बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

नंदूची शाळा



प्राचार्य दत्तात्रेय कदम अत्यंत बेचैन होऊन एकसारखं मोबाईलवरून एक कॉल करत होते. पण फोन काही लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर एकदाचा त्यांचा फोन लागला. अधीर होऊन त्यांनी विचारलं, "काय साळे सर! केंव्हापासून प्रयत्न करतोय फोन लावायचा, पण काही केल्या कॉलच कनेक्ट होत नव्हता..."

त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत पलीकडून रामचंद्र साळे उद्गारले, "अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. गावाकडे आता दर सांजच्याला हा घोटाळा होतोय."

त्यांना थांबवत कदमांनी पुन्हा आपलं संभाषण जिथून तुटलं होतं तिथून सुरु केलं, "ते असू द्यात. मला सांगा नंदूचं काय झालं? भेटला का तो? त्याच्या घरी गेला होतात का तुम्ही? त्याचे आजोबा भेटले का? काय अडचण काही कळलं की नाही? शेवटी काय ठरलं त्यांचं?" कदमांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.

त्यांच्या प्रश्नांना दमाने घेत साळेंनी सगळी माहिती पुरवली. ती ऐकून कदमांचा चेहरा उतरला. ते उदास होऊन मटकन सोफ्यावर बसले आणि 'फोन ठेवतो साळे सर' म्हणत त्यांनी फोन कट केला.
इतक्या वेळापासून त्यांचं संभाषण ऐकत, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारा त्यांचा मुलगा सिद्धार्थ गोंधळून गेला. त्याने वडिलांच्या जवळ जात विचारलं, "बाबा काय झालं? नंदूच्या शाळेचं काही कळलं का? तुम्ही इतके उदास का झाले?" आपल्या चिमुरड्या मुलाचे ते कोमल उद्गार ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळ शांत राहून मग म्हणाले, "आता नंदूची शाळा बहुतेक कायमचीच बंद होणार की काय असे वाटू लागलेय."

आपल्या वडिलांना असं हताश होताना पाहून त्या चिमुरड्याचा जीव गहिवरला. त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली. मग मनाशी काही एक विचार करत तो स्वयंपाकघरात भाजी करणाऱ्या आईपाशी धावतच गेला. त्याने आईच्या कानात काही खुसपुसलं. आई एक मिनिट कोड्यात पडली नि पुढच्याच क्षणी तिने आपल्या मुलाच्या मखमली गालांवरून हात फिरवत त्याचा गोड मुका घेतला. आईने दिलेल्या प्रतिक्रियेने सिद्धार्थ हरखून गेला. त्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी साफ झळकत होती. आईला हाताशी धरून तो आपल्या बाबांपाशी आला. त्या दोघांनी मिळून त्यांना चार गोष्टी सांगितल्या, मग त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान विलसले.

डावा हात फ्रॅक्चर झाल्याचं दुःख विसरून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मोटेवाडीला जायचं ठरवलं. जोडीला मागे लागून आलेला सिद्धार्थही होता. शाळा सुरु झालेल्यास महिना लोटला होता तेंव्हापासून नंदूच्या शाळेचा विषय कदमांच्या घरी चर्चेत होता. दरम्यान कदम सरांचा छोटासा अपघात झाला आणि रजा काढून ते घरीच थांबले आणि तिकडे नंदूचे पुढे काय झाले याची चिंता वाढली. सातवीत गेलेल्या नंदू शेळकेचं गाव आडवळणाचं होतं, तिथून तो मोहोळला जिल्हा परिषदेच्या शाळेत यायचा. अभ्यासात तो फार हुशार होता. मनमिळाऊ, कामसू आणि प्रेमळ अशा नंदूच्या घरी खूप गरिबी होती. त्याचे वडील आत्माराम आणि चुलते शांताराम यांच्यात आपसात दोन एकर कोरडवाहू जिरायत जमीन होती. पाऊस आला तरच त्यात पीक यायचं. एरव्ही सगळा कोरडाठाक मामला होता. सहा वर्षांपूर्वी नंदूच्या काकांनी कर्जबाजारीपणापायी स्वतःला संपवलं होतं, जे की पूर्णतः चुकीचे नि अयोग्य होतं. शांतारामाच्या पाठीमागे त्याची पत्नी आपल्या दोन लहान मुलींना घेऊन कायमची माहेरी निघून गेली. नंदूच्या कुटुंबातील खाणारी तोंडे कमी झाली असली तरी जिवाभावाची माणसं कायमची निघून गेल्याचं दुःख सर्वांनाच होतं.

भावाच्या अकाली जाण्याने आत्माराम खचून गेला. पण नंदूच्या आजोबांनीच त्याला धीर दिला. पाऊसपाणी नसेल तेंव्हा नंदूचे अख्खं घरदार रोजंदारीवर कामाला जाऊ लागलं. अपवाद फक्त नंदूच्या अंध आज्जीचा होता. ती बिचारी घरात बसून राही. नंदूची लहान बहिण वनिता हिचा सांभाळ करी. नंदूची आई मालनबाई ही खूप कामाची बाई होती. तिच्या अंगाला गेल्या कित्येक वर्षात नवं कापड नव्हतं पण बिचारीची कसली तक्रार नव्हती. घरात बऱ्याचदा ताजं अन्न नसे, तेंव्हा मायमाऊली स्वतः उपाशी राहून जे आहे ते सर्वांच्या ताटात वाढत असे. आत्माराम हा पहाडी कष्ट करणारा माणूस होता. त्याच्या अंगावरचे जाड्याभरड्या मांजरपाटाचे कपडे मातकट कपडे घामाने ओले झालेले असत तरीदेखील त्याचे हात थांबलेले नसत. आपल्या अंध आईसाठी, थकलेल्या वडिलांसाठी आणि नंदू वनिता साठी ते अफाट काबाडकष्ट करत असत. शेळके कुटुंब कसे तरी करून हाती आलेल्या भाकरीच्या चंद्रात नशिबाची चकोर शोधत असे. आपल्या गरिबीची, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेला नंदू त्यामुळेच अत्यंत जिद्दीने शिकत असे. मन लावून अभ्यास करे. शाळेतील सर्व शिक्षक आणि मित्र त्याला मदत करत. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा.

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात शाळांचे वर्ग बंद झाले. नंदूसाठी त्याच्या वडिलांना स्वस्तातला मोबाईल विकत घ्यावा लागला. त्याचे देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते. पूर्वी शाळा नित्य भरायची तेंव्हा नंदूला त्याचे बाबा पाच किलोमीटरचे अंतर कापत सायकलवरून आणून सोडत, शाळा सुटल्यावर गावाकडे माघारी जाणारा टमटम रिक्षावाला त्याच्यावर दया दाखवून घरी घेऊन यायचा. मात्र ऑनलाईन वर्ग मोबाईलअभावी नंदूला लवकर शक्य झाले नाहीत तरीदेखील त्याने पहिला नंबर कायम ठेवला. मागच्या वर्षी आक्रीत घडलं, नंदूचे वडील कोरोनाच्या साथीत दगावले. त्यांच्या घराचा आधार कोसळला. त्या दरम्यानच्या काळात नंदूच्या काकीने एक गाय सांभाळायला दिली होती तिला पहिल्या वेतात एक गोऱ्हा झाला. त्या खोंडाचा सांभाळ करता करता नंदूला मुक्या प्राण्यांची आणि शेतीवाडीची गोडी लागली. वडील गेल्यानंतर त्याने गावातली गुरे वळण्याचे काम सुरु केले त्यासोबत आपलं पांढरं शुभ्र मखमली खोंडही तो घेऊन जायचा. दुपारनंतर आपल्या आईसोबत हजेरीच्या कामावर तो जाऊ लागला. दमून घरी आल्यावर असतील ते चार घास खाऊन झोपी जाण्याआधी जमेल तसा अभ्यास करू लागला. त्याच्या आईने, आजी आजोबाने खूप सांगितले तरी त्याने आपला हेका सोडला नाही. शिवाय त्याला गायीचा अफाट लळा लागला होता. आता आपण शाळेत कसं जाणार? आधीच घरात कमावणारं कुणीच नाही त्यात आपला खर्च वाढणार त्यापेक्षा आपणच थोडेसे काम करून शाळेला सुट्टी दिली पाहिजे असं त्याचं किशोरमन सांगत होतं. किती गुणी पोर होता तो! त्याला आपल्या कुटुंबाची नि त्यांच्या कष्टांची पैशाची किती किंमत होती ना! त्यासाठी त्यानं आपलं शिक्षण पणाला लावलं होतं. नंदू शाळेत येणार नाही हे कळताच साळे सरांनी त्याच्या घरी जाऊन समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो लहानगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आपण घरी लक्ष दिले पाहिजे, अंध आजीला सहारा दिला पाहिजे आणि घराचे ओझे उचलले पाहिजे आपल्या वडिलांची कमी भासू देता कामा नये असा निश्चयच त्याने केला होता. त्यापुढे साळे सरांचे काहीच चालले नाही. हा सर्व वृत्तांत त्यांनी वेळोवेळी कदम सरांच्या कानी घातला होता. कदम सरांच्या घरी नंदूविषयी असीम मायेची नि प्रेमाची प्रतिमा तयार झाली होती. त्याच्यावरील प्रेमापायीच आता ते नंदूच्या गावी आले होते.

"नंदू ए नंदू!"
कदम सरांनी आवाज देताच आपल्या खोपटातून नंदू बाहेर आला. साक्षात आपले हेडसर, प्राचार्य घरापाशी आलेले पाहून त्याला गहिवरून आलं आणि धावतच जाऊन त्याने त्यांना मिठी मारली. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. एक शब्दही न बोलता दोघांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. त्या दृश्याने सिद्धार्थचेही डोळे पाणावले. त्याने नंदूला घट्ट मिठी मारली.

कदम सर नंदूला कवटाळून त्याच्या घराबाहेरील बाजेवर बसले. त्यांचा आवाज ऐकून नंदूची आजी आजोबा बाहेर आले. अत्यंत विनम्रतेने सरांनी त्यांचे चरणस्पर्श केले. थोड्याच वेळात नंदूची आई देखील धावत पळत धापा टाकत तिथे हजर झाली. कदम सरांना पाहून तिला कोण आनंद झाला! त्या मायमाऊलीच्या डोळ्यांना धारा लागल्या. कदम सरांना राहवले नाही, पुढे होत त्यांनी नंदूच्या आईच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, ताई रडू नका, तुमचा हा भाऊ अजून जिवंत आहे. सगळं माझ्यावर सोडा. फक्त नंदूला शाळेसाठी राजी करा. बाकी सगळं मी सांभाळतो!"
त्यांचे हे उद्गार ऐकून नंदूच्या वयोवृध्द आजीआजोबांनी हात जोडले. कदम सर त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांना मायेने जवळ घेतलं. नंतर बरीच चर्चा झाली. कदम सर आणि सिद्धार्थ तिथून हसतमुखाने समाधानी मुद्रेने बाहेर पडले. निघताना नंदूच्या आईने त्यांच्या हातावर पिवळ्याजर्द गुळाचा छोटासा खडा ठेवला.

त्या दिवसापासून नंदूची शाळा पूर्ववत सुरु झालीय. आता तो कदम सरांच्या घरी राहतोय. सिद्धार्थशी त्याची चांगली गट्टी जमलीय. नंदूजवळची गाय आणि तिचे खोंड तालुक्याच्या गावी गोशाळेत देखभालीसाठी ठेवलेय, तिथे असणारा सरांचा शिष्य नंदूच्या घरी लिटरभर दुध पोहोच करतो. नंदूच्या घरी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरांनी सरकार दरबारी विशेष प्रयत्न केले त्याला यश आलेय. त्याच्या घरची आर्थिक तंगी काही अंशी तरी दूर झालीय. नंदूचं दुःख आभाळाहून मोठं असलं तरी त्याचं समजूतदार मन त्याहून विशाल आहे त्याच्या बळावर तो आयुष्यात यशस्वी होणार याची खात्री आहे.

दिवसभर अभ्यास करून रोज रात्री नंदू झोपी जातो तेंव्हा त्याच्या स्वप्नात गाव येतं, घर येतं. थकलेले आजोबा आणि अंध आजी त्याचा लाड करताना दिसतात. आईच्या मखमली हातानी जोजवत तिच्या कुशीत झोपल्याचा त्याला भास होतो. रात्री कधी जाग आलीच तर त्याची नजर दूर निळ्याकाळ्या आभाळात जाते, जिथे लुकलुकत्या चांदण्यात त्याला त्याच्या प्रेमळ वडिलांचा हसरा चेहरा दिसतो, मग नंदू पुन्हा डोळे मिटून शांतपणे झोपी जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा