हेच त्यांचे आशय विषय राहिले. भारतीय समाजाची चिकित्सा जितक्या परखडपणे त्यांनी केलीय तितक्याच कठोरपणे आणि तटस्थतेने त्यांनी स्वतःविषयी लिहिलंय! 

व्रतस्थ वृत्ती, दांडगा व्यासंग, अभ्यासू मांडणी, चिकित्सक भूमिका हे गुण आजकाल एकाच लेखकाच्या ठायी आढळत नाहीत आणि आढळलेच तर तो लेखक स्वमग्नतेच्या कोषात इतका गुरफटून गेलेला असतो की त्याच्या सामाजिक जाणिवा पुरत्या बोथट झालेल्या असतात. या पार्श्वभूमीवर मुल्कराज आनंद यांची उत्तुंगता नजरेत भरते. 

लेखक ज्या कालखंडात जगतो, वावरतो, वाढतो त्या समकालाचे आकलन तो कसे करतो ही बाब इथे महत्वाची ठरते. आपल्या अंगावरील झूल अधिक चमकदार व्हावी म्हणून तो मुका अंधळा होऊन राहतो की आपल्या प्रतिमेची पर्वा न करता त्याच्या वर्तमानाचा कभिन्न पहाड लेखणीने फोडत राहतो याचे मूल्यांकन नक्कीच होत असते, भलेही लेखकाच्या वर्तमानात त्याचे मोजमाप झाले नाही तरी कालांतराने त्याच्या भूमिकेचा, मांडणीचा दृष्टिकोनाचा गौरव होतोच!             

जो लेखक भंवतालाशी प्रतारणा करुन निव्वळ गुलछ्बू लेखन करत असतो तो नकळत स्वतःची आणि त्याच्या वाचकांचीही फसवणूक करत असतो. आणि जे भूमिका घेऊन जगतात, लिहितात त्यांचे अस्तित्व त्यांच्या नंतरही काळाच्या पटलावर ठळक राहते. मुल्क राज आनंद यांच्या करकीर्दीकडे पाहिल्यावर याचा प्रत्यय येतो.      

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा