मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'

तिच्या ट्वीटनंतर अवघ्या काही तासात पाच लाखाहून
#मीटू चे पहिले ट्वीट  
अधिक प्रतिसाद उमटले होते आणि पुढे जाऊन '#मीटू' हा महिलांच्या शोषणाविरुद्धचा जागतिक विद्रोही नारा ठरला. विशेष म्हणजे त्या ट्वीटमध्ये तिने 'मी टू' हे शब्द लिहिताना त्याचा वापर # हॅशटॅग म्हणून केला नव्हता. पण तिच्या शब्दांचे परिवर्तन केवळ हॅशटॅग मोहिमेत न होता जगाला व्यापून टाकेल इतक्या मोठ्या अस्त्रात झालं हा इतिहास आहे.
यात महत्वाची एक गोष्ट अशीही आहे की एलिसा मिलानो हिने हे ट्वीट करण्याआधी हार्वे वीनस्टीनच्या शोषणवादी विकृत वर्तनाविरुद्ध 'द न्यूयॉर्क टाईम्स' या अग्रगण्य अमेरिकन दैनिकाने आणि 'द न्यूयॉर्कर' या प्रभावशाली नियतकालिकाने त्याच्या पोलखोलाची एक मोहीम चिवटपणाने लावून धरली होती. याच्या लेखनकर्त्यांनीच पुढचे पाऊल गाठत एलिसाला यावर आवाज उठवण्याची सूचना करत जगभरातील महिलांना एक शब्दास्त्र मिळवून देण्याची संकल्पना निर्मिली होती. विशेष म्हणजे या लेखमालिकेची संकल्पनाही पुरुषांची होती. एलिसानेच नंतर या गोष्टी समोर आणल्या होत्या. नंतर या मोहीमेत जगभरातल्या विविध देशातील महिला उस्फुर्तपणे सामील होत गेल्या आणि लैंगिक अत्याचाराच्या जोडीला अपमान, द्वेष, कुचेष्टा, टवाळकी, वर्णभेद, छळवाद, प्रांतवाद, भाषावाद यांच्या आधारे केला जाणारं महिलांच शोषणही यात नोंदवलं गेलं. एकंदर याचा परीघ अफाट होत गेला.... जिथं जिथं हे अभियान राबवलं गेलं तिथल्या आरोपी पुरुषांना तिथल्या समाज आणि व्यवस्थेनं फटकारलं. अनेकांचं कुटुंब विखुरलं, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचं आर्थिक नुकसान झालं, अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. हे सर्व पडसाद लगोलग उमटत गेले. त्यामुळे या चळवळीचा प्रभाव वेगाने वाढत गेला आणि तत्काळ परिणाम होऊ लागले. नंतर नंतर यात व्यक्तिगत वाद, सूडभावना, मत्सर, जुन्या संबंधातील कटूता इत्यादी गोष्टी सामील झाल्याच्या काही तुरळक घटनाही घडल्या.... एलिसाने ट्वीट करून ज्या अमेरिकेत ही मोहीम छेडली त्याला वर्ष पूर्ण होण्याच्या बेतात असताना एक
आठवडा आधीच्या काळात 'द इकॉनॉमिस्ट' या जागतिक महत्वाच्या आणि परखड विश्लेषणासाठी अत्यंत नावाजलेल्या नियतकालिकाने त्याच अमेरिकेत एक सर्वेक्षण करून आजच एक अहवाल प्रसिद्ध केलाय त्याचे निष्कर्ष मात्र धक्कादायक आहेत. त्याचा मथळाच असा आहे की, " #मीटूच्या एक वर्षानंतर आता अमेरिकन जनमत शोषितांच्या विरुद्ध वळले आहे". 

या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही आकडेवारी दिली आहे. पुरुष, महिला, ट्रम्प यांचे मतदाते, क्लिंटन यांचे मतदाते आणि सकल अमेरिकन नागरिक असे पाच वर्ग त्यांनी बनवलेत. 'अनोंदीत लैंगिक गुन्ह्यांच्या समस्येहून चुकीच्या आरोपांनी निर्माण झालेली समस्या अधिक मोठी आहे का ?' अशा अर्थाचा एक कल आहे, दुसऱ्या कलात 'महिलांनी केलेल्या आरोपांमुळे समस्या सुटण्याऐवजी वाढली का' अशा अर्थाचा प्रश्न अजमावण्यात आलाय तर तिसऱ्या सर्वेक्षणात विचारलं गेलंय की - 'ज्या पुरुषांवर वीस वर्षापूर्वी शोषण केल्याचा आरोप झाला त्यांनी आता नोकरीवर नसावं का ?' या तिन्ही मुद्द्यांवर पिडीत महिलांना आधी सहानुभूती होती ती आता कमी होऊन आरोपीच्या बाजूने जनमत वळल्याचे त्यात दिसून येते.

या आकडेवारीसोबत एक महत्वाचा आलेखही त्यांनी जोडला आहे जो स्त्रियांच्या जोशवादी भूमिकेतून उतरून राग निवळत चाललेल्या आरेखनाकडे घेऊन जातो. वीस वर्षापूर्वी आरोप झालेल्या पुरुषांना नोकऱ्यावरून काढून टाकण्याच्या बाजूने लोकांचा कल कमी झालाय आणि 'मीटू'मुळे समस्या सुटण्याऐवजी होण्याऐवजी वाढलीय याकडे कल वाढलाय. तर खोट्या आरोपांच्यामुळे निर्माण झालेली समस्या ही अनोंदीत वा निकाल न लागलेल्या गुन्ह्याहून मोठी झाल्याच्या मतात वाढ झालीय. 'मीटू'ची विश्वासार्हता या अहवालातील नोंदीमुळे नक्कीच प्रश्नांकित होईल.

मागील वर्षभरात लैंगिक शोषणाबद्दलची आर्टिकल्स २०१६च्या सुरवातीस सामान्य संख्येने येत होती, 'मीटू' नंतर त्यात भर पडली आणि त्याचा आलेख बेफाम वाढला, मोठ्या प्रमाणात त्यावर लेखन होऊ लागले आणि कालांतराने ते कसे रोडावत गेले याचे बारकावे यात आहेत. या आलेखातून हे ही स्पष्ट होते की १६ ऑक्टोबर २०१७ ते ३० सप्टेबर २०१८ अखेरच्या कालावधीत 'मीटू'चे ट्वीटस वाढते राहिले पण लैंगिक शोषणाचे ट्वीटस जाणवण्याइतक्या वेगाने कमी होत गेले.

सर्वेक्षणाच्या अंतिम निष्कर्षात म्हटलंय की शोषितांची लिंगानुसार वर्गवारी केल्यास असं जाणवतं की 'मीटू'त सहभाग घेणाऱ्या शोषित महिलांच्या विरोधात जास्त प्रमाणात जनमत बदललं आहे त्या मानाने शोषित पुरुषांच्या विरोधात हा कल फारसा बदललेला नाही. म्हणजेच ज्या महिलांनी 'मीटू' अंतर्गत आरोप केलेत त्यांच्याबाजूने आता पूर्वीइतके जनमत नाही पण 'मीटू'मध्ये ज्या पुरुषांनी आरोप केलेत त्यांच्या बाबतीत असं घडलेलं नाही. 

यातली आणखी वेधक बाब म्हणजे उजव्या विचारसरणीच्या ट्रम्प व्होटर्सचे मतपरिवर्तन अधिक प्रमाणात झालेय तर तुलनेने स्त्रीवादी आणि मुक्ततावादी विचाराच्या क्लिंटन व्होटर्सचा कल किंचित कमी बदलला आहे. 

या मोहिमेसाठी हा धक्कादायक अहवाल आहे हे निश्चित आहे. हे असे का झाले याची अनेक उत्तर मिळतील. त्यावरही विचार मांडेन. पण तत्पूर्वी हे नमूद करू इच्छितो की आपल्याकडे तर ट्रम्प राजवटीपेक्षाही किती तरी अधिक उजव्या विचारांचे सरकार आहे, त्यामुळे वर्षानंतर या अभियानाची आपल्याकडील स्थिती कशी असेल हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज पडणार नाही.

#मीटू त सामील होणाऱ्यांनी काय टाळायला पाहिजे हे जोवर त्यांना कळणार नाही तोवर हा कल बदलतच राहील असे खेदाने म्हणावे लागेल... 

 (क्रमशः) - 

समीर गायकवाड 

पोस्ट शेअर करण्यास परवानगीची गरज नाही.

(महत्वाची सूचना - सोबत दिलेला 'द इकॉनॉमिस्ट' मधला अहवालाचा फोटो कॉपीराईटेड आहे, त्यात छेडछाड करू नये. पोस्टमधील मजकुरात बदल करू नये )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा