काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.
आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.
दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.
खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेला शिसवी तानपुरा त्या घराला वेगळाच अर्थ प्राप्त करून देत होता.
अलंकृताचं व्यक्तिमत्व तिच्या नावास साजेसे होते, तिच्या अंगावर सोन्याचांदीचा एकही दागिना नव्हता तरीही दिसायला ती अतिशय मोहक सुंदर होती.
गाणंबजावण्याचे काम ती करे. तिची आई, आज्जी या देखील गायकीच करायच्या. अलंकृताला ती परंपरा पुढे न्यायची नव्हती.
तिने लग्नही केले नव्हते आणि तिला ते करायचेही नव्हते, बेसिकली तिला मूल होऊ द्यायचे नव्हते.
परिसरातले लोक खास करून पुरुष तिच्या चारित्र्यावर मुद्दाम शिंतोडे उडवत असतात असं अबीरने आवर्जून सांगितलं.
अलंकृतावर फिदा झालेले अनेक पुरुष होते मात्र त्यातल्या कुणालाच तिने भीक घातली नव्हती त्यामुळे तिला स्त्रियांत स्वारस्य आहे अशीही कंडी पिकवली होती.
या सर्वांना फाट्यावर मारत ती स्वतःच्या पद्धतीने जगत होती. तिची लगबग, बोलताना तिच्या कपाळावर रुळणारे केस, तिचं मधाळ हास्य, गालावरच्या खळ्या, पाणीदार डोळे आणि अगदी कमसीन हसरा चेहरा सर्वच जिव्हाळ होतं!
अबीर तिच्याविषयी सांगत असताना आतल्या खोलीतून तिच्या कोमल आवाजात अबीरला काहीतरी विचारायची आणि हा हसून तिला उत्तर द्यायचा.
मग मी आपला, तिने काय विचारले नि तू काय उत्तर दिलेस असं विचारे! मग त्याने सांगितलेल्या कानगोष्टी ऐकून मन तृप्त होई!
थोड्याच वेळात किणकिणत्या ग्लासांचा आवाज आला. अलंकृताने अगदी मधाळ चवीचे आम पने (आपल्याकडचे कैरीचे पन्हे) भरलेले ग्लास पुढे केले, तिचे हात विलक्षण मल्मली होते! उन्हाळयाचे दिवस होते, त्यामुळे पन्हं पिताच फ्रेश वाटलं.
पन्हे पिऊन झाले आणि अबीर तिथून निघण्याची घाई करू लागला. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि जेमतेम दोन वर्षात त्याला पहिलं मूल झालं होतं! त्याला एक गोड छोकरी झाली होती.
त्याला घरी लवकर जायची घाई होती आणि माझे प्रश्न सरत नव्हते. त्याची चुळबुळ पाहून मी अस्वस्थ झाल्याचे पाहून अलंकृताला हसू आलं!
मग न राहवून अबीर, त्याच्या पत्नी आणि मुलीविषयी सांगू लागला तेव्हा ती तन्मयतेने ऐकत होती, जणू काही ते मूल तिचेच होते असा स्नेहार्द्र भाव तिच्या डोळ्यात तरळत होता.
अखेरीस तो म्हणाला की, आता निघायला हवं, घरी त्याची पत्नी विदिशा एकटीच असेल आणि वृंदा (त्याची चिमुकली पोर) खूपच नाजुक आहे तिची काळजी घेण्यासाठी निघायला हवं!
मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होतो!
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून अलंकृता उत्तरली, होय त्याची इवलीशी राजकुमारी अगदी तिच्या वडिलांसारखीच नाजुक आहे, ती अंगणात चालते तेव्हा शिऊलीची फुले देखील तिला टोचत असावीत!
मानेला हळुवार झटका देत अशा काही रसाळ आवाजात ती हे बोलली की, अबीर लाजून चूर झाला, ती मात्र खळखळून हसत होती, हसताना ती अजूनच सुंदर दिसत होती!
हॉलच्या कोपऱ्यात ठेवलेला तानपुरा देखील हसरा वाटला!
अखेर तिचे प्रेमळ आदरातिथ्य स्वीकारून तिथून निघालो तेव्हा गोऱ्यापान अबीरचे गाल आरक्त झाले होते आणि आम्हाला निरोप देत दारापाशी उभ्या असलेल्या अलंकृताच्या डोळ्यात पाणी तरळलेले दिसले!
बाय द वे, शिऊलीची फुलं म्हणजे प्राजक्तफुलं! शिऊली हे त्याचं बंगाली नाव!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा