मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

मुघल काळात हा इलाखा गाणं बजावणं आणि मुजरा मैफलीसाठी प्रसिद्ध होता. दुरून लोक यायचे, नाचगाण्याचा आनंद घेऊन मनसोक्त राहून परत जायचे. परिणामी या भागात तात्पुरते राहण्यासाठी हवेल्या, बैठी घरे उपलब्ध असत. या सोयीला त्या काळचे एअरबीएनबी म्हणावे काय! असो.

शाहबाज खान कंबोह हा इसम अकबराच्या अतिशय घनिष्ठ वर्तुळात कसा पोहोचला याची कथा रंजक आहे. शंभर सैनिकांच्या मनसबदारीपासून सुरुवात करून नऊ हजारांच्या तोफखान्यापर्यंत त्याने मजल मारली.

अकबराने त्याला मीरबक्ष ही पदवी दिली होती, सेनापती केलं होतं आणि आपला वकील नेमलं होतं. ब्रम्हपुत्रेपर्यंत त्याच्या तलवारीची धार तळपली होती. त्याचा पराक्रम पाहून त्याला मीरतची जहागिरी इनाम दिली गेली. मात्र त्याचा जीव तिथे रमला नाही.

पुढे जाऊन कंबोह घराण्यातील वारस मीरतच्या नवाबपदी आरुढ होत राहिले. यांचा पूर्वज मोहबतखान कंबोह याने आताच्या पाकिस्तानमधील पेशावरमध्ये जी मस्जिद बांधली तिला आजही मोहब्बत खान मस्जिद या नावाने ओळखले जाते.

यांच्या वारसापैकी एक नवाब मोहम्मदखान याने मीरतला तटबंदी बांधून दिली. तेव्हापासून मीरत हे उत्तरेकडील महत्वाचे शहर झाले.

या शहराचे भौगोलिक स्थान असे होते की फारशा लष्करी कारवाया इथे घडल्या नाहीत, विरंगुळा आणि करमणूक यासाठी मात्र मुघली सलतनतीतले लोक या भागाला पसंती देत राहिले.

परिणामी इथे नाच गाण्यास बढावा मिळाला. औरंगजेबाच्या काळातच फक्त इथे मंदी आली. त्याच्या पश्चात इथे पायल की झंकारच निनादत राहिली.

या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की स्त्रिया पिढ्या न पिढ्या इथेच हाच धंदा करत राहिल्या. स्वातंत्र्य काळात त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप बदलले.

सगळीकडे नाचगाण्याचे कोठे बंद पडले, त्याला मीरतही अपवाद नव्हते. बायकांना घरे नव्हती मात्र भुकेने व्याकुळ झालेले मन आणि रिकामे पोट होते, जोडीला बदनामीचे कलंक होते.

त्यामुळे यांना सभ्य समाजात स्थान आणि काम मिळाले नाही, परंतु पोटाच्या आगीने बाजारात जरूर उभे केले! मीरतचा कबाडी बाजार त्यातून जन्मास आला!

कबाड म्हणजे भंगार!

ज्यांचे उपयोगमूल्य संपले आहे अशा वस्तू भंगारात टाकल्या जातात. या बायकांचे उपयोगमूल्य संपले होते म्हणून या देखील कबाड ठरवल्या गेल्या!

त्यांना कबाड ठरवले असले तरी त्यांना नष्ट केलं गेलं नाही, त्यांचे शोषण जारी ठेवलं गेलं! भंगारातलं लोखंड, टाकाऊ चीजवस्तू आणि या बायका एकसमान मानल्या गेल्या!

भंगार जसे कवडीमोल किंमतीत विकत घेऊन हवे तसे वापरता येते, तशी अवस्था या बायकांच्या देहाची म्हणजेच मानवी कबाडाची झाली! दीड शतकापासून इथे हाच व्यवसाय चालतो.

यातल्याच एका स्त्रीला बोलतं केलं तेव्हा तिने जे सांगितलं ते सोन्याहून लखलखणारं होतं,

वास्तवात 'कबाड' या बायका नाहीत, यांच्याकडे येणारे पुरुष कबाड आहेत, तरीही सभ्य समाजात त्यांना स्थान आहे.

वर्षानुवर्षे अनेक पुरुष जिच्यात रिचवले गेले, तिच्यासाठी दारुड्या पुरुषांची कुंडली मांडणे फारसे कठीण नव्हते! या नोंदी आगामी पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. वाचताना कधी स्तब्ध झाल्यासारखे वाटेल तर कधी डोळे भरून येतील, अशा नोंदी!

- समीर गायकवाड

#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #कविता #kavita #poetry

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा