मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धा वालकरच्या निमित्ताने - मुलींना समजून घेतलेच पाहिजे!श्रद्धा वालकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झालेय. त्याने मुंबईतील एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी घेतली. व्यवसायाने तो फूड ब्लॉगर आहे, तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवतो.
मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाशी भेट झाली. आरोपी आफताब हा श्रद्धा जिथे राहत होती त्याच परिसरात राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघांचे प्रेम झाले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा हे जोडपे दिल्लीत स्थलांतरित झाले आणि छतरपूर परिसरात, मेहरौली येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले अशी माहिती समोर येतेय. तिथे ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. काही महिन्यांनी तिने लग्न करण्याचा तगादा लावला. त्याने नकार दिला आणि त्यानंतर तिचं जे काही केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे, माणूसकीला काळीमा फासणारं नि प्रेम या शब्दाला बदनाम करणारं आहे.

या पाशवी नराधमाने आपल्या प्रेयसीचा उपभोग तर घेतला मात्र नात्याला नाव द्यायची वेळ आल्यावर तिचा खून केला. तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले! हात थरकापले कसे नाहीत त्याचे?

त्यानंतर त्याने तीनशे लिटर क्षमतेचा फ्रिज आणून त्यात तिच्या देहाचे तुकडे ठेवले. रोज मध्यरात्री दोन वाजल्यानंतर तो घराबाहेर पडायचा नि दिल्लीच्या सर्वदूर भागात तिच्या देहाचे तुकडे टाकून यायचा. असं त्यानं तब्बल अठरा दिवस केलं.

श्रद्धाची सोशल मीडियावरची अनुपस्थिती लक्षात येताच घटनेनंतर सहा महिन्यांनी तिच्या पालकांनी मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी आफताबला बोलतं केल्यावर त्याने सारं ओकलं.

हाच आफताब सोशल मीडियावर पर्यावरण, स्त्रीमुक्ती, खरे स्त्रीसौंदर्य यासह एलजीबीटी कम्युनिटीवर आधारित लिंगभेदमुक्ती विषयीच्या गप्पा हाणताना दिसतो.
त्याच्या पोकळ नैतिकतेच्या मुखवट्याआडचा चेहरा अत्यंत क्रूर हिंसक नि अमानवी आहे हे त्या मुलीला कळले नसेल!
इथे असे फसवे मुखवटे कितीएक असतील. म्हणून तरी माणसांची पारख असली पाहिजे.

'प्रेम सांगून वा ठरवून होत नाही' हे मी देखील मानतो मात्र आपण ज्याच्यासोबत आयुष्य काढण्याची स्वप्ने रंगवतो त्याचे विचार काय आहेत, त्याची मनोवृत्ती कशी आहे, त्याचं आपल्यावर खरेच प्रेम आहे का, शरीराच्या उपभोगानंतर पुढे काय असणार आहे, आपल्या नात्याला ओळख मिळणार आहे का, प्रेमाआडून आणखी काही साध्य करण्याचा छुपा हेतू आहे का इत्यादी बाबींवर किमान विचार तरी केला पाहिजे.

अलिकडच्या काळात अशा घटना सातत्याने घडत असूनही मुलींचे डोळे का उघडत नसावेत? 'प्रेम आंधळं असतं' हा फिल्मी डायलॉग आताच्या खुल्या नि मोकळ्या वातावरणाच्या काळात उचित वाटत नाही. नीटनेटका विचार करुन, चौकसपणे माहिती घेऊन, सारासार विवेक न गमावता पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. जन्मदात्यांच्याच मर्जीनेच आयुष्याचा जोडीदार निवडणं सक्तीचं नसलं तरीही त्यांच्या मतांचा, विचारांचा साधक बाधक विचार करायला हरकत नसावी.

आफताबच्या घोर अपराधाची त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने ज्या थंड डोक्याने, कमालीच्या निर्ममतेने श्रद्धाचा खून करत तिच्या देहाची जी विल्हेवाट लावलीय ती पाहता त्याच्यातल्या क्रौर्याची, निर्विकारपणाची, अमानवी वृत्तीची कल्पना यावी. या क्रूरकर्म्यास फासावरच लटकवले पाहिजे.

नाती कुठलीही असोत कौटुंबिक हिंसा ही आढळतेच.
घरगुती हिंसाचार जसे की बायकोला मारहाण करणे, सासरच्या मंडळींकडून जिवंत जाळणे वा फासावर लटकावणे असे प्रकार इतके नित्याचे झालेत की आपण त्याला निर्ढावले आहोत आपल्याला त्याचे दुःख वाटेनासे झालेय.
विवाहित स्त्रियांना हिंसेस अजिबात सामोरे जावे लागत नाही असे कुणाला वाटत नसेल तर तो त्याचा गैरसमज आहे.
मुळात लग्न झालेल्या बाईला मारझोड होणे वा तिने मनासारखे वागले नाही वा मागण्यांची पूर्तता केली नाही तर विहिरीत लोटून देणे याविषयी आपला संताप कधीच विझून गेला आहे.

'लिव्हइन'कडे आपण एका चमचमीत नि खमंग नजरेने पाहत असल्याने त्यातून समोर येणारा हिंसाचार अधिक ठळकपणे अधोरेखित करून नकळत कथित विवाहसंस्थेची साईड बळकट करून घेत असतो!
लग्न असो वा लिव्हइन असो आपला जोडीदार पारखूनच घेतला पाहिजे, त्याच्या मानसिकतेविषयी पुरता अंदाज आल्याशिवाय पुढची पाऊले उचलू नयेत हे लख्ख स्पष्ट आहे.

आफताबचा सोशल मीडियावरचा वावर स्टायलिश होता. 
श्रद्धाखेरीज आणखी काही मुलींशीही त्याची मैत्री / संबंध होते. यावरून त्या दोघांत खटके उडत. 
श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या देहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाही त्याने एका मुलीला डेटवर घरी आणल्याची माहिती समोर येतेय. 
मात्र ही माहिती खरी असेल तर अन्य मुलींची सद्यअवस्था काय आहे यावरही प्रकाश पडला पाहिजे. ही सर्व माहिती खरी असेल तर यात आणखी कोणी सामील आहे का याचाही तपास व्हायला हवा आणि असे करण्यामागचे सर्व हेतू शोधून पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

या हत्याकांडानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत त्या अनुषंगाने काही सवाल विचारावेसे वाटतात, काही मुद्दे प्रकर्षाने समोर येतात -      
मुलींचे शोषण होण्याचे सरासरी वय कोणते आहे हे आपल्याला नेमके ठाऊक आहे का?
साधारण चार पाच दशकांपूर्वीच्या काळापर्यंत मुली आठवी नववीत असताना मेन्स्ट्रुएशन यायचे. दशकानुगणिक हे प्रमाण खालच्या इयत्तेत येत राहिलेय.
आता परिस्थिती अशी झालीय की चौथी पाचवीतल्या मुली देखील 'शहाण्या न्हात्या धुत्या(?!)' होऊ लागल्यात.
हे कसे काय घडत गेले, याची कारणे काय हा वेगळा लेखनविषय आहे. इथे मुद्दा तो नाहीये.

सहावी सातवीत जाईपर्यंत मुलगा हा तिच्या दृष्टीने नव्या परिघात मोडू लागतो. शिकण्याचे माध्यम कोणत्याही भाषेचे असूद्यात {विश्वास बसत नसेल तर तुम्ही मुलींच्या शाळेतील शिक्षकांशी अनौपचारिक गप्पा मारून बघा) ही स्थिती सगळीकडे कमीअधिक प्रमाणात सारखीच आहे. फरक फक्त ग्रामीण आणि मोठ्या शहरातील शाळांत उरलाय, मात्र हे लोण तिथेपर्यंतही पोहोचलेय.

मुलींना मुलाबद्दल काय वाटते? त्यांच्या मनातील आकर्षणाचे अर्थ काय? प्रेमाचं नि संसार करण्याची स्वप्ने पाहण्याचे वय कोणते नि शालेय वयातले प्राधान्यक्रम काय यावर शाळेंत खुलेपणाने बोललं जात नाही.
परिणामी याच वयात मुलींचे शोषण सर्वाधिक होते.

बाह्य रूपास भुललेल्या मुली पालकांचं अजिबात ऐकत नाहीत कारण त्यावेळी त्यांचं मन आकंठ प्रेमात देहआकर्षणात बुडून गेलेलं असतं.
मुळात त्यांचं वय ते किती असतं? त्यांच्या अंगी परिपक्वता तरी किती असेल? जो संयम मोठ्यांच्या अंगी पुरता दिसत नाही तो त्या धगधगत्या वयात कसा आढळणार? या टप्प्यावर मुलींना समजून घेणं खूप गरजेचे आहे.

याच विषयांवर काही शाळांत नि कनिष्ठ महाविद्यालयांत बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. बोलताना मी अगदी आडपडदा न ठेवता अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय, मात्र यासंदर्भातले अनुभव भिन्न आहेत. एका महाविद्यालयांत आधीच सूचना केली गेली की कृपया अमुक एक उल्लेख टाळावेत आणि तमुक एक उल्लेख आवर्जून करावेत, मी सपशेल नकार दिला. जे उल्लेख टाळा असं सांगितलं होतं ते केले नाहीत मात्र त्यांनी ज्यावर भर दिला होता ते उल्लेख काही केले नाहीत.
मात्र काही उल्लेख निश्चयपूर्वक करतोच.

जसे की मुलींना फसवणारे वा भुलवणारे हे बहुतांश करून त्यांचे मित्र, परिचित,शेजार परिसरातील वा नात्यातीलच 
असतात.
सुरुवात मध्यस्थापासून होते जी मोस्टली मैत्रीण वा त्या मुलाची परिचित असते! सर्व संवाद रेकॉर्ड करून ठेवले जातात, चॅट केलेलं असेल तर त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले जातात.
मग आऊटींग म्हणजे बाहेर फिरणं होतं ( हे काहीही असू शकतं जसं की सिनेमा, हॉटेलिंग, गार्डन व्हिजिट, बर्थडेपार्टी वा फ्रेंड्स मीट इत्यादी).
इथे मुली सर्वाधिक फसतात, इथे तिसरा कुणी तरी आधीच उपस्थित असतो ज्याने सर्व शूट केलेलं असतं वा त्या मुलानेच कधी कळत तर कधी नकळत सेल्फी घेतलेली असते, कधी व्हिडीओ शूट केलेला असतो.
इथून खेळ सुरु होतो. हे फोटो / व्हिडीओ मॉंर्फ केले जातात आणि त्या मुलीला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेशर आणलं जातं.
या टप्प्यावर मुलीचे पालकांशी विश्वासाचे संबंध असले की समस्या निपटली जाऊ शकते मात्र असं खूप कमी घडतं.
मग ती मुलगी कधी खुशीने तर कधी बळजोरीने राजी होते.
पुढे जाऊन मुलींची अदलाबदली होते, मुलं मुली बदलले जातात आणि किस्सा तोच राहतो!
कित्येक महाविद्यालयीन मुलांच्या मोबाईलमध्ये आपआपल्या 'जीएफ'सोबतच्या सेक्ससंबंधी खमंग गप्पा आढळून येतात.

या मुली मग दिशाहीन होतात आणि अशातच कुणी एक गाठ पडतो जो नितांत प्रेमाचे नाटक करतो. या वेळी मुलगी अजूनच गाळात रुतून बसते. मग तो आफताबही असू शकतो!
आपली मुलगी काय करते?
तिच्या फोनचा वापर ती कसा करते?
ती कोणाशी बोलते?
तिची क्लोज फ्रेंड खरेच क्लोज आहे का?
तिची मैत्रीण / मित्र कोण नि कसे आहेत? शाळा / कॉलेज / क्लासेस ती नियमित अटेंड करते का?
फ्रेंड्स पार्टी वा अन्य कुठेही ती गेली तरी तिच्या येण्याजाण्याची खरी तंतोतंत माहिती बहुतांश पालकांना नसते.

मुलींना हे सांगावेसे वाटत असते मात्र कधी भीती आड येते, तर कधी आईवडील जुनाट विचारांचे वाटतात तर कधी कसं सांगायचं हा मुद्दा असतो!
तर कधी थ्रिलची अनुभूती खुणावत असते तर कधी तारुण्यसुलभ भावनांनी मुलींच्या भावनाआवेगांवर ताबा मिळवलेला असतो,
तर कधी त्यांना धाकधपटशाचा अवलंब केलेला असतो!
याही व्यतिरिक्त आणखी बरीच कारणे असतात जसे की पालकांचेच आपसात पटत नसते, घरात सतत कलह सुरु असतात, मुलींना प्रायव्हसी नसते आदी.

या वयातील मुलींना 'शेण खाऊन वाहवत गेली' वा 'खानदानीला बट्टा लावला' म्हणून कुणी दुषणे देत असेल तर त्या व्यक्तीची मी मनापासून कीव करतो, कारण मुलींवर दोषाचे खापर फोडून झाले की समाज, कुटुंब व्यवस्था आपले हात झटकण्यास मोकळी झालेली असते!

या मुलींशी समजेल अशा पद्धतीने आणि रुचेल अशा शैलीनेच बोललं पाहिजे.
किंबहुना नुसतं बोललं पाहिजे यावर न थांबता त्यांना बोलतं केलं पाहिजे, काय योग्य काय अयोग्य हे समजावून सांगितलं पाहिजे.
कोणती खबरदारी घेतली पाहिजे, विश्वास टाकण्याआधी कोणत्या बाबी तपासून घेतल्या पाहिजेत हे मुलींना अगदी सहजी सांगता येतं.
काही कॉलेजमधून याचे चांगले अनुभव आले.
याविषयी सामाजिक मानसिक प्रयोग केले पाहिजेत ज्यात पालक प्राध्यापक शिक्षक यांचेही सहकार्य लागते.
हरेक कॉलेजेस, शाळांमध्ये यावर बोललं गेलं पाहिजे.
नुसताच आक्रोश व्यक्त करून आणि भेदाभेद करून काहीच साध्य होणार नाही कारण येणारा काळ याहून वाईट असणार आहे तेंव्हा आपणच मार्ग काढले पाहिजेत.

आपल्या घरी, शेजारी, नात्यांत, मित्र परिवारात पौगंडावस्थेतली वा नवतरुण मुलगी असेल तर तिच्याशी अगदी खेळीमेळीचे, सुसंवादी नि सच्च्या स्नेहाचे संबंध असूद्यात. तिच्यावर नजर राखण्याचा एककलमी कार्यक्रम करत असाल तर तुम्ही गंडले जाल त्याऐवजी तिला बोलतं ठेवा, तिचे बेस्ट फ्रेंड बनले पाहिजे!

सोशल मीडियावर आक्रोश / संताप वा बुद्धिभेद करून काहीच साध्य होणार नाही. कृती केली पाहिजे. मुलींना समजून घेतले पाहिजे आणि भरकटण्यापासून वाचवले पाहिजे! हे शक्य आहे!!

श्रद्धासारखीच मात्र काहीशा वेगळ्या पार्श्वभूमीची एक केस मागच्या महिन्यात माझ्या आजोळकडील नात्यातल्या व्यक्तीने निदर्शनास आणली होती.
आई वडील विभक्त, वडील व्यसनी. मोठ्या बहिणीचे लग्न तोंडावर आलेले नि धाकटी बहीण घरातून निघून गेली!
खानदानी जातीचा अभिमान, वर खोट्या इभ्रतीचा सवाल!

घर सोडून गेल्यानंतर तिचा माग काढताना फारशी शोधाशोध करावी लागली नाही. तिच्या मित्राच्या घरी पुण्यानजीक ती राहू लागली होती. अर्थातच त्याने तिचे शोषण सुरू केलेलं.
क्लिप्स बनवल्या, नशेची औषधे दिली नि तिला एक साधन बनवले.
माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क केला, पोलिसानी अवघ्या काही तासांत त्याला शोधून काढले.

मात्र मुलीने मुलाच्याच बाजूने स्टेटमेंट दिले.
तक्रार देणाऱ्यांच्या मनात काळेबेरे आहे असा उलटआरोप केला!
पोलिसांच्या दृष्टीने माझी टीप कुचकामी ठरली, तोंडघशी पडलो.
असे असूनही त्या मुलीचे कौन्सिलिंग करण्याचे प्रयत्न दुसऱ्या बाजूने सुरूच आहेत.

मुलीला आपल्या मात्या पित्यांविषयी ममत्व नाही हे जरी मान्य केले तरी आपण जे करतो आहोंत त्यातून आपल्या आयुष्याची माती होणार आहे याची परिपक्वता तिच्या अंगी नाही हे मला नि त्या मध्यस्थाला कळतेय, मात्र मुलीला ते कळत नाहीये.
कारण सध्या तिची विचार करण्याची क्षमताच खुंटली आहे.
अशा अवस्थेत तिच्यावर चिडून चालणार नाही.

"तिनेच हा मार्ग निवडलाय ना, मग मरूद्यात तिला!" असे म्हणणारे लोक म्हणूनच मला आवडत नाहीत!
मुलींना समजून घेतले पाहिजे! त्यांच्या चुका सुधारून त्यांच्यासाठी परतीचा एक दरवाजा कायम उघडा ठेवला पाहिजे!

अशीच आणखी एक घटना - 

पुणे परिसरातीलच घटना. मुलगी इयत्ता नववीमधली. लॉकडाऊनच्या आधीचा महिना.
परीक्षा जवळ आल्याने मुलगी क्लासला जाते म्हणून निघून गेली ती परत आलीच नाही.
मुलीच्या घरच्या मंडळींनी घराण्याची इज्जत जाईल या भीतीपोटी दोन दिवस अक्षरशः वाया घालवले.
नंतर रीतसर तक्रार देण्यात आली. त्यांच्या एका परिचिताने तिचा सगळा बायोडाटा मलाही पाठवला.

माहिती घेता कळले की मुलीचे एका मुलावर प्रेम होते, आईवडिलांनी अनेक बंधने लादली बळ वापरून मुलाचे कुटुंब वेगळ्या शहरात हलवले. मुलीचा मोबाईल काढून घेतला.
तिची सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलिट करण्यात आली. तिच्यावर पाळत ठेवण्यात आली, मुलगी आता कह्यात आलीय या विचाराने त्यांनी घरानजीक असणाऱ्या क्लासमध्ये जाण्याची परवानगी दिली.
तिथून ती मुलगी गायब झाली.

ती त्या दिवशी क्लासला गेलीच नव्हती असं नंतर कळलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेनरोडवरील क्रॉस करतानाची दृश्ये वगळता खास काही दिसले नव्हते.
सगळे हैराण झाले. मात्र खऱ्या अर्थाने चकित तेंव्हा झाले जेंव्हा मुलीने वापरलेली चतुराई(!?) समोर आली.
तिने ट्युशनमधील मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये मैत्रिणीच्या नकळत इंस्टाग्राम अकाउंट उघडले होते आणि ट्युशनमध्ये गेली की त्या मुलाशी ती चॅट करायची.
त्याने कुठून कधी निघायचे हे सगळे निश्चित केले यासाठी एक मध्यस्थ निवडला जो त्या मुलीच्या घरी अगदी सटरफटर कामासाठी काही काळ येऊन गेला होता.
मुलीने मोठ्या विश्वासाने त्या मधल्या पोराच्या हाती आपली बॅकपॅक दिली आणि ती ट्रेनमध्ये बसली.

त्याने घात केला नि तो तिला पाटण्याला त्याच्या गावी घेऊन गेला.
एक आठवडा त्याने तिला घरी ठेवलं. मुलीच्या मित्राने त्या अकाउंटवर चॅट केलं पण रिप्लाय आला नाही, त्याला वाटलं घरच्यांनी पुन्हा अडवलं असेल.
नेपाळ सीमेनजीक ह्युमन ट्रॅफिकींगमधल्या काही लोकांनी त्या मुलीची टीप दिली आणि मुलगी सुखरूप घरी आली. आता मुलीकडे मोबाईल आहे, तिचे सोशल मीडिया अकाउंट देखील रिस्टोअर केलं गेलंय मात्र तिचे आईवडील तिचे बेस्ट फ्रेंड झालेत!

मुलींना समजून घेतलं पाहिजे हेच मी इथेही लिहीन. हे लेखन कदाचित ती देखील वाचत असेल आणि केलेल्या चुकीला सुधारता आलं म्हणून समाधानही वाटत असेल!

- समीर गायकवाड 

#shraddhamurder #live-in #sameerbapu
#love #murder #religion #girls #feminism 
#sameergaikwad #समीरगायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा