Friday, July 31, 2015

मुहम्मद रफी - खोया खोया चाँद...सलीम-जावेद या लेखकद्वयीतील सलीम म्हणतात की, "रफी देवाच्या आवाजात गाऊ शकणारा सूफी होता. दुसरा रफी होणे शक्य नाही. कारण देव डुप्लीकेटतयार करत नसतो..."
"मोहम्मद रफी यांचे प्रत्येक गाणे म्हणजे सोन्याचा तुकडा. त्यांच्यासारखा बुलंद आवाज झाला नाही, होणार नाही. ज्या गायकासोबत आयुष्यातील दुसरे गाणे गायले त्याच्या नावाचा पुरस्कार वयाच्या ८२व्या वर्षी मिळतोय. खूप छान वाटतेय", असे भावोद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना काढले होते .....
'गोड गळ्याच्या मोहम्मद रफींना कडू कारली फारच आवडायची; पण कारल्यातील कडवटपणा त्यांच्या स्वभावात कधीही आला नाही,' ही संगीतकार ओ.पी. नय्यर यांची आठवण आपल्याला 'आठवणी मोहम्मद रफींच्या' या श्रीधर कुलकर्णींनी लिहिलेल्या पुस्तकात वाचावयास मिळते. शांत स्वभाव, सोज्वळता, अबोलपणा, घरंदाजपणा, श्रोत्यांविषयी व चाहत्यांविषयी असलेला प्रेमभाव व सलोखा, मदत करण्याची वृत्ती, राहणीमानातील साधेपणा अशा गायनाव्यतिरिक्तही विविध पैलूंचे दर्शन या पुस्तकातील आठवणीद्वारे घडते….


Thursday, July 30, 2015

परीकथेतील राजकुमारा … जादुई गीतांचा सुवर्णकाळ ....


'परीकथेतील राजकुमारा… 'हे एकेकाळी रेडीओवर अफाट गाजलेले एक गीत. या गीताची सुरुवातच जादुई शब्दांनी होती. ज्या पिढीने परीकथा वाचल्या होत्या अन त्यातील राजकुमार - राजकुमारीचे स्वप्न पाहिले होते त्यांना यातील आर्त प्रतिक्षा भावणारी आहे. मात्र ज्या पिढीला ह्या परीकथा अन त्यातील राजकुमाराचे आकर्षण उरले नाही, त्याची ओढ राहिली नाही त्या पिढीला यातील सहवेदना जाणवणारच नाहीत. कारण आजची पिढी एका आभासी जगात जगते. लहान मुलांचे तर खेळाच्या मैदानावर दिसणे देखील दुरापास्त झाले आहे. मोबाईल - कॉम्प्यूटरवरील व्हिडीओ गेमपासून ते दुरचित्रवाहिन्यातील ‘डोरेमॉनच्या जंगलात’ ही मुले हरवून गेलीत. तर तरुणांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट आहे, सोशल मिडीया आणि इंटरनेटच्या कृत्रिम मायाजालात ही पिढी अशी काही हरवून गेलीय की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, ध्येय धोरणांचाही विसर होतोय. लहानग्या वयापासून  पीसी गेमच्या जाळ्यात गुरफटलेली अन व्हॉटसेप ते फेसबुकच्या फेऱ्यात अडकलेली ही मुले. त्यांना परीकथेचे स्वाभाविक वावडे असणार. पूजेचे ताट उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे फिरवायचे हे ज्यांना ठाऊक नाही, दंडवत अन नमस्कार यात काय फरक आहे किंवा आपले लोकसाहित्य कधी ढुंकूनही ज्यांनी पाहिले नाही अशीही मुले यात आहेत. फास्ट फुड ते हायटेक शिक्षण व्हाया ब्रेकअप इन माईंड एण्ड कल्चर हेच ज्यांच्या ठाई आहे ते भावगीतांचा एक हृदयस्पर्शी जमाना होता यावर कसे विश्वास ठेवतील ?


Saturday, July 25, 2015

हरवलेली गाणी....फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून माझ्या गावाकडच्या मायभगिनी काही दोन ओळींची गाणी गुणगुणत तुम्ही तसं कधी गायलात का ? एकीचे झाले की दुसरी गाई, मग तिसरी असं करत पुन्हा पहिली गात असे. लग्नघरी कासार आल्यावर मग तर एकीच्या ओळींना जोडून दुसरी उस्फुर्त काव्य रचत असे. भलीमोठी कविता तिथे जन्म घेई. यातल्याच काही जणी मग जात्यावरच्या ओव्याही रचत आणि मग काय आपला क्रम कधी येतो याची प्रत्येकजण हरीणीगत वाट बघे. ह्या साऱ्या जणी म्हणजे गावोगावच्या बहिणाबाईच की ! की तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही ? चला तर मग मी काही अशी ओव्यांची / द्विरूक्तीची ओळख करून देतो. तुम्हाला आवडतात का बघा. एखादी छानशी कॉमेंट करा. तुम्हालाही एखादी ओळ सुचली तर लिहा, तुमच्या घरी आता कोणी बांगडया भरतात की नाही हे मला माहिती नाही, पण घरी पोरीबाळी असतील तर त्यांना ह्या पोस्टबद्दल, गावाकडच्या ह्या गोड रिवाजाबद्दल सांगा. त्यांना नक्कीच बरं वाटेल. जमलंच तर चाल लावून सांगा, खूप गोड आहेत हो ही बांगडयांची गाणी. एकदा गाऊन तरी बघा....Saturday, July 18, 2015

मराठे - एक युद्धज्वर !


मराठयांनी एखाद्या माणसाचा सूड घ्यायचा ठरवलं की ते बेभान होऊन, जीवावर उदार होऊन, कुठलाही मागचापुढचा विचार न करता वर्षानुवर्षे आपल्या काळजात सुडाग्नी धगधगता ठेवतात. संधी मिळताच वचपा काढतात. याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानावर जागोजागी आढळतात. इथे उदाहरण दिले आहे, इतिहासातील महापराक्रमी अजरामर काका पुतण्यांचे ! याउलट असणारे किस्सेही इतिहासात घडलेले आहेत. पेशवाईत तर काकाच पुतण्याच्या जीवावर उठला होता. मात्र पोस्टमधले उदाहरण आगळे वेगळे आणि अलौकिक आहे !


चंद्राची कैफियत.....


तुम्हाला मामा आहे ? तुम्ही अंगाई ऐकलीय ? तुमचे बालपण पाळण्यात गेलंय? तुम्ही चांदोबा पाहिलाय ? तुमच्या घराला खिडकी आहे ? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हे लेखन आवर्जून वाचा...
काल पहाटेच्या स्वप्नात चांदण्यांच्या गावी गेल्यावर वाटेत मला हिरमुसला चंद्र भेटला … मी विचारलं "काय झालं ?" ओलेत्या डोळ्यांनी उतरल्या चेहरयाने तो उत्तरलातुझ्याकडे माझ्यासाठी वेळ असेल तरच बोलतो.. नाहीतर तू आपला तुझ्या वाटेने मला असेच मागे सोडून पुढे निघून जा …" मान डोलावून मी खुणावलेतसे तो रडवेल्या आवाजात बोलू लागला…  
"
काय सांगू तुला रात्र रात्र झोप येत नाही मला ! असाच जागा असतो,  डोळे लावून बसतोमान दुखायला होते. शेवटी डोळे पत्थरून जातात अन डोके बधीर होते !"
हमसून हमसून रडत चंद्र असं का सांगतोय मला काही कळत नव्हतं. तो डोळे पुसत पुसत पुढे सांगू लागला, "अलीकडे माझे फार फार वाईट दिवस आलेत रे ! माझ्याकडे बघून आता कुठली आई अंगाई गात नाही नी कुठले तान्हुले बाळ माझ्याकडे बघत बघत झोपी जात नाहीआता कुठल्या तान्हुल्याचा पाळणा कुण्या खिडकीतूनही दिसत नाही…  मी तासंतास खिडकीशी तसाच उभा असतोदारे खिडक्या सारं सारं बंद असतं.. आत तान्हुल्याचा आवाज येतो पण तोही माझ्यासाठी रुसत नाही..… "Friday, July 10, 2015

औरंगजेब ते लियाकत अली खान .....


मुघल सम्राट शहाजहान १६५९ मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास ३०० वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान पदरात पाडून घेतला पण ११ सप्टेबर १९४८ ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले...


राजर्षी शाहू - एका लोकराजाची गाथा....शाहू महाराजांचे नाव घेतले की दुर्दैवाने आजही काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात.

तर काही लोकांना शाहूंच्या विचाराशी काही देणेघेणे नसते पण उठता बसता शाहूंचे नाव घ्यायला आवडते. तर काहींना शाहूंचे विचार केवळ आरक्षणाच्या अनुषंगाने महान वाटतात, त्या लोकांना शाहू म्हणजे केवळ आरक्षणाचे उद्गाते वाटतात. काही लोकांना शाहू फक्त आपल्या जातीच्या भूषणापायी प्रिय वाटतात ! तर काही लोकांना राजकीय सोयीपोटी शाहू जवळचे वाटतात. संपूर्ण शाहू महाराज खूप कमी लोकांच्या पचनी पडतात ! शाहूंची पूर्ण माहिती नसतानाही त्यांची भलावण करणारे आणि खाजगीत त्यांच्या नावे बोटे मोडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मनापासून संपूर्ण शाहू ज्यांच्या मनाला पटले आहेत असे लोक मात्र खूप कमी आढळतात ! नेमके कोणते कार्य शाहू महाराजांनी केले आहे ? शाहूंचे सामाजिक योगदान काय आहे ? त्यांच्या जातीधर्मा विषयी कोणत्या भूमिका होत्या ? या सर्व बाबींचा धावता आढावा वाचायचा असेल तरच पुढे वाचा अन्यथा आपला हिरमोड होईल .......


छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - २छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - (२).................
मजकूर -
सरंजामी छ २४ रबीलाखर इहिदे
सीतेन अलफ पुणे व इंदापूर व चाकण
सुपे बारामती येथे इनाम हिंदू व मुसल
मान यासी इनाम आहेत. त्यास पेशजी आपणांस
मुकासा असताना अफजल खान आधी जेणे प्रमाणे
तसलमाती ज्यास जे पावेत असेल
तेणे प्रमाणे देणे यैसा तह केला असे मोर्तब
सुद.

............मर्यादेय विराजते. (शिक्क्याची मोहोर)
.................................................................................
तजुर्मा -


उन्हाशी झुंज अजून संपली नाही ....सुर्याच्या आगीने जीवाची काहिली होत्येय. उन्हे भल्या सकाळपासूनच वैरया सारखी, उभ्या जन्माचा दावा मांडल्यागत डोक्यावर नेम धरून बसलेली! विहिरी कोरड्या ठक्क झालेल्या. काळ्या मायेच्या सगळ्या अंगाला खोल खोल भेगा. दूरवर कुठेही हिरवाई नाही. ओसाड माळरानावर भकास तोडाचा काळ डोळे खोल गेलेली माणसे चोवीस तास हुडकत फिरतो. दूर बांधाबांधापर्यंत कुठेही पाखरे नाहीत की त्यांचे आवाज नाहीत, जळून गेलेल्या झाडांच्या फांद्यावर वाळून गेलेल्या घरट्यांच्या काटक्या उरल्या आहेत, र्हुमर्हुम आवाज काढणारा वारा सगळ्या शेत शिवारातून कण्हत कण्हत फिरतो आणि पाझर तलावाच्या पायथ्याशी जाऊन डोळे पुसतो. खुराड्याच्या सांदाडीला कोंबड्यांची लोळत पडलेली मातकट पिसे उगाच अस्वस्थ करतात.Thursday, July 9, 2015

'शोले' ...प्रेमाची अबोल कथा ...#फ्लॅशबॅक__
पूर्वी ती फार बोलायची , एक अल्लड युवती असताना चेतनेचा उत्फुल्ल झरा होती ती ! कालांतराने ती ठाकूर बलदेवसिंगची धाकटी सून होते. तिचा नवरा घरातला थोडासा लाडका अन खुशालचेंडू असावा असे भासतेएके दिवशी डाकू गब्बरसिंगचे दुःस्वप्न त्यांच्या हवेलीवर पडते त्यात तिच्या मोठ्या दिराची सहकुटुंब हत्या होते, तिच्या नणंदेची, पतीची अन चिमुरडया पुतण्याची देखील हत्या होतेया नंतर गब्बरबरोबरच्या चढाईत तिचा सासरा आपले दोन्ही हात गमावून बसतो. हात गेले तरी हार न मानलेला ठाकूर खचून जात नाही पण मनोमन तो सुडाच्या आगीत जळू लागतो. पुढे आपल्या सुडाग्नीला मूर्त स्वरूप देण्यासाठी तो जय-विरु ह्या चलाख ,धाडसी अशा गुंडांना रामगढ मध्ये पैसे देऊन आणतो ! गब्बरला जिवंत पकडण्यासाठी आलेले हे दोघे पूर्णतः भिन्न स्वभावाचे पण एकदिलाचे मित्र असतातत्या दोघाना तेथे येऊन काही काळ लोटतो, ते त्यांच्या कामात यशस्वी होतील अशीच त्यांची वाटचाल होत राहतेयथावकाश ते आपली मोहीम फत्ते करतात. शेवटी गब्बरला ठाकूर बलदेवसिंग स्वतः चिरडून टाकतो पण त्यात जयचाही बळी जातो…. या संपूर्ण काळात ती मात्र एक अबोल राहते, अकाली खुडलेल्या कळीसारखे आयुष्य जगत राहते..


निस्पृह न्यायाचा बाणेदार इतिहास - रामशास्त्री प्रभुणे !ज्या धन्याच्या पदरी 'ते' चाकरीस होते त्या धन्यांनी जेंव्हा अपराध केला तेंव्हा त्यांचा न्यायनिवाडा करताना त्यांनी थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती... ब्राम्हणांना दक्षिणा देण्याचे काम त्यांच्याकडे होते तेंव्हा दक्षिणा मागावयास आलेल्या ब्राम्हणांच्या रांगेत एकदा त्यांचे भाऊ उभे होते तर त्यांनी भावास दक्षिणा देण्यास मज्जाव केला होता. ते स्वतः ब्राम्हण असूनही ब्राम्हणांना दक्षिणा घेताना 'ते' इतके काही नियम लावत की ब्रम्हवृंद रडकुंडीस येई आणि त्यातून ब्राह्मणांनी त्यांच्यावर श्लोक रचला होता... एकदा त्यांची पत्नी भरगच्च दागिने घालून घराकडे येत असतांना त्यांनी तिला उंबरठयावरच अडवले आणि "आपण घर तर चुकला नाहीत ना ?" असं बोलून तिला आपली जागा दाखवून दिली होती. अशा अनेक गोष्टी ज्यांच्या बाबतीत सांगता येतील त्या रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर १९४४ मध्ये 'प्रभात'ने सिनेमा काढला होता. त्यावर आधारित ही पोस्ट. नि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्यायनिष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय रामशास्त्रींमध्ये एकवटला होता, त्यांनी आपल्या कर्तव्यात लहान मोठा आणि आपला परका असा आपपर भाव कधीच केला नाही. रामशास्त्रींवरच्या या सिनेमात 'दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' हे लहानग्या रामवर आणि त्याची बालिकावधू काशीवर चित्रित केलेले सुरेख गाणे आहे. चित्रपट पाहताना जुने पोशाख, जुने गाव आणि मुख्य म्हणजे तदकालीन राहणीमान यांचे गारुड आपल्या मनावर होते. नात्यांचा निरागसपणा भावणारा आहे. सेट्स भव्य आहेत. गीतसंगीतही श्रवणीय आहे. सिनेमा कृष्णधवल असूनही आजच्या काळातही प्रेक्षणीय आहे. ऐतिहासिक मूल्यांशी प्रतारणा न करता अत्यंत रसाळ शैलीत सिनेमाची कथा पुढे सरकत राहते. मुख्यत्वे यातील संवाद खूप बोलके आणि परिणामकारक आहेत. उच्च निर्मितीमुल्ये, कसदार अभिनय आणि वेगवान पटकथा यामुळे सिनेमा चक्क ७२ वर्षापूर्वीचा असूनही ताजातवाना वाटतो.


Sunday, July 5, 2015

सांगावा ....आयुष्याच्या एका वळणावर जेंव्हा गात्रे शिथिल होतात आणि जीवनाचा जोडीदार आपल्याला मागे टाकून अनंताच्या प्रवासाला एकटाच निघून गेलेला असतो तेंव्हा होणारे आभास जीवघेणे असतात. रात्रंदिन भास होत राहतात, हाका मारल्याचे आवाज कानात घुमत राहतात. आसपास चाहूल लागत राहते, हालचाल होत असल्यासारखं वाटते. भासांच्या दुनियेतून बाहेर आलं की श्रमून गेल्यागत होतं. त्यातून थोडा जरी डोळा लागला तरी स्वप्ने पडू लागतात. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांना अर्थ असतो की हे कुणालाही सांगता येणार नाही पण आपल्यावर निस्सीम प्रेम करणारी आपली माणसं कधीकधी स्वप्नातून आपल्याशी हितगुज करतात हेही खरे. दिगंताच्या पलीकडे अनंताच्या प्रवासाला गेलेली ही माणसं स्वप्नातून आपल्याला पुन्हा भेटतात आणि चार शब्द मायेचे बोलून लोप पावतात. याचा बोलका प्रत्यय देणारी माणसे गावाकडच्या मातीत अजूनही दिसतात. असाच एक माणूस मी पाहिलेला, रंगूबाप्पा त्याचं नाव....


'सैरभैर' पाऊस..


खरं तर हा मौसम उन्हाळयाचा. चैत्र लागल्यापासून तर अंगाची लाही लाही होऊ लागलेली. या पुढच्या वैशाखात तर जीवाची काहिली होते. दरवर्षी ऊन वाढतच चाललंय. आपण फक्त इतकंच  म्हणतो यंदा जरा ऊन जास्तच आहे ! तसं तर उन्हाशिवाय पाऊसही पडणार नाही त्यामुळं उन्हाला चुकवून चालणार नाही. मागच्या काही वर्षापासून दर उन्हाळ्यात एखादा का होईना पण तुफान पाऊस पडून जातोय. त्याचं काय गाऱ्हाणं आहे कळायला मार्ग नाही. लोकं म्हणतात अवकाळी पाऊस पडू लागलाय, कुणी म्हणतं यंदा वळीव लवकरच बरसलाय. पण असं काही नसतं, ते त्यांच्या त्यांच्या गतीनं चाललेले असतात आपण त्यांची चाल ओळखण्यात कमी पडतोय कारण आपण आपल्याच नादात जगतो आहोत. ही देखील काल परवाचीच गोष्ट. यंदाचा उन्हाळा चांगलंच अंग धरत होता, रोज उन्हं वाढतच होती पण मागील दोनेक दिवसात थोडा नूर पालटला.


मायेची गोधडी ...."गरजच काय होती ? माझ्या कपड्यांना हात लावायची ?" कान्हू मावशी मोठ्याने त्यांच्या सुनेला विचारत होत्या. रविवार दुपारची रणरणत्या उन्हातली दुपारी ३-४ ची वेळ होती. आधीच आभाळ अन सुर्यनारायण लपछपी खेळून हैराण करत होते.उष्म्याने जीवाची काहिली होत होती. चोरपावलाने आलेल्या डुलकीने डोळ्यांवर केलेला कब्जा त्यांच्या या चढ्या आवाजातील सवालाने मोडीत काढला.


निरागस......
"बा इठ्ठला, काय केलस रे ! इठ्ठला रे !" कालिंदीने फोडलेला तो आर्त टाहो आबा पाटलाच्या चिरेबंदी वाड्याला चिरून गेला, पांदीतल्या पारंब्यात गुरफटला, पारावरच्या वडपिंपळात घुमून गेला, गावकुसातल्या पाण्याच्या आडात खोलवर घुमला आणि सरते शेवटी पांडुरंगाच्या देवळाच्या शिखरात झिरपला. आबा पाटलांच्या वस्तीवरल्या खोपटात कालिंदीने फोडलेला टाहो दूरवर घुमला. त्या ध्वनीने रानातल्या पाखरांचा किलबिलाटही थांबला. तिच्या किंकाळीनं रानातले सगळे गडी आवाजाच्या दिशेने धावले. सगळे त्या खोपटात जमा झाले. आत कालिंदी धाय मोकलून रडत होती, तिच्या मांडीवर विठूचे डोके होते. विठूचा निष्प्राण देह मातीवर लोळागोळा होऊन पडला होता.


#बोन्साय ....सुट्टीचा दिवस असल्याने लवकर निघावे म्हणून तयारी केली तर 'असे पाहुणे येतीचा' छोटासा अंक घरी झाला अन निघायला उशीर झालाच. गावाकडे पोहोचेपर्यंत वेळ झाला. हमरस्त्यावरून गावाच्या रस्त्याला लागलो. ऊन चांगलेच रणरणले होते. काही अंतर गाडी चालवून झाली तोच गाडीने देखील पाय वर केले. गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले. गाडी तशीच ढकलत पुढे थेट पाणंदेपर्यंत आणली अन तेथे असणारया शितोळयाच्या मळयापाशी आंब्याच्या सावलीत उभी केली अन पाय मोडत निघालो. बाहेर ऊन अन अंगात घाम दोघेच डोलत होते, मी तसाच पुढे निघालो. वेशीच्या बाहेर असणारया मोठ्या चिंचेच्या झाडाखाली असणारया टपरीवजा खोपटात रघु आहे का डोकावून पाहिले तर तो गायब. त्याच्या दुकानाचा सारा संसार तसाच उघड्यावर टाकून तो बहुदा बिडी ओढायला गेला असणार. थोडा वेळ तिथे थांबण्यापेक्षा वेशीतल्या देवळात जाऊन थांबावे असा विचार केला अन देवळाकडे निघालो.


हरवलेले दिवस ....


बालपणीच्या अनेक आठवणी असतातकाही सुखद तर काही दुःखदआठवणींचा हा अमोल ठेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनामिक प्रेरणा देत राहतो. त्यातही गावाकडच्या बालपणीच्या घटना मनावर तशाच कोरल्यागत गोठून राहतात. अशीच एक आठवण...
शेतातली मोठी जनावरे गायी-म्हशी चरायला घेऊन जाण्याचा वसा थोरांकडे असायचा. या कामातलहानांना हात लावू देत नसत. गुरं हुरळली तर पोरासोरांना जुमानायची नाहीत असा युक्तिवाद ठरलेलाअसे. "तुम्ही अजूक नेणतं हायसा, थोडं थोर व्हायचं मग जित्राबाला हात लावायचा." हे वाक्य ठरलेले असे. तेंव्हा गायीम्हशी जवळ तासंतास उभे राहिले तरी कंटाळा येत नसे. गोठा ही शेतातल्या आवडत्या जागांपैकी एक असायची. गायी इदूळा सकाळी अन सांजेलाच गायी गोठ्यात असत, दुपारी त्या चरायला जात. फिरून आल्या की त्या थकलेल्या असत, त्यामुळे गोठ्यात निवांत बसून रवंथ करताना त्यांच्याशेजारी बसून निरखताना खूप शांत वाटे, मोठाला जबडा सावकाश एक सुरात हलवून त्यांची रवंथ चालत असे. मध्येच शेपटी हलवत अंगावर बसलेल्या गोमाशी गोचीड दूर सारतानाची ही डोळे झाकून बसलेली सगळी गुरं पाहून काळीज हरखून जाई