सोमवार, २९ मार्च, २०२१

नापसंत ठरलेली डाकूराणी - बँडिट क्वीन..


दिवाळीचा महिना तोंडावर आला होता. धड पावसाळा नाही आणि उन्हाळाही नाही अशा विचित्र पद्धतीचे हवामान होते. अंगातलं घामटं निघत होतं. नाही म्हणायला रात्र थोडीशी सरल्यावर उत्तररात्रीची सोलापूरी थंडी जाणवत होती. मीना टॉकीजची नऊच्या शोची दोन तिकिटे काढून मित्रासोबत पिक्चरला गेलो. सिनेमा काय बघितला मस्तक दोन दिवस सुन्न झालेलं. तो चित्रपट होता बँडिट क्वीन. उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (कोळींशी समांतर) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म. वसंतोत्सवात जन्मलेली म्हणून तिचे नामकरण ‘फुलन’ ! फुलनचे मायबाप अगदी दरिद्री, असहाय्य होते. वडिलांच्या तुलनेत आई स्वभावानं थोडीशी खाष्ट. फुलन तिच्या आईसारखी होती निडर आणि फाटक्या तोंडाची ! तिला चार भावंडं पैकी तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलनच्या बापाची सगळी जमीन तिच्या चुलत्याने हडप केलेली. वरतून तो त्यांना छळायचा. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. फुलनसह चारी भावंडांना ठोकायचा. अनेकदा उपाशी राहणारी फुलन सर्व घरकामे करण्यात तरबेज होती. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तीस वर्षाच्या पुट्टीलाल सोबत लावून देण्यात आलं. फुलनला न्हाण येण्याआधीच तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. चित्रपटातला हा सीन पाहताना अंगावर काटा आला. लहानग्या फुलनच्या किंकाळ्या कानातून मस्तकात खोल उतरल्या. तिचा अनन्वित छळ होतो, मारझोड होते. त्याच्या जाचाने भांबावून गेलेली फुलन दोनेकदा माहेरी पळून जाते. मात्र तिची कशीबशी समजूत घालून तिला पुन्हा त्याच्या ताब्यात दिले जाते.

सोमवार, २२ मार्च, २०२१

जीवनमूल्यांच्या लढ्याचा नवा चेहरा -


या आठवड्यामध्ये एक विलक्षण घटना घडली तिची नोंद पाश्चिमात्य माध्यमांनी निवडक पद्धतीने घेतली तर अन्य काही देशात त्याबद्दल क्वचित चर्चा झडली. अमेरीकेच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या घोषणापत्राला (डिक्लेरेशन ऑफ इंन्डीपेंडन्स) अनन्यसाधारण महत्व आहे. थॉमस जेफरसन हा विचारवंत राजकारणी त्या घोषणापत्राचा जनक होय. अमेरिकेत असलेल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वसाहती आणि त्याआडून सुरु असलेलं शोषण यांच्याविरुद्ध जेफरसनने आवाज उठवला होता. लोकशाही, संघराज्यवाद, व्यक्तिगत अधिकारांचे रक्षण यांचा तो खंदा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद देखील जेफरसनने भूषवले होते. अमेरिकेत त्याला जनकाची (फाउंडीग फादर) उपमा बहाल केली गेलीय. या थॉमस जेफरसनच्या पत्नीचे नाव होते मार्था वेल्स. तिला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली होती. ती वंशवेल यथावकाश वाढत राहिली. दरम्यान मिश्र वर्णीय संबंधातून जन्माला आलेली सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम स्त्री जेफरसनच्या पदरी होती. या स्त्रीला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली. सुरुवातीची काही दशके या अपत्यांना नाकारलं गेलं होतं ही वस्तुस्थिती होती. मात्र नंतरच्या पिढ्यात जैवशास्त्रीय आधारांच्या बळावर सॅली हेमिंग्जला झालेल्या अपत्यांचे पितृत्व थॉमस जेफरसनकडेच होते हे स्वीकारावे लागले. अर्थात उदारमतवादी आणि खुल्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असणाऱ्या अमेरिकन जनतेने खळखळ न करता हे सत्य स्वीकारले. मागील वर्षी विख्यात अमेरिकन छायाचित्रकार ड्र्यू गार्डनर यांनी काही ख्यातनाम व्यक्तींच्या स्मृतीघटकासह त्यांच्या नव्या पिढीची तसबीर पेश केली होती. याच शृंखलेतले एक पोर्ट्रेट होते थॉमस जेफरसनचे आणि त्याच्या सहाव्या पिढीतील नातवाचे. शेनॉन लेनिअर हा जेफरसनचा सहाव्या पिढीतला बंदा. त्याची वंशवेल ही सॅली हेमिंग्जच्या शृंखलेतील होती. थॉमस जेफरसनसारखी वेशभूषा केलेल्या शेनॉनचे पोर्ट्रेट खूप काही चर्चिले गेले नव्हते. काही निवडक पोर्टल्सवर याविषयी अल्पकालीन चर्चा झाली आणि विषय मागेही पडला. मात्र या आठवड्यातील टॉप ट्रेंडींग फोटोजमध्ये ही तसबीर आली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला पार्श्वभूमी होती ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी सम्राज्ञी मेगन मार्कल यांनी केलेल्या खळबळजनक विधानांची. त्यामुळेच हा पोर्ट्रेटवजा फोटो इतका चर्चेत आला की त्याखालच्या कमेंट्सवरून वादविवाद झडू लागले. यात नेटिव्ह अमेरिकन विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांनी कोणत्याही देशाचे प्रवासी वा परकीय नागरीक आमचा हिस्सा असूच शकत नाही या ट्रम्पवादी भूमिकेचा पुनरुच्चार केला तर उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी हीच खरी अमेरिकेची ओळख असल्याचं म्हटलं. कारण थॉमस जेफरसन श्वेतवर्णीय होते, सॅली हेमिंग्ज मिश्रवर्णीय होती तर शेनॉन लेनिअर हा देखील मिश्रवर्णीय शरीर लक्षणे असणारा आहे. त्याचं मूळ दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन असं असल्याने त्यात समावेशकता दिसते. श्वेतवर्णीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्याने ब्रिटिश वसाहतवादाचे जोखड फेकून दिले होते त्याच्या नव्या पिढीचं तुलनात्मक वैचारिक उदात्तीकरण करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्यातील राजपुत्र आणि स्नुषा यांचं सनसनाटी विधान पूरक ठरलं हे विशेष होय.

रविवार, १४ मार्च, २०२१

बॉक्स ऑफिसची देवी - जय संतोषी माँ


ऐंशी नव्वदच्या दशकात पत्रव्यवहार तगून होता. पोस्टकार्ड, अंतरदेशीय यांचा मुबलक वापर व्हायचा. तातडीच्या निरोपासाठी तार जिवंत होती. मनीऑर्डर देखील वापरात होती. तेंव्हा ठराविक पद्धतीचा पत्रव्यवहार जास्ती चाले. कुटुंबातल्या परगावी गेलेल्या सदस्याने पाठवलेली प्रेमपत्रे, मित्रांची - प्रेमाची पत्रे, ख्याली खुशालीची पत्रे, कामकाजाची, शासनाची पत्रे असा सगळा मामला होता. यात काही आगंतुक पत्रे देखील असत. आपल्या घरच्या लोकांनी कुठं कपडे खरेदी केली असेल तर त्या दुकानदाराने आपली आणि आपल्या खिशाची आठवण काढलेली पत्रे असत, नानाविध ऑफर्सची पत्रे असतं. अगदी 'फाडफाड इंग्लिश बोला'  पासून ते 'घरबसल्या ज्ञान आणि पैसे कमवा' अशीही आवतने त्यात असत. पैकीच एक पत्र संतोषी मातेच्या भक्ती परीक्षेचं असे ! ज्यांना हा प्रकार ठाऊक नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही. आपल्यावर अधिकचा जीव असणाऱ्या कुणी तरी एका आपल्याच हितचिंतक व्यक्तीने वा परिचिताने ते पाठवलेलं असे. संतोषी मातेचा कृपाप्रसाद हवा असेल तर अशाच मजकुराचे पत्र आपल्या परिचयाच्या एकवीस व्यक्तींना पाठवावे अशी विनंती त्यात असे, असं न करता पत्र फाडून फेकून दिल्यास मातेचा प्रकोप होईल अशी धमकी देखील त्यात असे. पत्राच्या सुरुवातीसच 'जय संतोषी  माँ' असे लिहिलेलं असल्याने नंतर नंतर ही पत्रे लगेच ओळखता येऊ लागली आणि पूर्ण न वाचता फेकून दिल्याचं, फाडल्याचं समाधान लोक मिळवू लागले. ही जय संतोषी माँ पत्रे महिन्यातून किमान एकदोन तरी येत असत, इतका त्यांचा पगडा होता. हे खूळ कुणी काढलं हे सांगता येणार नाही मात्र संतोषी मातेला देशभर कुणी आणि कधी प्रकाशझोतात आणलं हे निश्चित सांगता येईल. त्यासाठी चार दशके मागं जावं लागेल.