बुकशेल्फ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बुकशेल्फ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ मे, २०२५

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

रविवार, ११ मे, २०२५

हॅरी ट्रूमन, अणूबॉम्ब आणि विनाशकाची प्रतिमा!

राष्ट्राध्यक्ष ट्रूमन  

हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रूमन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक विनाशकारी निर्णय त्यांनी घेतला, ज्यामुळे युद्ध संपले पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

ट्रूमन यांच्या डेस्कवर एक पाटी असायची, ज्यावर "The Buck Stops Here" लिहिले होते. याचा अर्थ असा की अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे. हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला. वास्तवात ते एक साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म मिसूरीतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांनी लहानपणी शेतात काम केलेलं, औपचारिक कॉलेज शिक्षणही ते पूर्ण करू शकले नाहीत, तरीही ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले.

1947 मध्ये त्यांनी ट्रूमन डॉक्ट्रिन जाहीर केले, जे कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने इतर देशांना मदत करावी, असा विचार मांडते. यामुळे शीतयुद्धाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रूमन आपल्या मिसूरीतील घरी परतले आणि सामान्य जीवन जगले. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, आणि त्यांनी स्वतः आपली पेन्शन मिळावी यासाठी कायदा मंजूर करवला (!)

बुधवार, ७ मे, २०२५

'बांगलादेश ए ब्रूटल बर्थ' आणि व्हायरल फोटोचे सत्य!

हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे.

सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!

याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 - 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

इरेना सेंडलर - स्त्रिया जेव्हा विकारग्रस्त होतील..


युरोपमधील काही देशांत ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यातला संघर्ष नाझी विचारांच्या लोकांपायी शिगेला पोहोचला तेव्हाची ही गोष्ट. ही गोष्ट एका असामान्य स्त्रीची आहे जिने शब्दश: प्राणाची बाजी लावून तब्बल 2500 ज्यू मुलांची सुटका केली. ती स्वतः कॅथलिक ख्रिश्चन होती आणि त्या काळादरम्यान अनेक ख्रिश्चन्स ज्यू लोकांना आपला परम शत्रू मानत होते तरीही तिने जीव धोक्यात घालून ही मुले वाचवली. ही कथा आहे एका विलक्षण मायाळू आणि प्रेमळ नर्सची आणि तिच्यातल्या वैश्विक मातृत्वाची! त्या जिगरबाज स्त्रीचे नाव इरेना सेंडलर! तिच्या आयुष्यावर टिलर मॅझिओ हिने ‘इरेना'ज चिल्ड्रेन’ हे विश्वविख्यात चरित्र लिहिलेय.

इरेना सेंडलर एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची धनी होती, जिच्या धैर्य आणि मानवतेच्या कथा आजही प्रेरणा देतात. ती पोलंडमधील एक सामाजिक कार्यकर्ती आणि नर्स होती. तिने दुसऱ्या महायुद्धा दरम्यान वार्सा गेट्टोमधून सुमारे 2500 ज्यू मुलांना वाचवले. 'झेगोटा' या पोलिश भूमिगत संघटनेच्या बाल विभागाची ती प्रमुख होती. तिने बनावट कागदपत्रे तयार करून आणि मुलांना गुप्तपणे गेट्टोबाहेर काढून त्यांना ख्रिश्चन कुटुंबे, अनाथाश्रम तसेच कॉन्व्हेंटमध्ये आश्रय दिला. ती मुलांना रुग्णवाहिकेपासून ते बटाट्याच्या गोण्यांमध्ये लपवायची. त्यांची सुटका करताना ती कुठेही जाऊन धडकायची, अगदी गटारातून देखील मुले बाहेर काढायची!

रविवार, २७ एप्रिल, २०२५

जगण्यासाठीचं धावणं – रनिंग द रिफ्ट


काही लोकांना युद्धाची फार खुमखुमी असते. सध्या आपल्याकडे याची लाट आलीय. असाच कंड आफ्रिका खंडातील रवांडा देशातील दोन जमातीत होता. मुळात हा देश अनेक नागरी समस्यांनी गांजलेला नि अनेक भौतिक प्रश्नांनी ग्रासलेला. स्वकमाईमधून दोन वेळच्या अन्नाला महाग असणारी अर्धी लोकसंख्या. रवांडामध्ये हुतू आणि तुत्सी या दोन वांशिक गटातील संघर्षाला नरसंहाराचे स्वरूप लाभले आणि हा देश रसातळाला गेला. तब्बल अकरा लाख लोकांना प्राण गमवावे लागले. जगातला सर्वात गरीब देश म्हणून त्याची नोंद झाली. त्या संघर्षावर आधारित एक सुंदर कादंबरी आहे. त्याविषयीची ही ब्लॉगपोस्ट.

2010 साली अल्गॉनक्विन बुक्सद्वारे प्रकाशित झालेली रनिंग द रिफ्ट ‘Running the Rift’ ही नाओमी बेनारॉन यांची एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी कादंबरी. या कादंबरीत रवांडामधील हुतू - तुत्सी यांच्यातला दीर्घ संघर्ष आणि 1990 च्या दशकातील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर एका तरुण तुत्सी मुलाच्या जीवनाचा प्रवास रेखाटलाय. ही कादंबरी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी असल्याने तिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पेन-बेलवेदर पुरस्कार मिळालाय.

कादंबरीचा नायक जीन पॅट्रिक नकुबा हा एक तुत्सी मुलगा आहे, जो रवांडाच्या डोंगराळ भागात वाढलाय. त्याच्या अंगी धावण्याची नैसर्गिक प्रतिभा आहे. रवांडाचा पहिला ऑलिम्पिक ट्रॅक पदक विजेता बनण्याचे त्याचे स्वप्न असते. या स्वप्नामुळे त्याला स्वतःला आणि विवेकवादी लोकांना हुतू - तुत्सी तणावामुळे होणाऱ्या क्रूर हिंसाचारापासून मुक्ती मिळेल, अशी त्याची आशा असते. कथेचा पहिला भाग जीन पॅट्रिकच्या बालपणावर, त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या धावण्याच्या उत्कटतेवर केंद्रित आहे. पण, जसजसा हुतू - तुत्सी संघर्ष वाढत जातो, तसतशी त्याची स्वप्ने आणि जीवन धोक्यात येतात.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचे खरे अस्तित्व – एमा लॅझरस!



ही नोंद आहे एमा लॅझरस या कवयित्री विषयीची. ही नोंद आहे एका विदारक विरोधाभासाची! ही नोंद आहे बदलत्या विखारी भूमिकांची!अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या जगप्रसिद्ध शिल्पाखाली चबुतऱ्यावर एक कविता कोरली आहे. ही नोंद तिच्याविषयीही आहे.

एमा लॅझरस ही अमेरिकन कवयित्री होती, त्याचबरोबर ती ज्यू कार्यकर्ती होती. त्या काळातील ज्यू व्यक्तींना निर्वासितासारखं राहावं लागे. 1849 ते 1887 हा एमाचा कालखंड. तिचा जन्म न्यूयॉर्कमधला. तिचे पणजोबा जर्मनीहून तिथे आलेले. तिचे बाकी नातलग पूर्वज पोर्तुगालमधून अमेरिकेत पोटार्थी म्हणून आलेले. हे सगळे ज्यू होते.

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

सेंट ऑफ सॅफ्रॉन आणि द ओडिसी ऑफ काश्मिरी पंडित – विस्थापिकरण


'सेंट ऑफ सॅफ्रॉन - थ्री जनरेशन्स ऑफ ऍन इराणियन फॅमिली' हे विख्यात लेखिका रूही शफी यांचे आत्मचरित्र आहे, जे ईराणी महिलांच्या तीन पिढ्यातील जीवनसंघर्षावर आणि परिवर्तनावर केंद्रित आहे.

रुहींची आजी, आई आणि त्या स्वतः असा कालपट आहे. यात पाहिली पिढी ग्रामीण जीवनात राहणारी, दुसरी शहरीकरणाच्या प्रभावाखाली, आणि तिसरी राजकीय अस्थिरतेमुळे निर्वासित होणारी अशी वाटचाल दाखवलीय.

इराणचा समाजिक इतिहास कसा मध्ययुगीन काळाकडे वाटचाल करत गेलाय याचे उल्लेख उदाहरणासह येतात. 1920 ते 1980 या काळातील इराणच्या राजकीय आणि धार्मिक बदलांचा इराणी महिलांच्या जीवनावरील परिणाम आणि प्रभाव यांचे वेधक चित्रण यात आहे. लेखिकेने तिच्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक इतिहासाशी जोडून धार्मिक विचारधारेचा पगडा आणि सामाजिक नियंत्रणाची ताकद दाखवलीय.

गोष्ट दोन प्रतिभावंतांमधील विलक्षण साम्याची!


काहींच्या आयुष्यात एक विलक्षण साम्य असणाऱ्या घटना घडतात. गोष्ट आहे जागतिक कीर्तीचे अमेरिकन संशोधक बेंजामिन फ्रँकलिन आणि मराठी लेखिका मालती बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांची.
मालती बेडेकर यांचं लग्नाआधीचं नाव बाळूताई खरे. मराठीमधलं काही विलक्षण दिशादर्शक लेखन त्यांनी केलंय. त्या आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या लेखनाची एक कथा आहे! विभावरी शिरुरकर या नावाने त्यांनी त्या काळातलं अत्यंत जहाल असं लेखन केलं. त्यांनी लिहिलं खरं मात्र ते प्रकाशित कोण करणार? तर त्यांच्या मोठ्या भगिनी कृष्णा मोटे या यादेखील लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे पती ह. वि. मोटे यांनी हे लेखन प्रसिद्ध केलं. 'कळ्यांचे निश्वास' हे त्या कथासंग्रहाचे नाव. जरठ विवाह, बालविधवा,स्त्रीच्या कामवासना, प्रणयभावना, लग्नाचा बाजार, स्त्रीमनाची कोंडी, परित्यक्ता आणि विधवा विवाह यावर त्यांनी अत्यंत टोकदार कटाक्ष टाकले होते. या लेखनाची इतकी चर्चा झाली की ही विभावरी शिरूरकर कोण आहे याचा छडा लावला पाहिजे अशा चर्चा वर्तमानपत्रात झडू लागल्या.

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

द्वेषाची अखेर विनाशात होते - सिव्हिल पीस!


मणिपूरमधील एका मैती तरुणीचा एक व्हिडीओ अलिकडेच खूप व्हायरल झालाय ज्यामध्ये ती स्वतःच्या राहत्या घरी परतल्यानंतर सारं काही राख झाल्याचं पाहून रडते आणि कायमचं विस्थापित होणार असल्याचं सांगत घराच्या अवशेषांतून बाहेर पडते. हा व्हिडीओ पाहून जागतिक किर्तीचे आफ्रिकन लेखक चिनुआ अचेबे यांच्या ‘सिव्हिल पीस‘ या कथेची आठवण झाली.

सिव्हिल पीस Civil Peace ही कथा जोनाथन इव्हेग्बू नावाच्या नायजेरियन माणसाच्या जीवनावर केंद्रित आहे. जो नायजेरियन गृहयुद्धातून (1967-1970) आपल्या कुटुंबासह सुखरूप बाहेर पडतो. युद्धात त्याच्या हाती पाच अमूल्य गोष्टी गवसल्या असं तो मानतो — त्याचं स्वतःचं जीवन, पत्नी मारियाचं जिवंत असणं आणि त्याच्या चारपैकी तिघा मुलांचं उर्वरित आयुष्य. युद्ध संपल्यानंतर जोनाथन आपले घर शोधण्यासाठी एनुगू या त्याच्या मूळ गावी परततो, जिथे त्याला त्याचं घर सापडतं. काहीशा पडझड झालेल्या अवस्थेतलं आणि काही अंशी जाळपोळ झालेलं घर पाहून त्याला आनंदही होतो आणि दुःखही होतं. तो आनंदाने म्हणतो, “ईश्वर कधीच अडचणी निर्माण करत नाही, त्याने मला धीर दिला!"

द फीस्ट ऑफ द गोट – व्यक्त होण्याला किंमत आहे!

  


जवळपास प्रत्येक भारतीयास क्रिकेट आणि वेस्टइंडिज ठाऊक असते. वेस्टइंडिज हा एकल अस्तित्व असणारा देश नसून स्वायत्त बेटांचा समूह आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण पूर्वेस अगदी वरच्या बाजूने त्रिनिदाद अँड टोबॅगो पासून सुरुवात केली तर ग्रेनाडा, बार्बाडोस, डॉमिनिका, प्युर्टोरिको, हैती आणि अखेरीस जमैका यांची रचना इंग्रजीमधील डी या वर्णक्षरासारखी दिसते, यातलेच एक बेट आहे डॉमिनिकन रिपब्लिक, याची सीमा हैतीला लागून आहे. या डॉमिनिकन रिपब्लिक या छोट्याशा देशात राफाएल ट्रूहियो हा अत्यंत क्रूर हुकूमशहा होऊन गेला. १९३४ ते १९६१ या सत्तावीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने क्रूरतेचे कळस गाठले, अनन्वित अत्याचार केले. त्याच्याशी या पोस्टचा जवळचा संदर्भ आहे.