शनिवार, १८ जुलै, २०१५

मराठे - एक युद्धज्वर !


मराठयांनी एखाद्या माणसाचा सूड घ्यायचा ठरवलं की ते बेभान होऊन, जीवावर उदार होऊन, कुठलाही मागचापुढचा विचार न करता वर्षानुवर्षे आपल्या काळजात सुडाग्नी धगधगता ठेवतात. संधी मिळताच वचपा काढतात. याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानावर जागोजागी आढळतात. इथे उदाहरण दिले आहे, इतिहासातील महापराक्रमी अजरामर काका पुतण्यांचे ! याउलट असणारे किस्सेही इतिहासात घडलेले आहेत. पेशवाईत तर काकाच पुतण्याच्या जीवावर उठला होता. मात्र पोस्टमधले उदाहरण आगळे वेगळे आणि अलौकिक आहे !

पानिपतच्या युद्धाच्या बरोबर एक वर्ष आधी बुराडी घाटावर नजीब आणि कुतुबशाहने अत्यंत क्रूर पद्धतीने दत्ताजी शिंद्यांना घात करून अगदी निर्दयतेने ठार केले. त्यावेळी दत्ताजी शिंदे सदोतीस वर्षांचे होते. दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र बंधु. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु त्या वेळी जनकोजी फक्त दहा वर्षांचा होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. जनकोजी वयाने लहान असला तरी त्याची बुद्धी तेज होती आणि निर्णयक्षमता प्रबळ होती.

या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतही मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर वीरांनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता. त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापति करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला. जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेंत खून झाला, त्यातहि दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला व पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली. नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले. पुढील सालीं दादासाहेब अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत. यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले . त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्या नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें.

याचवेळी मल्हाररावानें "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील" असे उद्‍गारही काढले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला. त्यांची निर्घृण हत्या केली. याची वार्ता जेंव्हा जनकोजी शिंद्यांच्या कानावर आली तेंव्हा त्याचे वयोमान अवघे चौदा वर्षांचे होते.

आपल्या राज्याची काळजी घेणारा, सावलीसारखा आपली सोबत करणारा आपल्यासाठी जीवाला जीव देणारा आपला चुलता जखमांनी छिन्नविच्छिन्न होऊन धारातीर्थी पडल्यावरही त्याला गनिमांनी भाल्याने शिरच्छेद करून मारले या गोष्टीने त्याच्या धमन्यातील रक्त उकळत होते. सुडाच्या अग्नीत तो होरपळून निघत होता. त्याच्या मिसरूड फुटलेल्या ओठांवर रुचिरेऐवजी सूड नांदत होता. ज्या कोवळ्या वयात त्याला राज्य करायचे होते, अय्याशी करणं त्याला सहज शक्य होतं कारण राज्य तर त्याच्याच नावावर होतं. पण त्याच्या डोक्यात एक आणि एकच विचार होता, आपल्या चुलत्याच्या अमानुष हत्येचा बदला ! केवळ बदला हे एकच त्याचे ध्येय बनून गेले. आणि त्याने ते करून दाखवले. पानिपतच्या युद्धाच्या चार महिने आधीच त्याने ही कामगिरी पार पाडली.

आपल्या चुलत्याच्या हत्त्येचा बदला घेताना सोळा वर्षाच्या जनकोजी शिंद्यांनी ऑगस्ट १७६० मध्ये कुंजपुऱ्यातल्या चकमकीत याच कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात धडावेगळे केले. (जमदाडाची लांबी, वजन आणि जनकोजीचे वय यांच्या प्रमाणात कुतुबाची एका फटक्यात उडवलेली मान यांचे मेळ घातल्यास जनकोजीने किती त्वेषाने प्रहार केला असेल, संतापाचा लाव्हा त्याच्या धमन्यातून कसा वाहत असेल याची पुसटशी कल्पना येते) पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीबाविरुद्ध आक्रमण केले, परंतु नजीबाने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. पानिपतावर विश्वासराव पडल्याची वार्ता जेंव्हा पसरली, तेंव्हा सर्व सैन्य घाबरून सैरावैरा पळू लागले तेंव्हा जनकोजी अन त्याचे काका तुकाजी ( महादजी शिद्यांचे सख्खे मोठे तर जयाप्पा - दत्ताजीचे सावत्र लहान भाऊ ) यांनी सदाशिवराव भाऊंच्या गोटाकडे त्यांना बळ देण्यासाठी कूच केले, यावेळी बर्खुरदार खानाने तोफगोळा लागून जायबंदी झालेल्या जनकोजी शिंद्यांना पकडले. काशीराजाने नन्तर त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले, काही आर्थिक आमिषे दाखवली. पण याचा सुगावा नजीबास लागला. नजिबाने आपल्याला मारण्याआधी आपण जनकोजीस मारणे योग्य असा विचार करून बर्खुरदार खानाने जनकोजीस हाल हाल करून ठार मारले. याच दरम्यान दत्ताजींचे अखेरचे सख्खे बंधू ज्योतिबाराव शिंद्यांचे निधन झाले. नजीबाला ठार मारणे हाच शिंद्यांच्या घराण्यातील पुरुषांचा ध्यास झाला होता, त्याला महादजी शिंदे कसे अपवाद राहतील ?

राणोजी शिंद्यांची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. केवळ सावत्रतेमुळे गादीवर येण्यास त्यांना विलंब झाला. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होती आणि ती पूर्णत्वास नेली.

पानिपत युद्धाच्या आधी रसदीची चणचण भासू लागल्यामुळे दिल्लीलुटीचा प्रस्ताव मराठ्यांकडून आल्यावर या मोहिमेतून शीख आणि जाटांनी अंग काढून घेतले होते. मात्र याच शिखांनी मराठे पानिपतात हरल्यानंतर पुढे तब्बल ७ वर्षे नजीबाला पंजाबात झुंजवत ठेवले. तर पानिपतच्या युद्धात वाचलेले भुकेजलेले, अर्धउघडे, जखमी झालेले जे २०००० मराठे उरले होते त्यांना सुरजमल जाटाने वस्त्रे दिली, अन्न दिले होते. पंजाबात शिखांविरुद्ध हरलेला नजीब पुढे थकून गेला आणि ऑक्टोबर १७७० मध्ये तो मरण पावला. नजीब मेल्यावर १७७२ मध्ये महादजी शिंद्यांनी नजीबाबादमधील (आताच्या उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात नजीबाबाद हे शहर नजीबाने वसवले होते) पथरगढच्या किल्ल्यावर घणाघाती हल्ला चढवून झबिता खान ह्या नजीबाच्या वारसदार मुलास हरवले, तिथली नजीबाची कबर उध्वस्त केली. नजीबाचा हा पोरगा नंतर शुजा -उद- दौलाकडे पळून गेला. नंतर त्याला मुघलांनी हिंदूस्थानबाहेर निष्कासित केले होते. १७८८ मध्ये नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंद्यांनी यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला. त्याचे प्रेत त्यांनी दिल्लीच्या लाहोरी दरवाजाजवळ टांगले होते. रियासतकार सरदेसाईंनी मराठ्यांच्या इतिहासात महादजींची तुलना नेपोलियनशी केली आहे यावरून महादजींच्या शौर्याची कल्पना यावी.

नजीबाने आधी दत्ताजीस मारले. तर दत्ताजींचा पुतण्या जनकोजीने कुतुबाला मारून अर्धाच बदला घेतला. तर जनकोजीचे सावत्र काका लागणाऱ्या महादजींनी उरलेला हिशोब पूर्ण केला. मराठ्यांनी जर ठरवले तर रक्ताचे पाणी करून काहीही करून ते सुडाची गाथा रचतातच ! मराठे जरी पानिपत हरले तरी त्यांनी नजीबाचा हिशोब अशा प्रकारे सव्याज चुकता केला होता इतकेच नव्हे तर महादजी शिंद्यांनी दिल्लीश्वराला आपली कठपुतळी बनवून मुघलांना आपल्या अंकित करून हिंदुस्थानवर राज्य केले होते. मराठ्यांचे शौर्य अद्वितीय असेच होते पण आपसातील दुही हेच मराठ्यांच्या विनाशाचे सर्वकालीन कारण आहे, अगदी आजच्या काळातही हे तथ्य लागू पडते. रयतेचे तारक असणारे मराठे हेतूपुरस्सर माजवल्या गेलेल्या अंतर्गत दुफळीने स्वतःलाच मारक ठरले. आणि आजही मराठेच तारक आणि मारक आहेत कारण आजही त्यांच्यात युद्धज्वराचा रग तसाच कायम आहे...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा