हरिद्वारमध्ये आल्यावर स्वामीजींनी पाहिले की, साधू आणि पंडे धर्माचा खरा उपदेश न करता लोकांना पाखंड शिकवून फसवत होते. समाज सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याऐवजी अज्ञानाच्या खोल खाईत पडत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुंभ मेळ्यातील दृश्यांनी त्यांना अंतर्मनातून खोल वेदना झाल्या. त्यांनी जाणले की, लोक दुःखातून मुक्त होण्याऐवजी अशा कृत्यांमुळे दुःखाच्या भवसागरात बुडून जाताहेत.
परिणामी स्वामीजींनी या पाखंडी साधू-पंड्यांचा भांडाफोड करण्याचा निश्चय केला. आपल्या छोट्याशा निवासस्थानासमोर त्यांनी एक ध्वज रोवला, ज्यावर लिहिले होते - ‘पाखंड-खण्डिनी पताका’, म्हणजेच पाखंड नाश करणारा ध्वज. त्यानंतर त्यांनी आपल्या विचारांचे भाषणरूपात प्रचार करणे सुरू केले.
त्या काळापर्यंत लोकांनी कोणत्याही संन्याशाच्या मुखातून मूर्तीपूजेचा विरोध, श्राद्धांची निरर्थकता, अवतारांवरील अविश्वास किंवा पुराणे ही कल्पित ग्रंथ आहेत अशा गोष्टी कधीच ऐकल्या नव्हत्या. त्यामुळे लोक या सर्व गोष्टी विस्मयाने पाहत होते. काही जण याला ‘कलियुगाचे लक्षण’ म्हणत, तर काही तथाकथित पंडित स्वामीजींना ‘नास्तिक’ म्हणू लागले.
काही कथित पंडित आणि साधूंनी त्यांच्या विरोधात भाषणे सुरू केली, अपमानास्पद शब्द वापरले, पण स्वामीजी आपल्या कार्यात अढळ राहिले. अनेक विद्वान वादासाठी त्यांच्या ठिकाणी आले, परंतु स्वामीजींच्या तर्कशुद्ध व स्पष्ट विचारांपुढे निरुत्तर होऊन परत गेले.
स्वामीजी नेहमी सांगत की, “हर की पौडीवर स्नान केल्याने पाप धुतले जात नाहीत. वेदांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करा, चांगली कर्मे करा; त्यातूनच खरे सुख आणि मोक्ष मिळेल. सद्ग्रंथांचे वाचन आणि सत्यशील धर्मात्म्यांची संगत हेच खरे तीर्थ आहे.”
जन्मावर आधारित जातिव्यवस्था, अस्पृश्यता, बालविवाह, बहुपत्नीत्व, सती प्रथा, मृतांसाठी श्राद्ध, पशुबळी, मानवबळी, परदा पद्धत, देवदासी पद्धत, वेश्याव्यवसाय, मृतदेह पुरणे किंवा नदीत फेकणे, मृत मुलांना पुरणे, समुद्र प्रवास बंदीचा निषेध आदी प्रथांचा त्यांनी विरोध केला.
शुद्धी चळवळ, दलित मुक्ती, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, सर्व शिक्षा अभियान, महिला सक्षमीकरण, महिलांचा शिक्षणाचा अधिकार, वेदांचा अभ्यास करण्याचा प्रत्येकाचा अधिकार, गुरुकुल शिक्षण, पहिल्या हिंदू अनाथाश्रमाची स्थापना, पहिल्या गोठ्याची स्थापना, स्वदेशी चळवळ, संस्कृत ऐवजी हिंदी भाषेला पाठिंबा आदी घटकांचे त्यांनी समर्थन केले.
त्यांनी लिहिलेल्या 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथाने समाजाला अध्यात्म आणि ईश्वरवादाची ओळख करून दिली. शरीरावर नियंत्रण असणारे ते एक शक्तिशाली योगी होते आणि ते प्राणायामावर विशेष भर देत. सामाजिक पुनर्रचनेत सर्व जाती आणि महिलांच्या सहभागाचा त्यांनी पुरस्कार केला. महिला सक्षमीकरण हे त्यांचे महत्वाचे ध्येय होते.
जोधपुरच्या महाराजांवर त्यांनी अतिशय खरमरीत टीका केली आणि त्यानंतर एका आठवड्यात विषबाधेने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी कोण होते हे न्यायालयात अखेरपर्यन्त सिद्ध झाले नाही.
हे सर्व आज कशासाठी लिहिलेय असा काहींना प्रश्न पडू शकतो म्हणून चार ओळी जास्तीच्या लिहिल्याच पाहिजेत.
हरियाणामधल्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापिठात एक विलक्षण संतापजनक आणि तितकीच लाजिरवाणी घटना घडलीय. दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामात कुसुर करत असल्याचा संशय घेत, त्यांच्या मासिक पाळीचा पुरावा मागत गुप्तांगांचे फोटो देण्यास भाग पाडले गेले. त्यांच्या सॅनिटरी पॅडचे फोटो देण्यास भाग पाडले.
26 ऑक्टोबर रोजी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष हे विद्यापीठाला भेट देणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या काही तास आधी हा प्रकार घडला. त्यादिवशी कामावर येण्यासाठी चार स्वच्छता कर्मचारी महिलांना उशीर झाला. यामुळे पर्यवेक्षक वितेंदर कुमार आणि विनोद हुडा यांनी उशीरा येण्याचे कारण विचारले.
उशीरा आलेल्या महिलांनी नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र पर्यवेक्षकांनी दबाव टाकल्यानंतर त्यांनी मासिक पाळी आल्याचे सांगितले. यावरही पर्यवेक्षकांचे समाधान झाले नाही, सदर महिला खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. मासिक पाळी आली असल्यास त्याचा पुरावा काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
पर्यवेक्षकांनी मासिक पाळीचा पुरावा मागण्यासाठी त्यांना गुप्तांगाचे आणि सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्यास सांगितले. जेव्हा आम्ही हे करण्यास नकार दिला, तेव्हा आम्हाला शिवीगाळ करण्यात आली आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. पर्यवेक्षकांनी दबाव टाकल्यानंतर आणि सहाय्यक निबंधक श्याम सुंदर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर चार पैकी दोन महिलांनी या सूचनांचे पालन केले आणि शौचालयात फोटो काढले.
या घटनेला विद्यार्थ्यांनी उचलून धरल्यावर स्थानिक पोलिसांनी दयानंद विद्यापिठाच्या तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
या विद्यापिठात काम करणाऱ्या व्यक्तींनाच जर दयानंद सरस्वती उमगले नसतील, त्यांचे विचार कळले नसतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना ते काय ज्ञान देणार आहेत? आड मोकळे होत चाललेत आणि पोहरे तर ऑलरेडी रितेच झाले आहेत! असो..
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा