कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ जानेवारी, २०२३

विहीर..

#sameerbapu
विहीर .. 

तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

नंदूची शाळा



प्राचार्य दत्तात्रेय कदम अत्यंत बेचैन होऊन एकसारखं मोबाईलवरून एक कॉल करत होते. पण फोन काही लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर एकदाचा त्यांचा फोन लागला. अधीर होऊन त्यांनी विचारलं, "काय साळे सर! केंव्हापासून प्रयत्न करतोय फोन लावायचा, पण काही केल्या कॉलच कनेक्ट होत नव्हता..."

त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत पलीकडून रामचंद्र साळे उद्गारले, "अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. गावाकडे आता दर सांजच्याला हा घोटाळा होतोय."

त्यांना थांबवत कदमांनी पुन्हा आपलं संभाषण जिथून तुटलं होतं तिथून सुरु केलं, "ते असू द्यात. मला सांगा नंदूचं काय झालं? भेटला का तो? त्याच्या घरी गेला होतात का तुम्ही? त्याचे आजोबा भेटले का? काय अडचण काही कळलं की नाही? शेवटी काय ठरलं त्यांचं?" कदमांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.

त्यांच्या प्रश्नांना दमाने घेत साळेंनी सगळी माहिती पुरवली. ती ऐकून कदमांचा चेहरा उतरला. ते उदास होऊन मटकन सोफ्यावर बसले आणि 'फोन ठेवतो साळे सर' म्हणत त्यांनी फोन कट केला.
इतक्या वेळापासून त्यांचं संभाषण ऐकत, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारा त्यांचा मुलगा सिद्धार्थ गोंधळून गेला. त्याने वडिलांच्या जवळ जात विचारलं, "बाबा काय झालं? नंदूच्या शाळेचं काही कळलं का? तुम्ही इतके उदास का झाले?" आपल्या चिमुरड्या मुलाचे ते कोमल उद्गार ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळ शांत राहून मग म्हणाले, "आता नंदूची शाळा बहुतेक कायमचीच बंद होणार की काय असे वाटू लागलेय."

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

गोष्ट एका मास्तरांची ...


मराठीला धुमाळ मास्तर होते. पोरांना जाम कुटून काढायचे. कवितेची कुठलीही ओळ म्हणायचे आणि पुढची ओळ वाच म्हणून बोटात पेन्सिल घालून बोटं पिरगाळायचे. समास शिकवताना चिमटीत कान पिळण्याची 'संधी' ते सोडत नसत, त्यांच्या मारझोडीच्या 'क्रियां'ना कुठलेही 'पद' चाले ! पोरांना शेलकी 'विशेषणे' लावून हाक मारण्यात त्यांचा हातखंडा होता, लिहिताना 'कानेमात्रे' एक झाले तर आईबहीण एक करत ! मागच्या बाकावर बसलेल्या अवगुणी 'विशेषनामां'ना ते नेम धरून डस्टर फेकून मारत !