शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...



राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो.. ते ऐकताच जीवाबाबू जरासा चमकतो आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या डोळ्यातही चमक दिसते. ती नेमकी ओळखत चौधरी त्याला आपल्या बागानवाडीकडं घेऊन जातो. 'लहर होईल तेंव्हा आपण या गंगेत डुबकी लावून आनंद घेऊ' ही या दोघांची अटकळ असते. बोलत बोलतच ते दोघं बागानवाडीतल्या कोठीवजा घरात शिरतात. समोरच्याच खोलीत पाठमोरी गंगा (मंदाकिनी) तिच्या तान्हुल्या मुलास छातीशी धरून आपलं दुध पाजत असते. त्यांची चाहूल लागताच ती पदर पुढे घेऊन छाती झाकण्याचा प्रयत्न करू लागते. नीच वृत्तीचा वासनांध चौधरी तसाच पुढे जातो आणि कुजकटपणे तिला म्हणतो -"रहने दो. रहने दो, ये सब आखिर कब तक छुपाती रहोगी ? आज नही तो कल ये सब दिखानाही पडेगा.." त्याच्या या टोमण्याने घायाळ झालेली गंगा वीजेसारखी तळपत उत्तरते - "साहब अपनी मां का दुध पिते भी आपने ऐसा ही सोचा था ?" तिच्या तिखट प्रत्त्युतराने कळवळलेला चौधरी तिचे केस पकडून तिला मागे खेचतो. तिचा चेहरा पाहून जीवाबाबू दंग होऊन जातो कारण त्याचा मुलगा नरेन याची प्रेयसी असलेली मुलगी म्हणजेच गंगा असते.... येथून पुढचे सीन सर्वांना माहिती आहेतच....

गंगाला आपल्या मुलाला दुध पाजताना दाखवताना राज कपूरनी कुठलीही लपवाछपवी केलेली नाही. तिचे स्तन त्यांनी सताड उघडे दाखवलेत. मात्र हे दृश्य पाहताना वासना जाग्या होणार नाहीत याची त्यांना पुरती खात्री होती कारण या दृश्यांना अनुसरून असलेले जे संवाद होते त्यात विलक्षण करुण आणि प्रेमरस गच्च ओथंबले होते. त्यामुळे सेन्सॉरनंही याला कुठं आडकाठी लावली नाही. हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे प्रतिभाशाली कवी दिनकर मनवर 'यांच्या पाणी कसं अस्तं...' या कवितेवरून उठलेला गदारोळ. दिनकर मनवर हे संवेदनशील कवी आहेत, त्यांच्या हिंदी मराठी या दोन्ही भाषातील कविता याच्या दार्शनिक आहेत, ही कविता देखील देखण्या आशयाने सजलेली आहे. त्यातली रूपके बोलकी आहेत.

आजवर अनेक कविता, कथा, कादंबरी, शिल्पकृती, चित्ररचना अशा विविध आविष्कारातून मानवी अवयवांच्या विलोभनीयही आणि किळसवाण्याही रचना मांडल्या गेल्यात. त्या त्या कलावंताचा तो प्रतिभाविष्कार होता. राज कपूरच्या 'राम तेरी... 'त गंगाच्या स्तन प्रदर्शनास कुणी आक्षेप घेतले नाहीत वा आजवर अनेक साहित्य / शिल्प/ चित्रकृतीत स्तनांचे संदर्भ आलेत त्यावर कुणी आक्षेप घेतलेले नाहीत मग आताच आक्षेप का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून याकडे पाहिलं पाहिजे आणि कवितेतील शब्दरचनेकडे सौंदर्य दृष्टीने पाहिल्यास आक्षेप आपसूक निकालात निघतात असं मतही अनेकांनी मांडलं. या कवितेत पाण्याच्या वर्णनासाठी कवीने विविध रूपके आणि अलंकार वापरलेत त्यातलाच एक अंश 'आदिवासी तरुणीच्या जांभळ्या स्तनासारखं पाणी' या पंक्तीत मनवर यांनी वर्णिला आहे. त्यांच्या रचनेतील आदिवासी या शब्दाला हरकत घेत अनेकांनी आपल्या भावना दुखावल्याचा आक्रोश करत मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमातून कविता वगळण्याची मागणी केली. काहींनी मनवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रचंड आकांड तांडव झाले. लोकप्रक्षोभ वाढता राहिला, मनवर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली. नुकतेच त्यांनी आपली कविता अभ्यासक्रमातून वगळली जावी असं प्रतिपादनही केलंय. आता कदाचित गदारोळ निवळेल आणि वातावरण शांत होईल. पण याने मूळ प्रश्न सुटला का याचे उत्तर नाही असेच येईल...

दुसऱ्याचे स्तन वा लैंगिक अवयव पाहताना वा त्याचे वर्णन करताना सगळेचजण विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतात. पण तिथं रूपक वापरण्याऐवजी स्वतःचं रक्ताच्या नात्यातलं कुणी असलं तर तेच वर्णन तसेच येईल का याचं संपूर्ण सत्य असलेलं उत्तर मिळत नाही. वरच्या परिच्छेदात 'राम तेरी...' चं उदाहरण त्याचसाठी दिलं आहे. गंगाचे स्तन बघण्यास आसुसलेला चौधरी गंगाने त्याच्या आईच्या स्तनरुपी वात्सल्याचा दाखला देताच चवताळतो. भागवत चौधरी असो वा जीवाबाबू असो त्यांना आपल्या आईच्या स्तनाचे असे उघड प्रदर्शन कधीच आवडलं नसतं. तसंच या प्रकरणातही झालंय. कल्पना करू की, मनवर हेच आदिवासी आहेत, मग त्यांनी असं लिहिलं असतं का - 'माझ्या तरुण मुलीच्या जांभळ्या स्तनासारखं पाणी अस्तं ..'.. माझ्या मते तेच नव्हे तर अन्य कुणी देखील असं लिहीणार नाही. अगदी सआदत हुसेन मंटोदेखील लिहितात - "रंडी का कोई नाम नही होता. उसका कोई अपना अलगसा किरदार नही होता. मगर बिस्तरपर लेटते हुये उसके बजाय उसकी जगह पर कोई अपनी मां बहन को सोच नही सकता, क्योंकी उस वक्त जेहन में सिर्फ और सिर्फ उसका लचीला बदन होता हैं...."..... ग्रीक साहित्यकार सोफोक्लेसनं लिहिलेल्या 'किंग इडीपस' या अजरामर नाटकात आपल्या आईसोबत विवाह करण्याचा शाप लाभलेल्या राजाची कथा आहे. यात स्त्री सौंदर्याची देखणी रसाळ वर्णने आहेत पण ती तटस्थ आहेत. आपल्याच आईसोबत शय्यासोबत करणाऱ्या इडीपसला नंतर वस्तूस्थिती कळते आणि तो मुळासकट हादरून जातो. त्याला इतका मोठा धक्का बसतो की आपण नको ते पाहिलं आणि त्या करिता आपल्याला शिक्षा करून घेतली पाहिजे या जाणिवेतून तो आपले डोळे फोडून घेतो... पुरुष आपल्या कोणत्याही स्वकीयांचं लैंगिक शोषण चार भींतीआड करू शकतो पण त्याचं तमाम जगापुढं प्रदर्शन करत नाही हे कडवं सत्य आहे.

एखाद्या अवयवाच्या संदर्भाने आपण समुदायवाचक वा जाती धर्म वाचक शब्द वापरत असू तर तो भान राखूनच वापरला पाहिजे. कारण तोच शब्द आपण आपल्याच रक्तातल्या व्यक्तींसाठी तसाच वापरू शकतो का याची खातरजमा करायला हवी. एरव्ही अनेक वेळा अवयवसापेक्ष लैंगिक सभ्य / असभ्य लिहिलं जातं त्याला कुणीच आक्षेप घेत नाही. ‘आश्चर्य’ या महाकवी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या अखेरच्या पंक्ती अशा आहेत –
‘मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं,
अहो आश्चर्य – तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून
लोंबत होतं आपलं पार्लमेंट
आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं
आमचं साहित्यसंमेलन..’
कुसुमाग्रजांच्याच ‘प्रेम कुणावर करावं’ या कवितेतली सुरुवातच अशी आहे –
‘प्रेम कुणावर करावं ? कुणावरही करावं.
प्रेम राध्येच्या वत्सल स्तनावर करावं,
कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं !’
कवी ग्रेस यांच्या एका कवितेचे शीर्षकच आहे ‘या हाताने स्तन गोंदून घे’ –
यातल्या पंक्ती अशा आहेत –
‘या हाताने स्तन गोंदून घे , लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे, गळून पडे काजवा..’
माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’च्या तिसऱ्या अध्यायात एक ओवी अशी आहे –
कां गळां स्तन अजेचे। तैसें जियालें देखैं तयाचें।
जया अनुष्ठान स्वधर्माचें। घडेचिना ॥
‘गुरुचरित्र’मधील एक ओवी अशी आहे –
‘वाचोनिया हा एक सुत । शेळीचे गळा स्तन लोंबत ।
वृथा जन्मला म्हणत । विनवीतसे श्रीगुरूसी
संत भानुदास यांच्या एका गौळणीत राधा आणि श्रीकृष्ण यांच्या अनुषंगाने असा उल्लेख आला आहे – 
किती भक्षिलें रें गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा ।
तिचे स्तन धरुन हांसे गदगदां । म्हणे येवढा मुद्धा होता तिचा' 

अशी अनेक वर्णने मराठी कवितात येऊन गेलीत. पण इथे काही खटकत नाही. रचना करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंच आहे पण त्याचा वापर करताना सजग भानही हवंय. नियोजित शब्दाऐवजी आपण आपल्याच नाळेशी जुळलेल्या शब्दाची निवड करताना मागेपुढे करत असू तर आपली शब्द निवड थोडीशी लवचिक ठेवायला हवी. असो...


एक तथ्य असंही आहे की आपल्या देशातलं प्रौढ महिला, तरुणी, कुमारिका आणि बालिका यांचं रेड लाईट एरियात होणारं 'सक्शन' पूर्वी नेपाळमधून आणि बंगाल, आसाम, ओरिसा या राज्यातून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात होत होतं. पण मागील दशकापासून हा लंबक झारखंडकडे सरकला आहे. (या विषयावरचा झारखंड महिला आयोग आणि महिलांशी निगडीत संघटीत गुन्हेगारीचा अहवाल मेंदूला झिनझिण्या आणतो). झारखंडमधील चार जिल्ह्यातून सगळ्या देशाची मागणी पुरवली जातेय. इथल्या सगळ्या आदिवासी आणि अतिमागास समाजातील परिस्थितीने नाडलेल्या मुली याकरिता धंद्यात आणल्या जातात. याचे नेमके विश्लेषण करताना अनेक दलाल सांगतात की, 'या भागातील मुलींची देहरचना, त्यांचा रंग, डोंगर कष्टास सामोरं जाण्याची त्यांची तयारी, कमालीचा अशिक्षितपणा आणि संकोचित परिघातल्या जगातलं जीवन या कारणामुळे त्यांना मागणी आहे.' देहरचनेबाबत आणखी खोलात जाऊन माहिती घेतली तर पुरुषी अपेक्षांचं तेच वर्णन मिळते ज्यात मनवर यांनी आपल्या कवितेत उल्लेख केलेला स्तन घटकही तंतोतंत सामील आहे. आपल्या माता भगिनींना राजरोसपणे देशोधडीला लावून त्यांच्या देहाच्या चिंधडया उडवत त्यांचं आयुष्यभर शोषण केलं जात असताना आपला समाज मूग गिळून गप्प बसतो पण एका कवीने एका कवितेत एका ओळीत दोन शब्द वापरले तर त्याचं पित्त इतकं खवळतं की आपला समाज त्या कवीला मारण्याच्या धमक्या देऊ लागतो. मग हा संताप तेंव्हा कुठे गेलेला असतो जेंव्हा हाटा हाटावर आपली मायबहीण नासवली जाते ? तेंव्हा आपला आत्मा झिंदाबादची गर्जना का करत नाही ? नुसताच आक्रोश करून काय फायदा ? खरं तर ढसाळ म्हणतात तशी 'मातीची ही अस्मिता आभाळभरच व्हायला पाहिजे." रक्तात पेटलेल्या सूर्यांनी नुसताच सिलेक्टिव्ह विरोध करून काय कामाचा ?

माझं म्हणणं वाचून राग येईल. धमन्यातलं रक्त तप्त होईल, मुठी वळतील पण त्यापुढे आपली मजाल जात नाही. आपल्या निष्फळ संतापाने हे सत्य बदलणार नाही. मित्रांनो आपल्या दृष्टीआड जो मानवी मरणयातनांचा नरक असतो तो आपल्याला जाणवत असतो पण आपण त्याबद्दल आपले नाक, कान, डोळे बंद करून बसतो मात्र आपल्या दृष्टीसमोर कुणी नुस्तं काही मांडलं तरी आपण त्यावर तुटून पडतो. आपला अभिनिवेश हा त्या लेखनकर्त्या सारखाच सिलेक्टिव्ह असतो. होय, अगदीच सिलेक्टिव्ह असतो. न्याय हा सगळीकडे समान असला पाहिजे. कवीला जो न्याय लावू तोच न्याय आपल्या समाजाने स्वतःलाही लावून घेतला पाहिजे, मग आपल्यात दडलेला अपराधी दिसून येईल...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा