1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!
तो स्वतःविषयी नेहमी वाढवून चढवून बढाईखोर भाषणे करत असे! (आजही या गुणाचे महाभाग जगभरात आहेत, पुनश्च असो!) तो स्वतःला “स्कॉटलंडचा शेवटचा राजा” म्हणवून घ्यायचा. उच्चपदस्थ व्यक्तींशी बोलताना आपली जवळीक आहे हे दाखवण्यासाठी थट्टामस्करीचे वर्तन करायचा! पश्चिम जगात त्याच्याबद्दलचा तिरस्कार वंशद्वेषाने रंगलेला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी एकदा त्याचे वर्णन “अशिक्षित माकड” असे केले होते.
तरीही जगभरात त्याची दखल घेतली जाते कारण विसाव्या शतकात स्वतःच्या लोकप्रियतेच्या राजकारणाचा प्रयोग करणारा तो पहिला नेता होता. त्याने युगांडन जनमानसात स्वतःचं चित्र, साधा माणूस आणि लोकांशी थेट बोलणारा इसम असं रंगवलं होतं! त्याच्या आधीचे परकीय सत्ताधीश आणि त्यांच्या षड्यंत्रांना न जुमानणारा देशभक्त म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं. त्याने, आशियाई समुदायाची ओळख, युगांडाची पिछेहाट करणारे कृतघ्न शत्रूसम लोक अशी करून ठेवली होती. खेरीज या लोकांपासून मुक्ती मिळवायची असेल तर काय केले पाहिजे याचे विलक्षण नौटंकीबाज उपाय मांडले. जसे की, या लोकांना देशाबाहेर काढणे, त्यांची मालमत्ता हडप करणे! त्याच्या या अमानुष योजना पाहून, त्याच्या समर्थकांना वाटले की तो आपला देश मजबूत करतोय! पण असं घडलं नाही. त्याच्या आठ वर्षांच्या राजवटीत त्याने युगांडाला अधिक गरीब, हिंसक आणि विधीशून्य बनवलं.
अमीन हा नेहमीच सामाजिक एकतेच्या काठावरचा माणूस होता, त्याचं वर्तन आणि विचारधारा कधीही सर्वंकष नव्हती. तो कक्वा या छोट्या वंशगटात जन्मला होता, ज्याला इतर युगांडियन लोक तुच्छ मानत. स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठीतो आधी बॉक्सिंग चॅम्पियन झाला आणि नंतर वसाहती सैन्यात सैनिक म्हणून रुजू झाला, जेणेकरुन आपण कसे देशहितासाठी दक्ष आहोत हे भविष्यात त्याला सहज सांगता यावे!
एकदा इंग्रज अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये, एका इंग्रज वेटरने त्याला सेवा देण्यास नकार दिला, तेव्हा अमीनने त्याच्या बखोटास धरून बारमधून बाहेर ओढत नेलं, अशी गोष्ट त्याच्याविषयी प्रसृत करण्यात आली. वास्तवात या वदंतेची शहानिशा कधीही झाली नव्हती. मात्र ही गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक म्हणून त्याने सदैव चर्चेत ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर तो हळूहळू सैन्यप्रमुख झाला आणि 1971 मध्ये त्याने बंड करून सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवादास बळ देणारा नेता निवडून आला म्हणून लोकांनी रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा केला.
त्याच्या पुढच्याच वर्षी, म्हणजे 1972 मध्ये, अमीनने अचानक घोषणा केली की, 'युगांडामध्ये राहणाऱ्या दक्षिण आशियाई वंशाच्या सुमारे पन्नास हजार लोकांना नव्वद दिवसांच्या आत युगांडा देश सोडावा लागेल.' त्याची ही निर्दयी योजना अनाकलनीय पद्धतीने लोकप्रिय ठरली. अमीनने आपले स्थान बळकट करण्यासाठी चीप लोकानुनय करत, अगदी चतुराईने वांशिक असंतोषाची ठिणगी पेटती ठेवली. आशियाई लोकांविरोधात त्याने स्टेटमेंट दिले की, 'या परकीय लोकांनी आफ्रिकन नागरिकांकडे त्यांच्या स्वतःच्या देशात दुसऱ्या दर्जाचे लोक म्हणून पाहिले!'
त्याने ज्यांना परागंदा होण्याचे फर्मान सोडले होते त्यापैकी अनेक आशियाई कुटुंबांनी पिढ्यान्पिढ्या युगांडामध्येच वास्तव्य केले होते, पण वसाहतकालीन काळात ते अश्वेत आफ्रिकन नागरिकांहून वरच्या स्तरावर होते आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीमुळे स्थानिक लोकांमध्ये मत्सर निर्माण झाला होता. अमीनने त्यांच्या हकालपट्टीला डे ऑफ साल्वेशन अर्थात मोक्षाचा दिवस असे नाव दिलेलं! कुठली तरी टूम काढायची आणि त्याला लक्षवेधक नाव द्यायचं, हा त्याचा आवडता उद्योग होता! किंबहुना बाकी उद्योग करण्याइतके कौशल्य त्याच्यात नव्हतेच मुळी!
त्याच्या म्हणण्यानुसार या निर्णयाने आर्थिक युद्धाची सुरुवात झाली. युगांडातून वसाहतवादाचे सर्व अवशेष हद्दपार करण्याचे अभियान त्याने अमानुषरित्या राबवले. परदेशी लोक प्रगती करत आहेत त्यामुळे खरे युगांडियन मागे पडत आहेत, असं त्याचं म्हणणं होतं! त्याने आशियाई लोकांचे व्यवसाय जप्त करून आपल्या समर्थकांना वाटून दिले, पण त्या व्यवसायांचे पुरते नुकसान झाले. त्यावेळी लक्षात आलं की हाकलून लावलेले आशियाई लोक कारखाने चालवणे, लेखापालन, दंतवैद्यक यासारख्या क्षेत्रांत अतिशय कुशल होते! त्यांची जागा घेणारी माणसं त्याच्याकडे नव्हती!
लोक अस्वस्थ होताहेत हे लक्षात येताच अमीनने आणखी एक नाटकीय घोषणा केली. आपण युगांडाला नव्याने चालना देणार आहोत तीदेखील सुपरसॉनिक वेगाने, असं आचरट विधान त्याने केले. त्याचे समर्थक त्याच्या या स्वप्नावर हुरळून गेले नि त्याचा जयजयकार करू लागले! वास्तवात त्याचे अर्थशास्त्रविषयक ज्ञान अतिशय हास्यास्पद नि क्षुल्लक होते. त्याने अनेक आशियाई व्यापाऱ्यांवर तुच्छतेचे आरोप करून गोळ्या घातल्या, जेणेकरून त्याच्या समर्थकांना तो एक कणखर नेता वाटावा!
मात्र या सर्वाने जे व्हायचे होते तेच झाले, युगांडाची अर्थव्यवस्था कोसळली. पण विवेकभान गमावून बसलेल्या लोकांना त्यातदेखील काही काळ उर्जादायी झेप घेत असल्यासारखे वाटले! याविषयी अमेरिकन इतिहासकार डेरेक पीटरसन लिहितात, “अमीनच्या राजवटीने सरकारच्या लोकपरांङमुख, निरर्थक कारकिर्दीचे रूपांतर वांशिक आणि राजकीय मुक्तीच्या रोमांचक लढाईत केले. कापूस पिकवणे, रस्ते बांधणे यांसारख्या दुय्यम दर्जाच्या मोहिमा देशभक्तीच्या नावाखाली चालवल्या गेल्या.
आंतरराष्ट्रीय राजकारणातही त्याचं वागणं तितकंच नाट्यमय होतं. अनेक युगांडियन लोकांना त्याचं पश्चिमेकडील राष्ट्रांशी केलेलं व्रात्य वर्तन अत्यंत आवडायचं. स्वतःचा देश अस्थैर्यात नखशिखांत न्हाऊन निघालेला असताना त्याने चक्क उत्तर आयर्लंडमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची ऑफर दिलेली! त्याचा देश कंगाल होण्याच्या वाटेवर असूनही ब्रिटनच्या मंदीच्या काळात थेट 'सेव्ह ब्रिटन फंड' उभारण्याची घोषणा केलेली, हे सर्व वेडगळ चाळे तो केवळ देशांतर्गत राजकारणात त्याची छबी उत्तुंग व्हावी म्हणून करत असे! अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना लिहिलेल्या पत्रात त्याने, अमेरिकेत सातत्याने सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचा आणि वॉटरगेट प्रकरणाचा उल्लेख करून खिल्ली उडवली होती.
अमीन फक्त बढाईखोरपणातच नव्हे तर सामाजिक व वांशिक अल्पसंख्यांकांचे भूतदर्शन करण्यात पटाईत होता. परकीय नागरिकांना लक्ष्य करणे आणि तज्ज्ञांच्या, विद्वानांच्या मताकडे दुर्लक्ष करणे हे त्याचे आवडते काम होते. विशेष म्हणजे युगांडा रेडियोवरून तो त्याचे मत मोठ्या आग्रहाने मांडत असे. त्यात बहुत करून, लोकांना उपदेश वा आदेशवजा संदेश असत. किशोरवयीन मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम बंद करा, लोकांनी विग घालणे थांबवावे, असे कपडे घालावेत नि तसे अन्न खावे! एक ना दोन अनेक गोष्टींची त्यात जंत्री असे. एक प्रकारची अधीरता त्याच्या वर्तनात होती, त्याचे प्रशासन आणि कारभार विस्कळीत होते, मात्र तो तसे जाणवू द्यायचा नाही!
अमीन खूप क्रूर होता यात संशय नाही मात्र त्या काळात त्याच्या समर्थकांना याचा वृथा अभिमान होता. युगांडाच्या मुख्य न्यायमूर्तीना न्यायालयातून ओढून नेऊन ठार मारण्यात आले. एका आर्चबिशपला बनावट खटल्यात गोळ्या घातल्या गेल्या. कधी कधी तर पारंपरिक कपडे न घालणाऱ्या मेंढपाळांचा संपूर्ण गट फक्त त्या छोट्याशा कारणावरून ठार मारण्याचा हुकूम दिला. त्याच्या राजवटीत झालेल्या अंदाजे बारा हजार ते पाच लाख लोक ठार मारले गेल्याचा अंदाज लावला जातो. हे नरसंहार योजनाबद्ध नसले तरी त्यांना अमीनने चालना दिली होती हे नक्की! जे लोक आपल्यालाआवडत नाहीत त्यांना संपवून टाकण्यासाठी त्याने आपल्या सैनिकांना फ्री हँड दिला होता आणि त्याच्या सैनिकांनी त्या अधिकाराचा भयानक गैरवापर केला.
अमीनच्या दहशतीने संपूर्ण देश हळूहळू का होईना पण भयग्रस्त होऊ लागला. त्याने हाकललेल्या आशियाईंपैकी सर्वात मोठा गट ब्रिटनमध्ये पोहोचला त्यात महमूद ममदानी हे नाव विशेष उल्लेखनीय. सध्या ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत उतरलेल्या झोहरान ममदानी यांचे वडील होत. महमुद ममदानी यांनी लिहिलंय की, हाकलले गेलेले लोक जिथे गेले तिथेही परकेच वाटत राहिले, अगदी स्वतःच्या घरातही पाहुणे असल्यासारखे. ब्रिटनने तर नंतरचे कायदे बदलून अशा वर्णद्वेषी वसाहतकालीन घटकांना देशात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण तरीही जे युगांडन आशियाई तेथे पोहोचले ते नंतर यशस्वी कारकीर्द करण्यात सफल झाले.
1979 मध्ये अमीनने मूर्खपणे टांझानियावर हल्ला केला आणि तो तोंडघशी पडला, टांझानियन सैन्याने त्याला सत्तेतून खाली खेचले. तो परागंदा झाला. त्या दरम्यानच हलाखीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तब्बल सात वर्षांनी योवेरी मुसेवेनी नावाच्या बंडखोराने विद्रोह करत युगांडाचे अध्यक्षपद मिळवले, आजही तोच सत्तेत आहे. तो म्हणतो की, त्याने देशाला पुन्हा स्थिरता दिली. मात्र तो लोकशाहीवादी नाही. महमूद ममदानी यांच्या मते, मुसेवेनी हा पश्चिमेकडील देशांचा इमानी गुलाम आहे, जो हळूहळू भ्रष्टाचार, हिंसा आणि वांशिक विभाजन लोकांच्या नसानसातून भिनवून देशाला विखारग्रस्त बनवतोय.
आजघडीला युगांडातील अनेक मोठे उद्योग परदेशी मालकांच्या ताब्यात आहेत. ज्या असंतोषाचे कारण दाखवत अमीनने आपली राजवट उभी केली होती, तो असंतोष आणि ती स्थिती आजही तशीच आहे. मग अमीनने काय साध्य केले याचे उत्तर एका शब्दांत आहे, ते म्हणजे निरंकुश सत्ता! मात्र या बदल्यात त्याचे राष्ट्र अधिकच पिछाडीवर गेले! असो.
इतिहासाची नित्य पुनरावृत्ती होत असते. मुसेवेनी यांचा मुलगा, मूहूझी काइनेरुगाबा, सोशल मीडियावर अमीन आणि सद्यकालीन अन्य हुकूमशाही वृत्तीच्या अन्य राष्ट्रप्रमुखांसारखा बेताल वागतो. आपल्या टीकाकारांची खिल्ली उडवतो आणि विरोधकांना धोबीपछाड दिल्याची बढाई मारतो.
दरम्यान, युगांडाची राजधानी असलेल्या कंपाला शहरातील काही टॅक्सीचालक अजूनही आपल्या गाड्यांच्या काचाांवर अमीनचे फोटो लावतात, त्या कथित सुवर्णकाळाच्या आठवणीने, सदगदीत होतात जो प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नव्हता.
स्वप्नाळू राष्ट्रवाद हा असा असतो, विनाशकारी दमनकारक नेतादेखील प्राणप्रिय वाटू लागतो, त्याच्या व्यक्तीपूजेत गढून गेलेल्या लोकांना देशाची पीछेहाट कधी दिसत नाही आणि चुकून त्याची जाणीव झाली तरी ते स्वतःला खोट्या भ्रामक कल्पनाविश्वात रममाण करतात. आणि एके काळी आपण सुवर्णयुगात जगत होतो या गतकालीन काव्यकल्पनांत दंग होतात! दुविधा अशी झालीय की आजघडीला नवनवे अमीन विविध देशात उदय पावले आहेत आणि तिथेही असेच समांतर चित्र दिसतेय.
संदर्भ - इदी अमीन, योवेरी मुसेवेनी, अँड द मेकिंग ऑफ द युगांडन स्टेट स्लो पॉइझन; लेखक - महमूद ममदानी
- समीर गायकवाड
#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #कविता #kavita #poetry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा