शुक्रवार, १० जुलै, २०१५

छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - २



छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - (२).................
मजकूर -
सरंजामी छ २४ रबीलाखर इहिदे
सीतेन अलफ पुणे व इंदापूर व चाकण
सुपे बारामती येथे इनाम हिंदू व मुसल
मान यासी इनाम आहेत. त्यास पेशजी आपणांस
मुकासा असताना अफजल खान आधी जेणे प्रमाणे
तसलमाती ज्यास जे पावेत असेल
तेणे प्रमाणे देणे यैसा तह केला असे मोर्तब
सुद.

............मर्यादेय विराजते. (शिक्क्याची मोहोर)
.................................................................................
तजुर्मा -
१८ डिसेंबर १६६० रोजीचे हे पत्र दस्तूरखुद्द(सुद) छत्रपती राजेश्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारभारयांना पाठवलेले आहे. स्वराज्यावर अफजलखान चालून आला होता त्या काळानंतरचे हे पत्र आहे. पत्राच्या अंती त्यांची मोहोर (मर्यादेय विराजते) आहे. अफजलखानाशी दोन हात केल्या नंतर राजांनी दौलतीचे अनेक निर्णय घेतले होते जेणेकरून तंटे बखेडे होऊ नये, फुट पडू नये, या कठीण काळी यादवी माजू नये याची पुरेपूर तजवीज ते करत होते. या पत्रानुसार शिवाजी राजांनी (अफजलखाना येण्याआधी जी इनामे दिली गेली होती ) पुणे, इंदापूर व चाकण, सुपे, बारामती तशीच इनाम म्हणून हिंदू मुसलमानांना (दोन्ही धर्मातील हकदारांना) तसेच देण्याचे तह केले आहे. (निश्चित केलेल्या लोकांना) ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे तसलमाती (इनाम) रहावीत असा निर्देश इथे आहे.

कोल्हापूर पुरालेखागारात हे पत्र उपलब्ध आहे.
........................................................................................................

शिवाजी राजांनी अमुक एक व्यक्ती अमुक जात धर्माची आहे म्हणून त्यास कधी ठार केले नाही, जो जो स्वराज्यावर चालून आला व ज्याने ज्याने स्वराज्यनिर्मितीत अडथळे आणले वा स्वराज्यातील रयतेस ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते सर्व जाती धर्माचे लोक महाराजांच्या लेखी दुश्मन होते. तर ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं व रयतेच्या कल्याणासाठी जे राबले ते सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी आपले मानले. शिवाजी राजांसाठी 'रयतेचे कैवारी' आणि 'रयतेचे दुश्मन' अशा लोकांच्या दोनच वर्गवारी होत्या. चंद्रराव मोरे आणि अफजलखान यांत धर्मभेद न करता रयतेचा व स्वराज्याचा वैरी हे एकच परिमाण त्यांनी या दोघांसाठी वापरले. त्याच प्रमाणे हिरोजी इंदलकर व इब्राहीम खान यांच्यात देखील कधी फरक केला नाही. कारण ते स्वराज्यनिर्मितीतले घटक होते. वर दिलेल्या पत्रात देखील शिवाजी राजांनी हिंदू आणि मुसलमान हकदारांना आधी पासून दिलेले इनाम कायम राखले आहेत, त्यात धर्मभेद केलेला नाही.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा