Saturday, December 29, 2018

रिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर - कादर खान !

रिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर - कादर खान : लेखक समीर गायकवाड
एक कमालीचा हळवा आणि भावूक सीन अमिताभच्या 'मुकद्दर का सिकंदर'मध्ये होता. चिमुरड्या सिकंदरचे आईबाप नसतात. तो यतिम असतो. रामनाथजींच्या (श्रीराम लागू) घरी त्याला काम मिळते. त्यांच्याकडेच घरकामास असलेली फातिमा त्याला आपला मुलगा मानते. रामनाथजींची मुलगी कामना (राखी) हिच्या वाढदिवसाचा सोहळ्यात येण्यापासून सिकंदरला मज्जाव केला जातो. त्याचं तिच्यावर असीम आणि सालस प्रेम असतं. स्वकष्टाच्या कमाईतून आणलेलं बाहुलीचं गिफ्ट तिला देण्यासाठी तो लपून छपून तिच्या घरात शिरतो आणि पकडला जातो. त्याला आणि फातिमाला कामावरून काढलं जातं. त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जातो. ते रस्त्यावर येतात आणि येथून त्यांच्या आयुष्याची दशा बदलते. आजारी असलेल्या फातिमाचे दैन्यावस्थेच्या हाल अपेष्टांनी निधन होते. कोवळ्या सिकंदरला आपली मुलगी मेहरू हिच्या स्वाधीन करून ती अनंताच्या प्रवासास जाते.


Thursday, December 27, 2018

रेड लाईट डायरीज - वेश्याव्यवसाय : इतिहास ते आस


वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहायला गेलं तर जगातला हा एक प्राचीन उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे हे तत्व सर्वत्र लागू होते. याला आपला देशही अपवाद नाही. मराठी भाषा कोषात याची व्याख्या केली गेलीय. चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. वेश्याव्यवसाय प्रामुख्याने स्त्रियाच करतात. परंतु प्राचीन काळापासून पुरुषांचाही यासाठी वापर झाल्याचा आढळतो मात्र त्याला व्यवसायचे स्वरूप मिळाले नाही. हल्ली मात्र 'जिगोलो'च्या रूपाने पुरुष वेश्यावृत्ती पहावयास मिळते. त्याच बरोबर किन्नरांचाही देहविक्री व्यवसाय जारी असल्याचे दिसून येतेय. वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं आहे. तरीही, हा प्राचीन व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नसतात. अनेकांच्या मते ह्या व्यवसायातल्या स्त्रिया शोषितच असतात आणि त्या नेहमीच शोषित होत्या; किंवा, हा व्यवसाय जाणूनबुजून पत्करणं म्हणजे नैतिक अध:पतनच, असं मानणारे लोकही पुष्कळ आहेत. नाही तर ‘ही आमची बावनखणी, काय तिथल्या लावण्यखणी'; 'गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी' अशा प्रकारचे उमाळे काढणारे लोकही खूप असतात. वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहिला, तर त्यात शोषण आणि शौक दोन्ही आढळतात हे खरंच आहे; पण सांगण्यासारखं आणखी वेगळं त्यात काही सापडेल का ?


Tuesday, December 25, 2018

'सबकुछ पुलं'चा अलौकिक सिनेमा...

  

पुलंच्या जन्मशताब्दीचं निमित्त झालंय आणि मगच अवघा महाराष्ट्र पुलंमय झालाय असं काही नाहीये. मराठी माणसाला रसिकतेची जी काही व्यसनं आहेत त्यात पुलं हे नाव अग्रस्थानी आहे. यामुळे महाराष्ट्र बारमाही पुलंमय असतो. आता जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुलंच्या संदर्भास अनुसरून आपआपल्या आठवणी ताज्या करण्याचा एक चांगला मोका सगळ्यांनी साधलाय. एका अर्थाने हे पुलंच्या आडून वैयक्तिक स्मृतींचे रिइंडेक्सिंग आहे. पुलंच्या लेखनाचे कंगोरे इतके नितळ आणि स्पष्ट होते की कोणीही सामान्य माणूस त्यात डोकावताच त्याला आपलं प्रतिबिंब दिसते हे यामागचे एक कारण असू शकते. कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, नाटक, एकांकिका, चित्रपट कथा - पटकथा, प्रहसने, विडंबन, स्फुट, संवाद, गीते अशा विविध आघाड्यांवर त्यांनी काम केलं. मराठी माणसाच्या अक्षरखजिन्यास त्यांनी इतकं काही दिलं की तो समृद्ध तर झालाच झाला पण सदैव हसमुख राहील याची दक्षताही त्यांनी घेतली. मध्यमवर्गीयांना तर त्यांनी शब्दांच्या अक्षरशः सोनकळात चिंब भिजवले. हसवता हसवता माणसांच्या वागण्यातील अनेक अवगुणांवर कटाक्ष टाकताना समाजातील विषमतेवर बोट ठेवलं. त्यांनी केलेला मर्मभेद बोचरा असला तरी त्यात टोकदार सल नव्हता. मात्र प्रत्येकाने हसता हसता अंतर्मुख व्हावं इतकी किमया तरी त्यांचं लेखन सहज साधतं. विनोद निर्मिती सहज करता येऊ शकते पण कंबरेखालील विनोद टाळून त्यात दर्जा आणि स्तर यांचा समन्वय साधत सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनास केंद्रबिंदू मानत कधी गुदगुल्या करत, कधी चिमटे काढत, कधी कोपरखळ्या मारत तर कधी चक्क टपल्या मारत लोकांमधील दुटप्पीपणास सोलून काढलं. पुलंचं लेखन जसं महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं तसंच त्यांचे सिनेमे, नाटके देखील लोकांनी उचलून धरले. मराठी रसिकांना आजही त्यांच्या सिनेमांचं आकर्षण आहे. त्याच्याशी जडलेल्या स्मृती हे त्यामागचं एकमेव कारण नाहीये तर त्यातला चिरकालीन विनोद आणि विनोदाआडचं खरमरीत भाष्य आजही रसिकांना खुणावते. असं असूनही एक खंत कायम सलते ती अशी की रसिक मराठी माणसांनी पुलंच्या साहित्यास, नाटकास जितका उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना कायम चिरस्मृतीच्या कुपीत ठेवलं त्यामानाने पुलंच्या सिनेकारकिर्दीचा सार्थ सन्मान झाला नाही. याच दैदीप्यमान कारकिर्दीचा हा धांडोळा.


Sunday, December 23, 2018

रेड लाईट डायरीज - वेश्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरजएकीकडे काही लोक आहेत जे झपाटल्यागत रेड लाईट एरियातील प्रत्येक मुलीस वाचवण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी देशविदेशातून भारतात येऊन इथल्या दलदलीत रुतलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी कंबर कसून आहेत आणि एकीकडे आपले काही कायद्याचे सुव्यवस्थेचे रक्षक आहेत ज्यांचे या क्षेत्रातले खबरी दिवसागणिक घटत चाललेत. कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही, धूसर भविष्याकडची ही हतबल वाटचाल आहे. वेश्यांकडे पाहण्याच्या मानवी दृष्टीकोनाच्या काही विशिष्ठ बंदिस्त भूमिका आहेत. त्या उध्वस्त होऊन मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितले पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. तीन भिन्नकालीन आणि भिन्न तऱ्हेच्या घटनांचा उल्लेख करतो जेणेकरून लेखाचा मतितार्थ उमगायला मदत होईल.


जावे त्यांच्या 'देशा'... 'गमन' ते आगमन !


स्मिता पाटील आणि फारुक शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'गमन' हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता. गुलाम हसन हा उत्तर प्रदेशातील बदायूं शहरानजीकच्या एका खेड्यातला तरुण असतो. गावातलं तेच रोजचं नीरस आणि संथ जीवन याला तो कंटाळलेला असतो. त्याची तरुण पत्नी आणि वृद्ध आई यांच्या आयुष्याला दैन्य, शिथिलता आणि अस्वस्थता यांची एक डार्क शेड आलेली असते ती गुलाम हसनच्या काळजाला डाचत असते. गावात राहून आपलं काहीच भलं होणार नाही याची त्याला पुरती खात्री झालेली असते.


Saturday, December 22, 2018

इम्रानचे एका दगडात दोन पक्षी...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान आपल्या पश्तून मित्रांसोबत ...
   
पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या 'द डॉन' या राष्ट्रीय वर्तमानपत्रात दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजीच्या मुखपृष्ठावर एक ठळक बातमी होती. त्याचं शीर्षक होतं की 'केपी सरकारद्वारे आदिवासी भागात ७००० विविध पदांची निर्मिती होणार !'. यातली केपी सरकार ही संज्ञा पाकिस्तानमधील खैबर पश्तूंवा या प्रांतासाठीची आहे. ज्या भागात नवीन पदांची निर्मिती होणार असा उल्लेख आहे तो भूभाग म्हणजे या खैबर पश्तूनी भागाला लागून असलेला सलग चिंचोळा भूप्रदेश जो अफगानिस्तानच्या सीमेला लागून आहे,  पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरलेल्या बलुचबहुल प्रांताला तो भिडतो. हा सर्व इलाखा पाकिस्तानमधील आजच्या काळातील अन्य जाती जमातींच्याहून अधिक मागासलेल्या इस्लामिक आदिवासी जाती जमातींनी ठासून भरलेला आहे. १९ डिसेंबरच्या बातमीनुसार पाकिस्तान इथं आता प्रशासनाचे सुशासन राबवण्यासाठी उत्सुक आहे. वरवर ही एक अंतर्गत घडामोड वाटेल पण बारकाईने पाहिल्यास याला एक मोठा इतिहास आहे. या बातमीचा नेमका अर्थ कळण्यासाठी थोडंसं इतिहासात जावं लागेल.


Friday, December 14, 2018

'बदनाम' गल्लीतला ऐतिहासिक दिवस...कालचा हा क्षण अभूतपूर्व म्हणावा असाच होता.
सोबतच्या छायाचित्रातले घर असे आहे की जिथे सभ्य पांढरपेशी लोक नाकाला रुमाल लावतात. इथल्या लोकांचा तिरस्कार करतात. सामान्य लोकं यांच्याबद्दल अत्यंत घृणा बाळगतात. इथे 'त्या' राहतात.
ही अख्खी वस्तीच 'त्यां'ची आहे. इथे सगळ्या गल्ल्यात 'त्यां'चीच घरे आहेत.
रात्र झाली की इथे पाय ठेवायला जागा नसते, 'यां'ची शरीरे उफाणली जातात आणि त्यावर स्वार होतात तेच लोक जे दिवसाढवळ्या सभ्यतेच्या मुखवट्याआड जगत असतात.

काल मात्र इथे एक आक्रीतच झालं.
जनसामान्यांच्या भाषेत ज्यांना साधू संत, सत्संगकर्ते उपदेशक म्हटलं जातं अशी एक सत्शील,शालीन, ज्ञानी, विवेकी, व्यासंगी आणि सिद्धहस्त असामी इथे या वस्तीत आली. त्यांचे नाव मुरारीबापू ! ते आले होते ते ठिकाण म्हणजे कामाठीपुरयातली १३ वी लेन !
एका बदनाम वस्तीत एक सदाचरणी साधूपुरुष आले.
कशासाठी ? तर त्यांच्या सत्संगाचे आमंत्रण देण्यासाठी ! होय आमंत्रण देण्यासाठीच !!
त्यांनी या अभागी महिलांना 'नगरवधू' हे संबोधन लावले. हेच संबोधन भगवान गौतम बुद्धाच्या काळात आम्रपालीस देखील लावण्यात आले होते हे विशेष उल्लेखनीय होय.


नगरवधूंचा (देहविक्री करणाऱ्या महिला) फार मोठा इतिहास आहे. ५०० वर्षांपूर्वी गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये गणिकांचा उल्लेख केला आहे. ते वासंती नामक गणिकेच्या अंतिम समयी तिच्या निमंत्रणावरून एक पद गाण्यासाठी तिच्या घरी गेले होते. संत कबीरांपर्यंत अनेक महात्म्यांनी नगरवधूंना मोठे स्थान दिले.

मुरारीबापू काल म्हणाले की, "सध्या ही मातृशक्ती तिरस्कृत झाली आहे. त्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. या मातृशक्तीला पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठीच रामचरितमानसमधील मानसगणिका कथावाचन कार्यक्रमाचे आयोजन अयोध्येत केले आहे आणि त्यासाठी नगरवधूंना विशेष निमंत्रण देण्यासाठी मी मुंबईत कामाठीपुरयात आलो आहे.. "

मुरारीबापूंनी या आधीही या उपेक्षित शोषित घटकास जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. चक्क त्यांच्या सूरत येथील त्यांच्या निवासस्थानीच काही वारांगनांना पाचारण केले होते. त्यांना स्नेह प्रेमाची उब देत आशीर्वादही दिले होते. तेंव्हाही संस्कारी जगाने डोळे विस्फारले होते.

मुरारीबापूंनी काल एक छोटीशी सभाच इथे घेतली. जवळपास साठ ते सत्तर घरात ते गेले.
जिथे सभ्य माणसे येऊन घृणेच्या पिचकाऱ्या टाकतात तिथे एक साधूपुरुष आल्याने काल कामाठीपुरयास उधाण आले होते.
हा कोण साधू आहे जो आपल्याला बोलवतोय आणि थेट आपल्या बदनाम गल्लीत येतोय, आपल्या अंधारलेल्या दुर्गंधीने भरलेल्या घरांचे उंबरठे ओलांडून आत येतोय आणि आपली विचारपूस करतोय या भावनेने अनेकींना रडू कोसळले होते.
जवळपास सर्व स्त्रियांच्या डोळ्यात आनंदाश्रुंचे सागर लोटले होते.
एरव्ही ग्राहकाच्या शोधात असणारे डोळे मायेने. करुणेने भारावून गेले होते.

काल मुरारीबापूंनी एक ऐतिहासिक उपमा कामाठीपुरयास दिली. ते ,म्हणाले, "कामाठीपुरा ही इतरांसाठी कामाठीपुरा गल्ली असेल, पण माझ्यासाठी ही तुलसी गल्ली आहे !"
बापूंनी या महिलांना महान संतांचे दाखले दिले. ते म्हणाले, 'गौतम बुद्धांनाही उपदेश देण्यासाठी वेश्यालयातून आमंत्रण आले होते. तुलसीदास असोत किंवा गौतम बुद्ध, हे सर्व संत-फकीर निमंत्रण स्वीकारून त्या-त्या ठिकाणी गेले होते. त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला भेटायला, तुमचे दुःख जाणून घेण्यासाठी आलोय...' बापूंच्या या वाणीने उपस्थित महिला गहिवरून गेल्या...

झुबेना बेगमच्या घरात बापू आल्यावर तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. चरणस्पर्श करण्यासाठी ती वाकली, बापूंनी तिच्या पाठीवर हात ठेवत जे उद्गार काढले ते सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवण्यासारखे आहेत, बापू तिला म्हणाले, "मैं कोई साधू या ज्ञानी आदमी बनकर यहां आया नहीं हुं, आज एक बाप अपने बेटी के घर आया हैं !"
किती उच्च कोटीचे हे विचार आणि किती मोठं हे धाडस ! केव्हढी ही नैतिकता अन किती हा परात्मभाव..

बापूनी अयोध्येस सत्संगास येण्यास राजी असलेल्या स्त्रियांची नावे मागितली अन सर्व जाती धर्माच्या स्त्रियांनी आपली नावे दिली.
अशीही वेश्यांना जात नसतेच. समाजाच्या लेखी त्यांची जात एकच ती म्हणजे मादी ! अन त्यांचा धर्म एकच तो म्हणजे विक्रीस काढलेला देहधर्म.
काल या बुरसटलेल्या संकल्पनांना सुरुंग लावायला एक साधूपुरुष या गल्लीत आले आणि त्यांनी जगापुढे एक नवा विचार मांडला.
म्हणूनच पोस्टच्या प्रारंभी म्हटलंय की कालचा दिवस अभूतपूर्व होता ! अविस्मरणीय होता आणि चिरानंदी होता..
इतक्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण घटनेस वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्यांनी नेहमीप्रमाणे उपेक्षितच ठेवले, अगदी यथातथा प्रसिद्धी दिली.

बापू तुम्हाला मात्र सलाम ! तुम्ही जे केलंत ते अनेकांच्या पचनी पडणार नाही आणि अनेकांना या जन्मात ते जमणारही नाही. तुम्ही मात्र थेट मुलीचा दर्जा देत या दुर्मुखल्या स्त्रियांच्या चेहरयावर जी तृप्तता बहाल केलीय तिला कशाचीही तोड नाही.
एक लिहायचेच राहिले. मुरारी बापूंनी अनेकींना साडी चोळी दिली. त्यांच्या हातून ती वस्त्रे घेताना या बायका इतक्या हेलावून गेल्या होत्या की उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

मला पक्की खात्री आहे की यातल्या अनेक जणी ती साडी कधीच घालणार नाहीत. त्यांच्या जवळच्या सगळया कपडयांच्या चिंध्या झाल्या तरी बापूंनी दिलेली साडी घालून त्या बाजारात कधीच उभ्या राहणार नाहीत मात्र त्यांच्या मरणानंतर त्यांचे सरण जेंव्हा रचले जाईल तेंव्हा चितेवर ठेवताना त्यांच्या कलेवरास नेसवलेली साडी नक्कीच बापूंनी दिलेली ही साडी असेल !

- समीर गायकवाड


Saturday, December 8, 2018

जगभरातील प्रतिभावंतांनी झापडबंद चौकटी मोडल्यात, आपले काय ?


वर्ष संपत आलं की विविध क्षेत्रातील लोक सरत्या वर्षात त्यांच्या प्रांतात झालेल्या घडामोडींचा आढावा मांडू लागतात आणि त्यातील तपशीलवार निष्कर्षावरून हे वर्ष त्या क्षेत्रास कसे गेले याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. यातली व्यक्तीसापेक्ष मतभिन्नता वगळल्यास अनुमान बहुतांश समान येते. सर्वच क्षेत्रातील वर्षभराच्या आलेखाचे एकत्रीकरण केल्यास जगभराच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि पारलौकिक कलाचे एकसंध चित्र समोर येते. लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे याचे हे प्रतिबिंब असते. यंदाच्या वर्षी साहित्य- चित्रकृतींच्या प्रतिभाविष्कारात जगभरातल्या विविध भाषांतून मर्मभेदी विषयांवर नेटके भाष्य केलं गेलंय. अडगळीत पडलेले वस्तूविषय केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय यामागच्या प्रतीभावंताना द्यावे लागेल. मानवी जीवनाच्या विस्तृत पटात रोज नजरेस पडणारे तरीदेखील दखल न घेतले गेलेले अनेक घटक, घटना आणि विषय अत्यंत भेदक पद्धतीने यात मांडले गेलेत.


Friday, December 7, 2018

टुमारो नेव्हर कम्स अनटील इट्स टू लेट ! - 'सिक्स डे वॉर' बाय 'कर्नल बॅगशॉट'...

'सिक्स डेज वॉर' - एका ऐतिहासिक लढाईवरचे अर्थपूर्ण गाणे.... 
जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्त्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं आणि अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात रोज चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. ज्यूंना कधी काळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका आकृतीबंधातून आकारास आली होती. या भूमीचा इतिहास सांगतो की कधी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. विशेष म्हणजे दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम. आताच्या स्थितीत ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या अविरत संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. असो. तर इस्त्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिक (आताचे ईजिप्त, सिरिया आणि जॉर्डन) यांनी कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.


Monday, December 3, 2018

ठगांच्या दडपलेल्या इतिहासाचे तथ्य...


नुकताच 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सपशेल कोसळला. त्याच्या यश अपयशावर आणि निर्मितीमुल्यांवर खूप काही लिहून झालेय आणि आणखीही लिहिले जाईल. मात्र ठग म्हणजे नेमके कोणते लोक आणि इतिहासात त्यांची दखल कशी घेतली गेलीय यावर पुरता प्रकाश अजूनही टाकला जात नाहीये. याआधी हॉलीवूडनेही 'कन्फेशन ऑफ ठग' या पुस्तकाचा आसरा घेत काही भूमिका चितारल्या होत्या. ब्रिटिश सैन्यातला अधिकारी विल्यम हेन्री स्लीमनने १८३५ मध्ये चतुर्भुज केलेल्या ठग राजा सईद आमीर अली उर्फ 'फिरंगिया' याच्या कबुलीजबाबावर हे पुस्तक आधारले होते. फिलिप मिडोज टेलरने लेखन केले होते. आजवर ठगांवर आलेले चित्रपट पाहिल्यास आपल्याला ते अतिरंजित आणि भडक, बीभत्स वाटू लागतात.


Thursday, November 29, 2018

अनुवादित कविता - फरिदा शादलु - इराणी कविता

इराणमधील गृहयुद्धाच्या दरम्यान कुठेही कबरी खोदल्या गेल्या, माणसं शक्य तशी दफन केली गेली. त्यात अनेक मृतदेहांची हेळसांड झाली. जमेल तिथं आणि जमेल तेंव्हा कबरी खोदणे हे एक काम होऊन बसले होते. त्या मुळे या कबरी अनेक सार्वजनिक ठिकाणी देखील आढळून येतात. ख्रिश्चनांच्या कबरी जशा मातीवरती उभट आकाराच्या चौकोनी बांधीव असतात तशा या इराणी कबरी नाहीत. या कबरींचा पृष्टभाग सपाट असून जमीनीलगत आहे. क्वचित त्यावर काही आयत लिहिलेल्या असतात. सुरुवातीस नातलग कबरीपाशी नित्य येत राहतात पण गोष्ट जशी जुनी होत जाते तेंव्हा कबरीची देखभाल कमी होते आणि युद्धात, चकमकीत मारल्या गेलेल्या लोकांच्या कबरी असतील तर असला काही विषयच येत नाही. लोक अशा कबरी सर्रास ओलांडत फिरतात, कारण पायाखाली काय आहे हे उमगतच नाही...


Tuesday, November 27, 2018

सोशल मीडियावरील अनसोशल तथ्ये...


राजकारण आणि समाजकारण यासाठी सोशल मिडीया किती वाईट ठरतो आहे हे आजकाल जग अनुभवते आहे. एखाद्या राष्ट्राचा निवडणुकीच्या निकालाचा कल बदलवण्यापासून ते विविध जाती धर्मात तेढ माजवून बेबंदशाहीचं वातावरणास यामुळे चालना मिळाली. सोशल मिडिया किती चांगला वा वाईट आहे यावर आजही मतमतांतरे आहेत. काहींना त्यापासून वैयक्तिक, आर्थिक वा सामुदायिक लाभ झालेत तर काहींना त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळालेत जसे की लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्यापासून ते कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची हक्काची व स्वतःची स्पेस मिळाली आहे. सार्वजनिक जीवनात देखील सोशल मिडीयाने चांगले वाईट प्रभाव दाखवले आहेत. मनोरंजन आणि दळणवळणाचे साधन म्हणून सामान्य लोकांच्या आयुष्यात दाखल झालेल्या सोशल मिडीयाचं रुपांतर आता व्यसनात झालेय आणि लोक दिवसेंदिवस त्याच्या खोल गर्तेत लोटले जाताहेत. राजकीय सामाजिक परिमाणे वगळता सोशल मिडीयाचा आणखी एक भयावह चेहरा अलीकडे समोर येऊ लागलाय. तो काळजात धडकी भरवणारा आणि धोक्याची घंटी वाजवणारा आहे. त्यातून मानवता लोप पावून मानवी मुल्यांचा ऱ्हास घडवून आणणारी अनैसर्गिक आणि धोकादायक चिन्हे दिसत आहेत.


Sunday, November 25, 2018

लेस्बियन महिलांचं क्रूर शोषण - इक्वेडॉरमधली छळ केंद्रे !

'कौन्सिल ऑफ हेमिस्फेरिक अफेअर्स'मध्ये १६ जून २०१७ रोजी मार्टिना गुलीमोन यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता तेंव्हा काही मोठ्या जागतिक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत इक्वेडोर सरकारचा निषेध नोंदवला होता. या संशोधन अहवालात अनेक धक्कादायक बाबी लेखिकेने उघडकीस आणल्या होत्या.


Wednesday, November 21, 2018

रेड लाईट डायरीज - शिवम्मा ..वेश्यावस्तीत येणारे अनुभव आणि त्यांच्या कथा यावर आपल्याकडं फारसं बोललं वा लिहिलं जात नाही. मुळात अश्या वस्त्यात जाऊन आल्याचं कळू नये याकडे तिथं जाणाऱ्यांचा कल असतो. हा सगळा छुपा मामला असतो असं म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे शरीरधर्माच्या आणि व्यभिचाराच्या ज्या व्याख्या आहेत त्या इतक्या चौकटबंद आहेत की सेक्स आणि शरीरसंबंध यावर खुली चर्चा कधीच होत नाही. पांचट विनोद मात्र नॉनव्हेज जोक्सच्या नावाखाली शेअर होतात. लपून छपून लगट करणे, वासना शमवणे यावर आपला जास्त भर असतो. खुलेपणाने शरीरधर्माच्या वा देहभुकेच्या गोष्टींवर आपण व्यक्त होणं तर सोडा साधं मतही कुणी नोंदवत नाही. बंद खोलीआडची गोष्ट आहे ही यावर काय बोलायचं, काय लिहायचं असं म्हणत म्हणत राहत छुपेपणाने व्यभिचार करत राहायचं आणि स्त्रियांचं शोषण करत राहायचं हा आपल्या समाजाचा छद्मभाव आहे. त्यामुळे जेंव्हा या विषयावरील लेखन मी सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रिया विविध स्तरावरील आक्रोशाच्या होत्या. त्यात भावनिक पातळयांचा दोलायमान लंबक होता. सोबत काही झारीतले शुक्राचार्यही होते. यातले काहीजण अशा पोस्टवर येऊन टवाळकी करायचे तर काही इनबॉक्समध्ये येऊन पुळचटपणा करत. तोंडाला येतील ते आरोप करत, आपल्या मनातली गरळ ओकताना माझ्या अंगावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत. सेक्स आणि धर्मभेद यांचाही संबंध जोडायचा विकृत प्रयत्न काही महाभागांनी केला होता. लोकांना आपल्या डोक्यातलं विष दुसऱ्याच्या डोक्यात भिनवण्यात खूप मजा येत असावी. अशाच माझ्या एका मित्राने इनबॉक्समध्ये देशभर गाजलेल्या एका मोठ्या बलात्कार प्रकरणानंतर मला खुनशीपणाने विचारले, 'तुम्ही अमुक एका बलात्कारावर खूप व्यक्त झालात आणि तमुक एका बलात्कारावर कमी व्यक्त झालात. असं का ?”
त्याचा प्रश्न वाचून काही क्षण मी अबोल झालो.रेड लाईट डायरीज : योगायोग...


२००६ची गोष्ट असेल. बिस्मिल्ला आणि सुरेखा. दोघी कामाठीपुऱ्यातल्या बायका. तेराव्या लेनमधील सुलेमान बिल्डींगमध्ये त्यांचा कुंटणखाना होता. बिस्मिल्ला काळया तुकतुकीत कायेची, डबल हाडाची, ठेंगण्या बांध्याची, मजबूत देहयष्टीची होती. गोल चेहरा, अपरे नाक, अरुंद कपाळ, मिचमिचे डोळे आणि ओठांच्या रेखीव पाकळ्या. तिचे कुरळे केस वाऱ्याने उडू लागले की कानातले झुबे लकलक हलत. कपाळावरची कुरळी महिरप सरली की मागं नागिणीगत जाड पेडाची वेणी बांधता येईल असा केशसंभार होता. तिनं केस मोकळे सोडलेले असले की ती आणखीच रासवट वाटायची. बहुतेक करून दररोज दुपारी ती केस खुले सोडून सज्जातल्या खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यावर छुपी पाळत ठेवून बसलेली असे.


Sunday, November 11, 2018

'आणि' नव्हे 'सर्वस्वी' काशिनाथ घाणेकर !

डॉक्टर काशिनाथ घाणेकर 
एक काळ होता जेंव्हा मराठी रंगभूमीवरील कोणत्याही नाटकाची जाहिरात करताना त्यातल्या श्रेयनामावलीत प्रमुख अभिनेत्याचे नाव सर्वाआधी असायचे त्यानंतर दुय्यम भूमिकेतील अभिनेत्याचे आणि तत्सम क्रमाने उर्वरित नावे लिहिलेली असायची. हा एक अलिखित नियम होता. यावरून नाटकात कोण कोण काम करतंय याचा अंदाज येई. पण या परंपरेला छेद दिला डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी. त्यांची प्रमुख भूमिका असलेली नाटकं जेंव्हा रंगभूमीवर आली तेंव्हा तिच्या जाहिरातीत सर्व अभिनेते- अभिनेत्रींचा उल्लेख भुमिकेनुसार असे मात्र त्या नामावलीच्या अखेरीस '..... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' असं लिहिलेलं असे. असा बोर्ड नाट्यगृहाबाहेर लागलेला दिसला की तिकीटबारीवर लोकांच्या उड्या पडत. झुंबड उडे. बघता बघता तिकीट संपून जात आणि हाऊसफुल्लचा बोर्ड झळके.


Saturday, October 27, 2018

सत्तेच्या विरोधातील आवाजाच्या दडपशाहीचे नवे स्वरूप'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.


Friday, October 26, 2018

मुस्तफा...


मुस्तफा...  लेखक - समीर गायकवाड  

माझ्या एका मित्राचे देशी दारूचे दुकान आहे. आमचे जुने घर जिथे होते तिथे वाटेवरच हे दुकान आहे. दुकान कसले गुत्ताच तो. मित्राचं अख्खं कुटुंब त्या दारू गुत्त्यावरच अवलंबून होतं. त्याचं घर ही शेजारी म्हणावं इतकं जवळ होतं. किशोर वयात त्यांच्या घरात अनेक वेळा आमचा राबता असे. कधी कधी त्याच्या बरोबर दुकानात ही जाणं व्हायचं. तेंव्हा त्यातलं काहीच कळत नव्हतं. अत्यंत उग्र आंबट गोड वासाने आतला सगळा परिसर ग्रासलेला असे. चिलबटलेल्या मळकट कपड्यातली खंगून गेलेली माणसंच बहुत करून तिथं पिण्यासाठी आलेली असायची. स्त्रिया आपलं दुःख रडून वा इतरांपाशी बोलून सहज व्यक्त करतात पण सर्वच पुरुषांना हे जमते असं म्हणता येणार नाही, जे संसाराच्या शर्यतीत मागे पडतात, जे आयुष्याचा डाव हरतात, ज्यांची स्वप्ने चक्काचूर होतात, ज्यांच्या घरी हाताची पोटाची गाठ पडत नाही, जे आपल्या घरी रिकाम्या हाताने जातात, ज्यांना समाजाने धुत्कारलेलं असतं, ज्यांचं बहकलेलं पाऊल कधीच सावरू शकलेलं नसतं, ज्यांचा आयुष्याचा शोध कधीच संपलेला नसतो अशा किती एक गाऱ्हाण्यांनी त्रासलेल्या पुरुषांना दारूत आपलं दुःख रिचवावं वाटतं, आपल्या व्यथा वेदना दारूच्या नशेत विसराव्याशा वाटतात, आपली हार आपली कमजोरी आपला कमकुवतपणा दारूच्या कैफात बुडवावा असं वाटू लागतं आणि या अशा हरलेल्या, झिजलेल्या, दुभंगलेल्या, कोलमडून पडलेल्या माणसांचा जत्था तिथं दिवसभर पाझरत राहायचा.


Tuesday, October 16, 2018

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'


Saturday, October 13, 2018

ग्लोबल वॉर्मिंग : अर्थकारणात नव्या संकल्पना

ग्लोबल वॉर्मिंग - अर्थकारणात नव्या संकल्पना

दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नवनव्या विषयावरील चर्चांना वाव मिळतो वा कधी कधी वादाला नवा विषय मिळतो. यंदा साहित्यातील कामगिरीबद्दलचा नोबेल जाहीर झालेला नाही हा वादाचा विषय होता होता राहिला तर यंदाच्या अर्थशास्त्रातल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे वाचून काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी समाधान व्यक्तवले. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज' नावाने ओळखला जातो. यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम नॉर्डस, पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांत विभागून दिला जाणार आहे. पुरस्काराच्या रुपाने त्यांना ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळतील. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेत्यात अमेरिकनांचा दबदबा कायम राहिलाय, हे वर्षही त्याला अपवाद नाही. विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर हे दोघेही प्रज्ञावंत अमेरिकन आहेत. नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही त्यांनी येल विद्यापीठातूनच घेतले आहे. तसेच प्रतिष्ठित मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी पीएचडी केली आहे. तर पॉल रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक आहेत. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो या विषयावरती संशोधन केलं आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले आहेत. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्या नावाची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रस्तावना महत्वाची आहे. त्यात म्हटलंय की, "जगापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या या जटील आणि महत्वाच्या प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. सर्वंकष व्यापाराच्या बाजाराचं आर्थिक आकलन आणि निसर्गाचे स्वरूप यांच्यातल्या पूरक नात्याचा आर्थिक सूत्रांचा आराखडा यांनी मांडला आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निर्दालन करताना शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."


Saturday, October 6, 2018

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो..


Wednesday, October 3, 2018

रेड लाईट डायरीज - झोपेतून जागे होणार तरी कधी ?


रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते.
युनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका - कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे.
त्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग हे मुख्य पुरवठादार जिल्हे आहेत आणि मुंडा, संथाल व ओरावो या आदिवासी जमातीतील बायका मुली प्रामुख्याने खरीद फरोक्त केल्या जातात.


Tuesday, October 2, 2018

#रेड लाईट डायरीज - मुन्नीबाई ...

#रेड लाईट डायरीज
अशीच कथा मुन्नीबाईची. मराठवाडयातल्या नांदेडची. बाप लहानपणीच मेलेला. पाच भावंडे घरात. चुलत्याने आईला मदत केली पण रखेलीसारखं वागवलं. चार पोरी आणि एक अधू अपंग मुल यांच्याकडे बघत ती निमूट सहन करत गेली. माहेरची परिस्थिती इतकी बिकट की तेच अन्नाला महाग होते. मग ही पाच तोंडे घेऊन तिकडे जायचे तरी कसे. त्यापेक्षा मिळेल ते काम करत देहाशी तडजोड करत मुली मोठ्या होण्याची वाट बघण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. एकदा चुलत्याने आईपाठोपाठ मुलीवरही हात ठेवला.


Sunday, September 30, 2018

बदनाम गल्ल्यांचा अक्षर'फरिश्ता' - मंटो !


सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !


Saturday, September 29, 2018

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...

जगजीत आणि चित्रा सिंग -

नियती कुणाबरोबर कोणता डाव खेळेल हे कुणी सांगू शकत नाही. आता जो क्षण आपण जगतोय तेच जीवन होय. त्यात आनंद भरणे हे आपलं काम. सर्वच लोकांना हे सहजसाध्य होत नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो तर काहींच्या आयुष्यात सुख दुःखाचे इतके हिंदोळे येऊन जातात की त्यांचं जीवन दोलायमान होऊन जातं. आत्मिक प्रेमाने त्यावर मात करता येते. असंच चढ उताराचं, सुख दुःखाच्या भरकटलेल्या आलेखाचं जीवन विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग ज्या स्वतः एक उत्कृष्ट गझल गायिका होत्या, त्यांच्या वाट्याला आलं. त्यांच्या आयुष्याचा हा धांडोळा.


Wednesday, September 26, 2018

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...
भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.Saturday, September 22, 2018

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.


Monday, September 17, 2018

कैफ...ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.


Saturday, September 15, 2018

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.


Tuesday, September 11, 2018

अनटोल्ड अरनॉल्ड - अरनॉल्ड श्वार्झनेगरची दास्तान..


अरनॉल्ड श्वार्झनेगरचे आयुष्य जितक्या प्रकाशझोतांनी भरलेले आहे तितक्याच काळोखानेही त्याला ग्रासले आहे. एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तिच्या लाईमलाईटबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागते, मात्र त्याच वेळी तिच्या आयुष्याच्या एका कोनाड्यात बंदिस्त असलेल्या दुःस्मृतींना हात लावण्यास कुणी धजावत नाही. संवेदनशील आणि सच्च्या मनाच्या व्यक्ती स्वतः होऊनच काळाच्या पडद्याआड दडलेल्या या अंधारल्या गोष्टींना जगापुढे आणतात. त्यावर खुल्या मनाने व्यक्त होतात. त्यासाठी खूप मोठं मन आणि धाडस लागतं. अरनॉल्डसारख्या बलदंड बलशाली व्यक्तीसदेखील सुरुवातीला ते नीट जमलं नाही परंतू काही काळ गेल्यावर त्याला सत्य पचवता आलं आणि जगापुढे मांडता आलं.


Saturday, September 8, 2018

माऊलीची कृपा..


एकत्र कुटुंब पद्धतीच्या संस्कारात वाढलेल्या आमच्या कुटुंबात मला सात चुलते होते. त्यातलेच एक बापूसाहेब, ज्यांना आम्ही सगळी भावंडं बापूकाका म्हणत असू. परवा संध्याकाळी त्यांचे दुःखद निधन झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे आमचं गाव. माझ्या या काकांचं जगणं खूप काही भव्य दिव्य वा उत्कट विराट नव्हतं पण त्यांना जो कुणी भेटेल त्याला कायमचं काळजात सामावून घेणारं कमालीचं मायाळू होतं. गावातल्या छोटेखानी शाळेत इतर सर्व भावंडे शिकली सवरली पण बापूकाकांना मात्र पाटीपेन्सिलीवर जीव लावता आला नाही. त्यांचा सगळा जीव शेतीवाडीवर. शेतातली पानंफुलंही त्यांना बघून खुश होत असावीत, बांधावरच्या बाभळीही त्यांच्या गंधाने भारीत होत असाव्यात अन त्यांच्या स्पर्शाला काळी आईही आसुसलेली असावी. आजोबांनी त्यांना शाळेत पाठवलं की ते परस्पर निघून जात आणि कधी शेणाच्या गोवऱ्या थापायला जात तर कधी गुरे वळायला जात.


Wednesday, September 5, 2018

गोष्ट कुळकर्णी मास्तरांच्या शाळेची...


गावाकडच्या प्राथमिक शाळेत नारायण कुळकर्णी नावाचे एक मास्तर होते. त्यांची तऱ्हाच न्यारी होती. त्यांच्या वर्गातल्या ज्या पोरांनी मधल्या सुट्टीत खायला आणलं नसेल त्यांना त्यांच्या स्वच्छ नक्षीदार शबनम बॅगेतून आणलेल्या दोन डब्यातलं चवदार जेवण थोडं थोडं करून वाटायचे. ज्या पोरांना खाऊ घालत ती पोरं अभ्यासात चुकली तर तळहात लालबुंद होईस्तोवर पट्ट्या मारत पण चुकीला माफी देत नसत आणि माया करतानाही हात आखडता घेत नसत. पांढराशुभ्र सदरा, करकचून बांधलेलं दोन सोग्याचे स्वच्छ धोतर आणि करकरा वाजणाऱ्या कोल्हापुरी चपला. चापून चोपून तेल लावलेल्या केसांचा तरवारीसारखा विंचरलेला भांग. विस्तीर्ण गोऱ्या भालप्रदेशावर अष्टगंधाचा टिळा, तरतरीत नाकडोळे आणि टोकदार दाट मिशा. धनुष्याकृती भुवयांवर विराजलेल्या सोनेरी काड्यांच्या फ्रेममधील चष्म्याआडचे त्यांचे करारी डोळे जरब निर्माण करत, कधी कधी त्यात पाणीही तरळलेले दिसे. त्यांच्या गळ्यातल्या लालसर दोऱ्याला काहीतरी लटकवलेलं होतं ते कधी नीट दिसलंच नाही. त्यांचे चढ्या आवाजातले कडक, स्पष्ट उच्चार कानाला गोड वाटत. ते कविता ताल लावून म्हणत आणि इतिहास शिकवताना त्यात इतके दंग होत की आता वर्गातच समरांगण उभं ठाकतेय की काय असे वाटू लागे. ते जीव तोडून गणिते शिकवत पण आमचा आडच इतका कोरडाठाक होता की त्यात कितीही पाणी ओतले तरी जिरूनच जाई. तोडक्या मोडक्या साहित्यावरती ते विज्ञानाचे प्रयोग शिकवत, कधीकधी काही साहित्य त्यांनी पदरमोड करून आणलेलं. परीक्षा जवळ आली की पोरांऐवजी तेच चिंताक्रांत दिसत आणि मग कच्च्या पोरांचे ते ज्यादा तास घेत असत, प्रश्नोत्तरे सोडवून घेताना दिसत. अशा वेळी खोड्या करणाऱ्या पोरांचा कोंबडा करून त्याला तासंतास उभा करत. नारायण मास्तर कधीही दाढी वाढलेल्या वा मळकटलेल्या कपड्यात दिसलेच नाहीत. ते झपाझपा चालत जाऊ लागले की त्यांच्यासोबत चालणारा दमून जाई.


Saturday, September 1, 2018

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.


Saturday, August 18, 2018

महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !

वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !


Wednesday, August 15, 2018

'परमाणू' - पोखरणच्या अणूचाचणीचा सोनेरी इतिहास..बरोबर २० वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. याच घटनेवर आधारित 'परमाणू' या चित्रपटाचे 'झी सिनेमा'वर आज स्क्रीनिंग आहे. #indibloggerSaturday, August 11, 2018

रेड लाईट डायरीज - नवरा की दलाल ?


दिल्लीच्या जी.बी.रोडवरील रेड लाईट एरियातली आजची घटना.
पानिपतमध्ये राहणाऱ्या सद्दाम हुसेन याने पहिली पत्नी हयात असताना धोकाधडी करत गुपचूप दुसरा निकाह केला होता. तिच्याशी पटेनासे झाल्यावर तिला फिरायला नेतो असं सांगत त्याने थेट जी.बी.रोडवर आणलं. तिथल्या चलाख दलालांनी त्याला बरोबर हेरलं. त्याच्याबरोबरचं 'पाखरू' काय किंमतीचं आहे हे त्यांना नेमकं ठाऊक होतं पण सद्दामला बाई किती रुपयात विकायची हे माहिती नव्हतं. त्यानं बायकोची किंमत दिड लाख रुपये सांगितली. दलाल मनातल्या मनात खूप हसले असतील. काहींनी त्याच्याशी बार्गेन करून पाहिलं. पण सद्दाम आपल्या 'बोली'वर ठाम होता. शेवटी त्याच्यामुळे नसते वांदे होतील म्हणून काही दलालांनी त्याला हुसकावून लावले.Wednesday, August 8, 2018

करुणानिधी - द सुपर थलैवा...


दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील व त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो देखील काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होत असतं. एकमेकाशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी एका पाठोपाठ एक गेले. दोघांनी एकमेकांना इतके पाण्यात पाहिले होते की सत्तेचा लंबक आपल्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित द्वेषमूलक प्रवृत्ती म्हणून दक्षिणेत रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.पिशवीसूत्रखरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.Saturday, August 4, 2018

नव्या युरेशियाची रचना कितपत शक्य ?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, लहरी, एककल्ली आणि मुजोर स्वभावाचे असून त्यांची विचारधारा उजवीकडे कललेली आहे असं वॉशिंग्टन पोस्टने त्यांची उमेदवारी पक्की होताच म्हटले होते. काहींनी हे टीकेचे सुरुवातीचे स्वर कायम ठेवले तर काही ट्रम्प यांच्यासमोर नमले. आपल्यावर टीका करणाऱ्या मिडीयाचा समाचार घेताना तोल ढासळलेल्या ट्रम्प यांनी हे सर्व लोक ‘देशद्रोही’ असल्याची टीका नुकतीच केलीय. ट्रम्प यांचा तीळपापड होण्याचे ताजे कारणही तसेच आहे. ‘द्वेषमूलकतेने ठासून भरलेल्या तथाकथित राष्ट्रवादी लोकांच्या पाशवी समर्थनाच्या आधारे सत्तेत आलेल्या अमेरिकेच्या उद्दाम नेतृत्वास तुम्ही नमवू शकत नसाल तर तुम्ही त्यांचे जागतिक राजकीय महत्व कमी करून त्यांना शह दिला पाहिजे’ अशा अर्थाचे लेख मीडियात साधार मांडणीतून प्रसिद्ध केले जाऊ लागलेत. यातीलच एका लेखात ट्रम्प यांची दादागिरी कमी करण्यासाठी चीन आणि युरोपने एकत्र येऊन नव्याने युरेशियाची सूत्रे जुळवण्यावर प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे 'द इकॉनॉमिस्ट'नेही यावर भाष्य केलंय. या विचारांची ट्रम्प प्रशासनाने सवयीप्रमाणे टवाळी केली. पण यामुळे एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला ज्याची सुरुवात रॉबर्ट कॅपलेनयांच्या एका पुस्तकाने केली होती.


Saturday, July 21, 2018

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर....


जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.


Thursday, July 19, 2018

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये काल पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.


Tuesday, July 17, 2018

'रिती' राहिलेली रिता भादुरी...


पहाटे रिता भादुरीचे निधन झाले आणि दुपारी अंधेरी चकाला येथील पारशीवाडीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मोजून तीस माणसे असावीत, त्यातही इंडस्ट्रीतली फक्त पाच माणसे होती. सोशल मिडीयावर आरआयपीचे कोरडे संदेश झळकले नाहीत की भावपूर्ण श्रद्धांजलीचा पूर आला नाही. फोटोही दिसले नाहीत की पोस्टही नाहीत. बॉलीवूडवाल्यांचे तद्दन बेगडी ट्विटसही पाहण्यात आले नाहीत. पायलीला पासरीभर माणसे जिथं रोज मरतात तिथे कुणाच्या खिजगणतीत नसलेली एखादी अभिनेत्री निवर्तल्यानंतर तिच्या शोकसंदेशासाठी लोकांनी का आपला वेळ खर्ची घालावा ?


बायोपिक्समागचे गिमिक्सनुकतेच हिरानींच्या कृपेने 'संजू'चे किटाळ धुवून झालेय. आता या शृंखलेतील पुढील मान्यवर आहे सनी लिऑन. 'अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिऑन' नावाची तिच्या जीवनावर आधारित वेबसिरीज येऊ घातलीय. तिचे ट्रेलर रिलीज झालेय. यातल्या तुकड्यानुसार व याही आधी तिच्यावर लिहिल्या गेलेल्या कंटेंटनुसार कुमारवयातच तिची व्हर्जिनिटी कशी नष्ट झाली, अचानक ओढवलेल्या आर्थिक ओढाताणीचा तिच्यावर झालेला परिणाम आणि 'इझी मनी'चा तत्काळ उपलब्ध असलेला पर्याय म्हणून तिने स्वीकारलेलं पॉर्न स्टारडम, त्यात पैसे, नाव-कीर्ती (?) कमावल्यानंतर तिला मायदेशी परतावेसे वाटणे, बॉलीवूडमध्ये काही तरी करून दाखवण्याच्या जिद्दीने भारतात येणे, काही सिनेमे आणि जाहिरातीत काम करून झाल्यावर झटपट प्रसिद्धी मिळवून देणारी समाजसेवेची व्रते स्वीकारणे असा तिचा प्रवास आहे. हे सर्व करत असताना प्रेम आणि तिरस्कार (हेट्रेड) या दोन्ही भावनांनी तिचे जीवन व्यापून गेले वगैरे वगैरे...Saturday, July 14, 2018

नासाची सूर्यावर स्वारी ...


आकाशांत सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असतो. तर ज्याला आपण दीर्घिका म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. हा असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेला आहे. तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप ढगासारखा पदार्थ. आपली सूर्यमाला मिल्की-वे(आकाशगंगा) नावाच्या दिर्घिकेत आहे. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. यानुसार एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. भोवतालच्या तारकासमूहातील ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे सूर्य तयार झाला.

''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्यच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. या अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.Monday, July 9, 2018

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.Saturday, July 7, 2018

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.Wednesday, July 4, 2018

रेड लाईट डायरीज - मुजऱ्याच्या पाऊलखुणा...मुजऱ्याच्या पाऊलखुणा...      


बहुतांश लोकांना वाटते की, वेश्यावस्तीत राहणाऱ्या सर्व बायका देहविक्रय करत असाव्यात. हे म्हणजे कंट्री बारमध्ये कुणी पाणी जरी प्याला तरी लोकांनी मात्र त्याने दारूच ढोसली असे समजावं तसं आहे.असो. उत्तर भारतातील सर्व मुख्य शहरातील वेश्यावस्त्यांत देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांव्यतिरिक्त नाचगाणं करणाऱ्या कलावंतीणी आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ, जालंधर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, वाराणसी, झांशी, दरभंगा, बिलासपूर, भोपाळ अशी अनेक नावं आहेत. आपल्याकडे चक्क मुंबईच्या कामाठीपुऱ्यातल्या अकराव्या लेनमध्ये एका इमारतीत अगदी देखणं नाचगाणं सादर होतं. बॉलीवूडमधल्या हिरॉइन्स झक माराव्यात अशा लावण्यवतीही इथे आढळतात. असं सांगितलं जातं की 'मुकद्दर का सिकंदर'चा पूर्ण स्टोरीप्लॉट आणि रेखाने साकारलेली जोहराबाई ही इथलीच देण आहे. असो.. इथलं नाचगाणं जरी अप्रतिम असलं तरी ते देहमिलनाच्या वाटेवरचे नाही हे नक्की..

इथं आधी चिकाचे पडदेही होते, नंतर मण्यांचे पडदे आले, आता काही मोजक्याच घरात पडदा आहे. बाकी कुठे पडदा नाही. पहिल्यांदा अशाच एका पडदानशीन घरात गेल्यावर वादक मंडळी, गायिका आणि कोठेवाली मालकीण हे सर्व बिऱ्हाड पडद्याबाहेर होतं आणि त्या तलम पडद्याआड एक खाशी लावण्यवती होती.
आधी एकदोन चीजा सुनावून झाल्या, एक मुजराही झाला मग गायिकेने विचारले, "क्या सुनना पसंत करोगे ?".
माझं ध्यान जागेवर नव्हतंच मुळी, डोक्यात नेहमीप्रमाणे दुसरेच विचार सुरु होते.
मग न राहवून पडद्याआडच्या त्या रूपगर्वितेच्या कंठातून कोमल स्वर बाहेर पडले, "कुछ फर्माईये तो सही.."
काळजातून सुरा आरपार जावा पण कळ न यावी इतकी मधाळ धार त्या आवाजाला होती !

एक सेकंद काही सुचले नाही, सावध झाल्यावर तिला म्हटलं, "एक शेर अर्ज करना चाहता हूं.'
माझ्या अवताराकडे बघून मी शायरी वगैरे काही करत असेन यावर त्यातील कोणाचाही तीळमात्र विश्वास नसावा हे त्या सर्वांच्या प्रश्नांकित मुखकमलाकडे बघताच कळले.
त्यांचा मुद्दा ओळखत मी पुस्ती जोडली. "कलाम मेरा नही दाग जी का है, अपने दाग देहलवीजीका !"
आतून तो जीवघेणा नाजूक आवाज आला -
'इर्शाद !!"
मग काय 'दास रामाचा हनुमंत नाचे' या उक्तीचा आधार घेत मी आज्ञापालन केले आणि शेर सुनावला -
"ख़ूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं
साफ़ छुपते भी नहीं सामने आते भी नहीं... "

शेर ऐकताच टपाटप हिरेमोती पडावेत तसं खळखळून ती सौदर्यवती हसली. तिथला माहौलच बदलला.... हिराबाईची गाठ या लोकांनी घालून दिली. माझं मोठं काम एका शायराच्या शायरीने केलं. सीमाब अकबराबादींच्या शायरीचे स्मरण करताना ही आठवण होतेच. तसं बघितलं तर निगुतीने मुजऱ्याचा इतिहास शोधत बसलं तर शेकडो पाने लिहून होतील. पण रेड लाईट एरियाचा पूर्वी असलेला संबंध इतकाच मुद्दा समोर ठेवून काही बाबी मांडता येतील.

१९३० च्या आसपास विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी 'हिंगेर कचोरी' (हिंगांची कचोरी) ही कथा लिहिली. त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी आणि कथेच्या लेखनानंतर ४० वर्षांनी त्यावर अरविंद मुखर्जी यांनी 'निशी पद्मा' हा बंगाली सिनेमा बनवला. सिनेमा खूप चालला, त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित 'अमर प्रेम' बनवला. यातला राजेश खन्नाने साकारलेला आनंदबाबू आणि शर्मिला टागोरने साकारलेली पुष्पा विसरणं अशक्य गोष्ट आहे.

विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या आयुष्यात इतके चढ उतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर एका वर्षात निवर्तली. तेंव्हा त्यांचे वय होते १९ वर्षे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना तारादास नावाचा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर ४ वर्षांनी आताच्या झारखंडमधील पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे त्यांचे १९५१ साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ २७ वर्षे ते विधुर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले. त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

कोलकत्याच्या बदनाम गल्ल्यात 'हिंगेर कचोरी' मधील अनंग बाबू त्यांना वास्तवात भेटला होता. त्याचा जीव की प्राण असलेली पुष्पा तिथेच गवसली होती. विभूतीभूषणनी त्यांना नानाविध रंग चढवत आपल्या कथेत गुंफले. कोलकत्यात एकोणीसाव्या शतकात दोन प्रकारच्या वेश्या होत्या, एक देहविक्रय करणाऱ्या आणि दुसऱ्या कोठेवाल्या. यातल्या कोठेवाल्यांचा शोध प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी देखील घेतला होता, दरम्यान काही काळातच त्यांचे निधन झाले. पण 'प्यासा'त याची एक झलक दिसते. विभूतीभूषणना या कोठेवाल्या पुष्पाने भुरळ पाडली आणि त्या दरम्यान त्यांना मानहानी सहन करावी लागली. कोलकत्यात असलेल्या कोठेवाल्या तवायफ स्त्रियांत देखील वर्गवारी होती. याचा उल्लेख 'पाकिजा'त छुप्या पावलांनी येतो. मुजरा करणाऱ्या स्त्रियांची मूळ गावे आणि त्यांच्या मालकीणींचे कुळ यावर ही वर्गवारी ठरायची. यात बहुतांश बोलीभाषा आणि उर्दू - हिंदीतील गायकी सादर व्हायची. जिचा क्लास उंचा असे तिच्याकडे येणारा कदरदानही श्रीमंत असे असा सारा मामला होता. बिहार, झारखंड, स्वातंत्र्यपूर्व भारतातील पूर्व बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश येथून या कोठ्यांच्या मालकिणी तिथे आल्या होत्या आणि तिथे येऊन त्यांनी आपले बस्तान मांडले होते. काहींचे कोठे हवेलीवजा उंची होते. या सर्व स्त्रियांचे मूळ शोधायला गेलं तर ते लखनौमध्ये सापडतं. तिथून या स्त्रिया विस्थापित होत वेगवेगळ्या प्रांतात स्थायिक होत गेल्या.

मुजऱ्याचा इतिहास मुघलांपासून सुरु होतो. जयपूरमध्ये सर्वात आधी मुजरा सादर केले गेले. तिथे त्याचे स्वरूप कौटुंबिक आणि राजेशाही थाटाचे होते. कथक नृत्यशैलीला ठुमरी आणि गझल गायकीची जोड दिली गेली आणि मुघलांनी आपल्या दिवाणखान्याची शान वाढवण्यासाठी मुजरा वरती उत्तरेत आणला. बहादूरशहा जफरच्या काळात याचे खूप पेव फुटले होते. मुजरा सादर करणाऱ्या कलावंतीणी स्त्रियांची सुरुवातीची माहिती सांगते की, आईकडून मुलीला ही कला वारसा हक्कात दिली जायची. कोठ्याची मालकी देखील सोबतच यायची. विविध कदरदान लोकांसमोर कला सादर करताना कधी कधी त्यांचे बीज यांच्या गर्भात रुजायचे. त्याला टाळता येणं जवळपास अशक्य नसलं तरी कठीण होतं, पण सर्वच कोठेवाल्या याला राजी नसत. मग जी स्त्री अंगाला हात लावू देत नसे तिचा मुक्काम एका जागी टिकतच नसे. शेवटी कंटाळून तिला कुणाचा न कुणाचा आश्रय घ्यावा लागे.

लखनौ आणि बनारस ही मुजरा कलावंतांची दोन प्रमुख केंद्रे झाली. त्यातल्या बनारसमधल्या अदाकारा गंगेकाठची एकेक नगरे पार करत कोलकत्यात जाऊन वसल्या. पुष्पा ही त्यातीलच एक होती. असं असलं तरी या बायकांकडे जाणं म्हणजे खूप मोठं लांच्छन समजले जाई. त्यामुळे मोठमोठे आमीरजादे इच्छा असूनही त्यांच्या दारी जात नसत पण छुप्या पद्धतीने त्यांच्या मैफली आपल्या इलाख्यात भरवत, त्याचा आनंद घेत. बऱ्याचदा एखाद्या धनिकास पसंत पडलेल्या कोठेवालीस तो अंगवस्त्र समजून ठेवून घेई, तिची उमर ढळेपर्यंत तिची देखभाल करे. पण सर्वच ठिकाणी असे होत नसे, अनेकदा त्यांना वापरून टाकून दिले जाई. मात्र गायकीवर - नृत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि स्त्री सौंदर्याचे रसिक असलेल्या सर्वसामान्य माणसांनी या कोठ्यांना भरभरून प्रेम दिले.

अनेक दशके हीच परिस्थिती होती. लखनौच्या नवाबपदी आलेल्या शुजाउद्दौलाने हे चित्र पालटले. हा शुजाउद्दौला मराठ्यांच्या इतिहासात आढळतो. अहमदशहा अब्दालीच्या खांद्याला खांदा लावून त्याने पानिपतमध्ये मराठ्यांचा दुर्दैवी पराभव केला होता. याच शुजाचा इंग्रजांनी बक्सरच्या लढाईत १७६४ मध्ये दारूण पराभव केला होता. या लढाईने इंग्रजांचा पाया बळकट झाला होता. हा शुजाउद्दौला एका वेगळ्या कारणाने लखनवी इतिहासात प्रसिद्ध झाला, तो इतिहास म्हणजे त्याचा बायकांचा शौक ! हा माणूस कमालीचा शौकीन होता, त्याचा हा शौक कधी कधी पिसाटासारखा वाटायचा. हा पहिला नवाब होता ज्याने महालात मजा घेण्याऐवजी कोठेवाल्या बायकांच्या कोठ्यावर जाऊन बसून मैफली लुटल्या आणि शीलही लुटले, पण बदल्यात अफाट दौलतजादा केली !

शुजाउद्दौलाच्या या नव्या पायंडयाने तवायफकडे जाणं हा अमीरांचा रंगीन शौक झाला. धनवानांच्या या शौकाचा उल्लेख 'साहिब बिवी और गुलाम'मध्ये रेहमानच्या तोंडी आहे. रात्रीच्या अंधारात येणारे हौशी लोक किंवा स्त्रीसुखाचा हेतू मनात ठेवून आलेले लोक वा निखळ गीत-संगीत रसिक यांच्या व्यतिरिक्त कोठ्यांवर कोणच येत नसे. शुजाउद्दौलाने या संकेताच्या चिंधडया उडवल्या. ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली आणि अनेक श्रीमंत लोकांनी या गल्ल्यातील देखण्या आणि उच्च वर्गाच्या तवायफ स्त्रियांशी लागेबांधे ठेवले. यामुळे इतरत्रही लोक मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागले. म्हणूनच बहादूरशहा जफरच्या काळात यांना सोन्याचे दिवस आले होते.

हीच टूम कोलकत्यातल्या गल्ल्यात आली तेंव्हा तिथल्या श्रीमंतांनी आपले मोर्चे तिकडे वळवले. याच लोकात एक होता अनंग बाबू, जो विभूतीभूषण बंदोपाध्यायांच्या एकांत सफरीत भेटला असावा. तसेच मुंबईचा कामाठीपुरा अत्यंत भरात होता तेंव्हा तिथल्या १४ लेनपैकी एक लेन खास मुजरावाल्या बायकांची होती. मुजरा-गली असं तिचं नाव होतं. अनेक हिंदी सिनेमात तवायफ आणि कोठ्यांचे विषय मांडले गेले. 'देवदास', 'पाकिजा', उमराव जान', 'जिंदगी या तुफान', 'मुकद्दर का सिकंदर', 'घुंगरू', 'जहां आरा', 'मिर्झा गालिब', 'अमर प्रेम', 'एक नजर', 'शराफत', 'बाजार', 'मंडी', 'आप के साथ', 'चेतना', 'दस्तक', 'रज्जो' इत्यादी चित्रपटात या विषयावर प्रकाश टाकला गेलाय. 'मुकद्दर का सिकंदर'मधील जोहराबाई ही मुंबईच्या बदनाम गल्ल्यांची देण होती.

जी स्थिती कोलकता, दिल्ली, मुंबई आणि लखनौत होती तीच देशातील अनेक छोट्या मोठ्या शहरात होती. आताच्या बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत त्यात ५० रेड लाईट एरिया आढळतात. या पैकीच एक म्हणजे 'चतुर्भुज स्थान' आहे. ह्या अनोख्या नावाचा रेड लाईट एरिया बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातला आहे. मुघलपूर्व काळात इथे भगवान चतुर्भुज यांचे विख्यात मंदिर होते आणि परिसरात त्याचा खासा लौकिक होता. इथल्या लोकसाहित्यात त्याचे उल्लेख आढळतात. मुघल काळात या भागाचे हिमालयन पर्वतरांगांशी असलेलं भौगोलिक स्थान या नात्याने लष्करी तळाच्या सोयीच्या भूमिकेतून पाहिले गेले. याच काळात येथे घुंगरू, तबला आणि हार्मोनियमचे स्वर ऐकू येऊ लागले. बघता बघता ती या भागाची ओळख बनून गेली. हा भाग मुजऱ्यासाठी इतका प्रसिद्ध झाला की प्रसिद्ध साहित्यिक शरतचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांची पारो येथे गवसली. तिचे मूळ नाव होते सरस्वती. त्यांनी तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावले आणि भारतीय साहित्य-कला दालनात अजरामर केले.

मुजफ्फरपूरचे हे ठिकाण हा जणू मुजरा आणि तवायफ यांचा बाजार झाला. पन्नाबाई, गौहरजान, चंदाबाई यांच्या सारख्या नामवंत कलाकार इथे आपली गायकी पेश करून गेल्या. हा बाजार इतका रुजत गेला की इथल्या लोकवस्तीत प्रथाच पडली की इथल्या स्त्रियांना सर्व प्रकारच्या शारीरिक संबंधातून जन्मला आलेल्या मुलींना त्याच धंद्यात परंपरेने आणले जाऊ लागले. खरे तर हा कलंक होता पण लोकांनी त्याला रूढीचे गोजिरवाणे नाव दिले आणि स्त्रियांचे शोषण सुरु ठेवले. स्वातंत्र्योत्तर भारतात इथला मुजरा काळाच्या पडद्याआड होत गेला मात्र स्त्रियांचे भोग काही संपले नाहीत, इथल्या स्त्रिया वेश्याव्यवसायात ओढल्या गेल्या. मुळातच मुजरा, कोठा, तवायफ आणि वेश्या यांच्यातल्या सीमा खूपच धूसर होत्या, भरीस भर म्हणून लोकांचे अनेक प्रवाद आणि किस्से जनमानसात प्रचलित होते त्यांना वेश्यावृत्तीने बळकटी दिली.

२१ व्या शतकात आपल्या देशभरात याच क्षेत्रातल्या मुली डान्स बार कल्चरमध्ये गेल्या आणि डान्स बार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी ब्रिजजवळील जुन्या कॉंग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकवला जातो. मात्र इस २००० पर्यंत आताच्या बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चोबीस परगणा, बार्दवान, बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र सांगायचे झाल्यास बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांची काही संख्या आहे. अन्यत्र त्यांचे अस्तित्व खूप तुरळक आहे. एव्हढेच नव्हे तर अलीकडील हिंदी सिनेमातदेखील मुजरानृत्ये घटत चालली आहेत. कदाचित लोकांना त्यात पूर्वीसारखी आवड राहिली नसावी. डिजिटल युगाच्या करमणुकीच्या व्याख्या वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो. कारण काहीही असले तरी हे प्रमाण खूप कमी झाले आहे हे मान्यच करावे लागेल. एका अर्थाने हे बरे देखील आहे कारण यातून स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषणही व्हायचे, तसेच याच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले. ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य काही कौशल्य नव्हते त्यांच्यावर मात्र या उदासीन वृत्तीमुळे कुऱ्हाड कोसळली. त्यांना उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने निवडला. अलीकडील काळात इंटरनेटसह अन्य अनेक कारणामुळे व मनोरंजनाच्या बदलत्या व्याख्यांमुळे आपल्याकडे तमाशा कलावंतांची जसजशी उपासमार होऊ लागलीय आणि त्यांच्याकडे देहविक्रयाच्या संशयाने पहिले जाऊ लागलेय तसेच काहीसे मुजरा कलावंतांच्या अखेरीस घडले होते. आजही बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तरांचल या भागात चाळीशीत पोहोचलेल्या अनेक वेश्या या कलेच्या ह्याच क्षेत्रातून त्यात ओढल्या गेल्याचे पाहावयास मिळते.

मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहौर मधील 'हिरा-मंडी' मध्ये भरतो. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरा मंडी ही मुजऱ्याची काशी पंढरी होय. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका असलेल्या अनारकलीचे मूळ लाहौरमध्येच सापडते. 'अकबरनामा' आणि 'तुझुक -ए- जहांगिरी' अर्थात 'जहांगीरनामा' या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच १६११ ,मध्ये लाहौर येथे पोहोचला तेंव्हा त्याला अनारकली विषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटीश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे. लाहौरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे.

मुजरा नृत्य करणाऱ्या बायकांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरे तर यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ आणि लाघवी असतात, त्या ही सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात, यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो हे देखील येथे नमूद करावेच लागेल अन्यथा लेख संतुलित होणार नाही. जिथं सामान्य माणसांच्या मनात खोट असू शकते तिथे यांच्या मनात का असू नये ? आपल्यातल्या कुणालाच 'आनंदबाबू' बनायचे नाही पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो हे काळच सांगेल.

'मुक्कद्दर का सिकंदर'मध्ये जोहराबाई एकदा सिकंदरला म्हणते की, "एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है.." आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बीभत्स आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तोकड्या कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालनाऱ्यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी मुजऱ्याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या हे नक्की..

आयुष्यात जेंव्हा कधी पाकिस्तानला जायचा योग येईल तेंव्हा लाहौरच्या 'हिरा मंडी'ला नक्की भेट देईन आणि माझ्या पोतडीत काही नवी चीजा सामील करून घेईन ...

- समीर गायकवाड