गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

दुसरे कुटुंब विद्याचतुरचे आहे, जो रत्ननगरी नामक काल्पनिक राज्याच्या राजा मणिराज यांच्या दरबारातील विद्वान पंतप्रधान असतो. त्याला आणि त्याची सद्गुणी पत्नी गुणसुंदरी यांना दोन मुली असतात, कुमुद आणि कुसुम!

सरस्वतीचंद्रची आई मरण पावते आणि लक्ष्मीनंदन पुन्हा लग्न करतात. सरस्वतीचंद्रची नवी, सावत्र आई गुमान ही एक अतिशय धूर्त स्त्री असते, जी आपल्या सावत्र मुलाला नापसंत करते आणि त्याच्याकडे अगदी अभद्र संशयाने पाहते. दरम्यान, सरस्वतीचंद्र आणि कुमुद यांच्या लग्नाची तयारी सुरू होते, ज्यायोगे ते एकमेकांना न पाहताच पत्रांची देवाणघेवाण करतात आणि त्यांचे प्रेम फुलते. सरस्वतीचंद्र हा, कुमुदच्या ज्ञान, बुद्धिमत्तेसह अन्य स्त्रीसुलभ गुणांकडे आकर्षित होतो. कादंबरीत ही पत्रे एखाद्या व्यक्तीरेखेसारखी समोर येतात.

या सर्व घटनाक्रमा दरम्यान सरस्वतीचंद्रच्या घरातील वातावरण बिघडते, त्याला कारणही तसेच घडते. त्याच्या वडिलांनाही त्याचा संशय येऊ लागतो, त्यांना वाटू लागते की सरस्वतीचंद्रची आपल्या संपत्तीवर वाईट नजर आहे, त्यांचा हा समज बळावत जातो. सरस्वती खूप नाराज होतो आणि घर सोडून देण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागतात.

त्याचा सर्वात घनिष्ठ मित्र, चंद्रकांत त्याला परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु सरस्वतीचंद्र नकार देतो आणि मनाचा निग्रह करतो. कौटुंबिक कलहातून उद्भवलेले गैरसमज वाढतच जातात, एका रात्री, पित्याच्या क्रोधाला, समाजाच्या बंधनांना तुच्छ मानून, तो घर सोडून निघून जाते. जाताना, कुमुदला आणि त्याच्या घरच्या लोकांना आपण कधी तरी परत येणार असल्याचे सुतोवाच करतो.

संन्यासी वेषात, नाव लपवून, तो सुंदरनगरला पोहोचतो. खूप विचाराअंती सरस्वतीचंद्र, कुमुदला दुसरे पत्र लिहून कळवतो की, त्याला आता तिच्याशी विवाह करणे शक्य नाही. मात्र, पुढे जाऊन नियती त्याने दिलेल्या शब्दावर ते पाणी फिरवते!

या पत्रामुळे गैरसमजांची साखळी सुरू होते! आणि अखेरीस कुमुदचे लग्न बुद्धिधनचा विक्षिप्त मुलगा प्रमद्धनशी होते. हा बुद्धिधन, सुवर्णपूरचा पंतप्रधान होण्याची तयारी करत असतो. अशा प्रकारे सरस्वतीचंद्र आपले घर, संपत्ती आणि कुमुदलाही कायमचे मुकतो!

लग्न झाल्यानंतर संस्कारी विचारांची कुमुद स्वतःला पतीच्या चरणी समर्पित करते. प्रमद्धन मात्र तिच्या आत्मीयतेचा तिरस्कार करतो. तो नर्तकींच्या सहवासात रमतो आणि आपल्या दुहेरी आयुष्याबद्दल लपवाछपवी न करता, उलट कुमुदलाच सुनावतो, 'माझ्या दुर्बलतेवर काही बोलू नकोस. माझे वर्तन कधीही बदलणार नाही, किंबहुना हेच माझे पौरुषत्व समज!"

दरम्यान, आपले घर सोडून देशभर फिरत असलेला सारस्वतीचंद्र योगायोगाने कुमुदच्या सासरी येऊन पोहोचतो. प्रमद्धनचे वडील बुद्धिधन हे आपल्या मुलाच्या वागणुकीवर नाराज असतात, सरस्वतीचंद्राच्या विद्वत्तेने ते प्रभावित होतात आणि त्याला आपला सचिव म्हणून ठेवतात. तिथे त्या दोन पूर्वप्रेमींची पुन्हा भेट होते. पण कुमुद आता पतिव्रतेच्या मर्यादेत राहणारी स्त्री असते, सरस्वतीला पाहून देखील, ती आपल्या अंतःकरणातील तडफड दाबून ठेवते.

सरस्वतीचंद्र तिच्या वेदनेचा साक्षीदार असतो, पण तिच्या संमतीशिवाय काहीही करण्यास नकार देतो. प्रमद्धनचा स्वभाव मात्र दिवसेंदिवस अधिक उद्धट आणि दुराचारी होत जातो. शेवटी कुमुदच सरस्वतीला विनंती करते की, 'त्याने तिच्या आयुष्यापासून दूर जावे!' मानी स्वभावाचा प्रेमळ सरस्वती तिच्या विनंतीचा मान ठेवून निघून जातो.

तो ज्या रस्त्याने जाणार असतो तिथे दबा धरुन बसलेले दरोडेखोर त्याच्यावर हल्ला करतात. तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडतो. काही साधू त्याला पाहतात आणि आपल्या आश्रमात घेऊन जातात. तिथे तो सांसारिक सर्व संबंध तोडून साधूचे जीवन जगू लागतो.

दरम्यान इकडे कुमुदचे आयुष्य मात्र अधिक अंधारमय होते. प्रमद्धनला सरस्वतीचे एक जुने पत्र सापडते आणि तो त्या निमित्ताने कुमुदला घराबाहेर काढतो. तिच्या विनम्र, सालस, सोज्वळ स्वभावामुळे आणि स्वाभिमानी वागणुकीमुळे सासरच्या स्त्रिया तिच्या बाजूने उभ्या राहून प्रमद्धनच्या वडिलांना सांगतात की, त्यांच्या वासनांध मुलाने सुशील पत्नीला अन्यायाने हाकलले आहे. मग बुद्धिधन हे आपला मुलगा प्रमद्धन याने कायमस्वरूपी नाते तोडण्याचे फर्मान सोडतात. प्रमद्धनला घरातून बाहेर काढले जाते.

दुसरीकडे कुमुद निराश मनाने नदीत बुडून संपवू पाहते, पण काही साध्वी स्त्रिया तिला वाचवतात आणि एका मंदिराच्या आश्रमात घेऊन जातात, जिथे योगायोगाने सरस्वतीचंद्रही प्रायश्चित्तासाठी राहात असतो. तिथे पुन्हा त्या दोन पवित्र आत्म्यांची भेट होते. कुमुद नियतीपुढे नतमस्तक होते आणि आश्रमातील वरिष्ठ साध्वीचा सल्ला मान्य करते. आपण सरस्वतीचंद्र साठी काहीतरी केले पाहिजे असे तिला राहून राहून वाटू लागते.

याच सुमारास सरस्वतीला आपल्या गुरुंकडून कळते की प्रमद्धन मरण पावला आहे. त्याला ती बातमी कुमुदला सांगायची असते. त्या निमित्ताने दोघांची आणखी एक भेट ठरते; शांत, गंभीर आणि वेदनांनी भरलेली. त्यावेळी त्यांना जाणवते की, नियतीने पुन्हा त्यांना समोरासमोर आणलेय. त्यांच्या मनातील दडलेले प्रेम पुन्हा जागे होते.

तोवर कुमुद स्वतःला परित्यक्ता, विधवा समजत नसते. तिच्या मनात अजूनही पतीला बदलण्याची आशा शिल्लक असते. जेव्हा सरस्वती तिला प्रमद्धनच्या मृत्यूची बातमी सांगतो, तेव्हा तिच्यासमोर नवे शोकात्म आयुष्य उभे राहते, विधवापणाचे, विरक्ततेचे!

‘प्रेम नेहमीच एकजीव होऊ शकत नाही, कधी कधी त्यागाच्या रूपाने ते चिरंतन होतं!' असं कुमुद सांगते तेव्हा सरस्वतीचंद्रचा चेहरा उजळून निघतो!

याच कथेचा शेवट काहीसा बदलून नूतनचा 'सरस्वती चंद्र' रिलीज झाला होता. ही कादंबरी 1906 च्या सुमारास लिहिली आहे.
कादंबरीमध्ये धर्माच्या मर्यादेवर भाष्य आहे. सामाजिक शोषण आणि जाती, वर्गवारीच्या सर्वात तळाशी असणाऱ्या स्त्रियांच्या दमण शोषणाविषयीही लिहिलेय.

धर्माचा मुखवटा दीर्घ काळ घालून फिरल्याने विरक्ती येईलच असे काही नाही, उलट त्यामुळे माणसं कर्मवादी होण्याऐवजी दैववादी होतात, आपसात वर्गवारीची उतरंड पाडून आयुष्यात छुप्या पद्धतीने त्याचे पालन केले जाते असेही यात सूचित केलेय!

संस्कृत पंडीत असणारा नायक आणि त्याच्यापासून कायमची दूर जाणारी नायिका यांचा विरह अंगावर येतो. कादंबरीच्या शेवटी सरस्वतीचंद्र कुमुदला अखेरचा निरोप देऊन संन्यासी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो.

देह, प्रेम, मोहमाया यांच्याही पलीकडे विरक्ती आहे आणि केवळ धर्मासक्तीत अखंड बुडालेल्या व्यक्तीलाच ती साध्य आहे असे काही नाही, असा टोकदार संदेश कादंबरी देते.

पासष्ट वर्षांपूर्वी आपला समज आताच्या तुलनेत खुल्या विचारांचा आणि सहनशील होता असेच म्हणावे लागेल कारण आताच्या काळात कुणी सरस्वतीचंद्र सारखी कादंबरी गुजरातमध्ये लिहिली तर त्याचे जगणे मुश्किल होईल! कारण आपला समाज आता असहिष्णु झालाय! असो!

'छोड दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नही आदमी के लिए..' हे विलक्षण अर्थपूर्ण आणि शांतशीतल गीत याच सिनेमात होतं! आताच्या काळात तर ही भावना देखील दुरापास्त झालीय!

सबब 1960 मधला समाजच अधिक परिपक्व होता असे म्हणायचे का? असो. चारेक दिवसापूर्वी गोवर्धन त्रिपाठी यांची जयंती होती! त्यांना वंदन!

'सरस्वतीचंद्र'मध्ये नूतन खूप स्नेहार्द्र, कणवाळू, प्रेमळ आणि कारुण्यमूर्ती वाटते, माझी आई दिसायला नूतनसारखी होती! आजही नूतनचे फोटो, व्हिडिओ पाहिले की कासावीस होतं!

- समीर गायकवाड.

#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #कविता #kavita #poetry 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा