मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..



अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.
 
बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.

थिरुनल्लूर करूणाकरण यांच्या कवितेत या तलावाकाठी राहणाऱ्या आणि परस्परांवर अतिशय निरलस प्रेम करणाऱ्या गरीब प्रेमी युगुलाची गोष्ट आहे. रानी आणि नानू यांची ही काव्यकथा. 1956 साली 'केरळ कौमुदी' या काव्यसंग्रहात ती प्रकाशित झाली आणि मल्याळी कवितेत एक नवा अध्याय लिहिला गेला.

1957 पासून ही कविता शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट आहे, तिच्यावर अनेकांनी पीएचडी देखील केलीय. तिच्यावर नृत्यनाटिका बसवल्या गेल्यात. मल्याळी साहित्य रसिकास ही कविता ठाऊक नाही असे होत नाही, बालकवी आणि औदुंबर यांचे समीकरण असेच होते.

वास्तवात थिरु करुणाकरन यांच्या कवितेतील नानू म्हणजे ते स्वतःच होते, रानी आणि नानू दोघेही गरीब श्रमिक. त्यांच्या आयुष्यातील स्वप्ने प्रत्यक्षात उतरावीत यासाठी त्यांचा संघर्ष जारी असतो मात्र हाती काहीच लागत नसते, दमण आणि अन्याय दोघांना अप्रिय! दोघे त्यासाठी संघर्ष करतात मात्र वैयक्तिक जीवनातील प्रेम त्यात हरवून जाते. वेळ मिळेल तेव्हा आपलं हरवलेलं प्रेम शोधायला हे दोघे अष्टमुडीच्या विस्तीर्ण शांतगंभीर जलाशयाच्या काठी येऊन बसतात नि आपली व्यथा विलक्षण काव्यात्मक शैलीत मांडत राहतात.

बालकवी ज्याप्रमाणे मनाला नितळ शांततेचा डोह शोधून देणारा प्रवाह म्हणून तलावाचा प्रतीकात्मक वापर करतात तसेच थिरुंच्या कवितेत घडते. त्यांच्या कवितेत तलावाचे स्वतंत्र अस्तित्व आहे, तो मानसिक आधार बनून समोर येतो. छोट्या छोट्या पंक्तींद्वारे कविता गहिरी होते, ती शोकात्म आहे मात्र तिने आशा सोडलेली नाही हे महत्वाचे.

अष्टमुडी म्हणजे आठ भुजा असलेला. या जलाशयाला आठ कालवे आहेत जे थेट समुद्राला जाऊन भिडतात. अष्टमुडी तलाव, पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या मधोमध आहे. नारळाच्या झाडांनी नटलेले किनारे, शांत पाणी आणि हिरवीगार परिसर यामुळे तो पर्यटकांसाठी स्वर्ग आहे. इतरांना तो स्वर्ग वाटतो त्याबद्दल थिरुंना हायसे वाटते, त्यांच्यासाठी मात्र ती अशी शांतनिरव जागा आहे की जिथे भूमिपुत्र आपले गाऱ्हाणे मांडतो. केरळच्या विख्यात बॅकवॉटर्सचा हा इलाखा. कोल्लम ते अलेप्पी हा बॅकवॉटर प्रवास अविस्मरणीय, स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारा! असे असूनही थिरुनल्लूर त्याला आनंदमार्ग म्हणून न पाहता सहृदयी मित्र म्हणून पाहतात.

यंदाच्या वर्षी या कवितेची सत्तरी अनेक काव्यरसिकांनी आणि कलावंतांनी हौसेने साजरी केलीय. मल्याळी पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि नातू या चारही पिढ्यांनी रानी कवितेला प्रेमाचे स्थान दिलेय. केरळ सरकारनेही थिरुनल्लूर यांचा आदराने सन्मान केलाय.

1914 मध्ये बालकवींच्या कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि औदुंबर कविता रसिकांच्या हृदयात स्थिरावली. या कवितेचा नेमका लेखनकाळ ज्ञात नाही मात्र 1907 ते 1913 च्या दरम्यान ती लिहिली गेलीय असे मानले जाते. 1990 साली बालकवींची जन्मशताब्दी यथातथा साजरी झाली होती. असेही साहित्यिकांना हल्ली कोण विचारतो, नि किती साहित्यिकांना या अवमूल्यनाची खंत आहे. असो. विषय भरकटेल म्हणून यावर अधिक बोलणे नलगे.

एखाद्या लेखकाच्या गद्य लेखनात एखाद्या भौगोलिक स्थळाचे, गावाचे, परिसराचे , प्रदेशाचे वर्णन बऱ्याचदा येते कारण तो त्याच्या आस्थेचा भाग असतो. मात्र कवितेत हे फारसे घडत नाही कारण भौगोलिक घटकांची काव्यात्मक दखल घेणे हे नैसर्गिक कौशल्यप्रतिभेशिवाय आणि त्या घटकाविषयी आत्मीयता असल्याशिवाय नेमके जमत नाही. थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या बऱ्याच कवितेत अष्टमुडी तलाव समोर येतो.

त्रिवेंद्रम मधील प्राध्यापकी पेशामधून निवृत्त झाल्यानंतर ते पेरिनाड या आपल्या जन्मगावी परतले. अष्टमुडीच्या काठावर हे छोटेसे गाव आहे. अत्यंत शांततेने त्यांनी आपल्या आयुष्याचे अखेरचे पर्व व्यतित केले. एका उच्चवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या थिरुनल्लूरनी आपल्या साहित्यात कष्टकरी श्रमिकांच्या व्यथा मांडल्या, साहजिकच ते केरळच्या साम्यवादी चळवळीशी जोडले गेले.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे दफन केले गेले. 5 जुलै 2006 रोजी त्यांचे देहावसान झाले, त्यादिवशी अष्टमुडी काठचे पक्षी मौन होते आणि जलप्रवाह नेहमीपेक्षा स्थिरगंभीर होता. तब्बल दोन दशकापासून त्यांच्या स्मरणार्थ अष्टमुडीच्या विस्तीर्ण काठावर थिरुनल्लूर काव्योत्सव साजरा होतो. खूप कवींच्या लेखी हे भाग्य येते की, त्यांची साहित्यिक ओळख वगळता भौगोलिक स्थळांच्या माध्यमातूनही ते ओळखले जातात. कुसुमाग्रजांची जयंती स्मरणदिवस साजरा होतो मात्र गोदाकाठाशी त्यांचे काव्यात्मक नाते दरवर्षी जतन केल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. बा.भ. बोरकरांच्या बाबतीतही असेच चित्र दिसते. सद्यकाळातील मराठी कवींच्या बाबतीत अपवाद वगळता काही बोलण्याची सोय राहिली नाही असे क्लेशदायक चित्र दिसते.

कवीला आपल्या भूभागाची तीव्र ओढ राहिली नाही की आताची गावेशहरे रुक्ष झालीयत काही कळायला मार्ग नाही. आपण जिथे जन्मतो वाढतो तो भूप्रदेश आपल्या कवितेत ओजस्वीपणे का झळकत नाही असा प्रश्नच कुणाला पडत नसेल का? की हा प्रश्नच कालबाह्य झालाय? की कवीदेखील व्यावहारिक झाल्याने त्याला आता या गोष्टींची दखल घ्यावीशी वाटत नाही? परस्परांची पाठ खाजवून आपल्या नावाभवती वलय निर्माण करणे अगदी चीप वाटावे इतके सहजसोपे झाले असल्याने हे घटक गौण ठरले असतील का? एतद्देशीय मराठी काव्यरसिकाला तरी कुठे याचे काही देणेघेणे राहिलेय अशी शंकाही मनात येते. या पार्श्वभूमीवर थिरुनल्लुर करुणाकरण आणि अष्टमुडी यांचे नाते किती ठळक आणि उजाळ वाटतेय ना!

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा